Netajinchya sahvasat - 1 books and stories free download online pdf in Marathi

नेताजींचे सहवासात - 1

नेताजींचे सहवासात

प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33

(1)

कै. पुरुषोत्तम. ना. ओकांच्या ४ डिसेंबर (२००७) ला पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो.

कै. काकांनी ह्या पुस्तकांतून त्यांच्या व नेताजींच्या सहवासात घडलेल्या घटना आणि त्यातून नेताजींच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातील मराठीबाजाने केलेल्या लिखाणात पुनांच्या वैशिष्ठ्य़पूर्ण लेखनपद्धतीचा व शब्दसंचयाचा परिचय मिळतो. त्याचा प्रत्यय म्हणजे पुस्तकाचे शीर्षकः नेताजीं'च्या' ऐवजी त्यानी 'चे' असा प्रत्यय लावला आहे.
पुस्तकात एकंदर १२ प्रकरणे असून शेवटची दोन २००० सालच्या आवृतिच्या निमित्ताने भर घालून प्रकाशित झाली होती. माझ्या हातात या पुस्तकाची तिसऱ्या आवृत्तिची प्रत ऑक्टोबर २०१३ मधे मिळाली. तेंव्हा पासून मिसळपावच्या वाचकांना काकांच्या नेताजींच्या सहवासाचा परिचय सादर करण्यासाठी लेखन करायचे मनात होते. नाडी ग्रंथावरील अभ्यासकार्यात गुंतल्याने सवडीने लिहायला घेऊ असे वाटले. तेवढ्यात कै. काकांची पुण्यतिथी काल असताना लेखन सुरू झाले. वाचकांच्या प्रतिसादाप्रमाणे काही रंजक भाग नंतर सादर करावेत असे वाटून सर्वसामान्यपणे कुतुहलाचा विषय असलेल्या नेताजींच्या गूढ मृत्यु बद्दल त्यांनी लिहिलेल्या भागाने सुरवात करत आहे.
नेताजींचा मृत्यू नेताजींच्या अपघाती मृत्यूच्या संबंधात पुना म्हणतात, ' सुभाषचंद्र बोस त्यांनी निवडलेले सुमारे ६ भारतीय सहकारी १६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी जपानी लष्करी विमानाने बँकॉक नगरी प्रातःकाली येऊन पोचले व लगेच सुमारे २ तासानी म्हणजे ८।। च्या सुमारास सायगांवकडे जाण्यासाठी निघाले. तेथे एक दिवस सर्वांना मुक्काम करावा लागला. कारण, शरणागतीनंतर दूरवर पसरलेल्या स्वतःच्या लष्करी केंद्रांची जपानला आवराआवर करायची होती. त्या घाईघाईच्या निरवानिरवित विमाने कमी पडत होती. म्हणून जपान्यांनी सुभाषचंद्रांना सांगितले की - " तुम्ही स्वतः व एकच कोणी भारतीय सहकारी अशा दोनच जागा टोकियोला जाणाऱ्या लष्करी विमानात नेता येथील. कारण, बऱ्याच जपानी लष्करी अधिकाऱ्यांनाही त्याच विमानाने टोकियोस जायचे आहे. इतरांनी तूर्त सायगाँन (सायगांव) येथे मुक्काम करावा. काही दिवसांनी त्यांना विमानाची सोय होताच टोकियोला धाडले जाईल."
म्हणून बरोबर आलेल्यांपैकी सुभाषचंद्रानी कर्नल हबिबुर रहमान ह्याची निवड केली.... *हबिबुर रहमान हा शांत, सज्जन व्यक्ति सालस स्वभावाचा होता. नेताजींच्या मृत्यूची हकिकत मला १९४७ साली प्रत्यक्ष त्याचेच तोंडून ऐकायला मिळाली. कारण तोच एक भारतीय त्याच अपघातात सापडून शेवटपर्यंत सुभाषचंद्रांच्यासह होता.
शनिवार दि. १८ ऑगस्ट १९४५ ह्या दिवशी सकाळी सुभाषचंद्र बोस, हबिबुर रहमान हे काही अन्य जपानी लष्करी अधिकाऱ्यांसह सायगांवहून विमानाने टोकियोला जाण्यास म्हणून निघाले. दुपारी १।।च्या सुमारास विमान टायवान बेटातील टायशेकू विमान तळावर पेट्रोल भरण्यासाठी व काही स्थानिक जपानी लष्करी अधिकाऱ्यांना घेण्यासाठी उतरले.
काही सैनिक उतरवणे, काही नवे चढणे, विमानाच्या टाकीत पेट्रोल भरणे इ. सव्यापसव्य झाल्यावर दुपारी २।। वाजताच्या सुमारास त्या विमानाने आकाशात झेप घेतली. उड्डाणानंतर विमानाने वेग वाढवण्याची पुर्व तयारी म्हणून अधांतरी विमान तळाभोवती एक - दोन चकरा मारल्या, तेवढ्यात विमानाच्या यंत्राचे जे दोन पंखे उभय बाजूस विमानाच्या पुढ्यात वेगाने फिरत होते, त्यापैकी एक गळून धाडकन खाली कोसळले. त्या बरोबर विमानाचा तोल जाऊन गटांगळ्या खात विमान धाडकन भोवतालच्या मैदानावरच कोसळले. विमान फार उंचावर नव्हते. त्याचा वेगही फार नव्हता. तरी आत जे कोणी विमानाच्या पुढल्या भागात वा मागल्या भागात शस्त्रास्त्रे, चिलखती टोप इ. जड साहित्य घेऊन वा काहीही लोखंडी वस्तू न घेता बसलेले होते, त्यानुसार भूमी, विमान व आतील जड सामान ह्यांच्या आदळआपटीच्या चेंद्यामेंद्यात दोघे - तिघे जपानी ठार झाले. बाकीच्यांना कमीअधिक दुखापती झाल्या. त्यात हबिबुर रहमान ह्यास नगण्य मार बसला. सुभाष चंद्रही भूमीवर कोलमडले, पण ज्यांना विशेष दुखापत झाली नव्हती. अशात जपान्यांनी व हबिबुर रहमान ह्यांनी सुभाषचंद्रांना हातानी धरून उभे केले, तेंव्हा असे लक्षात आले की, भूमीवर आदळलेल्या विमानाच्या पेट्रोल टाकीने पेट घेतला होता व त्या जळत्या पेट्रोलची एक लाट सुभाष चंद्रांच्या अंगावर फेकली जाऊन त्यांचा घट्ट मिलिटरी पोशाख ओला चिंब झाला होता व त्यातून सुभाषचंद्रांच्या गळ्यापासून पायापर्यंत धूर व वाफा निघत होत्या.
त्यांच्या पायात गुडघ्यापर्यंतचे घोडेस्वारीचे चामडी बूट होते. त्यावर मांड्याशी फुगीर शिवण असलेली गरम हिरव्या कापडाची विजार (Breeches) घातलेली होती. टोकियोत थंडी असणार म्हणून तशाच गरम हिरव्या कपड्याचा बुशशर्ट अंगासरशी कापडी पट्ट्याने पोटावर आवळलेला होता.
अशा त्या घट्ट जाम्यानिम्यावर जळत्या पेट्रोलची एक लाट जोरात भिरकावली गेल्याने सुभाष चंद्रांचे शरीर रताळ्यासारखे भाजून डबून गेले होते. बरोबरचे जे लोक सावरले त्यांनी सुभाष चंद्रांना धरून उभे राहण्यास सहाय्य केले व सुभाष चंद्रांची घट्ट वस्त्रे काढून टाकली.
स्वातंत्र्य लढ्यासाठी गेली दोन वर्षे सभा संमेलनातून भारतीय नरनारींनी जे सोने, रुपे, नाणी, हिरे इत्यादि संपत्तीचा दिली होती व जी शिल्लक होती, ती पुढील अतर्क्य व संकटमय जीवनात सुभाष चंद्रांना उपयोगी पडावी म्हणून एका पेटाऱ्यात बंद करून त्यांचे बरोबर दिली होती. ती सारी संपत्ती विमानाच्या आपटीने पेटारा फुटून विमानतळावर दुपारच्या उन्हात चमचमत विसरून निपचित पडली होती.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जिवाचा आटापिटा करणारा हा वीरमणी नेताजी सुभाषचंद्र बोस एखाद्या देवदूतासारखा आकाशातून अवचित अवतरला असा धुराच्या व वाफाऱ्यांच्या वेष्टनात विमानतळावर विखुरलेल्या रत्नांच्या चमचमाटात मधोमध ताठ उभा होता.
अपघात होताच त्या केंद्रावरील जपानी सैनिकांनी धावपळ करून कापडी स्ट्रेचर्स आणून जखमी व्यक्तिंना मोटारगाड्यातून लष्करी इस्पितळात पोहोचवले. सुभाषचंद्रांना बाह्य इजा विशेषशी झालेली नव्हती. कोठे खरचटले असेल तेवढेच. पण त्यांचे अंग मात्र जळत्या पेट्रोलने ओलाचिंब झालेल्या घट्ट लष्करी पोषाखाच्या उबाऱ्याने आतून धुपून उकडल्यासारखे झाले होते.
विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या जपानी इस्पितळात सुभाष चंद्र व हबिबुर रहमान दोघे पलंगावर एकमेकांपासून पाच - सात फुटाच्या अंतरावर पहुडले होते. हबिबुर रहमान ह्यांच्या मनगटापाशी जळत्या पेट्रोलचे तुरळक थेंब पडल्याने तेथे थोडे भाजल्यासारखे झाले होते. एरव्ही ते सुस्थितीत असल्याने ते नेताजींच्या सुश्रुषेकडे लक्ष देत होते.
अशा प्रकारे ३।। ते रात्री ८।।पर्यंत सुभाषचंद्र बोस हे पलंगावर पडल्या पडल्या "मैं तो ठीक हो जाऊंगा" असे हबिबुर रहमानना म्हणत होते. पण रात्री ८।। नंतर मात्र सुभाषचंद्रांना ग्लानी येऊ लागली. त्यांची शुद्ध हरपू लागली. त्यांचे शब्द अस्पष्ट, असंबद्ध व तुटक उमटू लागले. तशा अवस्थेत ते एकदा हबिबुर रहमान ह्यांना म्हणाले, " मी ह्यापुढे जीवंत राहू शकेन असे वाटत नाही. म्हणून माझ्या देश बांधवांना माझा शेवटचा निरोप कळवा कि -" बाबांनो, माझ्या जीवात जीव असे पर्यंत मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी शक्यतो नाना प्रकारची खटपट केली. ते ध्येय साध्य होईपर्यंत अतःपर हिंदी जनतेनेही तो लढा अविरत नेटाने व निष्चयाने चालू ठेवावा. एवढे सांगून नेताजींची शुद्ध हरपली ती कायमचीच. रात्री १०।।च्या सुमारास शनिवार दि. १८ ऑगस्ट १९४५ रोजी (वय सुमारे ४८।।)टायकून बेटावरील टायशेकू येथील जपानी लष्करी इस्पितळात नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे प्राणोत्क्रमण झाले. दुसऱ्या दिवशी तेथील विद्युत दाहग्रहात सुभाषचंद्रांच्या पार्थिव देहास अग्नी देण्यात येऊन त्यांची रक्षा टोकियोतील रिंकोजी मंदिरात ठेवण्यात आली आहे. भारतीयांनी ती नेऊन त्यावर अंत्यसंस्कार करावेत असे जपान्यांचे म्हणणे, पण ती रक्षा सुभाषचंद्रांची कशावरून अशा संशयाने बोस कुटुंबिय रक्षा स्वीकारण्यास उत्सुक नाहीत म्हणून भारत सरकारही ती रक्षा आणण्यास तयार नाही. अशा घोटाळ्यात सुभाषचंद्रांची रक्षा जपानी राजधानीच्या रिंकोजी मंदिरात घोटाळत पडली आहे. जपान्यांच्या सहाय्याने स्वातंत्र्य युद्ध चालवलेल्या सुभाषचंद्रांच्या देहाची राखही जणू काय जपान देशाची भूमी सोडायला तयार नाही.
बोलाफुलाची गाठ
जपानी सरकारला सुभाषचंद्र बोस शेवटची अशी विनंती करायला जात होते की, त्यांच्या एखाद्या विमानाने रशियाच्या पुर्वेकडील सरहद्दीवर वा सरहद्दीच्या आत जेथे कोठे सोडता येईल तेथे सोडून द्यावे. तेथून पुढे रशियन सत्ता प्रमुख स्टॅलिनकडे जाऊन भारतातील आंग्ल सत्ता उलथून लावण्यास रशिया किंवा अन्य कोणाचे सहाय्य मिळते का ते आजमावण्याचा सुभाषचंद्रांचा विचार होता.
रशियाच्या सरहद्दीवर वा रशियन प्रदेशात कोठेही सुभाषचंद्रांना गुप्तपणे उतरल्यावर इंग्रजांनी सुभाषचंद्रांचा मागे काढण्याचा प्रयत्न करू नये म्हणून सुभाषचंद्र विमान अपघातात दगावल्याची घोषणा करायची असा एक पर्याय सुभाषचंद्रांच्या व जपानी अधिकाऱ्यांच्या विचाराधीन होता. म्हणून २१ ऑगस्ट 1945 रोजी जेंव्हा टोकियो रेडियोवरून सुभाष चंद्रबोस विमान अपघातात वारल्याची बातमी प्रसृत करण्यात आली, तेंव्हा बऱ्याच जणांना ती राजकारणी थाप वाटली, पण दुर्दैवाने ती बातमी खरी ठरून जपानला पोचण्यापुर्वीच सुभाषचंद्रांचा अंत झाला. जणू काय त्यांच्या एकाग्र धाडसी जीवनाचा नियतीनेच पूर्ण विराम दिल्याने एकूण बोलाफुलाची गाठ पडली!
लेखक - एक्स - कॅप्टन पी. एन. ओक

ताजा कलम –
1. *फाळणी नंतर हबिबुर रहमान पाकिस्तानात स्थलातरित झाले.
2. नेताजींच्या मृत्यूचे गूढ शोधायला अनेक समित्या स्थापल्या गेल्या. त्याचा तपशील इथे
भाग १ समाप्त....
पुढील भागात - नेताजी निवास, भोजन प्रिय नेताजी, नेताजींचे मार्दव, नेताजींची वीरवृत्ती, नेताजींचा सात्विक संताप, सुभाष चंद्रांची ध्येयनिष्ठ स्थितप्रज्ञता, नेताजींच्या उदाहरणावरून प्रत्येक नागरिकाने देश- राष्ट्र सेवा कशी करावी, आपल्याला राष्ट्रीय चारित्र्या नाही त्यासाठी काय करावे - मनोभूमिकाच बदला वगैरे प्रकरणांचा धावता परिचय...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED