स्वराज्यात गुन्ह्याला माफी नाही Dadoji Kurale द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वराज्यात गुन्ह्याला माफी नाही

आज 400 वर्षानंतर हि ज्यांचे नाव ऐकल्यावर आपली छाती अभिमानाने फुलून येते ते म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांविषयी आजपर्यंत खूप मान्यवरांनी लिखाण केलं. आपापल्या परीने राजांच्या आयुष्याच्या घड्या उलघडण्याचा प्रयत्न केला. हे जरी सत्य असलं तरी सुर्यासारख्या तेजस्वी राजांना शब्धात मांडता येणं हे फारच कठीण आहे. त्यांच्या पराक्रमाला शोभेल आणि त्यांच्या सन्मानाला पेलता येईल अशी ताकत कोणत्याही भाषेच्या शब्धात सामावलेली नाही.

छत्रपती शिवाजी राजांचे सबंध आयुष्य रयतेच्या सेवेसाठी गेले. रयतेच्या सुख दुःखांची खरी जाण त्यांना होती. त्यांच्या सारखा जाणता राजा या मराठी मुलखाला आणि मराठी रयतेला लाभला हे आपलं भाग्यच आहे. राजे होते म्हणून तर आज आपण ताठ मानेने जगत आहोत.

महाराजांनी मराठी मुलखावर नाही तर इथल्या रयतेच्या मनावर राज्य केलं. राजे आयुष्यभर न्यायाने आणि सत्याने वागले. कुणावर अन्याय केला नाही आणि कुणाचा अन्याय सहन हि केला नाही. शौर्याला प्रोत्साहन दिलं. गरिबाला न्याय दिला आणि अपऱ्याधाला कठोर शासन हि केलं. महाराजांनी कधीच भेदभाव केला नाही. सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि ह्या स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी आपली सारी हयात खर्ची घातली.

परस्त्रीला मातेसमान मानणारे राजे नेहमीच स्त्रियांच्या रक्षणासाठी तत्पर असायचे. मोगली अत्याचारापासून आपल्या धर्माचे आणि स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करण्यासाठीच तर त्यांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. स्त्रीचा आदर कसा राखायचा ह्याची अनेक उदाहरणे राजांनी दाखवून दिली आहेत. स्त्रीवर होणारा अत्याचार ते कधीच सहन करत नव्हते. आपल्या खास मर्जीतीला जरी कुणी असला आणि त्याने पर स्त्रीचा अपमान केला तरी त्याची ते तमा बाळगत नसत.

अश्या तेजस्वी आणि पराक्रमी राजांना मुजरा करण्यास आम्ही सदैव धन्यता मानतो.

कथा त्यावेळची आहे ज्या वेळी स्वराज्यावर पहिलं मोठं संकट चालून आलं होतं. मिरजा राजे जयसिंग नावाचे औरंगजेबाचे हिंदू सरदार स्वराज्यावर चालून आले होते आणि शिवाजी राजांना त्यांच्याशी तह करण्यास भाग पाडले होते.

प्रजेच्या हितासाठी राजांनी तह केला होता आणि औरंगजेबाला भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. पण औरंजेबाने कपटी डाव खेळून राजांना कैद केली होती. पण सह्याद्रीच्या वाघाला असं जास्त दिवस कैदेत ठेवता येणं शक्य नाही हे औरंगजेब साफ विसरला होता. मोठ्या शिताफीने शिवाजी राजांनी औरंजेबाच्या कैदेतून आपली सुटका करून घेतली आणि ते रायगडी परत आले होते.

तहामुळे मुलखाचा बराचसा भाग मुघलांच्या ताब्यात गेला होता. तो लवकरात लवकर सोडवून घेणे गरजेचे होते. त्याचबरोबर स्वराज्य विस्तारासाठी नवीन प्रदेश जिंकणे हि गरजेचे होते. राज्य जितकं मोठं तितकी ताकत मोठी हे राजे ओळखुन होते आणि म्हणूनच त्यांनी दुहेरी मोहीम आखली.

एकीकडे तहा मुळे मुघलांच्या घशात गेलेला मराठी दौलतीचा भाग सोडवून घेण्यासाठी राजांनी स्वराज्याचे सर सेनापती हंबीरराव मोहिते याना विडा दिला आणि दुसरीकडे स्वतः जातीने कर्नाटक प्रांताची मोहीम हाती घेतली. अखंड स्वराज्याच्या मराठी सेनेचे दोन भाग केले गेले. निम्मी सेना मदतीला घेऊन हंबीरराव स्वारीवर निघून गेले. राहिलेली निम्मी सेना घेऊन राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले. त्यावेळी राजांच्या सोबत असणाऱ्या सेनेचे सेनापती होते आनंदराव.

महाराज कर्नाटक प्रांतात शिरताच मिळेल तो प्रदेश जिंकत पुढे जात होते. साम दाम दंड या नितीने ते कर्नाटकावर भगवा फडकवत निघाले होते. राजांची कीर्ती आणि पराक्रम हा हा म्हणता सबंध कर्नाटक प्रांतात घुमत होता. राजांसोबत वैर करण्यात अर्थ नाही हे भागानगरच्या गोवळकोंड्याच्या कुतूबशहा ने ओळखले आणि त्याने राजांसोबत मैत्रीचा हात पुढे केला. राजांनी तो प्रस्ताव स्वीकारला आणि कुतूबशहा ची भेट घेऊन महाराज गदग प्रांताकडे वळले.

गदग प्रांतातील संपगाव जवळच्या खुल्या पठारावर राजांची छावणी पडली होती. तंबु उभे राहिले होते. शेकोट्या पेटल्या होत्या. सततचा प्रवास आणि शत्रूशी होणाऱ्या चकमका यामुळे राजांच्या सैन्याला थोडी विश्राती हवी होती. त्यामुळे इथे दोन दिवस छावणी टाकून मग पुढची मोहीम हाकावी या विचाराने राजांनी छावणीला विश्रांतीची मुभा दिली होती. राजांची छावणी विश्रांती करत असली तरी नेहमी चौकस असायची.

दोन दिवसांनी छावणी हलणार म्हणून राजांच्या पुढच्या मुक्कामाची तयारी करण्यासाठी लागणारे सामान 12 बैल गाड्यामध्ये भरून त्यांना पुढच्या मुक्कामाच्या दिशेने आजच रवाना केले गेले आणि सारी छावणी विश्रांती घेऊ लागली.

दुसऱ्या दिवशी पहाटे राजे उठले. थंडीचे दिवस असल्यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते. सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरपी किरणे अंगावर झेलत राजे विचारमग्न होऊन आपल्या तंबूच्या बाहेर उभे होते. शेजारी आंनदराव उभे होते.

राजांचे एक सरदार सखूजी गायकवाड राजांच्या मुजऱ्याला आले. राजांना त्रिवार मुजरा करून सखूजी खाली मान करून उभे राहिले. सखूजीना पाहून राजे म्हणाले, "काय सखूजीराव छावणीची हालचाल काय म्हणते?"

राजांच्या या प्रश्नाने आपली खाली वाकलेली मान किंचित वर घेऊन सखूजी म्हणाले, "सर्व काही ठीक आहे महाराज पण एक कागाळी कानावर आली आहे..."

"कागाळी?... कसली कागाळी?" राजांनी शंकेने प्रश्न केला.

"काल आपले पुढच्या मुक्कामासाठी लागणारे साहित्य भरून 12 बैलगाड्या पुढे पाठवल्या होत्या. पण वाटेत बेलवडीच्या पाटलाने त्या आडवल्या आणि समानासहीत पळवून नेल्या. बैल आणि बैलगाड्या त्याने कैद करून ठेवल्या आहेत."

हे ऐकताच राजे थोडे आश्चर्याने म्हणाले, "सखूजीराव तुमची काहीतरी गफलत होत आहे. अहो बेलवडी तर एक छोटी गढी त्याची एवढी हिम्मत होईल असं वाटत नाही. तुम्ही त्या पाटलाला समज द्या आणि बैल गाड्या सोडायला सांगा. या तुम्ही..." असं म्हणून राजे आपल्या तंबूत शिरले.

राजांची आज्ञा मिळताच सखूजीरावांनी आपल्या माणसांना पाठवून बेलवडीच्या पाटलांना जाब विचारला आणि ताबडतोब बैल आणि बैलगाड्या सोडून देण्यासाठी सूचना केली.

बेलवडीचा पाटील मोठा हिम्मतवान गडी होता. अंगाने अगदी धिप्पाड आणि आपल्या निर्णयावर एकदम ठाम असायचा. अंगात कमालीचं धैर्य होतं नाहीतर राजांशी शत्रुत्व ओढवून घेण्याचं साहस त्याने केलं नसतं. जेवढा पाटील हिम्मतवान होता त्याहून कितीतरी हिम्मतवान त्याची पत्नी होती. सावित्रीबाई.

पाटलांच्या गैरहजेरीत सावित्रीबाई गढीचा कारभार एकदम चोख पार पढायच्या. पाटलांची अर्धी हिम्मत तर सावित्रीबाईच होत्या. अश्या शूर आणि धाडशी असणाऱ्या सावित्रीबाई नेहमी आपल्या पतीच्या पाठीशी खम्भीर पणे उभ्या असायच्या. सावित्रीबाई पायीच्या लढाईत एकदम पटाईत होत्या. कर्नाटकी प्यादी पायीच्या लढाईत नेहमीच तरबेज असायचे.

शिवाजी राजांचा आदेश जेव्हा सखूजीरावांनी पाटलांना कळवला तेव्हा त्याचे एकच उत्तर पाटलाने दिले.

"हिम्मत असेल तर बैल आणि बैलगाड्या सोडवून न्या. नाहीतर आल्या वाटेने परत जा."

पाटलाचा निरोप राजांच्या कानावर गेल्यावर राजांना त्याचे कौतुक वाटले. एवढी छोटिशी गढी आणि त्याची इतकी हिम्मत. सबंध मराठी सेनेला असे खुले आव्हान पाहून राजे आवाक झाले. राजे सखूजीरावांना म्हणाले.

"पाटील जरा आपल्याच तोऱ्यात दिसतोय. त्याला आपली सामोपचाराची भाषा समजेल असं वाटत नाही. सखूजीराव तुम्ही आपली कुमक सोबत घ्या आणि गढीवर चालून जा. गढी काबीज करून या तोवर आपला तळ इथेच राहील. या तुम्ही... आई तुम्हाला यश देईल.... जगदंब जगदंब..." राजांनी डोळे मिटले आणि आपला उजवा हात गळ्यातील कवड्याच्या माळेला लावला.

राजांची आज्ञा होताचं सखूजीराव आपली कुमक घेऊन बेलवडीच्या गढीवर चालून गेले.

बेलवडीची गढी एकदम छोटी गढी होती. सपाट भूभागावर पसरली होती. चौफेर मातीचे ढीग पसरले होते आणि त्याच्या मध्ये हि गढी वसली होती. राजांच्या तळापासून हि गढी अगदी नजरेच्या अंतरावर होती. लांबून हि गढी पावसाळ्यात एकाकी उगवणाऱ्या आळम्ब्याच्या छत्री सारखी भासत होती.

एका दिवसात गढी काबीज करण्याच्या हेतूने सखूजीराव आपली कुमक घेऊन गेले होते. गढीच्या चौफेर बाजूनी त्यांनी नाके बंदी केली. चौकी पहारे बसवले. छोट्या मोठ्या चकमकी झडल्या आणि मराठी सेना गढीला भिडली पण पुढच्याच क्षणी गढीतून मोठा प्रतिकार झाला मराठी सेनेला माघार घ्यावी लागली.

दुसऱ्या प्रयत्नात परत मराठी सेना गढीला जाऊन भिडली पण यावेळी हि मोठा प्रतिकार झाला. पाटील जातीने लढाईत उतरला होता त्यामुळे त्याच्या सेनेचे मनोबल फार वाढले होते. कर्नाटकी प्यादी पायीच्या लढाईत एकदम पटाईत असतात याची प्रचिती सखूजीरावांना क्षणा क्षणाला येत होती. पहिला दिवस संपला पण गढी काबीज झाली नाही.

दुसऱ्या दिवशी सुध्दा तेच झालं. गढी काबीज होण्याची चिन्ह काही वाटत नव्हती. गढीतून होणारा प्रतिकार इतका मोठा होता की मराठी सेनेला गढीला भिडन्यास वावच नव्हता. दोन दिवस झाले तरी गढी काबीज झाली नव्हती.

इकडे राजांची सारी छावणी गढीच्या दिशेने डोळे लावून बसली होती. राजांचा मन:क्षोभ वाढत होता.

तिसऱ्या दिवशी सखूजीराव राजांच्या भेटीला गेले. त्यांना पाहताच राजे म्हणाले, "बोला सखूजीराव गढी काबीज झाली का?"

राजांच्या प्रश्नाने खाली मान करून सखूजीराव म्हणाले, "महाराज गढीचा बंदोबस्त फार कडक आहे. पण जास्त दिवस गढी टिकाव धरेल असं वाटत नाही."

यावर राजे हसले आणि म्हणाले, "सखूजीराव तुम्ही कधीपासून भविष्य सांगायला लागला की कोणी जोतिषी भेटला वाटेत?"

"हो महाराज. मी एका जोतिषांना विचारलं त्यांचं पण हेच मत आहे." सखूजीराव थोड्या हिंमतीने म्हणाले.

शेजारी उभ्या असणाऱ्या आंनदरावांकडे पाहात राजे म्हणाले, "पाहिलत आंनदराव आपल्या सखूजीरावांची शूरता. यांची तारीफ करावी तितकी कमीच वाटते. एवढी छोटीशी गढी घेण्यासाठी यांना जोतिषाला विचारण्या इतपत यांच्या शौर्याची मजल गेली. एवढा दक्षिण दिग्विजय करून आम्ही आलो आणि एवढीशी छोटी गढी आपल्याला घेता येईना.....
सखूजीराव असल्या छोट्या खेळात जास्त दिवस घालवणं आपल्याला जमणार नाही." राजांचा आवाज आता थोडा कडक झाला होता.

सखूजीरावांची अवस्था थोडी बिकट झाली होती. तरी थोडी हिम्मत करून सखूजीराव म्हणाले, "महाराज आपला तोफखाना वापरण्याची परवानगी मिळावी. एका दिवसात गढी नेस्तनाबूत करून दाखवतो."

"वा सखूजीराव वा... केवढा मोठा लौकिक पदरात पाडून घ्याल. एक मामुली गढी घेण्यासाठी तोफखाना वापरण्याच्या गोष्टी करताय? मग आपली फौज काय कमी आहे का? चालत गेली तरी ती गढी राहणार नाही. तुमच्या हातून हे काम होईल की नाही ते सांगा नाहीतर आम्ही हि कामगिरी दुसऱ्यावर सोपवतो." राजांचा आवाज आता फारच कडक झाला होता. कोणत्या वेळी कोणते शब्ध वापरायचे हे राजे बरोबर जाणून होते. सखूजीरावांना असं जिव्हारी लागणारं बोलल्याशिवाय त्यांच्यात चेव येणार नाही हे राजे ओळखून होते.

राजांचा निरोप घेऊन सखूजीराव बाहेर पडले. राजांच्या रागापेक्षा त्यांना स्वतःचा राग जास्त येत होता. 'तुमच्या हातून हे काम होईल की नाही ते सांगा नाहीतर आम्ही हि कामगिरी दुसऱ्यावर सोपवतो.' ... हे राजांचे बोल त्यांच्या जिव्हारी लागले होते.

सखूजीराव आपल्या माणसांना घेऊन जातीने बेलवडीच्या गढीला जाऊन भिडले. त्वेषाने गढीवर हल्ला चढवला तेवढ्याच त्वेषाने पाटलाच्या माणसांनी प्रतिकार हि केला. प्रचंढ युद्ध पेटलं. भयंकर कापाकापी सुरु झाली. दोन्ही सैन्य एक एकमेकांना ऐकेना. दोन्ही कडून हल्ले प्रतिहल्ले चालू झाले. सखूजीराव तर हट्टाला पेटले होते. हातात तलवार घेऊन जातीने लढत होते. मराठी मावळ्यांचा जोश वाढला होता. मराठी कुमक पाटलांच्या सैन्यावर भारी पडत होती.

सखूजीराव व त्यांचे साथीदार असेच लढत राहिले तर आपली हार पक्की आहे हे पाटलाने ओळखले आणि त्याने आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी गढीच्या मुख्य दरवाजा समोर चाललेल्या युद्धात स्वतः उडी घेतली. प्रचंढ त्वेषाने तो युद्ध करू लागला. समोर येईल त्याला आडवा पाडत पाटील मुख्य दरवाजातून बाहेर पडला. एक क्षण त्याला लढताना पाहून मराठी सेना मागे हटू लागली पण सखूजीरावांनी युद्ध चालू ठेवण्याची आज्ञा केली.

पाटील त्वेषाने लढत होता. सकाळपासून चाललेलं हे युद्ध संध्याकाळ झाली तरी चालूच होतं. अंधार पडला तर युद्ध करता येणार नाही हे मावळ्यांनी ओळखलं पुन्हा माघार घ्यावी लागणार हे कळताच मावळ्यांनी आपला जोर वाढवला. मराठी मावळ्यांच्या तडाक्यासमोर पाटील जास्तवेळ टिकाव धरू शकला नाही आणि एका जिव्हारी लागलेल्या घावाने पाटील धारातीर्थी पडला.

पाटील पडताच पाटलाचे लोक पाटलाला घेऊन गढीत गेले. पाटील पडल्याची बातमी ऐकून सखूजीरावांना आंनद झाला. सगळीकडे संध्याकाळचा अंधार पसरत होता. पाटील पडला आता गढी काबीज करण्यात काहीच अवघड नाही असं समजून सखूजीरावांनी थकलेल्या मराठी सेनेला आराम करण्याचा हुकूम दिला. उद्या सकाळी गढी काबीज करू असा विश्वास आता सखूजीरावांना वाटत होता.

इकडे पाटील पडल्याची बातमी राजांना कळाली तसं राजांनाही थोडं समाधान वाटलं. पुढे अजून बरीच मजल गाठायची होती आणि अश्या छोट्याश्या गढीसाठी इथं तळ मारून बसावं लागतंय याचाच राजांना त्रास होत होता.

फक्त आजची रात्र उद्या ह्या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावून राजांना भेटायला जावू असं ठरवून सखूजीराव त्या रात्री किती तरी दिवसांनी निवांत झोपले होते. राजांच्या एका स्वप्नासाठी असे अनेक मावळे रात्र रात्र जागून काढत होते. सखूजीराव हि त्यातलेच एक होते.

इकडे बेलवडीच्या गढीत मात्र आजची रात्र खूपच निर्णायक ठरणार होती. गढीचा मालक पडला आता कोणत्याही क्षणी शत्रू येईल आणि सारं लुटून नेईल अश्या विचाराने गढी पुरती घाबरून गेली होती. मात्र सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळच तेज चमकत होतं. पती निधनाचे दुःख करत बसण्याची हि वेळ नाही हे त्यांनी ओळखलं होतं. शत्रू असा दाराशी ठाण मांडून असताना. गढीचा मालक धारातीर्थी पडला असताना सावित्रीबाईंनी एक धाडशी निर्णय घेतला. "उद्या आम्ही स्वतः जातीने गढी लढवू." गढीच्या लोकांना पुन्हा जोश चढला, कारण ते सावित्रीबाईंचे कर्तृत्व ओळखून होते. त्यांच्या सोबत लढायला सारी गढी एक झाली आणि उद्याच्या दिवसाची वाट पाहू लागली.

दुसऱ्यादिवशी सकाळी सखूजीराव आपले सैन्य घेऊन गढीवर चालून गेले पण तिथलं दृश्य पाहून ते आश्चर्यचकित झाले. पाटील पडले म्हणून पाटलांची पत्नी सावित्रीबाई गढी लढवण्यासाठी सज्ज झाली होती. विजयाच्या धुंदीत आलेल्या सखूजीरावांच्या सेनेवर सावित्रीबाईंच्या लोकांनी हल्ला चढवला आणि पुन्हा सखूजीरावांना माघार घ्यावी लागली.

रोज असच होऊ लागलं. त्वेषाने पुढे जाणाऱ्या सखूजीरावांच्या लोकांना तितक्याच त्वेषाने प्रतिकार होऊ लागला. आपल्या युद्ध कौशल्याने आणि अचूक डावपेचाने सावित्रीबाईंनी नुसत्या पायदळाने हि लढाई जिंकणं अशक्य करून टाकलं होतं. सखूजीराव पुरते हैराण झाले होते. गढीला वेढा घालून एकवीस दिवस झाले होते मात्र हाती काहीच लागलं नव्हतं. नुसते दिवस उलटत होते.

सावित्रीबाई मोठ्या हिमतीने गढी लढवत आहे हे जेंव्हा राजांना कळाले तेव्हा राजे म्हणाले, "धन्य आहे त्या शूर स्त्रीची. आपला पती निधन पावला असता त्याच दुःख न करता ती गढी लढवत आहे तिच्या धाडसाला तोड नाही. आम्ही आणखी एका दिवसाची वाट पाहू नाहीतर स्वतः जातीने या मोहिमेत उतरू त्याशिवाय दुसरा मार्ग आता राहिला नाही."

राजांचा हा निर्धार सखूजीरावांना कळाला. त्यांनी त्वेषाने आपली मूठ वळली. मनाशी ठाम निर्णय केला. आपण अजून जिवंत असताना राजांना युद्धात उतरावं लागतंय याची त्यांना मनस्वी चीड वाटू लागली. उद्या एक तर गढी पडेल नाहीतर हा सखूजी पडेल.

दुसऱ्या दिवशी सकाळी छावणीवर दाट धुके पडले होते. सकाळच्या बोचऱ्या थंडीत छावणी हळू हळू जागी होत होती. राजे आपली सकाळची नित्य कामं आटोपून आपल्या तंबूत बसले होते. तेवढ्यात आंनदराव मुजऱ्यासाठी राजांच्या समोर आले. आनंदरावांना पाहून राजे म्हणाले...

"आनंदराव आज एकटेच? आपले सखूजी आले नाहीत..?"

"महाराज आज पहाटेच सखूजीराव आपली कुमक घेऊन बेलवडीवर चालून गेलेत..." आंनदरावांनी खुलासा केला.

"आम्ही काल बोललो ते सखूजीरावांनी जीवाला लावून घेतलेलं दिसतंय..?" राजांनी किंचित नाराजीने उद्गार काढले.

"पण महाराज सखूजीराव आपल्या कामात कसूर करतील असं वाटत नाही. त्यांच्या कार्याबद्दल मनात शंका नसावी..." आनंदराव सखूजीरावांची शिफारस करण्याच्या हेतूने बोलेले....

"आम्ही कुठं तस म्हणतो.... पण हा पेचच असा पडला आहे की काही सुचत नाही. एवढी फौज हाताशी असताना आम्ही तिला गढीवर पाठवू शकत नाही. तोफखाना वापरू शकत नाही. का? तर... एवढीशी गढी काबीज करण्यासाठी
जर आम्ही फौज आणि तोफखाना वापरला तर किती अपकीर्ती पदरात पडेल. दक्षिण दिग्विजय करणारा राजा एक मामुली गढी काबीज करण्यासाठी तोफखाना वापरतो हि बदनामी आम्हाला सहन होणार नाही.

यात सखूजीरावांचा दोष आहे असं मुळीच नाही पण आम्ही सखूजीरावांना चांगलं ओळखतो. सखूजीरावांच्या जवळ धाडस आहे मात्र युक्ती नाही. त्या ऐवजी संताप आहे. संतापाने बुद्धी चालत नाही. त्यामुळेच युद्धाचे डावपेच कळत नाहीत. नाहीतर हि छोटी गढी घायला त्यांना इतका वेळ लागला नसता..." राजांनी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, "बघू आजचा दिवस वाट पाहू..."

तेवढ्यात तुताऱ्यांचा आवाज साऱ्या मुलखात घुमला. गढीच्या दिशेने आवाज येत होता. सखूजीरावांनी गढी काबीज केली होती. राजांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. ते हात जोडून म्हणाले, "जगदंबेची कृपा.... आनंदराव, सखूजीराव विजयी झाले... चला आपल्या विजयी वीरांच्या स्वागताला चार पाऊले पुढे जाऊ..."

क्षणात राजांचे घोडे तयार केले गेले. राजांनी घोड्यावर मांड टाकली आणि घोडे गढीच्या दिशेने उधळले. पाठोपाठ आनंदराव आणि निवडक घोडदळाचे पथक दौडू लागले.

थोड्याचवेळात महाराज गढीच्या दाराजवळ पोचले. गढीच्या दाराशी असलेला नगारा घुमू लागला. समोर बरेच जखमी मावळे पडले होते. जे युद्धात कामी आले होते त्यांना शेल्यात झाकून ठेवले होते. जखमी वीरांना पाहून राजे गंभीर झाले. बलीदानाशिवाय विजय प्राप्त होत नाही हे राजांना ठाऊक होतं पण पित्यासारखं आपल्या सेनेवर प्रेम करणाऱ्या राजांच्या काळजाला किती भेगा पडत होत्या हे त्यांचं त्यांनाच माहित.

राजे आलेले कळताच राजांच्या स्वागताला श्रीपतराव नाईक पुढे आले. राजांची अपेक्षा होती की सखूजीराव सामोरे येतील पण सखूजीराव कुठे दिसत नव्हते. राजांच्या चेहऱ्यावर चिंता झळकू लागली. सखूजीराव युद्धात कामी तर आले नसतील ना ह्या शंकेने ते अस्वस्थ झाले. समोर आलेल्या श्रीपतरावांचा मुजरा स्वीकारून राजांनी प्रश्न केला?

"श्रीपतराव आमचे सखूजीराव कुठं आहेत?"

श्रीपातीरावांनी राजांची चिंता हेरली होती. ते म्हणाले,
"महाराज गढी घेण्यासाठी खूप शर्थ करावी लागली. सखूजीराव तर स्वतः युद्धात उतरले होते. शेवटी गढी काबीज झालीच पण इतके दिवस नेटाने गढी लढवणाऱ्या सावित्रीबाई मात्र दाट धुक्याचा आसरा घेऊन बाजूच्या जंगलात पसार झाल्या. सखूजीराव त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागावर गेले आहेत."

हे ऐकून राजांना थोडं समाधान वाटलं. ते आंनदरावांना म्हणाले, "पाहिलंत आंनदराव आम्ही बोललो होतो ते खरं आहे ना? एवढी गढी घेऊन हि सखूजीरावांचा संताप कमी झाला नाही. आता त्या सावित्रीबाईंना पकडल्याशिवाय ते माघारी येणार नाहीत." असं म्हणून राजे माघारी फिरले आणि श्रीपतीरावांना म्हणाले,

"जखमींची नीट काळजी घ्या. जे कामी आलेत त्यांचा योग्य तो सन्मान करा आम्ही येतो..."

"पण महाराज आपण गढीत यावं..." श्रीपतीराव एकदम भांबावून म्हणाले,

"जरूर येऊ... पण ज्यांनी मोठ्या पराक्रमाने हि गढी जिंकली ते सखूजीराव गढीत नसता आम्ही कसे येऊ? ते शोभणार नाही. सखूजीराव आल्यानंतर आम्हाला वर्दी द्या. त्यांच्या भेटीसाठी आम्ही उतावीळ आहोत." राजे पुन्हा छावणीकडे परत आले.

त्यानंतर पुढचे दोन दिवस सारे सखूजीरावांची वाट पहात होते पण सखूजीरावांचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्यांचा शोध घेण्यासाठी पथके पाठवली होती पण अजून काहीच बातमी हाती लागली नव्हती. राजे बेचैन झाले होते. छावणी उठवण्याची गडबड चालू झाली होती.

तीसऱ्या दिवशी सारे सरदार आणि कारभारी मंडळी राजांच्या शामियान्यात जमले होते. राजे पुढच्या मोहिमेची आखणी करत होते. त्याचवेळी जासुस आत आला आणि त्याने सखूजीराव आल्याची वर्दी दिली.

"काय! सखूजीराव आले?" असं म्हणत राजे जाग्यावरून उठले आणि बाहेर जाऊ लागले तोच सखूजीराव राजांच्या समोर आले. त्यांनी राजांना लवून मुजरा केला.

मुजऱ्यासाठी झुकलेल्या सखूजीरावांना राजांनी उठवलं आणि मिठीत घेतलं. "काय सखूजीराव तुम्ही, आम्ही इथं तुमच्या स्वागतासाठी उतावीळ असताना कुठे रानोमाळ हिंडताय तुम्ही?" सखूजीरावांच्या खांद्यावर हात ठेवत राजे म्हणाले, "काय मग गनिम सापडला का?"

"तो सापडला नसता तर तुमच्या पुढ्यात आलो नसतो महाराज." सखूजीराव नम्रपणे म्हणाले.

"शाब्बास... खरे मावळे शोभताय तुम्ही..." राजांनी पुन्हा सखूजीरावांची पाठ थोपटली.

"महाराज गनिमाला आपल्या समोर हजर करण्याची आज्ञा मिळावी." मोठ्या आतुरतेने सखूजीरावांनी विनंती केली. राजांनी आपल्या मानेने होकार दिला. सखूजीराव बाहेर गेले. राजे पुन्हा आपल्या आसनावर रूढ झाले. साऱ्यांची नजर शामियान्याच्या दरवाजावर खिळून राहिली.

थोड्याचवेळात सखूजीराव शामियान्यात आले त्यांच्या पाठोपाठ जेरबंद केलेल्या सावित्रीबाईंना राजांसमोर उभं करण्यात आलं. दोन्ही हात बांधलेल्या सावित्रीबाई राजांच्या समोर खाली मानेने उभ्या होत्या. त्यांच्या अंगावर झालेल्या जखमांमुळे त्यांनी केलेल्या लढ्याची जाणीव होत होती. स्त्री शरीरावर लढाईचे कपडे एखाद्या रणरागीनेसारखे वाटत होते. पण सावित्रीबाईंना पाहताच राजांच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र ढासळले होते. जेरबंद केलेल्या सवित्रीबाईंकडे बोट दाखवत राजे म्हणाले,

"सखूजीराव हे काय? ह्यांच्या हातात काढण्या?"

"महाराज ह्याच त्या सावित्रीबाई ज्यांच्यामुळे आपल्याला इतक्या छोट्याश्या गढीसाठी इतके मावळे गमवावे लागले."

"पण स्वराज्यात स्त्रियांना जेरबंद करण्याची आवशक्यता केव्हा पासून भासू लागली?" राजांच्या आवाजाचा पारा आता चढला होता. राजांचा कठोर आवाज ऐकून सखूजीराव चरकले,

"क्षमा असावी महाराज, पण ज्या शर्थीने यांनी गढी लढवली, यांना पकडण्यासाठी 3 दिवस आम्हाला अन्नपाण्याविना रानोमाळ फिरवलं. यांचा शेवटचा माणूस गारद होईपर्यंत ह्या आमच्या हाती लागल्या नव्हत्या. यांचं रूप जितकं सोजवळ दिसतं तितकं नाही. गढी घेण्यासाठी जितके मावळे कामी आले नाहीत त्यापेक्षा जास्त ह्यांना पकडताना कुर्बान झाले. म्हणून याना जेरबंद करावं लागलं." सखूजीरावांचं हे स्पष्टीकरण ऐकून राजे म्हणाले,

"बाई, धन्य आहे तुमची आणि तुम्ही दाखवलेल्या पराक्रमाची... सखूजीराव बाईंच्या हाती बांधलेल्या काढण्या सोडा आधी."

"पण महाराज...!" सखूजीराव काळजीच्या स्वरात म्हणाले, त्यांची चिंता ओळखून राजे म्हणाले,

"सखूजीराव अबलांच्या हाती काढण्या लावणे हे शूरांना शोभत नाही. त्या आम्हाला मातेसमान आहेत. प्रथम त्यांना मोकळं करा."

राजांची आज्ञा होताच सावित्रीबाईंच्या हाती बांधलेल्या काढण्या सोडल्या गेल्या. हात मोकळे झालेल्या सावित्रीबाई खाली मान करून राजांच्या समोर उभ्या होत्या. त्यांना उद्धेशून राजे म्हणाले,

"सावित्रीबाई तुम्हाला त्रास देण्याचा आमचा हेतू नव्हता. आज ही नाही. पण तुमच्या पतीने विनाकारण आमचं शत्रुत्व ओढवून घेतलं. आमचे काबाडीचे बैल पळवून नेले. त्यांना आम्ही समजावून सांगून पाहिलं पण त्यांनी ऐकलं नाही. युद्ध करण्यास तयार झाले. त्याचा परिणाम त्यांना यमसदनी जावं लागलं. पण स्वराज आणि धर्म स्थापनेच्या आमच्या या कार्यात तुमच्या सारख्या शूर आणि पराक्रमी युरांगणेचा आम्हाला विरोध व्हावा याचं फार दुःख होत आहे. स्वधर्म आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी आम्हाला तुमच्यासारख्या माता भगिणींचा विरोध का असावा?"

राजांचा हा प्रश ऐकून सावित्रीबाईंनी आपली मान वर घेतली. एखादी वीज चमकावी तशी तिची नजर साऱ्या दरबारात फिरू लागली. रागाने ती लालबुंद झाली होती. डोळ्यातून जणू आगीच्या ज्वाळा फेकत होती. रागाने सारे शरीर थरथरत होते. मोठं मोठे श्वास घेत ती नुसतीच उभी होती. तिचं असं क्रोधी रूप पाहून राजे म्हणाले,

"तुम्हाला तुमच्या पराजयामुळे अपमान वाटून घेण्याचं कारण नाही.."

"हं:!" सावित्रीबाई हुंकारली आणि म्हणाली, "राजे जय पराजय ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. त्याची चिंता मी कधीच करत नाही."

"बरोबर आहे, धर्मानं, न्यायानं आणि नितीनं जगणार्यांना पराजयाचा वारा कधीच शिवत नाही. आमच्या स्वराज्यात सगळ्यांना न्याय मिळतो.." राजांचे हे बोल ऐकून सावित्रीबाई जास्तच चिडल्या...

"तुमच्या ह्या आसुरी राज्याला स्वराज्याचा टीळा कशाला लावलाय? माझं दुर्दैव, माझा आज पराभव झाला. चांगल्या कामात दैवाने साथ दिली नाही नाहीतर मी एकटीच तुमच्या स्वराज्याला पुरून उरली असते."

"खामोश!! आपल्या तोंडाला लगाम लावा बाई, तुम्ही छत्रपतींच्या समोर उभ्या आहात याची जाणीव असू द्या.." सावित्रीबाईंना उद्धेशून आंनदराव गरजले. पण राजांनी त्यांना अडवले आणि राजे म्हणाले,

"बोला बाई तुम्ही बोला, आम्ही सारं ऐकून घेऊ. तुम्हाला तुमच्यावर अन्याय झाला असं वाटत आहे का?"

"अन्याय? राजे तुम्हाला न्यायाची चाड आहे का?" रागाने फनफनतं सावित्रीबाईंनी राजांना जाब विचारला. तिच्या ह्या प्रश्नाने साऱ्या दरबारात भयाण शांतता निर्माण झाली.

राजे मात्र स्थिर होते. तेवढ्याच स्थिर मनाने ते म्हणाले, "आई, आमच्या विषयी आजपर्यंत अनेक समज गैरसमज समाजात पसरवले गेले. पण आजपर्यंत आमच्या स्वराज्याच्या हेतुबद्धल कुणीच शंका घेतली नाही. तुम्ही ती हिम्मत करताय म्हणजे नक्कीच तुमची काही तरी तक्रार असणार. तुम्ही निर्धास्त होऊन बोला आमचं अभय आहे तुम्हाला. तुमच्यावर जर अन्याय झाला असेल तर आम्ही जरून न्याय देऊ. पण स्त्री आहात म्हणून शत्रूचे लाड पुरवले जातील अशी समजूत करून घेऊ नका. बोला अगदी मन मोकळे करून बोला."

राजांच्या कडून अभय मिळून हि सावित्रीबाई काहीच बोलत नव्हत्या. त्या नुसत्याच उभ्या होत्या. त्यांची ती शांतता राजांना असह्य करत होती.

"बोला बाई... काय असेल ते बोला." राजे पुन्हा म्हणाले.

खाली मान करून सावित्रीबाई म्हणाल्या,

"अश्या भरलेल्या दरबार मी काय बोलणार...?"

राजांनी लगेच आज्ञा केली, आश्चर्यचकित झालेले सगळे राजांच्या आज्ञेमुळे शामियान्याबाहेर गेले. शामियान्यात फक्त सावित्रीबाई आणि शिवाजी राजे राहिले होते.

"बोला बाई... आता सांगा.." शिवाजी राजे म्हणाले,

मघापासून रागाने लालबुंद झालेली ती सावित्रीबाई आता मात्र ढासळली. उभ्याजागीच ती कापू लागली, तिने आपल्या दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला आणि सारा शामियाना हुंदक्यांच्या आवाजाने भरून गेला.

इतकावेळ अगदी निडर आणि खंभिर उभी असलेली सावित्रीबाई आता एखाद्या लहान मुलासारखी हमसून हमसून रडताना पाहून राजे आपल्या जागेवरून उठून उभे राहिले आणि म्हणाले,

"सावित्रीबाई तुम्ही मला मातेसमान आहात. काय झालं अगदी निःसंकोचं सांगा. घाबरू नका अगदी निर्धास्त बोला."

सावित्रीबाईंनी डोळे पुसले आणि राजांच्याकडे पाहून म्हणाली, "तुमचे सखुजीराव फक्त गढी काबीज करून थांबले नाहीत..." आणि नजर खाली करत ती पुन्हा म्हणाली, "त्यांनी माझ्या अब्रूवर हात टाकण्याचा प्रयत्न केला."

"काय?! हे अशक्य आहे.." राजे एकदम चकित होवून म्हणाले, "बाई, तुम्ही जे सांगताय हे जर खोटं असेल तर या गुन्ह्याला शिरच्छेदाखेरीज दुसरी शिक्षा नाही हे लक्षात ठेवा."

राजांच्या नजरेला नजर देत सावित्रीबाई म्हणाली, "राजे मी पाटलीनं आहे. गावची वतनदार. मी माझं कर्तव्य नीट जाणून आहे. माझ्या नवऱ्याने तुमची आगळीक काढली ते माहित असून ही मी माझ्या गढीच्या रक्षणासाठी उभी राहिले. नवऱ्यामागे त्याची कामगिरी मी हाती घेतली. मला मरणाची भीती नाही. मी एक खानदानी स्त्री आहे. मरणापेक्षा जास्त आम्हाला आमची अब्रू प्रिय असते मग मी खोटं कशाला सांगू. आपण याची शहानिशा करू शकता. हवं तर सखूजीरावांनाच विचारा...."

राजांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. मुठी आवळल्या गेल्या. चेहरा कठोर झाला. राजांनी सर्वांना आत येण्याची आज्ञा केली. सर्वजण आत आले. डोळ्यातून अश्रू ढाळत उभ्या असणाऱ्या सवित्रीबाईंकडे सारेजण आश्चर्याने पहात होते. आपली तीक्ष्ण नजर सखूजीरावांच्याकडे रोखत राजे म्हणाले,

"सखूजी, ह्या बाई काय सांगत आहेत?" राजांच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने सखूजीराव चरकले आणि भेदरलेल्या आवाजाने म्हणाले,

"हे साफ खोटं आहे महाराज, माझ्या विरोधात कुभांड आहे हे."

"काय साफ खोटं आहे? काय कुभांड आहे?" राजे आपल्या जागेवरून उठत म्हणाले, "सखूजी, आम्ही कांही न विचारताच तुम्ही उत्तर देत आहात."

आता मात्र सखूजीराव पुरते सापडले होते. तोच राजे पुन्हा गरजले."

"सखूजी, तुम्ही यांच्याशी गैरवर्तन केलंत?"

"महाराज.." सखूजी पुरता बेजार झाला, "क्षमा महाराज... क्षमा." म्हणत राजांच्या पायावर कोसळला.

राजांच्या मुठी आवळल्या गेल्या. त्यांचे डोळे भरून आले. संतापाने राजे थरथरत होते. सखूजीरावांच्या मिठीतुन आपले पाय सोडवून घेऊन राजे माघारी फिरले. त्यांचे काळीज पार तुटले होते. विश्वासातली माणसंच अशी कृत्य करायला लागली तर काय अर्थ आहे ह्या स्वराज्याला. खोल विहिरीतून आवाज उमटावा तसे राजे बोलले,

"हे काय करून बसलात सखूजीराव, मोघली रिवाज मोडून आपल्या रयतेचे रक्षण करता यावं म्हणून आम्ही स्वराज्य स्थापन केलं. धर्माचं आणि अब्रूचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही आयुष्यभर झटत आलो आणि आमच्या ह्या स्वराज्यात तुम्ही आईवर हात टाकण्याचा गुन्हा करून बसलात..?"

"चूक झाली महाराज... क्षमा महाराज.." म्हणत सखुजीराव पुढे सरकू लागले.

"थांबा. पुढे येऊ नका सखूजी. तुमच्या त्या अपवित्र हातांचा स्पर्श नको आहे आम्हाला, ह्या गुन्ह्याला आम्ही क्षमा करू शकणार नाही... एकवेळ आम्ही पराभव स्वीकार केला असता पण ह्या गुन्ह्याला माफी नाही."

राजे परत आपल्या आसनावर बसले, "सखूजी तुम्ही जे कृत्य केलंत त्यामुळे स्वराज्याच्या कामाला कलंक लागला आहे. जे हात आशीर्वादासाठी उठायला हवेत त्या हातांना आमच्या स्वराज्याच्या नावाने बोटं मोडायला लावलतं तुम्ही....ह्या गुन्ह्याबद्दल...."

शेजारचे जाधवराव धीर करून पुढे सरकले.." राजे..."

"खामोश!.." राजे कडाडले, ते उठून उभे राहिले, साऱ्या दरबारातील लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सखूजीरावांच्याकडे बोट दाखवत राजाज्ञा झाली.

"ज्या डोळ्यांनी सखूजिंनी ह्या मातेकडे वाईट नजरेने पाहिले ते डोळे तप्त सांडसाने उखडून काढा! ज्या अमंगळ हातांने परस्त्रीला स्पर्श केला ते हात तोडा. ह्या शिक्षेची बजावणी आता इथं आमच्या समोर झाली पाहिजे..."

बापरे!! किती कठोर शिक्षा हि.... साऱ्या दरबारी लोकांची छाती भीतीने धडधडत होती. सावित्रीबाई तर आवाक होऊन नुसत्याच पहात उभ्या होत्या. सखूजीराव तर पुरते ढासळले होते.

पुढच्याच क्षणी हातात तप्त सांडसे घेऊन पालोतेधारी आले. सखूजीला पकडण्यात आलं आणि एका हृदय द्रावक किंचाळी पाटोपाठ सखूजींचे डोळे तप्त सांडसाने उखडले गेले. त्यांचे दोन्ही हात कलम केले. हे असह्य दृश्य पाहून खुद्द
सावित्रीबाईंनीहि आपले डोळे झाकून घेतले होते.

"ह्या पाप्याला पन्हाळ्याच्या अंधार कोठडीत डांबून ठेवा." अशी आज्ञा देऊन राजे सावित्रीबाईंना म्हणाले,

"बाई, आम्हाला माहित आहे, ह्या शिक्षेमुळे तुमच्यावर झालेल्या अन्यायाची परतपेढ होणं शक्य नाही. तुमचं दुःख मोठं आहे. आम्ही तुम्हाला बाइज्जत मुक्त करत आहोत. बेलवडी तुमची होती आणि ती तुमचीच राहील. त्याचबरोबर बाजूची दोन गावं आम्ही तुम्हाला आंदण म्हणून देत आहोत."

राजांची हि न्याय नीती पाहून सावित्रीबाईंचे डोळे भरून आले होते. एका शत्रू स्त्रीच्या अब्रू रक्षणासाठी आपल्या विजयी सरदाराचे हात कलम करणारे राजे त्या प्रथमच पहात होत्या. राजांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी सावित्रीबाई पुढे सरसावल्या पण आपले हात जोडून राजे म्हणाले,
"आई, आमच्या पाया पडून आम्हाला आणखीन लाजवु नका. शक्य झालं तर एक आशीर्वाद द्या..."

सावित्रीबाई राजांकडे पाहू लागली....

"हाच आशीर्वाद द्या कि, आमच्या ह्या स्वराज्याला परत असला कलंक लागू नये. आमच्या स्वराज्याच्या हेतू बद्दल परत कोणत्याही स्त्रीच्या मनात शंका येऊ नये. एवढा आशीर्वाद तुमचा लाभला तरी आम्ही कृतार्थ होऊ..." असे म्हणून राजे पाठमोरे झाले.

राजांचे डोळे पाण्यावले होते. राजांची ती छबी पाहून सावित्रीबाई मात्र पावन झाल्या होत्या.

____ धन्यवाद ___