नेताजींचे सहवासात - 4 - अंतिम भाग Shashikant Oak द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नेताजींचे सहवासात - 4 - अंतिम भाग

नेताजींचे सहवासात

प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33

नेताजींचे सहवासात

पुढील उरलेला भाग 3 (आ)– ‘निवासातील नोकरवर्ग’ वाचकांच्या प्रतिसादानंतर

भाग 3 (आ) - नेताजी निवास

सिंगापूर वास्तव्यातील निवासातील नोकरवर्ग

बर्लिनहून नेताजींबरोबर आलेले श्री स्वामी व हसन सुमारे दीड वर्षापर्यंत नेताजींचे चिटणीस म्हणून काम पहात. शिवाय स्वातंत्र्य सैनिकातून श्री रावत हे गढवाली ग्रहस्थ लष्करी सहायक म्हणून दिमतीस दिलेले होते. एक शीख ग्रहस्थ श्री समशेरसिंग व एक चाळीशी उलटलेले गुरखा सुभेदार, नेताजींचे अंगरक्षक म्हणून काम करीत. जपानी भाषा व अथवा व्यक्तींशी संबंध आणणारी सर्व कामे सुलभतेने व्हावीत म्हणून एका उच्च सरदार कुळातील श्री कोबायाशी हे जपानी तरूण नेताजींच्या दिमती हजर असत. श्री. भास्करन हे मलबारी ग्रहस्थ हे नेताजींचे लघुलेखक व टंकलेखक म्हणून काम पहात. डॉ. राजू हे हे नेताजींचे वैयक्तिक वैद्यकीय सल्लागार होते. रोज रात्रौ हिन्दी स्वातंत्र्य संघातील दोघे लघुलेखक नेताजींचे निवास जाऊन लंडन सॅनफ्रॅनसिस्को, दिल्ली इत्यादी शत्रूचे नभोवाणी केंद्रावरून घोषित करण्यात येणाऱे सर्व वृत्त रेडिओचे सहाय्याने ऐकून भराभर लघुलिपित टिपून मग त्याचे नेहमीच्या लिपीत भाषांतर करून रात्री 2-3 वाजायच्या सुमारास नेताजींसमोर ठेवीत.
रिपु प्रचाराचे विश्लेषण करून त्याचे शोषण करण्याच्या उद्देशाने त्याविरुद्ध प्रचारशास्त्राचे अनुरोधाने कोणते अमोघ अस्त्र सोडावे याचा मनाशी विचार करून नेताजी ते मुद्दे टिपून ठेवीत. नंतर काही महत्वाच्या कागदपत्रांचे वाचन, पत्रलेखन, मनन, दैनंदिनी लिहिणे, पुस्तके वाचणे वगैरे कार्यक्रमात ते मग्न असताना पहाटे पाच अथवा सहाचा ठोका पडे. सर्वसाधारणपणे पाच ते सकाळी नऊ वाजे पर्यंत त्यांची झोपची वेळ असे. त्यांचे निवासस्थानी सतत राहणारे इतर नोकर म्हणजे एक देवी सिंग नावाचा गढवाली शिपाई त्यांच्या दिमती असे. तो कपडे धुणे, धोब्यास देणे, जोड्यास पॉलिश करणे, पितळी बिल्ले चकचकीत ठेवणे, जामनिमा चढवण्यास मदत करणे, इत्यादि कामे त्याच्याकडे असत.
प्रमुख स्त्री-पुरूष कार्यकर्त्यांच्या चालचलणुकीबाबत त्यांचे कानावर काही निश्चयात्मक बातम्या गेल्यावर तेंव्हा त्यास नेताजींनी चांगले खडसावल्याचे ऐकिवात आहे. नेताजी फार क्वचित रागवत. त्यांचा स्वभाव उदार व किंवा चिडखोर नसून सरळ, शुद्ध, आनंदी, समाधानी आणि कर्तव्यदक्ष असे. काम न झाल्याबद्दल त्यास राग येत असे. कारण प्रसंगी ते रागावले तरी त्यांचा संताप हा सात्विक संताप असे. स्वातंत्र्य सैनिकातील एक मराठा मल्ल नेताजींचे अंगमर्दन करण्याच्या कामावर त्यांचे निवासस्थानीच राही. रात्री निजताना व अंघोळ करण्याअगोदर ते दोन वेळा अंगमर्दन करून घेत.
जर्मनीहून नेताजी सिंगापूरला आल्यावर त्यांचे निवासस्थानी जाण्याचे प्रसंग मला वारंवार येत. एके दिवशी सकाळी काही कामानिमित्त दहा वाजायच्या सुमारास मी गेलो होतो. खालच्या दिवाणखान्यात बसून चौकशी करता कळले की सिंगापूर शहरातील एक दोन डॉक्टर व श्री. राजू नेताजींचे रक्त तपासण्यात गुंतले असून नेताजींची प्रकृती नादुरुस्त होती. ते दिवशी हिन्दी स्वातंत्र्य संघाचे व व सैन्य कचेरीत जाण्यास नेताजीस एक तास काय तो उशीर झाला असेल नसेल. ते आजारी आहेत हे कोणास कळलेही नाही. कार्याची तळमळ ही जिवाच्या तळमळीला गिळून टाकण्यास समर्थ असते याचे ते प्रत्यक्ष उदाहरण होते. एरव्ही शरीर व्याधींपुढे सर्व मानव आपापला ध्येयवाद विसरून जाऊन हात टेकतात.
बरेच वर्षापासून मलायातच स्थायिक झालेले श्री सुरीन बोस हे कुटुंबवत्सल ग्रहस्थ नेताजींचे सिंगापुरातील गृहव्यवस्थापक होते. त्यांचे त्यावेळी वय चाळिशीच्या आतबाहेर असून ते अतिशय मनमेळाऊ, गरीब स्वभावाचे होते व हसतमुख चेहऱ्याचे होते. त्यांची पत्नी व मुले ही भाड्याच्या घरी राहत. ते स्वतः सकाळी साडे आठ वाजेपासून रात्री अकरा-बारा पर्यंत नेताजींच्या बंगल्यावर असत. बंगल्यातील टेबलक्लॉथ, चादरी उशांच्या खोळी धोब्यास देऊन त्याचा हिशोब ठेवणे, दूधवाल्याकडून प्रसंगी कमीजास्त दूध घेणे, भाजीपाला, धान्ये, मसाले, इत्यदि मालाचा साठा पुरेसा आहे किंवा नाही यावर देखरेख ठेऊन जरूर तो स्वयंपाक रोज करवून घेणे, पाहुणे मंडळी जास्त येणार असल्यास अथवा तत्सम विशेष प्रसंगी इतर ठिकाणहून बैठक, कपबशा, पेले, ताटल्या, काटे, चमचे, सुऱ्या, काचेचे सामान वगैरे मागवू काम झाल्यावर ते पोचवून देणे, नेताजींचे भोजनसमयी काही कमी जास्त असल्यास जातीने पहाणे, आल्या-गेल्यास चहा, कॉफी, दूध, सरबत, मिळण्याची व्यवस्था करणे, घरातील सर्व मंडळी व इतर पाहुणे मंडळी जेवली की नाही? त्यास काय हवे नको इत्यादि बघण्याचा अत्यंत जोखमीचे व कधी न संपणारे असे हे काम होते. तरी जीव टेकीला आल्याचे ते चुकून सुद्धा म्हणाले नाहीत व त्यांचे कामात नेताजीं न्यून काढल्याचे मला तरी माहित नाही!
नेताजींचे मोटारीचा चालक, त्याच बंगल्यावर इतर कामासाठी राहणाऱ्या तीन मोटारींचे चालक व तातडीने संदेश मोटर-सायकलीवरून पोहोचवणारा एक दूत, इतकी इतर मंडळी नेताजींचे निवासस्थानी कायमची असत.

कै. पु, ना. ओकांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी पत्नी साधना ओक

***