निघाले सासुरा - 11 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निघाले सासुरा - 11

११) निघाले सासुरा!
एकेक दिवस मागे पडत होता. लग्नाचा दिवस जवळ येत होता. तसतशी लगीनघाई वाढत होती. त्यादिवशी जेवणे झाली आणि सारे जण दिवाणखान्यात बसले असताना बाई म्हणाली,
"अहो, आपण एक गोष्ट कशी विसरलो हो?"
"कोणती?" दामोदरपंतांनी विचारले.
"अहो, दयानंदाच्या मुलीचे लग्न ठरलंय."
"हो क्का? पण हे दयानंद कोण गं?"
"कोणत्याही वेळी मस्करी करत जाऊ नका हो. अहो, आपणास केळवण करावे लागेल की."
"अरे, खरेच की. मीसुध्दा विसरलोच. पण त्यासाठी आपल्याला आपल्या घरी जावे लागेल. या सर्वांनी तिकडे यावे लागेल."
"वन्स, भाऊजी, ते काहीही नको. तुम्ही इथून गेलात म्हणजे संपलं सारं." सरस्वती म्हणाली.
"खरे आहे. अग बाई , केळवणाची काहीच गरज नाही."
"दयानंदा, तुमचे बरोबर आहे. पण सरस्वती म्हणते तशी आपल्या पूर्वजांनी काही परंपरा वारसा म्हणून आपणास दिलेल्या आहेत. त्या पाळाव्याच लागणार ना?" दामोदर म्हणाले.
"मामा, माझ्याजवळ एक पर्याय आहे." आकाश म्हणाला.
"कोणता पर्याय आहे?" बाईंनी विचारले.
"म्हणजे परंपरेनुसार केळवणही होईल आणि तुम्हाला तुमच्या घरी जायची गरज भासणार नाही."
"खरे सांगतोस? मग सांग ना..." बाई म्हणाली.
"अग, मी ओळखलाय त्याचा पर्याय. इथेच स्वयंपाक करु... पैसे आपण देऊ?" दामोदर म्हणाले.
"मामा, तसे नाही. आपण सगळे मिळून एका हॉटेलमध्ये जाऊन जेवण करु. पैसे तुमचे...पदार्थ आमचे!"
"काल श्रीपालच्या मामांनी हॉटेलमध्ये केळवण केले."
"ताई, तू पण गेली होतीस ना?" आकाशने विचारले.
"ह..ह..हो." छाया म्हणाली.
"पण तुला रे कसे माहिती?" सरस्वतीने विचारले.
"अग आई, अंदाजे पंचे दाहो दरशे. सहज खडा टाकला..."
"आणि तो अचूक लागला. मामा, तुम्हाला अजून एका माणसाला केळवणाच्या जेवणाला बोलवावे लागेल."
"कुणाला ग अलके?" बाईने विचारले.
"म्हणजे कसे आहे मामा, केळवण भाऊजींच्या मामांचे असूनही त्यांनी ताईला निमंत्रण दिले..."
"तसे आपणही श्रीपालरावांना बोलवू या." दामोदर म्हणाले.
"काय ताईसाहेब, झाले मनासारखे?"
"मनासारखे म्हणजे? काय म्हणायचे तुला?" छायाने विचारले.
"तिकडच्या केळवणाचे उदाहरण देताना उद्या मामांनी भाऊजीसही जेवायला बोलवावे हाच हेतू होताना तुझा?" आकाशने चिडविण्याच्या स्वरात विचारले.
"आक्या, थांब... थांब..." छाया आकाशवर ओरडली.
"अग, जाऊ दे ग." सरस्वती म्हणाली.
"भाऊजी, खरेच नको हो. कशाला खर्चात पडायचे?" दयानंद म्हणाले.
"दयानंद, काही गोष्टी गरज, आवश्यकता असते म्हणून नाही तर रीत-परंपरा आहे म्हणून कराव्या लागतात. कधी जायचं?" दामोदरपंतांनी विचारले.
"ते सारे त्या पोरांना ठरवू द्या. त्यातले आपणास काही माहिती नाही." बाई म्हणाल्या.
"म्हणजे? हॉटेलमध्ये जायला तुम्ही तयार आहात वन्स?"
"का नाही? एखाद्या वेळी पोरांबरोबर करुया की मज्जा!" बाई म्हणाली.
"वन्स, एवढ्या माणसांचा खर्च म्हणजे?" सरस्वतीने विचारले.
"हो ना. त्यापेक्षा असे करा ना, घरीच स्वयंपाक करु. गोडधोड करू. हवं तर होणारा खर्च द्या."
"जमणार नाही. दयानंद, जमणार नाही. जायचं म्हणजे जायचं. ओ. क्के." दामोदर अधिकारवाणीने म्हणाले.
"आकाश, पुढची सारी व्यवस्था तुझ्याकडे. सगळं ठरव म्हणजे मग श्रीपालला निरोप देता येईल." बाई म्हणाली.
"आत्या, आपला खास दूत निरोप देईलच की।" आकाशने पुन्हा छायाला चिडवले.
"ए आई, आक्श्याला काही सांग हं." छाया रागारागाने म्हणाली.
"एक सांगा, दिवस कोणताही चालेल ना? नाही तर मग निघेल कुणाची अमावस्या किंवा पोर्णिमा."
"दिवस चांगलाच असला पाहिजे. आत्या-मामा एवढे सन्मानाने जेवण देत आहेत तर काय अमावस्या निवडणार? जमणार नाही." सरस्वतीने निक्षून सांगितले.
"मामा, बघा आता. जेवायचे कुठे तर हॉटेलमध्ये! त्यासाठीही चांगला दिवस पाहायचा म्हणजे मुलाने परदेशातून आल्यावर त्याच्या आईने पाच रुपयांची खडीसाखर वाटावी असे आहे."
"त्या खडीसाखरेची गोडी तुला काय कळणार रे?" सरस्वती आकाशला म्हणाली.
"हो ना. गाढवाला गुळाची चव थोडीच कळते..." छायाने आकाशला चिडवायची संधी हातची सोडली नाही.
"बरे. बरे. ठीक आहे. आम्ही गाढव बाबा. परवाचा दिवस या दिनदर्शिकेप्रमाणे 'उत्तम' असा आहे. ठरवायचा का?" आकाशने विचारले.
"परवा नको रे बाबा. दुसरा बघ." छाया म्हणाली.
"केळवणासाठी 'उत्तम दिवस वर्ज्य' असे तुझ्या कॅलेंडरमध्ये आहे का?" आकाशने विचारले.
"परवा श्रीपालकडे सोडमुंजीचा कार्यक्रम आहे." छाया म्हणाली.
"त्यांच्याकडील कार्यक्रमाचा आणि आपला काही संबंध आहे का?" अलकाने विचारले.
"अलके, तुला कळत कसे नाही, सन्माननीय श्रीपाल येणार आहेत म्हणून आपल्या छायाताईचा सारा आटापिटा चालला आहे." आकाश म्हणाला.
"आणि भाऊजींना केळवणाला बोलवायचे नाही असा मामांनी ठरवले तर?" अलकाने विचारले.
"कसे शक्य आहे? मामा एक वेळ आपल्याला बोलावणार नाहीत पण भाऊजींना न बोलावणे शक्यच नाही." आकाश म्हणाला.
"बाईआत्या, मौंज सोडणे म्हणजे काय ग?" छायाने विचारले.
"अग, लग्नापूर्वी करण्याचा तो एक धार्मिक विधी असतो."
"आणि मौंज झाली नसेल तर मग?" आकाशने विचारले.
"तर मग आधी मौंज लावावी लागते."
"समजा, माझ्यासारख्याने मौंज सोडलीच नाही तर काय होते?" आकाशने विचारले.
"अशा प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. रीत, परंपरा या पूर्वजांनी निर्माण केलेल्या आहेत. त्याप्रमाणे सारे सोपस्कार पार पाडणे हे पुढील प्रत्येक पिढीचे कर्तव्य असते." बाई म्हणाली.
"आत्या, ते ठीक आहे ग पण प्रत्येक गोष्ट आंधळेपणाने करणे म्हणजे..."
"कसे आहे, आकाश, एखादी परंपरा आपण पाळली नाही तर त्यामुळे 'असे होते' असे म्हणणे अवघड असते. 'सर्दी का झाली?' या प्रश्नाचे उत्तर जसे देता येते म्हणजे वातावरण बदलले, गार हवा सुटली किंवा कानाला काही न बांधता बाहेर गेल्यामुळे सर्दी झाली असे सांगता येते पण धार्मिक बाबतीत काही अदृश्य परिणाम असतात तर अनेक दूरगामी परिणाम असतात म्हणण्यापेक्षा ते स्पष्टपणे दिसून येत नसले तरी इफेक्ट साधून जातात. त्यामुळे एखादा विधी न केल्याने असे नुकसान झाले असे सांगता येत नाही. अरे, मौंज लावणे, मौंज सोडणे ह्या परंपरेचे सोड पण आजकाल लग्न विधीसारखे कार्यक्रम तरी का पूर्वापार पद्धतीने होतात का? इंटरनेटच्या माध्यमातून लग्न लागताहेत..."
"पण मामा,ही लग्नं तशी लागल्यामुळे कुठे काय परिणाम होतो?" अलकाने विचारले.
"अलका,आत्ताच सांगितल्याप्रमाणे गॅसला हात लावताच चटका बसतो असे हे परिणाम नसतात. अनेकदा लग्नानंतर कुटुंबात, नवरा-बायकोत ज्या कटकटी, क्लेश होतात, मुलांना सुख लाभत नाही अशी अनेक संकटे येतात तेव्हा उशीर झालेला असतो म्हणून आपण परंपरा पाळली नाही म्हणून असे झाले हे लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊनही काही उपयोग नसतो. अनेकदा आपण असेही म्हणतो की, पूर्वजांनी केलेल्या चांगल्या वाईट कामाचे परिणाम आपणास भोगावे लागतात. महत्त्वाचे म्हणजे अशा रीती-परंपरा पाळताना जर कुणाला समाधान मिळत असेल तर असे विधी सुरू ठेवायलाच पाहिजेत." दामोदर म्हणाले.
"एकदम बरोबर बोललात भाऊजी. मानसिक समाधान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पैसे मोजून मिळत नाही तर अशाच छोट्या मोठ्या प्रसंगातून अनुभवता येते..." दयानंद बोलत असताना छायाचा भ्रमणध्वनी वाजला.
"आला. आला ग, आला." अलका हसत म्हणाली.
"कबुतर आ..आ..आ.. मेरे पहले प्यार का संदेशा ला..ला..ला.." आकाश तसे चिडवत असताना छायाने त्याला जीभ दाखवत भ्रमणध्वनी उचलला.
"हॅलो, हो.. हो. काय म्हणता? व्वा! बरे झाले. एक टेंशन गेले. करते. करते." म्हणत छायाने फोन बंद केला.
"काय झाले गं? कशाचे टेंशन होते?" सरस्वतीने विचारले.
"अग, काही नाही. असेच.."
"आई, वो ऊनकी 'अंदर कि बात' है, हमे कैसे बोलेगी हमारी ताईसाहेबा."
"काय झाले, छाया?"दामोदरपंतांनी विचारले.
"मामा, विशेष काही नाही. मी आणि श्रीपालने काल रक्त तपासले होते. त्याचा अहवाल आलाय. सारे व्यवस्थित आहे."
"व्वा! व्वा! छाया, अभिनंदन! तुम्हा दोघांनी एक फार मोठा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. खरेच अशी तपासणी करण्याचा तुमचा निर्णय जसा क्रांतिकारी आहे, तसाच तो अनुकरणीय आहे."
"मामा, खरे तर श्रीपालच फार आग्रही होता..."
"ताई, तू भाऊजीस हे क्रेडिट देते आहेस हे खरे परंतु मामा एड्सच्या घोषवाक्य स्पर्धेत ताईच्या एका घोषवाक्याला प्रथम पुरस्कार मिळाला होता. 'आधी केले मग सांगितले!' याप्रमाणे."
"छाया, ऐकवशील का ते घोषवाक्य?"
"ऐकवते....
जातपात, धर्म, गोत्र आता विसरा,
लग्नापूर्वी रक्त तपासणीचा हट्ट धरा!"
"बहोत खुब! दोन ओळीतच केवढा गहन अर्थ सामावला आहे."
"मग मामा, वो बहन किसकी है। 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले।' ताई, खरेच तुला मनापासून नमस्कार करते..." असे म्हणत अलका तिच्या पायाशी वाकत असताना छायाने तिला मध्येच थांबवून छातीशी घट्ट कवटाळल्याचे पाहून सर्वांचेच डोळे पाणवले...
भारावलेले वातावरण हलके व्हावे या हेतूने आकाशने विचारले, "मामा, हा मौंज सोडण्याचा विधी नेमका असतो तरी काय हो?"
"का रे, तुला भलतीच घाई झालेली दिसतेय?" बाईने विचारले.
"घाई नाही गं. पण असे आहे बघ, मौंज झाली, की रोज संध्या करावी लागते, जानवे घालावे लागते, जेवताना काय म्हणतात ते... जाऊ दे, ताटाभोवती पाणी फिरवावे लागते. मौंज सोडल्यावर हे सारे करायची गरज नसेल तर ताईच्या लग्नात घ्यावी म्हणतो मौंज सोडून..."
"ओ महाराज, कुणी सांगितले हे सारे? उगाच अकलेचे तारे तोडू नकोस. अगोदरच तुला थोडीच आहे आणि मोठा सांगतोय... यापूर्वी कधी केली होतीस संध्या? आठवतंय? अंगात जानवे कधीपासून नाही रे?" सरस्वतीने विचारले.
"बरे. बरे. ते जाऊ दे. मामा, काय असतो हो हा प्रकार?"
"अरे, दोन-तीन तासांचा अवधी आहे. सोडमुंज असेही या संस्काराला म्हणतात. सोडमुंजीला 'समावर्तन' असेही म्हणतात. समावर्तन म्हणजे निवृत्त होणे अर्थात ब्रम्हचर्याचा त्याग करून गृहस्थाश्रमाकडे वाटचाल करणे. ज्याची मौंज सोडायची आहे त्याला सोवळ्यात होऊन होम करावा लागतो. या विधीतला सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे नवरदेव रुसून काशीला निघतो.."
"मामा, काशीलाच का हो? एखाद्या हिलस्टेशनला किंवा परदेशात गेला तर?" आकाशने विचारले.
"तुला पाठवू हं... थंड.. थंड हवा खायला." छाया म्हणाली.
"अरे, विधीच तसा आहे. तर अशा या रुसून जाणाऱ्या मुलाला त्याचा मामा रुसून जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो." दामोदर म्हणाले.
"मामा, थोडे सविस्तर सांगा ना.. प्लीज!" आकाश म्हणाला.
"अरे, ते होमहवन झाले ना की, नवरदेवाच्या डोक्यावरील पूर्ण केस किंवा केसाची एखादी बट काढावी लागते. नवरदेवाला पुन्हा स्नान घालून, मळवट भरून सोवळे नेसावे लागते. पुन्हा जानवे परिधान करावे लागते. काही कुटुंबातील पद्धतीनुसार हार घातलेला हा नवरदेव गावातील देवळात जाऊन देवदर्शन करून परत येतो तर काही कुटुंबात नवरदेव घोड्यावर बसून काशीला निघतो..."
"घोड्यावर? कुणाला घोड्यावर बसता येत नसेल तर ?" छायाने विचारले.
"ताई, भाऊजींना घोड्यावर बसता येईल ना? तुला हाच प्रश्न पडलाय ना?" आकाशने विचारले.
"छाया, हा घोडा म्हणजे खराखुरा घोडा नसतो तर लाकडाच्या काठीचा घोडा असतो..."
"धत् तेरे की! खोद पहाड निकला चुहा! बरे, पुढे?" आकाशने विचारले.
"काठीच्या घोड्यावर मांड टाकून हा निघतो..."
"चल मेरे घोडे, टिक् टिक् ..." आकाश म्हणाला तसे अलकाने एक बालगीत म्हटले,
"लकडी का घोडा
घोडे पे निकली सवारी।
घोडे के दुम पे मारा हातोडा,
दौडा दौडा दौडा,
घोडा दुम दबा के भागा।"
"अलका, आकाश, ऐका ना. मामा पुढे..." छाया म्हणाली.
"तो मुलगा त्या काठीच्या घोड्यावर बसतो. काशीकडे प्रयाण करीत असतानाचा प्रवास खूप दूरचा आहे म्हणून त्याच्या खांद्यावर शिदोरी बांधलेले उपरणे देतात."
"ते कशासाठी?" अलकाने विचारले.
"अग, दूरच्या प्रवासात त्याला भूक लागली तर? पूर्वीच्या काळात जागोजागी आजच्यासारखे हॉटेल, धाबे नव्हते ना? आणि असले तरीही पूर्वीचे लोक हॉटेलमध्ये खातही नव्हते म्हणून."
"हा रुसलेला नवरदेव निघाला, की मग त्याच्या मामाचे काम सुरू होते. हा मामा, आपल्या रुसलेल्या भाच्याची समजूत काढतो."
"ती कशी?" छायाने पुन्हा विचारले.
"भाच्याला कपडे, पैसे, वस्तू अशा गोष्टींचे प्रलोभन दाखवतो."
"अशा प्रलोभनांना तो नवरदेव भुलला नाही तर?" अलकाने विचारले.
"मग शेवटचा पर्याय! मामा, विनवणी केल्याप्रमाणे म्हणतो, की अरे, काशीला जाऊ नको. मी माझी पोरगी तुला देतो..."
"बाप रे! पण मामा, यामुळे ते जमलेले लग्न मोडणार नाही? म्हणजे असे बघा,त्या मुलाचे लग्न अगोदर जमलेले असताना जर त्याला त्याची पोरगी देतो असे वचन देत असेल तर मग..."
"आकाश, तसे म्हणायची परंपरा आहे. भाच्याची होणारी पत्नी म्हणजे एका अर्थाने त्या मामाची मुलगीच असते ना. अर्थात हा सारा गमतीचा भाग आहे."
"व्वा! मामा, व्वा! ग्रेट! ...." आकाश बोलत असताना छाया भ्रमणध्वनीवर क्रमांक जुळवत त्या सर्वांपासून थोडी दूर ... दरवाजाजवळ गेली आणि म्हणाली,
"श्रीपाल, परवा तुझ्या मौंज सोडण्याचा कार्यक्रम आहे ना, मी येईन रे पण तुझ्या मामाला मुलगी आहे का? लग्नाची आहे? सुंदर आहे? अरे, त्यादिवशी म्हणे,तू रुसून काशीला जायला निघाल्यावर तुझे मामा तुला त्यांची पोरगी देतो असे वचन... काय? ए बाबा, पुन्हा अशी गंमत करू नकोस हं. ठेवते..." असे म्हणत छायाने भ्रमणध्वनी बंद केला आणि पाठीमागे चेहरा वळवताच तिच्याकडे पाहत सारेच हसत असल्याचे तिच्या लक्षात आले. तितक्यात आकाश-अलकाने एकमेकांना टाळी दिली तशी छाया लाजेने लालेलाल होत स्वतःच्या खोलीत पळाली...
**