निघाले सासुरा - 13 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निघाले सासुरा - 13

१३) निघाले सासुरा!
छायाच्या लग्नाच्या कामांनी वेग घेतला होता. जो तो जमेल तसा आपला सहभाग नोंदवत एक-एक काम मागे टाकत असला तरीही ऐनवेळी एखादे नवीन काम समोर उभे टाकत होते. त्यादिवशी कोणत्या तरी विषयावर चर्चा रंगलेली असताना अचानक आकाशने विचारले,
"आत्या, मला एक सांग लग्नाची वेळ झालेली असताना, सारे अक्षता टाकायला सज्ज असताना मंगलाष्टकं सुरू होण्यासाठी वेळ का लागतो ग?"
"त्याला काय एक कारण आहे का? आजच नाही, पूर्वीही असे प्रकार होत असायचे." बाई म्हणाली.
"पूर्वी म्हणे नवरदेव रुसत असे." अलकाने विचारले.
"ती फार मनोरंजक कारणे आहेत. कधी हुंडा जास्त मिळावा म्हणून तर कधी अंगठी, कपडे इतकेच काय पण पलंग मिळावा म्हणूनही नवरदेव रुसत असे. मला आठवते, माझ्या एका मैत्रिणीचा नवरा सीमांतपूजनाच्या वेळी रेडिओ हवा म्हणून यायलाच तयार नव्हता. आजकाल हे प्रकार दिसत नाहीत..." सरस्वती म्हणाली.
"रुसणे गेले नि नाचणे आले! पूर्वी ऐनवेळी नवरदेव रूसला म्हणून लग्नाला उशीर होत असे तर आजकाल वऱ्हाडाची नाचण्याची हौस वाढते आहे. तासनतास नाचत राहतात आणि मग लग्नाची शुभ वेळ टळून जाते." पंचगिरी म्हणाले.
"मला एक समजत नाही. तुम्हाला नाचायचेच आहे ना तर मग मुहूर्ताच्या दोन तास आधी वरात काढून मग काय तो मनसोक्त गोंधळ घाला ना अगदी 'नाच नाचूनी हौस माझी फिटली, नंदलाला हौस माझी फिटली..' अशी म्हणण्याची वेळ येईपर्यंत नाचून घ्या ना. इतरांचा वेळ कशाला नष्ट करता. परवा तर एक फार मोठी गंमतच झाली." दामोदर म्हणाले.
"ती कोणती?" आकाशने विचारले.
"अरे, लग्नघटिकेच्या अर्धा तास अगोदर एक वरात निघाली. सारे वऱ्हाडी नाचू लागले. हळूहळू सरकत, नाचत, थिरकत वरात मारोती मंदिराकडे निघाली. तरुण तुर्क, म्हातारे अर्क, बायकाही नाचू लागल्या. वरात थोडे अंतर गेली न गेली एक प्रकार घडला."
"काय झाले?" पंचगिरींनी विचारले.
"घोडा उधळला की काय?" आकाशने हसत विचारले.
"अरे, नाही रे. वरात ज्या रस्त्याने निघाली होती त्या बाजूने एक बार होता. नवरदेवाचे मित्र आणि काही वऱ्हाडी मंडळीही एक-एक असे जाऊन 'तीर्थ' प्राशन करून येऊ लागले. त्या चढत्या नशेने त्यांना अंदाधुंद नाचण्याची ऊर्मी आली. होश घालवलेली मंडळी जोशमध्ये येऊन नाचू लागले. तितक्यात कुणीतरी नवरदेवाला घोड्यावरून खाली उतरवले..."
"त्याला कुणी बारमध्ये तर नेले नाही ना?"
"नाही. तसे झाले नाही पण मित्रांच्या आग्रहाखातर नवरदेवाची पावलेही थिरकू लागली. तितक्यात दोन- तीन मित्रांमध्ये नेत्रसंकेतातून संदेशवहन झाले. एक-दोघे मित्र बारमध्ये गेले. तिथे पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या आणि त्यात बारमधले 'स्पेशल पाणी' मिसळले. ते पाणी नवरदेवासोबत इतर तहानलेल्या जिवांना देण्यात आले..."
"बाप रे! मग काय झाले?"
"अरे, शिणलेल्या शरीरात अशी काही स्फूर्ती, चेतना संचारली म्हणशील. तब्बल तीन तास ती वरात आणि नाच जाणारा-येणारांचे लक्ष वेधून घेत होता. सोबतच आंबटशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते ते वेगळेच." दामोदर म्हणाले.
"भाऊजी, मंगलमय वातावरणात असे घडणे कितपत योग्य आहे? बरे,अनेक वरातींमधून नाचण्याचे प्रकारही ठरलेलेच. गाणी जरी आधुनिक असली तरीही नाचण्याचे प्रकार मात्र जुने ते जुनेच." पंचगिरी म्हणाले.
"बरोबर आहे. पाच-सहा जण नाचताना एक जण हात डोक्यावर नेवून परंपरागत लकब दाखवतो. दुसरा खांद्याच्या रेषेमध्ये हात हलवत कंबर लचकावतो. त्याची ती कंबर लचकताना पाहून ओकारी येते रे. एखाद्या सौंदर्यवतीने लचकावलेली कंबर कुठे आणि यांचा हा डोक्यात जाणारा प्रकार! किळस येते, किव येते. त्याच्या बाजूला दोघेजण एकमेकांच्या डोळ्यात पाहत हात समांतर ठेवत नाचतात. आजकाल पोरीसुद्धा फुगडी खेळत नाहीत पण वरातीत फुगडी हा प्रकार जसा काही अत्यावश्यक आहे."
"होय ना. आणखी एक प्रकार मी वर्षानुवर्षे पाहतो तो म्हणजे एक जण गारुड्याप्रमाणे रुमालाची पुंगी करून वाजवतो आणि त्याच्यासमोर दुसरा माणूस एखादा नाग डोलावा तसा डोलतो. अरे, काय हे प्रकार? 'हम अंग्रेज जमाने के नाचे है, जमाना बदला, अंग्रेज जाकर भी जमाना हुआ लेकिन हम और हमारा डान्स नही बदला!" दामोदर हसत म्हणाले.
"एखादी व्यक्ती बहुतेक वेळा तो वराचा मामाच असतो तो मात्र इमानेइतबारे सर्वांना 'पुढे चला' असे विनवित असतो परंतु त्याची ही मोहीम 'एकला चलो रे!' अशी होऊन राहते. कारण त्याचे कुणी ऐकायचे सोडा लक्षही देत नाही."
"काय करणार बिचारा! नवरदेवाला वेळेवर व्यासपीठावर न्यायची जबाबदारी त्याची असते ना. बरे, अशा वरातीत होणाऱ्या उशिराला आणि नाचणाऱ्या मंडळींना इतर वेळी दबक्या आवाजात विरोध करणारी मंडळी स्वतःच्या घरातील लग्नावेळी निघालेल्या वरातीचे, नाचण्याचे आणि उशिराचे प्रशंसक बनतात. नाचणारांची मुक्तकंठाने प्रशंसा करताना नाच्यांवरून पैसे ओवाळून फेकतात. दुसरीकडे भटजी स्वतःची उपस्थिती दाखविण्यासाठी वधूवराच्या मामाच्या नावाने कंठघोष करतात." दामोदर म्हणाले.
"मामा, माझ्या मित्राच्या नातेवाईकाच्या लग्नात तर भटजींनी वेगळाच सूर लावला."
"तो कोणता?" दामोदरपंतांनी विचारले.
"लग्नाचा मुहूर्त टळून जात होता तशी गुरूंची घाई सुरू झाली. ते माईकवर जोरजोरात सूचना देऊ लागले. सुरुवातीला 'वधूचे मामा वधूला लवकर आणा.' सोबतच 'वराचे मामा वराला घेऊन या.' असे सांगत असताना कुणीच ऐकत नाही, उशीर होतोय हे पाहून ते मनोमन चिडले. परंतु कमालीची सोशिकता दाखवत ते म्हणाले, 'अहो, घाई करा मुहूर्त टळून चाललाय. वधूचे मामा वराला लवकर आणा आणि वराचे मामा वधूला लवकर..."
"काय म्हणालास? वधूचे मामा वराला आणि वराचे मामा वधूला लवकर आणा. व्वा! व्वा!" दामोदर हसत म्हणाले.
"मामा, हे तर काहीच नाही. माझ्या मैत्रिणीकडे एका लग्नात वरातीला उशीर होतोय म्हणून वैतागलेले भटजी चक्क असे म्हणाले, की वधूवराचे मामा घाई करा. गडबड करा. वधूचे मामा मामीला घेऊन उपस्थित आहेत तेव्हा वराचे मामा मामीला घेऊन लवकर या."
"अलके, काही तरीच हं..."
"आई, खरेच ग. हवे तर माझ्या मैत्रिणीला फोन करून विचार." अलका म्हणाली.
"मामा, मला काय वाटते माहिती आहे का, एखाद्या लग्नात वरातीत होणाऱ्या नाचामुळे जर लग्नाला उशीर होत असेल ना तर एखादी वधू स्वतःच माईक हातात घेऊन अशी घोषणा करून टाकेल की, दोन मिनिटात नवरदेव बोहल्यावर चढला नाही तर मी वेटिंग असलेल्या दुसऱ्या मुलाच्या गळ्यात हार घालायला मोकळी असेल." आकाश म्हणाला आणि सारे हास्यसागरात डुबकी मारत असताना सरस्वती म्हणाली,
"वन्स अहो, एकदा माझ्या माहेरी मुलीचे लग्न होते त्यावेळी की नाही चक्क वधुची आईच रुसली."
"काय म्हणतेस सरस्वती? नवरदेव रुसला, वरमाय रुसली हे ऐकले होते पण नवरीची माय रुसली म्हणजे कहरच झाला."
"त्याचे काय झाले वन्स, त्या मुलीला मुलाने मागणी घातली होती. एक पैही हुंडा न घेता लग्नसुद्धा नवरदेवाच्या घरीच होते. वरात फिरून फिरून, नाचून नाचून परत आली. त्यावेळी नवरदेवाच्या स्वागतासाठी पाण्याची कळशी घेऊन वधूमाय वराला ओवाळण्यासाठी उभी होती. खरे तर डोक्यावर कळशी घेतलेली मजुरीन नवरदेवाला पैसे मागत असते. मात्र नवरदेवाला कुंकू लावायला त्याची सासू पुढे येतच नव्हती. ती आपल्या जागेवर ढम्म उभी होती."
"पण का?"
"कुणीतरी विचारले तेव्हा ती म्हणाली की, तिला जावयाकडून पैठणी हवी आहे."
"अग बाई, ऐकावे ते भलतेच."
"शेवटी नवरदेवाने हो भरला तेव्हाच ती वधूमाय पटकन समोर आली आणि मग पुढील कार्यक्रम विधिवत पार पडले
"व्वा ग शेरनी! आई, तुलाही संधी आहे. श्रीपालभाऊजी ताईवर लट्टू आहेत. शिवाय वरपक्ष ऊसासारखा गोड आहे. तेव्हा मारो आडवा हाथ। अशी संधी पुन्हा येणार नाही."
"अलके, उचलली जीभ लावली टाळूला असे भलतेसलते बोलू नको." सरस्वती रागाने म्हणाली.
"सरस्वती अग, तिने गंमत केली ग. अग, माझे नंदवई... ह्यांचे मेहुणे ग... मंगलकार्यालयात येण्यासाठी घोडाच पाहिजे म्हणून ऐनवेळी रुसून बसले."
"म्हणजे?"
"अग, ह्यांची बहीण गावातच दिलीय. त्यांच्या घरापासून मंगलकार्यालय तसे फार जवळ आहे. सीमांतपूजनाच्या दिवशी आमच्याकडून एक माणूस चार पाच ऑटो घेऊन वराच्या घरी वऱ्हाड आणायला गेला तेव्हा नवरदेव म्हणाला, घोडा आणि वाजंत्री असल्याशिवाय मी घराबाहेर पाय ठेवणार नाही."
"मग?"
"आली का पंचाईत. वाजंत्रीला सीमांतपूजनाच्या रात्री दहा वाजता आणि घोड्याला लग्नाच्या दिवशी सकाळी वरातीसाठी ठरविले होते. तो माणूस धावतच पुन्हा घरी आला. शेवटी हातापाया पडून अव्वाच्या सव्वा रक्कम देऊन घोडा आणि वाजंत्रीची व्यवस्था केली तेव्हा कुठे नवरदेव घराची पायरी उतरला."
"खरेच एकेक गमतीजमती आहेत. हुंडा पद्धती मात्र बंद होण्याची शक्यता दिसत नाही." दयानंद म्हणाले.
"कसे शक्य आहे पंचगिरी? वरचेवर प्रस्थ वाढतच जातंय. एकीकडे आपण म्हणतोय, की मुलींची संख्या कमी होतेय आणि दुसरीकडे बदलत्या स्वरुपात का होईना पण हुंडा घेण्यासाठी आपणच खतपाणी घालतोय."
"भाऊजी, मुलींची संख्या कमी असण्याचे प्रमाण काही फार मोठ्ठे नाही हो. ज्यावेळी शंभर मुलांच्या तुलनेत ऐंशीच्या आसपास मुलींची संख्या येईल ना त्यावेळी मात्र हाहाकार माजेल. आज तसे चिंतेचे कारण नाही."
"पंचगिरी, तू म्हणशील तशी परिस्थिती ज्यावेळी येईल ना, त्यावेळी मुलींसाठी हुंडा मोजावा लागेल."
"ही गोष्ट नाकारता येत नाही. कदाचित आपल्या नातवांच्या लग्नापर्यंत ही स्थिती उद्भवली तर आश्चर्य वाटू नये." सरस्वती म्हणाली.
"आज मात्र हुंडा द्यायचा म्हटलं, की अंगावर काटा येतो." बाई म्हणाली.
"आता या शिकलेल्या मुलींनीच पुढे यायला हवे."
"मामा, तशी सुरुवात झाली आहे." आकाश म्हणाला.
"होय! काही मुलींनी हुंडा घेणार नाही असा निश्चय असलेल्या मुलासोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मुलींनी हुंड्याची बैठक चालू असतानाच अवास्तव मागणी करणारी मुले धुडकावून लावली आहेत. त्या बैठकीत एक-दोन मुलींनी जाऊन 'हुंडा मागणाऱ्या मुलासोबत मी लग्न करणार नाही.' असे ठणकावून सांगताना ती बैठकच उधळून लावली." अलका म्हणाली.
"ते तर काहीच नाही. परवा आमच्या गावात एक लग्न होते. ठरल्याप्रमाणे वधूपित्याने सारा हुंडा वरपित्याच्या हवाली केला होता. लग्नाच्या नियोजित वेळी वधू बोहल्यावर चढली..."
"आत्या, हे बोहले म्हणजे काय ग?" अलकाने विचारले.
"तुला माहिती नाही? बरोबर आहे म्हणा, आता कार्यालयात लग्नं लागतात तिथे ते उंच नि भव्य स्टेज असते त्यामुळे तुम्हाला बोहले माहिती नसणारच. अग, पूर्वीच्या काळात कार्यालये नसायची. घरापुढे भलामोठा मांडव घालायचे. मांडव तोही भलामोठा यासाठी घालायचे की, येणाऱ्या पाहुण्यांना याची जाणीव व्हावी की, या मोठ्या मांडवाप्रमाणे वधूचे मनही मोठे आहे. ती संस्कारक्षम आहे. सासरच्या घरच्या साऱ्या रीती, परंपरा ती समर्थपणे पेलेल. मांडवावर हिरवीगार पाने, फांद्या टाकून अंगणाच्या मधोमध विटा आणि माती यापासून एक ओटा तयार करत असत त्यास बोहले म्हणतात. त्या बोहल्यावर वधूवरांना लग्नासाठी उभे करत..."
"थोडक्यात बोहले म्हणजे कार्यालयातील स्टेज"
"तेच ते. तर मी सांगत होते... त्या लग्नात ती वधू स्टेजवर जाऊन वराची वाट बघत उभी राहिली पण नवरदेव यायलाच तयार नव्हता..."
"का बरे?"
"त्याला म्हणे त्याचवेळी मोटारसायकल हवी होती."
"बाप रे! तितक्या तातडीने?"
"हो. वाट पाहून जमलेली मंडळी थकली. वधूपक्षाने आणि वराकडील अनेक लोकांनीही नवरदेवाला खूप समजावले पण नवरदेव हट्ट सोडायला तयार होत नव्हता. काही वेळाने वधू पुढे झाली. 'मी अशा लालची, लुटारू मुलासोबत लग्न करायला तयार नाही.' असे म्हणत ती नवरदेव बसलेल्या खोलीत गेली आणि स्वतःच्या कपाळावर असलेली मुंडावळ काढून वराच्या दिशेने फेकून देत ताडताड पावले टाकत घरी परतली. नवरीचा तो अवतार बघून नवरदेव सुतासारखा सरळ झाला पण वधू तयार होत नव्हती. 'मी जन्मभर कुमारी राहीन पण या मुलाशी लग्न करणार नाही.' अशी प्रतिज्ञाच तिने जाहीर केली. शेवटी नवरदेवाचे वऱ्हाड बिना लग्नाचे, नवरी न घेता निघाले आणि एक फार मोठा बाका प्रसंग उभा राहिला..."
"पुन्हा काय झाले?"
"अरे, त्या वधूपित्याने नगदी रक्कम, सोने मिळूनळ जवळपास सहा लाखांचा खर्च केला होता."
"आई ग! एवढा खर्च?"
"वरपक्षाने तिथून गाशा गुंडाळण्याच्या हालचाली सुरु करताच वधूपित्याने त्यांच्याकडे दिलेले सोने आणि नगदी रक्कम परत करावेत अशी मागणी केली. 'आम्ही नंतर पाठवून देतो.' अशी पळवाट वरपक्ष शोधत असताना नवरीकडील मंडळीने एक नामी आणि युक्ती शोधली..."
"ती कोणती? प्रकरण मजेशीर होतंय हं." आकाश म्हणाला.
"चर्चा करू. ठरवू. असे गोड बोलत नवरदेव, त्याचे आईवडील आणि मामा यांना एका खोलीत नेले. तिथे दहा-पाच मिनिटे चर्चा केली. 'आत्ता आलो..' असे म्हणत वधूपक्षाचे लोक बाहेर आले. खोलीत केवळ नवरदेवाची माणसे होती. हे लक्षात घेऊन त्या खोलीला बाहेरून मोठे कुलूप लावले..."
"काय म्हणता? चक्क कोंडले?"
"हो. तोंड उघडण्यासाठी नाक दाबावेच लागते. बाहेर थांबलेल्या नवरदेवाच्या लोकांना अशी तंबी दिली की, जोपर्यंत आमची नगदी रक्कम आणि सोने परत मिळणार नाही तोपर्यंत या खोलीचे कुलूप निघणार नाही.."
"व्वाह! मग पुढे?"
"लगोलग काही लोक गावी परतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सारी रक्कम घेऊन दोन-चार माणसे आली. रक्कम वधूपित्याच्या स्वाधीन करून नजरकैदेत ठेवलेल्या मंडळीस घेऊन गेले."
"पण त्या रणरागिणी वधूच्या लग्नाचे पुढे काय झाले?"
"त्याच मांडवात, त्याच दिवशी अन्य एका तरुणाशी तिचा विवाह झाला."
"व्वाह! छान झाले. असे प्रकार वारंवार व्हायलाच हवेत. तरच काही प्रमाणात वचक निर्माण होईल." दामोदर म्हणाले.
"दयानंद, सरस्वती अरे, लग्न घर आहे ना? हे काय आपण अशा एकेका विषयावर चर्चाच करीत बसलो ना, तर कामे कधी होणार? कोण करणार? चला." बाई म्हणाली. ते ऐकताच सरस्वती उठली. पण दोन चार पावले जात नाही तोच मागे वळून दयानंदांकडे बघत घाबरलेल्या आवाजात म्हणाली,
"अहो, असे कसे झाले? आपण केवढी मोठ्ठी चूक केलीय?"
"अग, आधी शांत हो काय झाले?" दयानंदांनी विचारले.
"काय झाले म्हणून विचारता? वन्स, भाऊजींना पत्रिका दिलीत का?"
"अरे, बाप रे! खरेच महाभयंकर चूक घडली. भाऊजी, माफ करा हं. मी खरेच असा कसा मुर्खपणा केला म्हणावा?" दयानंद अपराधी भावनेने म्हणाले.
"दयानंद, सरस्वती आम्ही घरचेच आहोत. इथेच असल्यामुळे..." दामोदरपंतांना थांबवत दयानंद म्हणाले,
"खरेच तसेच झाले हो."
"असू दे. पत्रिका विसरलात तर विसरलात. चालेल. हरकत नाही. पण, ज्येष्ठ जावयाचा आहेर विसरलात तर मात्र मग गाठ या ज्येष्ठ जावयाशी आहे म्हटलं. असा रुसून बसेल ना की..." दामोदर हसत म्हणाले आणि हलक्याफुलक्या वातावरणात दयानंदांनी दामोदरपंतांना कुंकू लावून अक्षत, पत्रिका दिली आणि वाकून नमस्कार केला....