Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 28 (Last part) books and stories free download online pdf in Marathi

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २८ (अंतिम भाग)


आकाशच्या डोळ्यात पाणी जमा झालेले. सुप्रीच्या डोळ्यातून आधीच पाणी वाहत होते. मात्र ती हसत होती. " तुला डब्बू बोलतात हेही माहित नव्हतं मला. मीच प्रत्येक वेळेस तुला माझ्यात अडकवून ठेवलं. तुझ्याबाबत कधी काही जाणून घेण्याचा प्रयन्त ही केला नाही. तू जेव्हा हरवला होतास ना ... तेव्हा काय बोलला तू , माझ्यामुळे पुन्हा माणसात आलास तू.. नाही आकाश.... तुला त्या निसर्गाने जिवंत ठेवले. तोच तर तुझा सोबती आहे ना पहिल्यापासून... आणि मी तुला त्याच्या पासून दूर ठेवत आले. " आकाश आता नॉर्मल वाटत होता . तोही बोलू लागला .


" कधी कधी आई बोलते मला...... तुझ्या अंगात रक्त नाही.... उधाणलेला वारा वाहत असतो. मी खूप समजावले स्वतःला... नको जाऊया पुन्हा... सुप्री किती काळजी करते. तरी सुद्धा, माझे मन तयारच होयाचे नाही. श्वास गुदमरायला माझा. लोकांना जरी मी इथे दिसत असलो तरी मन मात्र तिथे कुठेतरी फिरायला गेलेलं असायचे. सर्वांना दिसायाचा तो हाडा- मासांचा गोळा. जीवच नव्हता त्यात... आताही , मला कळत नाही ... माझे चुकते आहे का ... तुझ्यापासून वेगळं होताना.. तुला का शिक्षा हि ... " ,

" नाही आकाश... मी खूप विचार केला. आपलं लग्नही झालं असतं पुढे... पण तुझं काय.. तू तर सुरुवातीपासूनच बोलत होता ना ... शेवटचा प्रवास ... त्यानंतर त्या पुढच्या आयुष्यात तुला स्वतःला हि जमलं असत का तुला थांबवायला... नाहीच !! शक्यच नाही... मग उगाचच माझ्या आनंदासाठी त्याग करायचा..... म्हणजे एकाने आनंदात राहायचे आणि दुसरा....... दुसरा स्वतःला फक्त अडवत राहणार... मीही मग स्वतःला दोष देत राहिले असते... सगळं काही माहित असून सुद्धा मी का वागले अशी ... " ... सुप्री..

थंडगार वाऱ्याची झुळूक आली या दोघांकडे. " बघ आकाश.. तुला तुझे मित्र बोलवत आहेत. ",
" सुप्री !! .... " ,
" आकाश.... मी नॉर्मल आहे. आणि सुखात राहीन ... अजिबात काळजी नाही करायची माझी.. " ,
" घरी आणि ऑफिस मध्ये काय सांगू मी .... " ,
" कधी पूर्ण होईल प्रवास तुझा.. " ,
" माहित नाही ... कदाचित २ आठवडे... २ महिने... २ वर्ष ..." आकाश थांबला बोलायचा.
" चालेल... मी सांगते तुझ्या ऑफिसमध्ये.. आणि आईंना सुद्धा समजावेन.. तू निर्धास्त भटकंती कर ... विचारांचे ओझे नको ठेवू मनावर...... थकलास ना तू ... विचार करून करून ... आता खरंच आराम कर तू ... आम्ही सारे मजेत राहू ... कसलाच विचार आता मनात आणायचा नाही ... " सुप्रीने आकाशच्या गालावरून हात फिरवला. " तूच बोलतोस ना , मी किती strong आहे आणि गणू सोबत असताना कशाला घाबरायचे.. " रडू तर येत होते तिला. खूप वेळ आवरलेले रडू क्षणात डोळ्यातून झरझर ओघळले. आकाशला बिलगून रडू लागली सुप्री. संजनालाही रडू आवरले नाही मग. आणि पाऊस ... तोही रिमझिम सुरु झाला. ५- १० मिनिटे रडण्यात गेली. नंतर मग सुप्रीने स्वतःला सावरलं.

" चल .. निघतो आम्ही... तुझाही प्रवास सुरू होईल आता.. नवी भटकंती... मनसोक्त भटकत राहा.. त्या पाखरांसारखे.... तुला ओळखण्यात जरा कमी पडली मी... हो मुक्त तू .... कसलीच बंधनं नाहीत तुला.... " सुप्री बोलली. आकाश तिच्याकडेच पाहत होता.
" राहशील ना माझ्या शिवाय... " ,
" हो ... हो .... " सुप्री उभी राहत म्हणाली. " आठवणींच्या गर्द रानात हरवून गेली असेन फक्त... त्यातून बाहेर काढायला तरी येशील ना .... " यावेळेस आकाशला रडू आलं.
" बघ रे गणू .... किती emotional असतात माणसं ..... बघ, आता निघते आहे तर मिठीही मारत नाही. गरिबाला कोण मिठी मारणार ना... " आकाशला हसू आलं. मिठीत घेतलं त्याने सुप्रीला. संजनाहि जवळ आली. तिलाही मिठी मारली. " मित्रा ... आठवण ठेव आमची... " संजनाने गालगुच्चा घेतला त्याचा.
" जेव्हा परतुनी येईन तेव्हा भेटेन नक्की... " सुप्री पुन्हा आकाश जवळ उभी. निघायची वेळ. पाय निघत नव्हते.
" चला मिस्टर A.... थांबली असती पण आई घरी वाट बघत असेल ना ... म्हणून चालली ... शिवाय .... ह्या संजूला रस्ते कळत नाही ना ... तिला सुखरूप घरी नेयाला पाहिजे ना ... " आकाशने पुन्हा सुप्रीला मिठी मारली. तिच्या कपाळावर ओठ टेकवले.


" चल.... अनोळखी होऊ पुन्हा... एक कळलं ते तुझं नाव ,स्वभाव .... आभाळ , आकाश एकच , ..... तुझी आई बोलते ना तुला.. वारा आहेस तू ... कुणाला थांगपत्ता लागू देत नाहीस .. काय सुरु असते मनात तुझ्या... तुलाच जमते असे वागणे... वादळं फक्त तूच थोपवायचीस... साऱ्यांना सामावून घेणारा आकाश तू... सर्वाचा आकाश... तरी सांगू... तू माझंच आकाश होऊन रहा... माझं आकाश... नाहीतर नजर उचलून पाहायचे कोणाकडे .... " सुप्री बोलली. आकाशकडे एकदा हसून पाहिलं. संजनाचा हात हातात घेतला आणि निघाली त्या डांबरी रस्त्याने... शहराकडे. आकाश, तिच्याकडे ती नजरेआड होईपर्यंत पाहत होता. वाईट वाटतं होते, तरी हेच आपलं जगणं आहे , हे त्याला पटलं होते. बंधमुक्त जगणं. अपेक्षांचे ओझे फेकून दिले त्याने. पुन्हा एकदा त्याने सुप्री निघालेल्या वाटेकडे नजर टाकली. दूरवर गेलेली ती. आकाशने मग त्या पायवाटेकडे नजर टाकली. डोळ्यातली आसवं पुसली. आणि काहीश्या विखुरलेल्या , तरी नव्या आभाळाच्या साक्षीने नवीन प्रवासाला निघाला आकाश.


प्रत्येकवेळेस दुसऱ्यासाठी जगणं , हेच आयुष्य बनून जाते. पण स्वतःचे जगणेही महत्वाचे असते. नाहीतर जन्मभर हातात राहतात त्या चुकलेल्या निर्णयाच्या मनावरच्या खपल्या. जखम भळभळत नाही तरी वेदना होतंच राहतात. जगावं कधी स्वतःच्या नियमाने..... जगावं कधी पाखरांसारखे..... जगावं कधीतरी ... मनासारखे. हेच जगणं ... सुप्रीचा निर्णय योग्य होता तिच्यासाठी आणि आकाशसाठी सुद्धा. गोष्टी अश्याच सुरु होता आणि संपतातही अश्याच. सुख-दुःख हा तर नियमच आहे जगाचा. चालणारे पाय आणि प्रवास कधी थांबला नाही पाहिजे. चेहरे बदलतात, नावं बदलतात , पण प्रवास , भटकंती कधीच थांबत नाही. गोष्ट संपली. आनंद आहे. जिथे सुरवात, तिथे शेवट आणि जिथे शेवट होतो, तिथे नव्याने सुरुवातही होते. आकाश- सुप्री पुन्हा अनोळखी झाले. कदाचित पुन्हा नव्याने ओळखीचे होण्यासाठी. हे दोघे स्वतःच्या सुखाच्या प्रवासाला निघाले आहेत. कदाचित एखाद्या अनोळखी वळणावर पुन्हा नव्याने भेटतील..... एका नवीन भटकंती साठी... !! विचार करायला हरकत नाही, बरोबर ना !!


==================== समाप्त ======================

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED