Nidhale Sasura - 1 books and stories free download online pdf in Marathi

निघाले सासुरा - 1

१) निघाले सासुरा!
शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं 'सावधान' हे मंगल कार्यालय केवळ त्या शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेक गावातील लोकांचे आवडते मंगल कार्यालय होते. सावधान कार्यालय अस्तित्वात येत असताना तो परिसर अगदीच निर्मनुष्य नसला तरी नेहमी शुकशुकाट मात्र नक्की असायचा. मंगल कार्यालयाची उभारणी झाली. त्या कार्यालयात सुरुवातीला काही 'शुभ मंगल' झाले तसे हळूहळू त्या परिसरात सिमेंटचे जंगल वाढले. अत्यंत देखणे, सुबक आणि लग्न समारंभात लागणारी हवी ती वस्तू मिळणारे मंगल कार्यालय म्हणून सावधान नावारुपाला आले. प्रसंगी वधूची नैसर्गिक 'मासिक' तिथी लक्षात घेण्याऐवजी वधूपिते सावधान कार्यालयात उपलब्ध असणाऱ्या तिथीला प्राधान्य देऊ लागले आणि मुलीच्या लग्नाचा बार धुमधडाक्यात उडवून देऊ लागले.
त्यादिवशीही सावधान कार्यालयात कुणाचे तरी 'दोनाचे चार हात' झाले असे म्हणण्यापेक्षा वधूवरांच्या 'चाराचे आठ हात' झाले. 'आता सावध सावधान...' हे मंगलाष्टक सुरु झाले. लाऊडस्पीकरमधून बाहेर पडलेला तो स्वर त्या मंगलकार्यालयात उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळीसोबत कार्यालयाच्या परिसरात असलेल्या घरोघरी आवाज पोहोचला. त्या परिसरातील लोकांना ते मंगलाष्टक नित्याचेच झाले होते. सुरुवातीला लोकांना त्याचे भरपूर अप्रूप वाटत असे परंतु हळूहळू मंगल कार्यालयातील 'सावधान' या मंगलाष्टकांची अर्थात लग्नांची संख्या वाढली आणि ती उत्सुकता कमी होत गेली. घरापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वेच्या रुळावरून धावणाऱ्या रेल्वेची शिट्टी ऐकताक्षणी सुरुवातीला आबालवृद्ध धावत जातात परंतु कालांतराने त्या शिट्ट्यांचा, रेल्वेच्या खडखडाटाचा सराव झाला की, त्यातला नवखेपणा, आपुलकी, औत्सुक्य आपोआप कमी होत जाते. तसेच सावधान मंगल कार्यालयात म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टकांचे, वरातीचे, गर्दीचे आणि फटाक्यांचे झाले...
त्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर दयानंद पंचगिरी यांचे घर होते. सेवानिवृत्त झालेल्या पंचगिरी यांनी चार खोल्यांचे घर बांधले होते. पंचगिरी साठीकडे झुकत होते परंतु गेली काही वर्षे ते छाया नावाच्या त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी झुरत होते. त्यादिवशी सकाळी सकाळी पंचगिरी एका वरपित्याकडे गेले होते. दोन दिवसांपूर्वी मुलाकडील मंडळी छायाला बघून गेली होती. दाखवा- दाखवीच्या कार्यक्रमानंतर वाट होती ती निकालाची. जणू मतदान होऊन उमेदवारांना मतमोजणी आणि निकालाची प्रतिक्षा असल्याप्रमाणे! घरातील सारेजण जणू डोळ्यात प्राण आणून पंचगिरी परत येण्याची वाट बघत होते. छाया कावरीबावरी होऊन, चंचल नजरेने दाराकडे पाहत होती. कुठे कशाचा आवाज झाला, कशाची चाहूल लागली की, 'बाबा आले' या आशेने ती बाहेर बघत होती परंतु प्रत्येक वेळी तिच्या पदरी निराशा पडत होती. 'पदरी निराशा' हा प्रकार जणू तिच्या पाचवीलाच पूजला गेला होता. दोन दिवसांपूर्वी तिचा जो कार्यक्रम झाला होता तो अर्धशतकीय कार्यक्रम होता. प्रत्यक्ष पाहण्याचा कार्यक्रम होण्यापूर्वी अनेक ठिकाणी पंचगिरी यांच्या येरझारा झाल्या होत्या. गेली पाच-सहा वर्षे छाया सातत्याने त्या प्रकाराला, एक प्रकारच्या अग्निदिव्याला सामोरी जात होती. शनिवार- रविवारी बहुतेक कार्यक्रम होत असले तरीही मुलाकडील मंडळीची इच्छा पाहता कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी ती नटूनथटून, सजूनधजून मुलाला सामोरी जात होती. अगदी अमावस्या आणि व्यतीपाताच्या दिवशीही काही कार्यक्रम पार पडले होते.
सततच्या येणाऱ्या नकारांमुळे पूर्वी असलेला छायाचा उत्साह, आशा मावळत चालली होती. सातत्याने मिळणारा नकार तिला निरुत्साही करीत असे. एक उपचार, सोपस्कार याप्रमाणे ती 'त्या' लोकांना, त्यांच्या त्याच त्याच प्रश्नांना आणि नजरांना सामोरी जात होती. अनेकदा पाहायला आलेल्या 'वरा'च्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या आणि कधी कधी तर मुलाच्या वडिलांची नजरही नको तिथे घुटमळताना पाहून तिला लाजीरवाणे होत असे.
छायाने पाहता पाहता वयाची तिशी ओलांडली. सौंदर्याचा विचार केला तर शंभर मुलींचे सोडा पण दहा मुलींमध्ये ती नक्कीच उठून दिसत होती. रंग निमगोरा, नाकी-डोळी नीटस, भरल्या अंगाची नसली तरी कृशही नव्हती. नजरेत भरतील अशीच शारीरिक मापे होती. चष्मेबद्दूर नव्हती. कान तसे तिखटच होते. केस लांबसडक होते. पदवीधर असूनही राहणी साधी आणि आकर्षक अशी होती. परंतु का कोण जाणे तिच्या कुंडलीतला 'तो' काही केल्या समोर येत नव्हता. 'आला, योग आला. या मुलापाशी येताच वरसंशोधन संपेल...' अशी आशा निर्माण होत असताना पाठोपाठ निराशाजनक उत्तर मिळत असे. 'योग नाही.' हे नेहमीचे उत्तर होकारासाठी तळमळणाऱ्या कानावर पुन्हा पडायचे. आकाशात घिरट्या घालणारे मनपाखरु दुसऱ्याच क्षणी पंख कापलेल्या पक्षाप्रमाणे तडफडत खाली यायचे. पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पडणारे स्वप्न एका क्षणात भंग पावायचे..
शेजारच्या सावधान मंगल कार्यालयातून 'आता सावध सावधान...' हे मंगलाष्टक छायाच्या कानावर पडताच ती कावरीबावरी झाली. वधूच्या वेशात ते मंगलाष्टक आपण जमिनीकडे बघत, लाजून चूर होत ऐकावे, ऐकताना मधूनच चोरट्या नजरेने जन्मोजन्मीच्या साथीदाराकडे पाहावे, नजरानजर होताच पटकन नजर चुकवून पुन्हा खाली पहावे... अशा क्षणाची छाया वाट पाहत होती परंतु योग जुळून येत नव्हता, वेळ साधल्या जात नव्हती. काही दिवसांपासून मंगलाष्टकांचे मंजूळ स्वर कानी पडले की, छायाचे डोळे भरून येत होते. त्यादिवशी तसेच झाले. दिवाणखान्यात छाया, तिची आई, तिची अलका नावाची बहीण आणि 'बाई' या नावाने परिचित असलेली तिची आत्या अशा साऱ्या बसलेल्या असताना सावधान कार्यालयातून मंगलाष्टकांचा आवाज ऐकू आला. डोळे भरून आलेल्या अवस्थेत छाया लगबगीने उठून तिच्या खोलीत गेली. तिच्या आईने आणि अलकाने तिच्या अचानक निघून जाण्याचे कारण ओळखले. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे राहायला आलेल्या बाईआत्याला मात्र काहीच बोध झाला नाही. आत्याने विचारले,
"अलके, ही छाया अशी का उठून गेली ग?"
"अहो वन्स, सहजच असेल..." छायाची आई वेळ निभावून नेण्याच्या उद्देशाने म्हणाली परंतु बाई पटकन म्हणाली,
"सहज कसं? तिच्या डोळ्यात पाणी होते. तिकडून दयानंदाचा काही फोन आला का?"
"वन्स, तसं काही नाही हो. आजकाल हे शेवटचे मंगलाष्टक ऐकू आले ना की, छाया अशीच दुःखीकष्टी होते बघा. लगेच डोळे भरून येतात. काय करावे ते सुचत नाही."
"सरस्वती, अग, साऱ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. योग आला ना, तर आठ दिवसात आपली छाया सातासमुद्रापार जाईल बघ... मधुचंद्रासाठी गं! असते एखाद्याचे बाशिंग जड असते."
"वन्स, जड जड म्हणता पाच-सहा वर्षे गेली बघा. केव्हा जुळून येईल नि काय?" सरस्वती निराशेच्या सुरात म्हणाली
"अग, जन्माला येणाऱ्यांची जोडी स्वर्गातच ठरलेली असते. पण त्यांना एकत्र येण्यासाठी यावी लागते योग्य वेळ! आज ना उद्या छायाचाही जोडीदार असा छायाला शोधत येईल बघ. किती दिवस लपून बसणार आहे?"
"वन्स, मला पटतेय हो. पण छायाचे काय? तिला सांगून सांगून मी तर थकले बाई. तेच तेच तिला प्रत्येक वेळी किती समजावणार ना? शिवाय तिचे तरी का खोटे आहे? तिशी गाठलीय पोरीनं. वन्स, तिच्या मैत्रिणींना दोन दोन मुलं झालीत."
"आता मी आलेय ना मग सारं चांगलं होईल बघ."
"वन्स, तुमच्या पायगुणाने आज 'हे' होकार घेऊन येऊ देत."
"येईल गं येईल. थांब. मी बोलते छायाला..." असे म्हणत बाई उठत असताना त्या दोघींचा संवाद शांतपणे ऐकणारी अलका म्हणाली,
"आत्या, खरे आहे. तू सांगितले ना तर ताई नक्की सावरेल बघ."
"आलेच..."असे म्हणत बाई छायाच्या खोलीकडे निघाली...
तिकडे छाया खोलीतल्या पलंगावर असलेल्या लोडला टेकून छतावर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत होती. विचारांनी डोक्यात गर्दी केली असताना डोळेही पाझरत होते. एक ना अनेक प्रसंग तिच्या मनश्चक्षूसमोर तरळत होते. किती नकार मिळाले होते, मिळत होते. बरे, मिळालेल्या नकाराची कारणे तरी किती मिळमिळीत, वरवरची आणि तकलादू होती. मिळालेल्या काही नकाराची कारणंही तिला आठवत नव्हती आणि पाहायला आलेले अनेक चेहरेही तिला आठवत नव्हते. एक गोष्ट मात्र तिला नेहमी खायला उठत होती, बोचत होती, टोचत होती सोबतच आपण स्वतः काही ठिकाणांना नकार दिला ही बाबही तिला आता खटकत होती. दोन-तीन ठिकाणी मिळालेला होकार छायाने नकारात बदलला होता. आता तिला तो स्वतःचा मुर्खपणा वाटत होता. होकार दिलेल्या मुलापैकी कुणा एकाच्या गळ्यात वरमाला घातली असती तर आजवर ती संसारात मस्तपैकी रमली असती. एखादे सुंदर, गोंडस, मधाळ फळही तिच्या संसारवेलीवर उगवले असते पण वेळ निघून गेली होती. स्वतः होऊन स्वतःचा कपाळकरंटेपणा जगजाहीर केला होता. त्यानंतर तिला सातत्याने नकार मिळत होते. मिळणाऱ्या नकाराची कारणेही तिला मुखपाठ झाली होती.
वधूवराचे एक गोत्र, एक नाड, एक गण अशा काही कारणांमुळे वधूवर एकमेकांना सामोरे जाण्याचे सारे रस्ते 'ब्लॉक' होऊन जात असत. परंतु त्यामुळे एक होत असे पुढील सारे सोपस्कार म्हणजे वेळ, खर्च वाचत असे. मात्र त्यातही काही वेळा वेगळेच प्रकार घडले. अमित नावाचा व्यवसायाने शिक्षक असलेला एक मुलगा छायास बघायला आला. जणू पर्यटन स्थळी गेल्याप्रमाणे दहा-बारा जणांचा चमू एका सायंकाळी छायाला पाहण्यासाठी पंचगिरी यांच्या घरी दाखल झाला. बघण्याचा कार्यक्रम छान झाला. मुलाची आणि कंपुची देहबोली सकारात्मक वाटत होती. त्यामुळे हा मुलगा आपणास पसंती देईल असे छायाला मनोमन वाटत होते. दोन-तीन दिवसांनी दयानंद निरोप घेण्यासाठी मुलाच्या घरी पोहोचले. नमस्काराचे आदानप्रदान होताच मुलाचे वडील म्हणाले,
"मी आज तुम्हाला फोन करणारच होतो. बरे झाले, तुम्ही आलात ते."
"हो का..." असे म्हणणाऱ्या पंचगिरीच्या आवाजात उत्सुकता होती. त्यांनी आशाळभूत नजरेने मुलाच्या वडिलांकडे पाहिले
"त्याचं काय आहे, पंचगिरीसाहेब, मुलाची अशी इच्छा आहे, की अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मुलीची भेट घ्यावी. अर्थात तुमची संमती असेल तर." मुलाचे वडील म्हणाले
"ठीक आहे. आमची काही हरकत नाही." मनात पेटलेल्या आशेच्या दीपकास जणू जीवदान मिळत होते. फडफडतानाही तो स्थिरावल्यागत वाटत होता.
"उद्या दुपारी साधारण तीन वाजता आम्ही येतो."
"ठीक आहे. तयारी करण्याच्यादृष्टीने विचारतो, किती जण याल?" पंचगिरींनी विचारले
"तसे जास्त नाही पण दहा एक माणसे येतील."
"ठीक आहे. मी वाट पाहतो..." असे म्हणून पंचगिरींनी त्यांचा निरोप घेतला. घरी पोहोचताच त्यांची वाट पाहणाऱ्या कुटुबियांना सविस्तर सारे सांगितले.
"सरस्वती, अग, शुभ संकेत दिसतो आहे. मुलाला छाया आवडलेली दिसतेय म्हणून त्यांनी पुन्हा पाहायची इच्छा व्यक्त केली आहे. तसे नसते तर आत्ताच नकार दिला असता..."
"ते बरोबर आहे हो पण..." सरस्वती शंका व्यक्त करीत असताना दयानंद म्हणाले,
"अग, आता पण बीण काढू नकोस. आपली मुलीकडची बाजू आहे. आपल्याला नाही म्हणता येत नाही. दहा लोक येतील. तयारीला लागा..."
"तयारी करता येईल हो. पण दहा माणसे म्हणजे जरा अतिच झाले हो. मुलीकडील बाजू असली म्हणून काय झाले? आतापासूनच ही मंडळी अशी त्रास देणार असेल तर पुढे लग्नप्रसंगी किती अडेलतट्टूची भूमिका घेतली ते काय माहिती..." सरस्वतीला थांबवत दयानंद म्हणाले,
"काहीही अडेलतट्टूप्रमाणे वागणार नाहीत. आजकालच्या पोरांचे हे नवीन खुळ आहे. जाऊ देत. बघू काय होईल ते. सध्या तरी त्यांचा प्रस्ताव स्वीकारावाच लागेल." दयानंद सांगत असताना छाया तिच्या खोलीत गेली. वडिलांचे बोलणे ऐकून तिची आशा बळावली होती. उद्या येणारा अमित नक्कीच पसंती देईल. पहिल्या फेरीत पसंतीचे मत असल्यामुळे त्याने पुन्हा भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. एकंदरीत छायाला अंतर्बाह्य होकाराची चाहूल लागल्यामुळे ती सुखावली होती. एका वेगळ्याच संवेदनेने तिच्या शरीरात संचार सुरु केला. एक प्रकारची हुरहूर तिला लागली होती...
दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे होताच थोड्या वेळाने सर्वांनी आवराआवर सुरू केली. तसे पाहिले तर त्या सर्वांना ती तयारी, तो प्रसंग नवीन नव्हता. ते सोपस्कार नित्याचेच झाले होते, अंगवळणी पडले होते. यंत्रवत सारी आवराआवर झाली परंतु त्यादिवशी छायासोबत सर्वांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. कदाचित भविष्यातील होकाराची कुणकुण सर्वांना जाणवत होती. छायाही अगदी मन लावून नटली होती, सजली होती. वारंवार आरश्यातील स्वतःच्या 'छायेला' पाहून आश्चर्यचकित होत होती.
"सरस्वती, झाली का गं तयारी? अग, तीन वाजत आहेत. पाहुणे केव्हाही येतील बरे." दयानंद म्हणाले.
"झाली. सगळी तयारी झाली. का हो, त्यांचा होकार असेल ना हो? म्हणजे काल प्रत्यक्ष चर्चेतून, त्यांच्या हावभावातून, देहबोलीतून तुम्हाला काही जाणवले का?"
"अंदाज तर सकारात्मक दिसतोय. काल कोणतीही बाब स्पष्ट जाणवली नाही पण पुन्हा कार्यक्रम ठेवलाय याचा अर्थ पाणी कुठे तरी मुरतंय."
"जोडा छान आहे ना हो?" सरस्वतीबाईंनी विचारले
"छान तर आहेच. आपली छायाही काही कमी नाही ग पण का जाणे योग जुळून येत नाही."
"येईल हो येईल. आज नक्की होकार येईल. माझे मन मला सांगतेय की, आपली तपश्चर्या आज फळाला येईल." सरस्वतीबाई म्हणाल्या.
वाजता वाजता तीनाचे सहा वाजले आणि एकदाचे पाहुणे येऊन थडकले. दहा-बारा म्हणता चांगला अठरा- वीस जणांचा ताफा येऊन थडकला. नवीन आलेल्या पाहुण्यांचा परिचय झाला. शिरा-पोहे-चहाची फेरी झाली. छाया प्रश्नोत्तराच्या तासाला सामोरी जाण्यासाठी येऊन बसली. प्रश्नोत्तराच्या फेऱ्या सुरू झाल्या. त्यादिवशी छाया बरीच धिटावली होती. तीन-चार दिवसांपूर्वी याच मुलाला खालमानेने उत्तर देणारी छाया त्यादिवशी मात्र प्रश्नकर्त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देत होती.
"ठीक आहे. पंचगिरीसाहेब, निघतो आम्ही. उद्या सकाळी फोन करतो." असे म्हणत मुलाच्या वडिलांनी सर्वांचा निरोप घेतला. छाया स्वयंपाकघराच्या दाराआड उभी राहून पाहात असताना तिची अमितशी नजरानजर झाली तशी छाया लाजून बाजूला झाली. त्या रात्री जणू छायाच्या झोपेत स्वप्नांची लड लागली. एका मागोमाग एक सुंदर स्वप्ने तिला रात्रभर पडत होती. अर्थातच तिच्या स्वप्नातला राजकुमार अमितच होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी छाया जरा उशिराने उठली. रात्री उशिरा झोप लागल्यामुळे आणि स्वप्नांच्या दुनियेत बराच वेळ विहार केल्यामुळे सकाळी लवकर जाग आली नाही. ती उठून तयार होऊन बाहेर आली आणि दिवाणखान्यातील फोन वाजला. सरस्वती बाई देवपूजा करीत होती. फोनची घंटी ऐकल्याबरोबर तिने देवाला हात जोडले आणि म्हणाली,
'देवा, होकारार्थी फोन असू दे बरे. लगेच एकशे एक रुपयांचे पेढे वाटते हो..." ती प्रार्थना ऐकणाऱ्या छायाचेही हात आपोआप जोडल्या गेले. बाहेर दिवाणखान्यात बसलेल्या पंचगिरी यांनीही आकाशाकडे बघत हात जोडले. फोन उचलून म्हणाले,
"हॅलो, नमस्कार..."
"पंचगिरीसाहेब, आमचा तसा होकार आहे पण..."
"पण काय?..." पंचगिरींनी हलकेच विचारले
"होकार देण्यापूर्वी एका गोष्टीची खातरजमा करायची आहे म्हणून फोन केला...
"खातरजमा? ती कोणती? विचारा ना." पंचगिरी म्हणाले
"त्याचं काय आहे पंचगिरीसाहेब, मी पत्रिका, गोत्र पाहण्याच्या मुळात विरोधात आहे पण आमच्या सौभाग्यवतींचा तसा हट्ट आहे हो. आपल्या पुरुषांच्या सकारात्मक विचारसरणीला अडसर कोणता असेल तर तो बायकोच्या नकारात्मक विचारांचा! शिवाय काल तुमच्या घरून परतलो आणि बायकोने अमितची पत्रिका काढून पाहिली..."
"पत्रिका? लग्नपत्रिका?" पंचगिरींनी दचकून विचारले
"अहो, नाही हो. जन्मपत्रिका काढून पाहिली त्यात लिहिलंय की..."
"क...क...काय लिहिलंय?" पंचगिरींची धाकधूक वाढली होती.
"पत्रिकेत स्पष्ट लिहिलंय की, अमितचे लग्न ठरवताना साऱ्या गोष्टी पाहाव्यात पण ते शक्य नसेल तर किमान गोत्र तरी नक्कीच पाहावे. त्याशिवाय पुढली बोलणी करु नये. तेव्हा म्हटलं गोत्र तरी पाहूया. दयानंदजी, तुमचे गोत्र काय हो?"
"अ.. आ...आमचे गोत्र... ते... हे आपले भारद्वाज आहे..." पंचगिरीच्या आवाजातला कंप स्पष्ट जाणवत होता
"भारद्वाज? बाप रे! सगळाच घोळ झाला की."
"काय झाले हो?" पंचगिरींनी अत्यंत काळजीने विचारले
"काही विशेष नाही. आमचेही गोत्र भारद्वाजच आहे हो. तेव्हा माफ करा... 'योग नाही हो.'..." असे म्हणत म्हणत तिकडून फोन बंदही केला. पंचगिरींनी जड अंतःकरणाने फोन खाली ठेवला न ठेवला की शेजारी उभी असलेल्या सरस्वतीबाईंनी घाबरलेल्या अवस्थेत विचारले,
"का हो, काय झाले? होकार आहे ना त्यांचा?"
"तसा त्यांचा होकारच होता पण गोत्र आडवे आले. एक गोत्र आहे तेव्हा..." पंचगिरी बोलत असताना कानात प्राण आणून ऐकणारी छाया पळतच तिच्या खोलीत गेली. पाठोपाठ अलकाही गेली. तसे सरस्वती म्हणाली,
"अहो, छाया त्यांना पसंत असेल तर मग काय हरकत आहे? राहता राहिला गोत्राचा प्रश्न तर त्यात अवघड असे काय?"
"म्हणजे? तुला काय म्हणायचे आहे?" पंचगिरींनी काहीशा उत्सुकतेने विचारले
"अहो, छायाला कुणाच्या तरी ओटीत घालू... दत्तक देता येईल म्हणजे तिचे गोत्र बदलेल की..."
"अग, पण हे कसं शक्य आहे?"
"का शक्य नाही? शेजारच्या जोश्यांकडे अशीच परिस्थिती उद्भवली होती. तेव्हा गुरूंनीच हा मार्ग सुचवला होता आणि जोश्यांनी विधिवत मुलीला तिच्या मामाच्या ओटीत घातले त्यानंतर धुमधडाक्यात लग्न लागले..."
"अग, पण ती मंडळी तयार होईल का?"
"न व्हायला काय झाले? फोन लावून विचारा तर तुम्ही. गरज आपल्याला आहे ना? आपली मुलीची बाजू पडली ना?" सरस्वती म्हणाली आणि पंचगिरींनी साशंक अवस्थेत फोन लावला.
"हॅलो, मी पंचगिरी बोलतोय. एक विचारायचे होते..."
"बोला. बोला..."
" मी यासाठी फोन केला की, प्राप्त परिस्थितीत काही मार्ग काढता येईल का?"
"सारे मार्ग खुंटले असताना आपण मार्ग काय काढणार? मुलामुलीचे गोत्र एक ...याचा अर्थ कळतो काय तुम्हाला? चांगली मुलगी आहे म्हणून आम्ही सारे खूप आनंदात होतो हो. पण..."
"बरोबर आहे. पण असे केले तर... आम्ही मुलगी आमच्या एखाद्या नातेवाईकाच्या ओटीत देतो... रीतसर दत्तक देतो मग गोत्राचा प्रश्न..."
"पंचगिरी, अशा थातूरमातूर उपायांनी का कुळ बदलणार आहे की, शरीरातील रक्त बदलणार आहे? तिच्या रक्तात तर शेवटपर्यंत पंचगिरीच्याच रक्ताचे अणू-रेणू असणार आहेत ना? कशासाठी भलतेच निर्णय घ्यायचे? उद्या काही बरीवाईट घटना घडली म्हणजे? तेव्हा सॉरी!..." असे काहीसे ठणकावून सांगत त्यांनी फोन बंदही केला...
"एकविसाव्या शतकात ही मंडळी गोत्र, नाड अशा गोष्टींना कवटाळून बसतात ही आश्चर्याची गोष्ट आहे. सुरुवातीला तर आम्ही किती सुधारणावादी आहोत, अशा खुळचट कल्पनांना थारा देत नाहीत असा आव आणतात. अगोदर एकदा नाही तर दोन वेळा कार्यक्रम घडवून आणला. दोन्ही वेळा मिळून पंचवीस एक माणसे घेऊन आली. काय ते आधी ठरवून, सारे पाहूनच मग पुढले पाऊल टाकावे ना पण.... आणि आव आणायचा सुधारणावादी!..." पंचगिरी कुरकुरत म्हणाले आणि आत निघून गेले....
**
@ नागेश सू. शेवाळकर


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED