वैरण - III Subhash Mandale द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वैरण - III

वैरण
भाग-III

तानाजीचे मन गाव सोडायला तयार नव्हते.पण करणार काय, बघितलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण धुळीस मिळाल्या होत्या.शिवाय कमावणारे हात गमावले होते.बाबा गेल्यानंतर दोन दिवस शेजारच्या लोकांनी जेवण पुरवलं.त्यानंतर स्वत:च्या घराची काळजी सत:च करावी लागते. आईच्या काळजीखातर नाईलाजाने तो गाव सोडायला तयार झाला.

वैरण भाग-II पासून पुढे...,

तानाजीच्या आईने गावकडे आलेले संघर्षमय अनुभव सांगितल्यानंतर ती पुढे बोलायला लागली,
"तानाजी आणि मी पुण्यात आलो.आबाकाकांच्या मित्राने राहण्याची सोय केली पण पंधरा दिवस कामाचा पत्ता नव्हता.शिवाय इथे आमच्या ओळखीचं कोणी नव्हतं आणि त्यात........."
"त्यात माझी आणि तानाजीची भेट झाली.त्याला बघितल्यावर मला जाणवले की त्याला कामाची नितांत गरज आहे.मग मी माझ्या ओळखीने त्याला काम मिळवून दिले."आईचं वाक्य पुर्ण व्हायच्या आत तिलोत्तमा पुढचं बोलली.

गप्पा इतक्या रंगल्या होत्या की तानाजी सगळी कामं आटोपून आॅफिसला जाण्याच्या तयारीत त्यांच्याजवळ कधी येऊन बसला होता हे त्यांना समजलेच नाही.
"खूप वेळ झाला आहे,तुझ्या गप्पा मारायच्या झाल्या असतील तर चल."अगदी हक्काने तानाजी आपल्या मानलेल्या बहिणीला तिलोत्तमा हिला बोलला.

"तर तर लय वेळेच्या बाता करतोयस,चल."असे म्हणून तिलोत्तमा आणि तानाजी,तिलोत्तमाने आणलेल्या मर्सडीज कार जवळ आले. तिलोत्तमा कार चालवायला बसली.तिच्या शेजारच्या शीटवर तानाजी बसला.

तिलोत्तमाने गाडी चालू केली त्याबरोबर तिच्या गप्पा सुरू झाल्या.
"तानाजी, खरंच तुला गरज आहे का कंपनीत बारा-चौदा तास काम करायची?"

"होय, पैशाची गरज आहे?"

"फक्त पैशासाठी?"
तिलोत्तमा तानाजीचा उद्देश जाणून घेण्याच्या उद्देशाने विचारू लागली.

"नाही, मी प्रोडक्शन प्लॅन कम्प्लीट करणार हा साहेबांचा विश्वास आहे. माझा जीव गेला तरी बेहत्तर मी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही."
कंपनीबदलची तानाजीची आत्मियता पाहून तिलोत्तमाला स्वत:बद्दल अभिमान वाटू लागला. की आपण एका कर्तव्यनिष्ठ माणसाची बहीण आहे.ती पुढे बोलू लागली,
"आईने तुझे गावाकडचं जीवन सांगितले, वाईट वाटलं,ग्रेट आहेस तू , आता विसर म्हैस, वैरण आणि गाव.इथं तुला पस्तीस हजार रुपये पगार मिळतोय, मजेत जीवन जग."

"माझं ध्येय निश्चित आहे आणि माझ्या जीवनाचा उद्देश गावच्या वैरणीचा प्रश्र्न सोडवणे हाच आहे, त्यामुळे मी इथं शहरात जीवन जगू शकत नाही,वैरणीच्या नादात मी माझं सगळं गमावले आहे,ते मला पुन्हा मिळवायचं आहे."

"त्यासाठी काय करणार आहेस, काय ठरवलं आहे का?"

" जे ठरवलं आहे,ते गावी गेल्यावरच होईल, थोडं पैसे जमा होईपर्यंत किमान सहा महिने पुण्यात रहावं लागेल."

"त्याची काही आवश्यकता नाही, मी कंपनीच्या अकॉंटमधुन दहा लाख रुपये तुझ्या खात्यावर जमा करण्याची व्यवस्था करेन."

"कसं शक्य आहे? तू एक सामान्य सेक्रेटरी आहेस ना?"

"नाही,ही कंपनी माझ्या पप्पांची आहे, कंपनीच्या एम्प्लाॅयचा अॅटीट्यूड जाणून घेण्यासाठी मी माझी ओळख लपवून ठेवली आहे.शिवाय खालच्या लेवलवर काम करण्याचा अनुभव मला घ्यायचा आहे."

"पैसे नकोत,आधीच तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर",तानाजी स्वाभिमानाने बोलला.

"बहीण माणतोस ना?मग उपकाराची भाषा का करतोस,ते काही नाही उद्याच पैशाची व्यवस्था करून देईन."
चर्चा चालूच होती. तोपर्यंत कार कंपनी जवळ पोहोचली.कारच्या वेगापेक्षा तिलोत्तमाच्या निर्णयाचा वेग खूप होता.ती कारमधून उतरली आणि त्याला घेऊन थेट एम.डी.साहेबांच्या आॅफिसकडे गेली.केबीनचा दरवाजा नाॅक न करता ती सरळ आत घुसली.
"पप्पा, माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे."
तिलोत्तमा आज आपल्याला कंपनीच्या वर्करसमोर 'साहेब' न म्हणता पप्पा म्हणाली याचं त्यांना आश्चर्य वाटले.कारण आॅफिसमध्ये पप्पा म्हणायचे नाही असे अगोदरच ठरले होते.
"हा बोल, काय काम आहे?"
"पप्पा मला दहा लाख रुपये हवे आहेत,शिवाय तानाजी उद्यापासून कंपनी सोडणार आहे."

हे ऐकताच साहेब जागेवरून ताडकन उठले.

"तिल्लु हे काय सांगतेस,तो आपल्या कंपनीत आल्यापासून कंपनीचं प्राॅफिट तीस टक्क्यांनी वाढलं आहे, सहा महिन्यांत अठरा लाख रुपयांचा कंपनीला फायदा झाला आहे.(तानाजीकडे बघून) पगार वाढवून पाहिजे का? पस्तीस हजार ऐवजी सत्तर हजार रुपये पगार देईन पण कंपनी सोडू नकोस."

"पप्पा, त्याला स्वत: साठी नाही तर गावच्या भल्यासाठी काम करायचे आहे आणि त्यात मी त्याला मदत करणार आहे."

"कशाला स्वत:चं नुकसान करून घेतोस?, मी ही खेडेगावातूनच आलोय, गावाकडच्या खाचखळग्यांमध्ये तुला फक्त दु:खच मिळेल", साहेब समजावण्याच्या उद्देशाने बोलले.

"माझं ध्येय निश्चित आहे, उद्देश पक्का आहे त्यामुळे खाचखळग्यांच्या रस्त्याने चालताना दु:ख जरूर जाणवेल पण मस्तकावर बाबांचा आशीर्वाद आणि पाठीवर आईचा हात असल्यावर काट्याकुट्यांनी भरलेला रस्ताही सहज पार करेन."

"तानाजी,गावी तुला धुळ मातीशिवाय काही हाती लागणार नाही."

"त्यात तुमचा दोष नाही,'निसर्गापासून माणूस दूर गेला की त्याचे जीवन एकांगी होऊ लागतं.त्या कृत्रिम, एकांगी जीवनात त्यांच्या कल्पना, भावना,वासना या सर्वच गोष्टी विकृत स्वरूप धारण करतात' येतो मी "असे म्हणून तो केबिनच्या बाहेर आला.

"मस्तकावर बाबांचा आशीर्वाद,पाठीवर आईचा हात आणि या बहीणीची साथ तानाजीला असेल."

"म्हणजे??"

"होय पप्पा, मी ही तानाजी सोबत त्याच्या गावी जाणार आहे."

"तू खूप हेकेखोर आहेस, एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती तू करणारच, तुला काय करायचंय ते कर.तुला कंपनीची थोडीही काळजी नाही."साहेब वैतागून म्हणाले.

"मला माझ्या भावाची तानाजीची काळजी आहे.",
असे म्हणून तिने आधीच सही करून ठेवलेल्या चेकबुकमधून एक चेक घेतला आणि पटकन बाहेर पडली.साहेब मात्र अवाक् होऊन बघतच राहिले.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिलोत्तमाने तानाजी आणि त्याच्या आईची गावी जाण्याची व्यवस्था केली.तिलोत्तमाचे हृदय भरून आले होते.तिची आई देवाघरी गेल्यापासून पप्पांशिवाय ती एक दिवसही कुठे राहीली नव्हती.ती जड अंतःकरणाने गावी निघाली होती.
तिला वाटले होते की,पप्पा शेवटच्या क्षणी तरी निरोप द्यायला येतील.पण तसे काही झाले नाही.न राहून तिलोत्तमाने तानाजीला घट्ट मिठी मारली.तानाजी वडील वारल्यानंतरही रडला नव्हता पण आज तो अश्रू आवरू शकत नव्हता.त्याला ही परिस्थितीशी लढायची प्रेरणा देत होती.त्याने स्वत:ला सावरले आणि 'आई, तिलोत्तमा आणि तो कर्तव्यपुर्तीसाठी गावी आला.'
गावात आल्याबरोबर ते तिघेही परीला पुरले होते तेथे गेले,त्या मातीला प्रणाम करून ते तसेच पुढे स्मशानभुमीकडे गेले.तेथेही तिघांनी थोडं थांबून स्मशानभूमीत राखेला नमस्कार करून घराची वाट चालू लागले.तानाजी घरी पोहोचला.तानाजी आणि तिलोत्तमाने आडातून रहाट शेंदून दोन हंडे पिण्यासाठी पाणी आणले. सायंकाळ झाली होती तरीही तो आबाकाकांच्या घरी गेला आणि त्यांना ठरवलेलं नियोजन सांगितले.तानाजीची तळमळ पाहून त्यानी दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामपंचायत सदस्यांची तातडीची बैठक बोलावली.
बैठकीत कॅनॉलने गावोगावी पाणी पुरवठा करणाऱ्या टेंभू योजनेच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठीआमदार साहेबांना भेटायला जाण्याचे ठरले.सर्व सदस्य एक मताने सहमत झाले.
त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी ग्रामपंचायत सदस्य आणि गावची प्रतिष्ठीत माणसं घेऊन आमदारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
तानाजीने आमदारसाहेबांना टेंभू योजनेचे काम मंदगतीने होण्याची कारणे विचारली.
त्यावर त्यांनी उत्तर दिले,"सरकारकडून मुबलक प्रमाणात निधी मिळाला आहे पण कामासाठी मजूर कमी पडत आहेत."

"आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करू.", गावकऱ्यांच्या वतीने तानाजीने आमदार साहेबांना आश्र्वासन दिले.
गावकरी काम करण्यासाठी लगेच तयार झाले कारण त्यांनी अनुभवलं होतं की प्रत्येक वर्षी निम्मे गाव जनावरांच्या वैरणीसाठी स्थलांतर होत होते.माणूस माणसात राहिला नव्हता.ते थांबवण्यासाठी याशिवाय पर्याय नव्हता.

तिसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांच्या मदतीने टेंभू योजनेच्या कामाला गती मिळाली.तरीही अजून लवकर काम व्हावे यासाठी तो प्रयत्न करत होता.सुरवातीला कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला कारण नुसतंच मोफत काम केले तर खाणार काय,म्हणून तानाजीने श्रमदान करायला येणाऱ्या सगळ्यांसाठी काम पूर्ण होई पर्यंत जवळ असलेल्या पैशातून मोफत खाण्याची व्यवस्था केली.टेंभू योजनेचे काम जे काम सहा महिन्यांत झाले नसते ते तीन महिन्यांत पुर्ण झाले.
गावात पांडुरंग पाटील यांच्याशी चर्चा चालू असताना त्यांनी विचारले,

"गावात पाणी येणार पण ते साठवणार कुठे?"

बोलता बोलता त्याला समजले की ,'पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशनच्या' वतीने मोफत श्रमदान शिबीर केले जाते.तो तातडीने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जल शिवार योजना गावात येण्यासाठी ज्या कायदेशीर तरतुदी असतात त्या पूर्ण केल्या. मोफत श्रमदानासाठी गावातीलच नाहीतर तालुक्यातील लोकांनीही सहभाग दर्शवला होता. पंधरा दिवसात टेंभू योजनेचे पाणी गावात येणार त्यामुळे त्या आधी गावात अनेक शेततळी खोदून पुर्ण केली.
तानाजीच्या कामाची चर्चा आमदार साहेबांच्या पर्यंत पोहोचली होती त्यामुळे स्वतः आमदार साहेब गावात तानाजीला भेटण्यासाठी आले.

आमदार साहेब तानाजीला भेटले त्यावेळी तानाजीने त्यांना आठवण करून दिली "दहा महिन्यापूर्वीे तुम्ही गावच्या सभेत म्हणाले होते की,'गावात वर्षभरात टेंभू योजनेचे पाणी येईल.लोकांनी वैरणीच्या पिकांची लागवड करावी.वैरणीची बियाणे सरकारकडून मोफत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे'."

"तुझं काम बघून,मी स्वत: आमदार फंडातून वैरणीच्या पिकांच्यासाठी निधी पुरवेन."असे आमदार साहेबांनी आश्वासन दिले.

आमदार साहेबांनी दिलेल्या आश्वासनानुसार गावात निधी वाटप करण्यात आला.गावातील लोकांनी वैरणीची पिके घेतली.ऐन रखरखत्या उन्हाळ्यात गावचे शेत हिरवं गार झाले.गावचं नंदनवन झाले.
गाव कितीही सुजलाम सुफलाम झाले तरी पुन्हा वैरणीसाठी वाईट परिस्थिती येऊ नये यासाठी पुर्वी लोक पडीक रानातल्या गवतावर म्हशी चरायला घेऊन जायचे, तेथे म्हशी चरायला बंदी घातली.तेच गवत कापून आणून जनावरांना घालायला सुरुवात केली म्हणजे वैरणीची नासधूस न होता पुरेपूर वापर होईल.
तानाजीने शिकलेल्या शिक्षणाचा पूर्ण उपयोग गाव सुधारण्यासाठी लावला.

या सगळ्या धावपळीत दिड महिन्यात जवळ असणारे सगळे पैसे खर्च झाले होते, त्यामुळे तानाजीने आबाकाकांच्या कडून पुन्हा डुचकी सहीत अर्धलीनने(अर्धलीन चा अर्थ पहिल्या भागात दिला आहे)चार म्हशी घेतल्या.त्याचं दुध विकून पैसे येऊ लागले.त्याच पैशांनी नवीन सहा म्हशी विकत घेतल्या, तानाजीने गावच्या वैरणीचा प्रश्र्न कायमचा मिटविला होता,आबाकाकांनी या कामावर खुश होऊन अर्धलीनने आणलेल्या म्हशी त्याला तशाच देऊन टाकल्या. लोकांचे उन्हाळ्यात होणारे स्थलांतर थांबले.गावातील लोक गुण्यागोविंदाने राहू लागले.तानाजीने बघता बघता स्वत:चा आणि परिसराचा जलदगतीने विकास घडवून आणला होता.जादुची कांडी फिरवावी तशी गावच्या परिसराची अवस्था झाली.

सहा महिन्यानंतर......

नेहमी प्रमाणे सकाळी उठून अंघोळ करून तानाजीने आडातून पाणी आणले,म्हशींना पाजले, वैरण घालून मागे वळून पाहिले आणि पाहतो तर काय शेजारी कार येऊन उभी होती.त्याला बिना आवाजाची कार कधी जवळ आली समजलेच नाही.कारमधून कंपनीचे मालक असलेले तिलोत्तमाचे वडील,साहेब बाहेर आले.कारमधून बाहेर येताच त्यानी पहिला प्रश्र्न केला,
"माझी तिल्लु कुठे आहे?"
"चला घरी", असे म्हणून तो आणि साहेब घरी निघाले.तानाजी घरात गेला.साहेबांनी दरवाजाच्या आत पाय ठेवला आणि पाहतात तर काय कधी स्वत:चं जेवण स्व:त वाढूनही न घेणारी तिलोत्तमा चक्क खाली बसून परातीत भाकरी थापत होती.
भाकरी करता करता तिची सहज नजर वर गेली.तिलोत्तमा आणि तिच्या पप्पांची नजरानजर झाली तशी ती पटकन जागेवरून उठली आणि पळत जाऊन पिठाने भरलेल्या हातांनी पप्पांना मिठी मारली.पप्पांनीही तिला पोटाशी कवटाळून धरले.दोघेही गहिवरून रडू लागले.जणू दोन नद्यांना पूर आला होता.

थोड्या वेळाने तिलोत्तमाला बोलली,
"पप्पा, तुम्ही कसे काय गावात?"

"व्वा रे व्वा,तू विसरली असशील मला.मी नाही विसरू शकत तुला.बाप आहे मी तुझा, तुला न्यायला आलो आहे मी",पप्पा हळवं होऊन बोलले.

"मी नाही येणार?"

"झाली तेवढी हौस खूप झाली,शहरातील सुखी,समाधानी जीवन सोडून,
काय मिळाले खेड्यागावात येऊन? दु:ख आणि कष्ट??"

"पप्पा,कोण म्हणतं मी दु:खी आहे, शहरात सुख जरूर मिळाले पण समाधान म्हणाल तर ते शहरात कधीच मला मिळाले नाही,ते मिळालं ते या खेडेगावातल्या मातीत, उन्हाळ्यात उन्हाची प्रखरता झेलून मी माझी ओळख निर्माण केली,हिवाळ्यात धुक्यातील छोट्या छोट्या पायवाटांतून भटकंती करून मोकळ्या आकाशात मी माझं अस्तित्व शोधले,निसर्गात राहून फळाफुलांकडून बहरायला शिकले,पशूपक्षांकडून सप्तसुरांनी जीवन सजवायला शिकले, हिरव्यागार गवतावर सुखाची झोप घेतली.हिरव्यागार झाडाझुडपांमध्ये जीवनाचे रंग शोधले,डोंगरामध्ये खोल दऱ्यांचा गहरेपणा अनुभवायला,जे समाधान लाखो रुपये खर्च करून शहरात मिळाले नसते ते या खेडेगावात अनुभवायला मिळाले,पप्पा अजून काय पाहिजे जीवन जगण्यासाठी?,
अन् कष्टाचं म्हणाल तर तानाजीने गावच्या विकासासाठी रात्रंदिवस जी मेहनत घेतली त्याला म्हणायचं कष्ट."

"मी काहीच केले नाही,घरची सर्व जबाबदारी संपूर्णपणे तू सांभाळली, एका श्रीमंत बापाची मुलगी असून कोणतीही लाज न बाळगता पडतील ती कामे केली, त्यामुळेच मी सर्व करू शकलो. तू नसती तर कदाचित इतक्या कमी दिवसांत आपण वैरणीचा प्रश्र्न सोडवू शकलो नसतो.", तानाजी सगळं श्रेय तिलोत्तमाला देत होता.

"तानाजी तू जे काम केले आहेस त्याची तुलनाच होऊ शकत नाही.कामाचं फलीत हे तुझ्या बाबांचा आशिर्वाद आहे, ते वरून पाहत असतील, तेही म्हणत असतील,
'तुझ्या कष्टाच्या चांदण्यांनी तुझं सारं आकाश तूझी सारी धरती अगदी लखाखून गेली आहे.तुझ्या संधीचा सूर्य तुझ्या प्रयत्नांच्या डोंगराआडून हळूहळू सरकत आहे.डोळे तर तू उघडलेले आहेस, आता समोर बघ ही पहाट......
त्यानंतरचा दिवस तुझ्यासाठीच आहे,
जा स्वत:ची ओळख करून दे या जगाला आणि जगानंही ओळखू दे तुला'......"

"खरंच तिल्लु,तू सांगितलेल्या निसर्ग सौंदर्य वर्णनाने आणि तुमचं बहीण भावाच उदात्त प्रेम बघून पैशाच्या धुंदीने झाकलेले माझे डोळे उघडले.खरं तर मी तुला न्यायला आलो होतो पण तू नाही आलीस तर मी तुझ्यासोबतच राहीन"असे म्हणून त्यांनी तिलोत्तमाला जवळ घेतले.
"शेवटी बापाचं आतडं आहे त्यांचं, किती ही केलं तरी मुलीकडे ओढ घेणारच", असे म्हणून तानाजी साहेबांच्या पाया पडू लागला इतक्यात,
"अरे वेडा आहेस का?"असे म्हणून साहेबांनी तानाजीला उठवले आणि पोटाशी कवटाळले.
"मी पुण्यातून तुझ्या गावी तिल्लुला न्यायला आलो होतो पण आता बालपणी अनुभवलेले निसर्ग सौंदर्य पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.आणि काही दिवस मी इथेच राहणार आहे,
अगदी सुखी समाधानाने.....
. 🙏🙏🙏
_ सुभाष आनंदा मंडले
(9923124251)