भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १८ Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १८

" नको ना विचार करू इतका ... आपण जाऊ शहरात पुन्हा... नव्याने सुरु होईल सर्व.. ",
" कसं सांग ... तू आलीस इथे ... मागोमाग ... तेही मला आवडले कि नाही ते सांगू शकत नाही... तू आलीस , त्याचा आनंद मानावा कि मी पुन्हा शहरात जाईन त्याचे दुःख... मी काय करू सांग, तो गणू सुद्धा नुसता हसत बघत असतो माझ्याकडे .... काहीच मदत करत नाही... आणि शहरात गेल्यावर कस ठीक होणार आहे सर्व .. मन तर इथेच राहणार ना माझं ... " बोलता बोलता आकाश अचानक थांबला.
" काय झालं ... " सुप्री त्याला बिलगून बसलेली.
" मी आपल्या भविष्याचा काही विचार केला आहे.. एकदा का तुझ्यासोबत संसारात अडकलो कि हे असे फिरता येणार नाही मला. ",
" असं काही नाही... तू जाऊ शकतोस ... तुला वाटेल तेव्हा , वाटेल तिथे... तुला कोण अडवणार.... " ,
" नाही .... तू बोलते तेवढे सोप्पे नाही ते.म्हणूनच मी विचार केला. उद्यापासून हे सर्व निघतील पुढच्या प्रवासाला. कदाचित हि शेवटीच भटकंती असावी माझी, त्याच्या सोबत ती भटकंती पूर्ण करू दे मला. त्यानंतर मी कधीच म्हणजे कधीच अश्या प्रवासाचा हट्ट करणार नाही. " ,
" अरे पण ..... " ,
" प्लिज प्लिज सुप्री ... नको थांबवू .. हाच माझा शेवटचा प्रवास ... त्याचाच विचार करत होतो दुपारपासून. विचार पक्का केला. तुही येणार असशील सोबत तरी चालेल. म्हणजे तुझ्याही काही राहणार नाही मनात. उद्या निघू सकाळीच. तुला जमणार नसेल तर तू जाऊ शकते शहरात. हा प्रवास संपवून तुला शहरातच भेटेन. झोपूया का आता .... तुला वेळ देतो आहे विचार करायला. उद्या पहाटे सांगशील , अशी अपेक्षा करतो. " म्हणत आकाश उठून निघून गेला.

पूजाचे लक्ष या दोघांकडे होते. कादंबरीने विचारलं. " काय गं ... इतकं काय निरखून पाहते त्या दोघांना... ",
" असंच ... कदाचित वादळाची चाहूल असावी हि... " ,
" वादळ !! काही समजलं नाही मला... " ,
" आकाशच्या मनातले .. तो असा कधी नव्हता आधी. भीती वाटते ती त्याच्या मनातल्या भावनांची... उगाचच घाईघाईत कोणता चुकीचा निर्णय घेऊ नये त्याने असे वाटते... " पूजा झोपायला आली.

पूजा पहाटेच जागी झालेली. निघायचे होते ना. तिनेच सर्वाना जागे केले. अंघोळ वगैरे करून सारेच तयारीला लागले. पूजाचे लक्ष आकाशच्या तंबूकडे गेले. तंबू नव्हता तिथे. नंतर तिने सुप्री - संजनाच्या तंबूवर नजर टाकली. तर त्याही तंबू गुंडाळत होत्या. नवल वाटलं तिला. " Hi ... " मागून आवाज आला. आकाश होता मागे.
" आवरले का सर्वांनी... झाले असेल आवरून तर निघूया का .. " आकाश पाठीवर सॅक चढवत बोलला.
" कुठे ?? " ,
" कुठे म्हणजे आपल्या पुढल्या प्रवासाला... " पूजाला काहीच कळलं नाही.
" जरा स्पष्ठ बोलतोस का डब्बू ... " तोपर्यंत सुप्री ही पूजा जवळ आलेली.
" सुप्रीला मी कालच माझा निर्णय सांगितला. आणि तो तिला पटला. तुझा तो अर्धवट राहिलेला प्रवास ... खरंतर माझ्यामुळे अर्धवट राहिलेला. तो प्रवास पूर्ण करणार आहे. तुमच्या सोबत. .... सुप्रीही तयार झाली आहे. " पूजाला ते ऐकून काय रिऍक्ट व्हावे ते कळत नव्हते. एक वेगळीच भावना तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती.
" चल चल निरू .... जास्त वेळ नको दवडू. निघायला हवे ना ... " आकाश वेगळाच भासत होता.
" खरच का ... " मागून कादंबरी आली. " बर झालं ... आता पूजाच टेन्शन गेले.... " कादंबरी बोलली.
" चला .. मग ... निघूया .. थांबायचे नाही आता.. " आकाश बोलला आणि बाकी सर्व त्याच्या मागून चालू लागले. पण सुप्रीच्या चेहऱ्यावर काहीवेगळंच होते. पूजाच्या नजरेतून सुटलं नाही ते. पूजाला झालेला आनंद आता काळजीत बदलला.

पूजाने सुपारीला एका बाजूला घेतलं. " तुम्ही तर शहरात जाणार होता ना... " सुप्री गप्पच होती. शेवटी बोलवं लागलं.
" आकाश बोलला , आपल्या लग्नापूर्वीचा शेवटचा प्रवास हा... तोच बोलला कि लग्नानंतर अश्या कुठल्याच भटकंती साठी हट्ट धरणार नाही. त्यानेच निर्णय घेतला कि हा शेवटचा प्रवास करावा. मीही काही बोलू शकली नाही त्याला. " बोलता बोलता तिलाही वाईट वाटलं. पूजाला शॉक बसल्या सारखं झालं.
" आणि तू काही बोलली हि नाहीस काही.. " सुप्री गप्प झालेली पुन्हा . सुप्रीला मागे सोडून भरभर चालत तिने आकाशला गाठलं.
" थांब डब्बू ... बोलायचे आहे तुझ्याशी... " आकाशने बाकी सर्वांना पुढे जायला सांगितले. कादंबरीसहित बाकी सर्वच पुढे चालत गेले. सुप्री -संजना मागून चालत आल्या. त्या दोघींना थांबवलं पूजाने.
" डब्बू ..... काय बोललास तू सुप्रीला.. शेवटचा प्रवास ... यानंतर कधी प्रवास करणार नाहीस... काय चाललय हे ... " ,
" हो ... घेतला मी तसा निर्णय... ",
" वेडं लागलं आहे का तुला ... तरी वाटलंच होते मला ... भावनेच्या भरात काही चुकीचा निर्णय घेणार तू ... तसंच झालं. " पूजा बोलली.
" नाही निरू .. " आकाशने पूजाच्या खांद्यावर हात ठेवला. " काहीच चुकीचं नाही आहे. मलाही हा प्रवास करायचा होता. निघतो आहे ना आता .... चल ... काहीच चुकलं नाही ... " ,
" अरे !! तरी सुद्धा ... " ,
" निरू ... नको बोलू काही आता ... मीही थकलो आहे विचार करून करून ... खूप वर्ष असाच जगत आलो ना ..मोकळा एकदम ... आता नाही झेपत हे विचारांचे ओझे... आभाळानेच का सर्वांना सामावून घेयाचे प्रत्येक वेळेस ... कधी कधी आपणही व्हावे आकाश ... मगच कळते , भरलेल्या आभाळाचे दुःख काय असते ... " सुप्रीकडे पाहत आकाश बोलला. पूजा समजली. " चला निघूया ... सुप्री - संजना ... तुम्ही दोघी पूजा सोबत असणार या प्रवासात .. मला पुन्हा या ग्रुपच्या पुढे राहायचे आहे ... कदाचित .... शेवटच्या वेळी .. " आकाश निघून गेला पुढे. संजना - सुप्री - पूजा ... तिघी एकमेकींकडे पाहत ... थोड्यावेळाने त्याही निघाल्या.
=====================================================================


तिथून खालीच असलेल्या गावात पोहोचले सगळे. विचारत विचारत निघाले. आकाशला माहिती हवी होती ती पूजाने सांगितलेल्या गावाची.कोणाला विचारले तर तसे कोणते गाव होते हेच कोणाला माहित नव्हते. त्यातल्या त्यात एकाने सुचवलं. गावच्या शाळेचे मास्तर, गावात तेच वयस्कर होते. त्यांना काही माहिती असल्यास , नाहीतर कोणालाच माहित नाही. जायचे तर होतेच. शाळेतच राहायचे ते, अशीही माहिती मिळाली.
" गावातले शिक्षक ... शाळेतच राहतात का... " कादंबरीचा आकाशला प्रश्न. या प्रवासाला सुरुवात झाल्यापासून कादंबरी आकाश सोबतच चालत होती. कादंबरीचा प्रश्न ऐकून आकाशला हसायला आलं.
" इतकी वर्ष फिरते आहेस ना ....निरू सोबत ... तरी माहिती नाही. " ,
" काय ते ... ",
" अगं ... असं कोणी शाळेत राहते का.... तो माणूस बोलला ना ... फार वयस्कर आहेत.... वय झालं म्हणून शाळेतच राहत असतील. रोजची दगदग कशाला... " बोलता बोलता सारेच त्या गावातल्या शाळेजवळ जमा झाले. आकाशने सर्वांना बसायला सांगितलं. आकाशने बाहेरूनच आवाज दिला.
" कोणी आहे का शाळेत .... गुरुजी ... !! गुरुजी आहेत का ... " आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
" कदाचित , कोणी नसेलच आतमध्ये... " कादंबरीने शंका व्यक्त केली. आकाशला हि तसेच वाटले. " निघूया ... पुढे विचारू कोणाला तरी... " म्हणत आकाशने त्याची सॅक पुन्हा पाठीवर चढवली. आणि आतुन कोणीतरी बाहेर आले. वयस्कर होते तरी अजूनही फिट दिसत होते. हेच ते गुरुजी असावेत असा अंदाज आकाशने लावला.
" तुम्हीच ना गुरुजी ... " आकाशने विचारलं.
" होय ...मीच... काही काम होते का ... " गुरुजींनी या सगळ्या ग्रुपकडे पाहिलं. १०-१५ लोकं. पुरुष-बायका ... " कुठून आलात ... तुम्हाला आराम करायचा आहे का शाळेत ... करू शकता ... नाहीतरी शाळेला सुट्टी आहे ... " ,
" नाही नाही .. गुरुजी .... आम्हाला एका गावाची माहिती हवी होती. " ,
" कोणते गाव ? " ,
" निरू .... इकडे ये .... " आकाशने पूजाला हाक मारली. " तुला माहित आहे ना त्या गावाचे वर्णन ... सांगून बघ यांना ... माहित असेल तर सांगतील. " पूजा पुढे आली. आणि पाठोपाठ सुप्री आकाशच्या शेजारी येऊन उभी राहिली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: