इमोशन्सची रखेल - 1 Dhanashree Salunke द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इमोशन्सची रखेल - 1

“इमोशन्सची रखेल”
( भाग १)

बेडरूमधल्या टेबलवरील मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशाने ,तिच्या वितळलेल्या मेणाचा ओघळ , सोनेरी रंगात उजळतं होता. टेबलावर जागोजागी सांडलेल्या, अर्धवट सुकलेल्या पेंटिंगच्या रंगांवरून प्रवाही होताना त्या सोनेरी पारदर्शी मेणाचा आभासी रंगबदल होत होता.मेणाचा हा आभासी रंगबद्दल , अंधुकश्या उजेडाने प्रकाशित असलेल्या त्या बेडरूममधील मीनाक्षीच्या भावनांसमान होता .वेळोवेळी काही क्षणांपुरती ती देखील सहवासात येणाऱ्या रंगात रंगून जाई.. पण आतून पारदर्शी असलेल्या तिच्या भावना कोणताच रंग लपेटू शकत न्हवत्या त्या रंगहीन होत्या.
पांढऱ्याफक्क मऊशार चादरीमध्ये सिद्धांतच्या मिठीत स्थिरावलेली ती सिद्धांतच्या केसांवरून हात फिरवताना त्याच्याकडे पाहत होती.
"किती बदललास रे सात वर्षात .... मला अजून आठवतंय तुझ्या फायनल इयरच्या सबमिशनच्या वेळेला तू डीले केलेलास म्हणून ओरडा खाल्ला होतास माझा , तेव्हा अगदी रडवेला झाला होतास तू , तुझा तो चेहरा अजूनही लक्षात आहे बरका माझ्या .. " मीनाक्षीला हसू आवरले नाही. हसता हसता तिने तोंडावर हात ठेवला
"मॅम तुम्हीपण ना " सिद्धांत लाजला.
"एक सांगू मॅम " तिच्या बटांशी खेळत तो म्हणाला..

”हो सांगना"

"दॅट टाइम अल्सो आय हॅड अ क्रश ऑन यु.... व्हेरी स्ट्रॉंग वन"
"माहिती होतं मला ... कळून येतं रे लगेच "

“खरंच मॅम ?”

"नाहीतर काय ... पण तुझ्या वागण्यात कधी काही चुकीचं नाही जाणवलं मला . .. नाहीतर तर काही काही विद्यार्थ्यांचे वर्तन अतिशय असभ्य असतं महिला शिक्षकांशी , आकर्षणापेक्षा वासनाच जास्त जाणवते त्यांच्या वर्तवणुकीतून .. "

"हे खरं आहे , लेक्चर चालू असताना , महिला शिक्षकांचे कॅमेऱ्यात असावधपाणे फोटो काढताना कितीतरी जणांना पाहिलंय मी आणि नंतर त्या फोटोंशी गैरवर्तन करताना ... " सिद्धांत निराश होऊन बोलला.

"हम्म .. सिद्धांत पण तेव्हा माझ्यासाठी तू एक बालिश पोरगाच होतास.. आणि माझ्यासमोर तुझ्या ऑक्वर्ड होण्याचं खूप हसू यायचं मला" मीनाक्षी पुन्हा हसू लागली. सिद्धांतने तिचा हात धरला.

"मी कधी विचारही केला न्हवता कि आयुष्यात कधी मी तुमच्या इतक्या जवळ असेल.. स्वप्नं वाटतंय मला हे " त्याने तिच्या हाताचे चुंबन घेतले . तिने क्षणभरासाठी डोळे मिटले.

"यु आर रिअली व्हेरी ब्युटीफुल मॅम ..मला तुम्ही खूप आवडता " मीनाक्षीच्या नजरेत नजर मिसळत तो बोलला , त्याचे डोळे पाणावले होते. ती वेळ ते क्षण त्याच्यासाठी खूप भावनिक होते. आजपर्यंत कितीतरी जणींशी शारीरिक आणि भावनिक जवळीक निर्माण झाली असेल त्याची पण मीनाक्षीबद्दल कॉलेजच्या दिवसांपासूनच असणाऱ्या भावनांना तोड न्हवती.आपल्याला आवडणारी काही माणसे आपल्या कधीच जवळ आलेली नसतानासुद्धा आपण मनातल्या मनात त्यांना जवळ करतो , त्यांच्याशी संवाद साधत राहतो , कल्पनेत जवळ असली तरी ती आपली वाटू लागतात . अनेक वर्ष मनात जपलेल्या मीनाक्षीच्या आज तो खूप जवळ होता.मेण वितळतचं होतं. दोन आकृत्या मेणबत्तीच्या प्रकाशात आकार बदलतं होत्या. दोन भावनांचे रंग एकमेकांत पुन्हा मिसळू पाहू लागले.

सकाळच्या गारव्यात मीनाक्षी बनवत असलेल्या कॉफीचा गंध मिसळला , तो बेडरूमपर्यंत पोहचला . सिद्धांताने डोळे उघडे . बेडवर पडल्या-पडल्या तो बेडरूम न्याहाळू लागला.पांढऱ्या रंगांच्या भिंतीवर मीनाक्षीने रंगवलेल्या अनेक सुंदर पेंटिंग्स होत्या , मांडणीवर किती तरी पुरस्कार , स्मुर्तीचिन्हं दाटीवाटीत ठेवली होती . टेबलं , फ्लॉवरपॉट , कपाट आणि घरातील इतर अँटिक शोभेच्या वस्तू त्या वास्तूला एका कलाकाराचे घर असल्याची जाणीव करून देत होता.
दरवाजा वाजला मीनाक्षी हातात ट्रे घेऊन आत आली. तिच्या धुतलेल्या, अर्धवट वाळलेल्या केसातून पाण्याचे काही थेंब अजूनही गळत होते.

"व्हेरी गुड मॉर्निंग मॅम " अंगावर टीशर्ट चढवत सिद्धांत बोलला.

" गुड मॉर्निंग मिस्टर चौधरी " मिनाक्षीने प्रतिउत्तर दिले. तिने टीपॉय बेडसमोर ओढत त्यावर ट्रे ठेवला.खुर्ची त्यासमोर मांडली. त्यावर बसली आणि टॉवेलने केस कोरडे करू लागली.

"मॅम हा येलो कुर्ता खूप छान दिसतोय तुम्हाला " कॉफीचा कप उचलत सिद्धांत बोलला.

"आतातरी माझ्याशी फ्लर्ट करणं बंद कर " हसत मीनाक्षी म्हणाली. सिद्धांतही गालात हसला.

"बाय द वे सिद्धांत , यु टू आर लुकिंग क्युट विथ दोज मेसी हेअर्स " मीनाक्षी म्हणाली दोघेही मनोसोक्त हसले.
"सिद , मगाशी माझं बोलणं झालंय शकील जाफर सरांशी आणि गुड न्यूज आहे ते तुझी व्हिजिट स्पॉन्सर करायला तयार आहेत .. " कॉफीचा घोट घेत मीनाक्षी बोल्ली.

"खरंच ? " मोठा आ वासात सिद्धांतने विचारले.

"म्हणजे मी आता माझ्या पेंटिंग्स स्पेनला होणाऱ्या इंटरनॅशनल आर्ट ऐक्सिबिशनमध्ये ठेऊ शकतो ... मॅम माझा तर विश्वासंच बसत नाहीये .. हे फक्त तुमच्यामुळे झालं " तो अजूनही धक्क्यात होता.

"यु डिजर्व धिस चान्स... परवा तुझ्या पेंटिंग्स पाहताक्षणी डोळ्यात भरल्या , कितीतरी वेळ मी हरवून एक-एक पेंटिंग पाहत होते , पेंटिंग मागची कन्सेप्ट , बेधडक रंगांचा वापर , त्याच्यातलं वेगळेपण , तुझी अनोखी शैली ..... लाजवाब . " मीनाक्षी

थँक यु सो मच .. इट मिन्स अलॉट .. खरतर तुमच्या इतका फॉर्म नाही माझा पण कॉलेजमध्ये खूप काही शिकलं ते तुमच्याकडूनच ..."

"थँक्स पण तू तुझी अनोखी शैली निर्माण केलीस त्यावर कोणाची छाप नाही अँड आय एम प्राउड ऑफ इट .. खूप पुढे जाशील तू लक्षात ठेव माझे शब्द .. " मीनाक्षी आत्मविश्वासाने बोलली. सिद्धांत हसला. त्याने कॉफीचा काप बाजूला ठेवला. मीनाक्षीचीही कॉफी पिऊन झाली होती.

"योग जुळण्यावर वैगेरे परवापर्यंत माझा अजिबात विश्वास न्हवता पण परवा मी इतर पेंटर्ससोबत आर्ट गॅलरीच्या एग्झिबिशन मध्ये माझ्या पेंटिंग्स ठेवतो काय आणि चीफ गेस्ट म्हणून उंची येता काय .. "

"खरंच .. योग जुळून आला . " टॉवेलने केस कोरडे करू लागली.

"तुम्हाला माझ्या पेंटिंग्स न्याहाळता पाहिलं आणि क्षणभर डोळ्यांवर विश्वासाचं बसला नाही की खरंच तुम्ही आहात , खात्री पटताच काळजाची धडधड वाढू लागली .. मोठ्या धाडसाने तुमच्याशी बोललो , बाहेर भेटायला विचारलं ... "

"आणि फ्लर्ट करून करून मला पटवलंसपण " मीनाक्षी हसू लागली .

"तुम्हाला फ्लर्ट वाटत असलेल्या बऱ्याच गोष्टी मी खऱ्याअर्थाने तुमच्यासाठी फील केल्यात मॅम .. आणि तुम्हाला एकांतात भेटल्यावर मी माझ्या नकळतच भावनांना वाट करून दिली कसलीही फिकीर न करता " मीनाक्षीच्या जवळ येत तो बोलला.तिच्या हातातून टॉवेल घेत तो तिचे केस कोरडे करू लागला.
केस बऱ्यापैकी कोरडे झाल्यावर. दुसरी खुर्ची मीनाक्षीच्या अगदी शेजारी मांडून तो त्यावर बसला.त्याने मीनाक्षीचा हात हातात घेतला. पुढे झुकत त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवले. नंतर बराच वेळ तो फक्त मीनाक्षीकडे एकटक पहात राहिला.

"काहीतरी बोल . ... नक्कीच काहीतरी आहे तुझ्यामनात " मीनाक्षी शांतता भंग करत म्हणाली.

"हो काहीतरी विचारायचं "

"ठीक आहे विचार .. योग्य वाटलं तर उत्तर देईल " मीनाक्षी सावधपणे म्हणाली.

"काल आपण इंटिमेट होताना .. चर्मअवस्थेच्या शेवटच्याक्षणाला तुम्ही माझ्या चेहऱ्यात कोणाला शोधात होतात ... माझ्या भावनांच्या कुशीत झुलवत तिथपर्यंत नेल्यावर तुमच्या डोळ्यात , आरश्यात मी स्वतःला पाहावं तसा मी दिसायला हवा होतो ... पण तो चेहरा माझा न्हवता" निराश होत सिद्धांत बोलला. मीनाक्षीने हात सोडवला. ती निरुत्तर झाली .

"बोलाना मॅम काहीतरी "

"चल जाफर सरांना भेटायला जायचयना... लवकर निघावं लागेल आपल्याला" त्याला टाळत खुर्चीवरून उठत मीनाक्षी म्हणाली.

"माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही देणार का ?"

"सिद , तुलाही माहितीये हे किती कॅजु अल लिंक अप आहे , आणि मला नाही आवडत माझ्या पर्सनल गोष्टी शेअर करायला , आपल्यातले क्षण सुंदर होते पण उगाच भावनांचा गुंता नको"

"माझ्यासाठी कॅजुअल न्हवतं ते .. तुम्हाला नाही कळणार आणि घाबरू नका गोष्टी शेअर केल्याने भावनिक गुंता नाही होणार आपल्यात , मी तेवढी काळजी घेईल , पण त्या शेवटच्या क्षणाला काहीतरी खुपलं मला .. मला माहितीये तुम्हालाही आतून काहीतरी काचतंय .. आणि ते जास्त त्रास देतय मला "
मीनाक्षी निशब्द झाली. डाव्या हातातील बोटात घातलेल्या अंगठीशी ती अस्वस्थपणे खेळू लागली. ती अंगठी घट्ट होती , रुतून बसली होती , आता तिच्या मापाची न्हवती तरीही तिने उतरवली न्हवती. .
काळजात दडवुन ठेवलेल्या अनेक अव्यक्तं गोष्टी, भूतकाळाच्या कुलूपबंद पेट्या कोणीतरी मुक्त करू पाहत होतं.
कितीतरी जणांनी तो अयशस्वी प्रयत्न केला असेल. पण आज लपवून ठेवण्याचा , अव्यक्त राहण्याचा जोर हलका पडतं होता ,माहित नाही का.
मीनाक्षी बेडवर बसली शून्यात पाहू लागली.

"बोलना मॅम "

"जाणून काय करणार "

"मुक्त करायचा प्रयत्न करणार "

"कशाला "

"काहीतरी आहे जे नको असायला पाहिजे आता तरी रक्तातळलेल्या मनाने जपून ठेवलंय तुम्ही त्याला "

"दोन भेटीत कसं काय कळालं तुला "

"जसं तुम्ही माझ्या पेंटिंग्स मधले भाव अचूक ओळखलेत , मॅम आर्टिस्ट आहोत आपण , अव्यक्त भाव छोट्या छोट्या गोष्टींमधून अचूक सेन्स करता येतात आपल्याला , या एक माणूस राहत असलेल्या बंगल्यात , दुसऱ्या व्यक्तीचा आभास निर्माण करायचा प्रयत्न जागोजागी दिसतो जसकी डायननिंग टेबलवर दोन ताटं उलटी मांडलेली आहेत ... "

"दरवाज्यातून आत येताच एक शोभेचा पिंजरा आहे , त्याचा दरवाजा सताड उघडा आहे , त्यात शोभेचा पक्षीही आहे पण मांडणीनुसार त्याला त्या पिंजऱ्यातून मुक्त व्हायची इच्छा नाही असं जाणवतं , त्या पक्षाशी मान खाली आहे पंख घट्ट मिटलेले आहे तो त्या पिंजऱ्यात खुशही नाही ... तो पक्षी तुम्ही आहात ना मॅम "

"सिद्धांत ... " मीनाक्षीला भावना अनावर झाल्या . दोन्ही हातात चेहरा लपवून ती हमसून हमसून रडू लागली. सिध्दांत तिच्या जवळ गेला . ती त्याला बिलगली डोळ्यातून पाणी वाहतच होते . हुंदके भर भरून येतच होते. वर्षानुवर्षे रक्ताळलेलया जखमांना कोणी तरी फुंकर घालू पहात होतं.
मीनाक्षीची ती अवस्था बघून सिद्धांतही रडू आले.
थोड्यावेळाने मीनाक्षी थोडी शांत झाली. सिद्धांताने पाण्याचा ग्लास आणला. मीनाक्षीने पाणी प्यायले.

"जाणून घेतल्याशिवाय पिच्छा नाही सोडणार ना तू माझा "

"हो मॅम " शेजारी बसत सिद्धांत बोलला. मीनाक्षी गालातल्या -गालात हसली.

"सांगते ... इतके वर्ष कधी मन नाही मोकळं केलं कोणापुढे , आज काय होतंय काय माहिती,कदाचित तुझी माझ्याविषयीच प्रामाणिक तळमळ भावली असेल मला .. आज सांगूही वाटतयं .. मनातलं बोलूशी वाटतंय .. पंधरा वर्षांपूर्वीची गोष्टं आहे तेव्हा मी कॉलेजमध्ये होते" मीनाक्षी बोलू लागली तिच्या अंगठीला वेगळीच चमक आली.
**********************************************
पुढील भाग लवकरच ....

© धनश्री साळुंके