Ashtavinayak - 5 books and stories free download online pdf in Marathi

अष्टविनायक - भाग ५

अष्टविनायक भाग ५

इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद.

हाच तो ऋग्वेदातील प्रसिध्द मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा कर्ता.

गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला.

त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ''तु याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.'' विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला.

ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते

या मंदिरासंदर्भात आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

असे मानले जाते की माघी चतुर्थीला जर इथे प्रसाद म्हणून मिळालेला नारळ खाल्ल्याने पुत्र प्राप्ती होते. त्यामुळे माघी उत्सवात या अष्टविनायकाच्या देवळात भक्त अतिशय गर्दी करतात.

इथे येणारे भाविक दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात. दुपारी १२ ते २ या वेळात प्रसाद वाटला जातो.

गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी (गणेश जयंती) या दिवसात उत्सव साजरा केला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होते. शिवाय अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी यादिवशी विशेष पूजा केल्या जाते.

गणपतीचे पाचवे स्थान हे थेऊर आहे

हे मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे २२ किमी अंतरावर आहे.
मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर अंतर- थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे.

ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.
यासंदर्भात आणखी एक अशी कथा आहे.
राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला.
जेंव्हा गणासूराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेंव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासूराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले.
गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले.
दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला.

गणपतीने गणराजाला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिले . याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले व त्यांची चिंताही दूर झाली. आणि तेंव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला.
ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला 'कदंबपूर' असेसुद्धा म्हणतात.

चिंतामणीची मुर्ती पूर्वाभिमुख व स्वयंभू आहे .
दुष्ट इंद्राला गौतम मुनींच्या शापामुळे जी हजार छिद्रे अंगावर निर्माण झाली होती त्या छिद्राचे हजार डोळ्यांत रुपांतर येथील गणपतीने इंद्रावर केलेल्या कृपेमुळे झाले होते .
इतक्या प्राचीन काळापासून हे गणेशस्थान प्रसिद्ध आहे . देवळाचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे . पण गणेशाची मूर्ती पूर्वेकडे तोंड केलेली आहे व डाव्या सोंडेची आहे. तसेच, डोळ्यात माणिकरत्न आहेत.
देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.

थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. असे म्हणतात की त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.
खुद्द गणपती आपले मंदिर सोडुन त्यांच्या भेटीस येत असे .
मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते
गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले.

क्रमश:

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED