Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 12 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १२


पूजा - कादंबरी गावातून काही खायच्या वस्तू , काही औषध घेऊन आल्या. आजचा दिवस सुद्धा त्याच ठिकाणी. कदाचित उद्याचा दिवसही इथेच काढावा लागेल. असा विचार कादंबरीच्या मनात येऊन गेला. काय करणार, हे असं फिरणं असले कि अशी आजारपणं आलीच सोबतीने. हि अशी पहिलीच वेळ नव्हती. पण पूजाची अशी कोणती स्पेशल जागा आहे , हे जाणून घ्यायची हुरहूर लागलेली कादंबरीला. असो, कादंबरीने तिच्या कामाला सुरुवात केली. पावसाने सकाळपासून नुसता काळोख करून ठेवला होता. कालच तर सुरुवात केलेली त्याने. आज त्यामानाने शांत होता पाऊस. बघता बघता संध्याकाळ झाली. कादंबरीने घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे ५ वाजले होते. पूजाला शोधू लागली. कुठे गेली हि मुलगी. काय झालं हिला सध्या... काही कळत नाही. कादंबरी पुन्हा तिला शोधू लागली.

त्यांच्या तंबूपासुन मागच्या बाजूला एकटीच दूरवर पाहत बसलेली पूजा. कादंबरी हळूच तिच्या शेजारी जाऊन बसली.
" काय बघते आहेस पोरी... " कादंबरीचा प्रश्न. पूजाला माहित होते कि कादंबरी येणार शोधत.
" बघ .... समोर किती छान सूर्यास्त होतो आहे ना ... " कादंबरीनेही पाहिलं. काळ्या ढगांच्या आडून आडून सूर्य देवाचे प्रस्थान होतं होते. छानच होते ते. कादंबरीला बरं वाटलं ते बघून. पुन्हा पूजाकडे वळली.
" पूजा ... काय झालं आहे तुला .. एवढी वर्ष प्रवास करतो आहोत एकत्र आपण... यावेळेस का अशी वेगळी वाटते तू ... "

पूजा छान हसली. " त्याची आठवण काढलीस ना तू .. आपण जेव्हा प्रवास सुरु करणार होतो तेव्हा... आणि तेव्हापासूनच सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्यातच रमली. तो म्हणूनच सांगायचा, अश्या आठवणींच्या गर्द रानात गेलो कि हरवून जातो आपण. बघितलंस ना .... आता त्यातून बाहेरच पडता येतं नाही मला... " कादंबरीला काही सुचले नाही बोलायला यावर.

थोड्यावेळाने बोलली कादंबरी. " ऐक ना पूजा .... आपण आता ५ वर्ष तरी एकत्र आहोत. त्यातले ४ वर्ष मी तुझ्या आई-वडिलांना ओळखते. पहिल्या वर्षी तूच भेट घालून दिली होतीस त्यांची. त्यानंतर एकदाही घरी गेली नाहीस तू. मला तर तुझे आई-वडील मी त्यांचीच मुलगी आहे असं वागवतात. मग ... तुझ्याशी त्यांचे हे असे नाते तुटक का वाटते. नाही लक्षात येतं मला. म्हणजे ते दोघे इतके छान आहेत. तुझा भाऊही किती फ्रेंडली आहे. तरी तुझं असे .... लांब लांब राहणे ... " पूजा कादंबरीकडे पाहत होती. " मी विचारणार नव्हते , पण माझ्या मनात तर हा प्रश्न कायमच उभा राहतो. माझं घर सोडण्याचे कारण तुला माहित आहे. माझे आई-वडील कोण , हे तर बघितलं हि नाही मी. साहजिकच .. अशी माया तुझ्या घरी लावतात मला , त्यावरून ते वाईट नाही हे नक्की.. " कादंबरीचे बोलणे संपले होते. पूजाने पुन्हा हलकीशी smile दिली. आणि समोर मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत राहिली.

खूप वेळाने पूजा बोलू लागली. " मी ना लहान होते. अगदी लहान नाही. पण थोडेफार समजायचे. तेव्हा एकदा आईने सांगितले होते. बाबांना मुलगा पाहिजे होता. तेव्हा इतके जाणवायचे नाही. कारण कामानिमित्त बाबा सारखे बाहेरच असायचे. घरी आले तरी मला कधी लाडाने जवळ घ्यावे असे कधीच वाटायचे नाही त्यांना. जवळ गेले कि राग राग करायचे. काही चांगले काम केले , परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले... कधीच स्तुती नाही. काही कधी विचारायला गेले कि आईला विचार , इतकंच बोलायचे. कामात असताना काही विचारलं तर खेकसायचे अंगावर. इतका राग का करायचे , कळायचे नाही मला. आई बोलायची छान माझ्याशी. शेवटी आईच ना ती. पण तिलाही कधी कधी नको वाटायचे मी. असं वाटायचं कि मी मुलगी म्हणून जन्म घेतला , ती माझीच चुक झाली. इतक्या लहान वयात असे विचार यायचे मनात. मला लिखाणाची खूप आवड, लहानपणापासून.... बऱ्याच लोकांना , शाळेत तर सर्वाना माझे लिखाण आवडायचे. पण घरी .... काहीच नाही. एक दिवस शाळेत आलेल्या पाहुण्यानी माझ्या निबंधाला छान अशी कंमेंट लिहून दिलेली. वडील नुकतेच आलेले कामावरून. मला आनंद झालेला ना... तशीच ती वही घेऊन गेले दाखवायाला. बाबांनी ते न बघताच हातातली वही फेकून दिली... ' कसली भिकारपणाची लक्षण आहेत हि... लेखक व्हायचे आहे का ... त्यापेक्षा अभ्यास कर.. ' म्हणत तणतणत निघून गेले. वाईट वाटलं तेव्हा खूप. काहीच बोलली नाही. तसेच वागायचे ते. शाळेला सुट्टी पडली कि मला एकटीला आजी- आजोबाकडे सोडून दोघेच कुठेतरी फिरायला जायचे. इतकी नकोशी होती त्यांना मी. त्यामुळे आजी-आजोबा जास्त जवळ मला. आता आजोबा नाही राहिले, ते त्यावेळेस त्यांच्या जुन्या गोष्टी सांगायचे. कुठे फिरायचे, कसे फिरायचे .. सर्व सांगायचे. त्यांच्या लहानपणी त्याचा एक मोठा वाडा होता, त्या गावाच्या गोष्टी सांगायचे. छान वाटायचे ते जग. तिथे जास्त रमायचे मी. घरी पुन्हा जावे असे वाटायचे नाही मला. नंतर , जेव्हा मी आठवीत होते. तेव्हा लहान भावाचा जन्म झाला. तेव्हापासून माझ्या बद्दल असलेलं उरलं - सुरलं प्रेम सुद्धा नाहीस झालं. त्यांना वंशाचा दिवा पाहिजे होता, झालं ते. मी तशीही नावडती होती बाबांना. त्यात आईलाही तोच आवडू लागला. मी घरात असून नसल्यासारखे असायचे. त्याचेच लाड सारखे.... मलाही तो प्रिय होता. पण त्याचे बालपण , माझ्या बालपणापेक्षा किती सुंदर , सुखद होते ... याचे वाईट वाटायचे मला."

" एकदा कॉलेजमध्ये असताना , मला एका प्रोजेक्ट साठी gold medal मिळालेले, महाराष्ट्र शासनाकडून. केवढा सत्कार झालेला माझा. आई-बाबांना बोलावून सुद्धा कोणीच आलं नाही तिथे. बाकीच्या मुलांचे आई-वडील दोन्ही होते, त्याच्या मुलाचे सत्कार बघायला. त्याचे कौतुक करायला , तो आनंद अनुभवायला. मी मात्र एकटीच तिथे. घरी आले. सांगितलं किती छान झाला सोहळा आणि gold medal हि दाखवले. बाबा , पेपर वाचत बसलेले. डोकं वर न करताच , ' छान ' इतकंच बोलले. आईला दाखवायला गेली तर बोलली , ठेवून दे एका बाजूला ... काम झाल्यावर बघीन. वाईट वाटलं. तेव्हा कळलं आपल्याला या घरात आता किंमत राहिली नाही. त्यानंतर हि तेच , जॉबला लागली. कुठे जाते जॉबला तेही कधी विचारलं नाही. माझा प्रत्येक निर्णय चुकीचा वाटायचा त्यांना. त्यात मी काही बोलली कि आवडायचे नाही. कधी आजारी असले तरी न विचारणारे पालक झालेले ते. जॉब वरून रात्री घरी आली कि जेवली का किंवा जेवणार आहेस का ... हे सुद्धा आई विचारायची नाही. चिडचिड होयाची मग माझी. त्यामुळे ऑफिस मधेच बसून राहायची उशिरापर्यंत. घरी कोण होते विचारायला. कधी भाऊ विचारायचा, ताई उशीर झाला का आज.. ते बर वाटायचे मला. त्याला आवडायचे मी, कधी कधी त्यासाठी खाऊ घेऊन जायचे ना घरी. छान जमायचे आमचे. पण नंतर या दोघांनी काय मनात भरवलं त्याच्या माहित नाही. त्यालाही माझा कंटाळा यायचा. जवळ यायचा नाही. एकदा त्याला खाऊ घेऊन गेली , त्याच्या आवडीचा. तर बोलला .... तूच खा .. माझे पप्पा आहेत , ते आणतील मला खाऊ... तेव्हा शेवटचं वाईट वाटलं स्वतःबद्दल. एवढयाशा लहान मुलालाही मी नको असेन तर ... एखाद्या paying guest सारखी राहायचे घरात मी. फक्त घरातले माझ्याकडून राहण्याचे पैसे घेयाचे नाहीत हाच काय तो फरक. " पूजा सांगता सांगता भावुक झाली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश:

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED