नेताजींचे सहवासात - 2 Shashikant Oak द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नेताजींचे सहवासात - 2

नेताजींचे सहवासात

प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33

भाग 2

प्रस्तावना -
... पु.ना. ओकांच्या पुस्तकाचा मुकुटमणी आहे त्या प्रकरण 10- बाबत ते प्रस्तावनेत प्रखरपणे उल्लेख करतात की
‘इसापनीती, पंचतंत्र अथवा हितोपदेश इत्यादि ग्रंथ जसे काऊ-चिऊच्या गोष्टी सांगण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाहीत तद्वत प्रस्तूत ग्रंथही केवळ मनोरंजनासाठी लिहिलेला नाही. त्याच प्रमाणे "सुभाष लीलामृत" अथवा “सुभाष महात्म्य" या दृष्टीने प्रस्तूत ग्रंथाकडे पाहणे चुकीचे ठरेल…
…लेखक व वाचकांचा स्वातंत्र्यपुर्व काळातील आपल्या समाजातील घटनांचा अन्योन्य संबंध कसा आहे, यावर ते म्हणतात, 'वाचकांच्या आवडीनिवडी भिन्न असतात. सर्वांचे समाधान करू पाहणाऱ्या लेखकाची स्थिती इसापनीतील गोष्टीप्रमाणे गाढव विकावयास नेणाऱ्या म्हाताऱ्यासारखी व्हायची! गिऱ्हाईकांच्या चटावलेल्या जिभेस भजी, भेऴ, उसळ, मिसळ, सरमिसळ इत्यादि चटकदार परंतु अंती घातुक असे पदार्थ पुरविणारा वाङ्मयीन उपहारगृहातील एका गरीब व गलिच्छ हुकुमी 'पोऱ्या' हीच सामान्य वाचकवर्गाची सर्वसाधारण लेखकासंबंधी रूढ असलेली कल्पना सूक्ष्म मनोविष्लेषणांत दिसून येते. शाब्दिक अथवा अलंकारिक सर्कस करून लोकांची शाबासकी मिळवणे किंवा चव्हाट्यावर साहित्यिक तमाशा करून पैसे मिळवणे हे मुळात लिखाणाचे ध्येय असता उपयोगी नाहीवचकांस संतुष्ट ठेवणे यात .लेखकाचे कसब आहेच यात शंका नाही, परंतु लेखक हा पौष्टिक वाङ्मय निर्माण करून समाजास पुष्ट बनवणारा साहित्यिक बल्लवाचार्य असला पाहिजे. काही एका क्षेत्रात तरी स्वतंत्र विचार असणे, ते स्पष्टपणे प्रकट करण्याची हातोटी साधणे व निर्भयपणे सांगण्याची तयारी ठेवणे हे नामवंत लेखकांचे व वक्त्यांचे विशेष गूण असतात. समाजाच्या विचारास काहीएक प्रकारची कलाटणी मिळावी हाच कोणत्याही ध्येयनिष्ठ लिखाणाचा उद्देश असतो. लघुकथांप्रमाणे नेताजींचे सहवासातील आठवणी सांगितलेल्या नाहीत. 10व्या प्रकरणात या ध्येयाचा कळस झाला आहे. (काहींच्या मते हे प्रकरण अस्थानी वाटते अशा मतांचा समाचार घेताना ते म्हणतात), - हा कळसच काढून टाकला असता, तर प्रस्तूत लेखकाच्या दृष्टीस तरी (तो ग्रंथ) उघडा – बोडका व पडीक दिसला असता....
... या ग्रंथाच्या उद्देशावरील भाष्यावरून त्यांना अभिप्रेत नेताजींच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू व त्यांच्या पर्वाची माहिती देऊन थांबायचे नाही. तर 'वाचकांना स्वतः तसे निगर्वी, निस्वार्थी, त्यागी, सेवाभावी, तेजस्वी, वीरवृत्तीचे जीवन जगण्याची प्रेरणा, स्फूर्ति व मार्गदर्शन लाभावे हा मूळ उद्देश आहे.'
नेताजींचे प्रथम दर्शन व भेट
... ते म्हणतात, ‘नेताजींना सिंगापूरच्या आधी मी एकदाच पाहिले होते, ते हिंदुस्तानात. इसवी सन 1939साली कॉंग्रेसचे अध्यक्षपदाचा राजिनामा देऊन ते पुरोगामी गटाचा प्रचार करण्यासाठी पुण्यात आले होते. श्रोत्यांच्या अफाट गर्दीत मी त्यांना लांबून पाहिले. त्याप्रसंगी माझा निकटचा सहवास कधी होईल असे वाटण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांचे भाषणाने मी भारावून मात्र गेलो व आत्ताच त्यांचे पक्षास जाऊन मिळावे निदान त्यांच्या पक्षाच्या मुखपत्रात तरी आपण काम करावे असे तरुणपणीच्या सहजप्रवृत्तीने वाटून गेले. देशभक्तीच्या वासंतिक वातावरणात विचार वृक्षांना फुटलेले तरुणपणचे पल्लव हे आजूबाजूच्या परिस्थितीच्या शरदऋतूत ताबडतोब झडून जातात, तसेच ते व्याख्यान ऐकून टिळक स्मारक मदिराच्या आवाराबाहेर मी पडलो तेंव्हा झाले...
... भविष्याच्या उदरात अतिपुर्वेत सुभाषचंद्र बोस हे प्रगट व्हायचे होते. विधीने त्यांची तयारी चालवली होती. कालाचा महिना अगाध आहे, असे म्हणावे लागते. कृष्ण जन्माबरोबरच कृष्णाचे सवंगडी ही विधात्याने आपल्या मायावी लीलेने एकत्र केले, तद्वत नेताजी सुभाष यांचे अवतार कार्यास ज्यांचा हातभार वा बोटभार लागावयाचा होता त्या व्यक्ती अव्यक्त अशा लाग्याबांध्यांनी त्या दिशेने ओढल्या जाऊ लागल्या. माझेही काहीसे असेच झाले. हाही एक अपुर्व योगायोगच म्हणावयाचा....
...स्वातंत्र्याचे वातावरण व नेताजींसारखा गुरू मागूनही कोणास मिळणार नाही. सुदैवाने मला हा लाभ झाला. अतिपुर्वेत नेताजी यांचे निकट सहवासात असणाऱ्या व्यक्तीत महाराष्ट्रीय असे आम्ही दोघेच होतो. एक मी व दुसरे जगन्नाथराव भोसले. नेताजी बोस हे 3 जुलै 1943 रोजी अतिपुर्वेत अद्भूतरितीने प्रगट झाले व 18 ऑगस्ट 1945 तितकेच अदभूत पणे लुप्त झाले. दोन वर्षे व दीडमहिन्याच्या काळात मला त्याचा दैनंदिन असा पुष्कळ असा सहवास लाभला...
...सिंगापुरात जपान्यांच्या हाती सापडलेल्या साठहजार हिंदी युद्धबंद्यापैकी 18 ।। हजार हिंदी स्वातंत्र्य सैनिक बनले. त्यांचे अधिपत्य (पुर्वाश्रमीचे कॅप्टन) जनरल मोहन सिंग यांचे होते. जपान्यांचा व त्यांचा बेबनाव होऊन डिसे. 1942चे सुमारास त्यास स्थानबद्ध केले. तत्पुर्वी 2-3 महिने सामिल झालेले लेफ्टनंट कर्नल जगन्नाथराव भोसले यांनी जपान्यांच्या विनंतीवरून जर्मनीतून सुभाषचंद्र अतिपुर्वेत येईपर्यंत स्वातंत्र्य चळवळीची धुरा धारण केली....
... त्यांस विश्वासू व कार्यप्रवीण अशा सुविद्य मदतनिसाची वाण भासू लागली. त्यादृष्टीने त्यांच्या परिचयातील अधिकाऱ्यापाशी त्यांनी तपास सुरू केला. सर्वांनी एकमुखाने माझे नाव व माझ्याबद्दलची माहिती कानी घातली. असा रितीने पुर्वपरिचय किंवा तोंडओळखही नसताना त्यांनी विमानाने एक अधिकाऱी सायगाव शहरी पाठवला. मला त्या अधिकाऱ्याने सांगितले, ‘असे असे काम आहे, हे काम अंगावर घेण्याची तयारी असल्यास पहा’. काही काळ विचार केल्यावर मला ही या कार्याचा अंगिकार करण्याची बुद्धी झाली. मी रुकार दिला आणि ताबडतोब सिंगापुरास गेलो. इ.स. 1943 च्या जून महिन्याचे 6 तारखेस मी सिंगापुरात पोहोचलो. येथपर्यंत मला पुढील महत्वपुर्ण घटनांची काहीच कल्पना नव्हती. सिंगापुरातील आझाद हिंद नामक इंग्रजी दैनिकाच्या 14जून 1943 च्या अंकात सुभाषचंद्र यांच्या अतिपुर्वेतील आगमनाची आनंददायक वार्ता मी वाचली. ते टोकियोत असल्याचे वृत्त त्यात जाहीर करण्यात आले होते. ते कसे आले केंव्हा आले काही उल्लेख त्यात नव्हता. युद्धकालातील अतिमहत्वाचे गौप्य म्हणून तत्संबंधी व्यक्तींनी तो सर्व वृत्तांत अत्यंत कसोशीने जतन करून ठेवला होता. ...
नेताजी हे पुर्वपद
... सुभाषचंद्र बोस हे नाव लांबलचक तर खरेच, परंतु त्यात आणखी एक विशेष गोष्ट अशी की, ‘श्री’ अथवा तत्सम इतर कोणते तरी पुर्वपद किंवा बहुमानार्थी ‘बाबू’ सारखे उत्तरपद त्यास लावणे जरूर होते. इतकेही करून शिपाई अथवा तत्सम कनिष्ठ लोकांचे तोंडी ते एकेरी असे वाटावयाचे. एकाद्या निकटवर्तियाचा जिव्हाळा व राष्ट्रपतीचा निदर्शन असा बहुमान अशा दोन्ही गोष्टी एकाच नावा साधणे सोपी गोष्ट नव्हती. हे व असा तऱ्हेचे उद्देश‘नेता’ या शब्दाचे ‘नेताजी’ या रुपाने साधले.
भाग 2 समाप्त...