Heartbroken books and stories free download online pdf in Marathi

हार्टब्रोकन

हार्टब्रोकन

गर उसको चाहना खता है मेरी

फिर शौक से तू सजा दे...

रुलाने से पहले इस दिल को

और खता करने कि रजा दे...

नानासाहेब पाटील

nanasaheb.writer@gmail.com


प्रकरण १

भर दुपारी रणरणत्या उन्हात दाट वस्तीततल्या गल्ली बोळातून विषण्ण मनाने खाली मान घालून पाय ओढत तो जात होता. साडेपाच फुटाच्या आतबाहेर उंची, साधारण शरीरयष्टी, सावळा रंग, केस विस्कटलेले, किमान पंधरा दिवसांची वाढलेली दाढी, डाव्या मनगटावर एम.आय.चं स्मार्ट बँड वॉच, पिवळ्या रंगाचा चुरगळलेला टीशर्ट, रेग्यूलर मेन्स डार्क ब्लू जीन्स, पायात अडकवलेल्या लाल रंगाच्या लोफर शूज मधल्या त्या तरुणाला शहराच्या गर्दीपासून दूर जाण्याची घाई दिसत होती पण शारीरिक हालचाली मात्र त्याला साजेशा नव्हत्या.
अरुंद रस्त्यावरील एका वळणावर तो टर्न घेणार इतक्यात एक सायकल ब्रेकचा आवाज करत त्याच्या पासून काही इंचावर करकचत थांबली.
“आयची रे तुझ्याs... मारतो का भडव्याs s” तो दचकत ओरडला.

“स s स्स s s सॉरी...” त्याचा रुद्रावतार पाहून लटपटत तो सायकलवाला किशोरवयीन मुलगा कसाबसा बोलला व सायकलवर टांग न मारता तसाच तिला पायी पळवत घेऊन गेला.

राग आवरत वळण घेत पुढे आणखी काही वेळ तो चालत राहिला. अंग भाजून काढणाऱ्या त्या उन्हात नेहमी जाणाऱ्या येणाऱ्यावर धावणारी भटकी कुत्री देखील कुठेतरी एखाद्या घराआडच्या सावलीत ल्याहा ल्याहा करत सायंकाळची वाट पाहत निपचित पडली असतील पण त्याच्यावर मात्र उन्हाचा फारसा परिणाम जाणवल्याचं दिसून येत नव्हतं.

आणखी एक गल्ली पार करून तो मुख्य रस्त्यावर आला. हमीद चौकातील रिक्षांची गर्दी, भटक्या गायींचा कळप ओलांडत अब्बासच्या पान दुकानवर येत त्यानं लाईट गोल्डफ्लेकचं पाकीट विकत घेतलं अन् त्यातलीच एक घाई घाईत पेटवली. दोन तीन जोरदार कश मारून नाकातोंडानं धुराची वर्तुळं काढत रस्त्याकडे तोंड करून तो उभा राहिला. अब्बास त्याला डीस्टर्ब न करता त्याचं निरीक्षण करत होता.

अब्बास त्याचा खास मित्र होता. डोक्यावर पांढरी गोल जाळीदार टोपी, कोरलेली दाढी, डोळ्यात सुरमा घातलेला अब्बास उंची असूनही ऐन तारुण्यात स्थूलत्व आल्याने धिप्पाड दिसायचा. त्याच्या मालकीचं रेस्टॉरंट व भव्य पान दुकान होतं. तो कॉमर्स पदवीधर होता मात्र त्यानं सुरुवाती पासूनच व्यवसायात रस असल्याने अन्यत्र कुठेही उमेद्वारी करून वेळ वाया न घालवता हा हा म्हणता स्वतःच्या व्यवसायात जम बसवला होता.

त्याचा लहान भाऊ रेस्टॉरंटच्या गल्ल्यावर बसायचा व तो स्वतः पानदुकानाच्या गादीवर.

अब्बासचं पान त्या भागात फेमस होतं. रात्री आठ वाजेपासून पान खाणाऱ्या शौकिनांची जी गर्दी चालू व्हायची ती थेट बारा वाजेपर्यंत कमी होत नसे.

“काय रे? काय झालं?” काही वेळानंतर मात्र अब्बासने त्याला काळजीने विचारलं.

“काही नाही” तो तसाच रस्त्यावरील गर्दीकडे पाहत धुर सोडत बोलला.

“काही नाही? चेहरा बघ एकदा आरशात? टेन्शन है क्या कुछ?”

“इट्स अ लॉंग स्टोरी... छोडना याsर...” तो अनिच्छेनेच बोलला व दमदार कश मारत गरम धुराने छाती भरून घेत धुराचे गोलाकार पांढरे शुभ्र वलय काढण्यात गुंग झाला.

अब्बास त्याच्या या विचित्र वागण्याकडे काही क्षण पाहत राहिला. मग मात्र मनाशी काहीतरी ठरवत तो दुकानातून बाहेर आला.

“अल्ताफ... जमीर को भेज दुकानपे... मै जरा बाहर होके आता.” लहान भावाला आवाज देत तो भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली सावलीत लावलेल्या त्याच्या काळ्या रंगाच्या रॉयल इन्फिल्ड बुलेट कडे निघाला.”

“चल...”

“कुठे?”

“जन्नत...” अब्बासने इंजिन स्टार्ट करताच ते साडे तीनशे सीसीचं धूड फदफदायला लागलं.

जन्नत बार तिथून साधारणपणे दहा बारा किलोमीटर दूर होता. शहराबाहेरील रस्त्याला लागून असलेल्या शेतात वड, चिंच अश्या वृक्ष वेलींनी नटलेल्या भागात वसलेला हा बार दुपारी तसा निवांत असायचा पण रात्री मात्र इथे चांगलीच गर्दी व्हायची.

गर्दी असली तरी जागा मोकळी असल्याने आप-आपसातील बोलणं समजायचं. कस्टमरच्या प्रायव्हसी करता तीन फुट उंचीची भिंत व त्यावर तीन फुट उंचीच्या बांबूच्या विणलेल्या छोट्या झोपड्याही बनवलेल्या होत्या. त्या भिंतींवर वारली पेंटीग्स काढलेली होती.

एका झोपडीत किमान सहा लोक बसतील असं टेबल लावलेलं होतं. टेबलवरील बोलल्या जाणाऱ्या आवाजाचा बाजार होणार नाही याची पुरेपूर काळजी जन्नतने घेतली होती. नाहीतर शहरातले काही बार इतके कॉम्पॅक्ट आणि भंपक असतात कि कोण काय बोलतं तेच कळत नाही. आपल्या टेबलवरील शेजारच्या व्यक्तीशी बोलताना सुद्धा मोठ्याने बोलावं लागतं. त्यामुळे शहरापासून दूर असूनही लोक जन्नतला प्रिफर करायचे.

जन्नतच्या पार्किंगला बुलेट पार्क करून ते एका झाडाखालच्या रिकाम्या झोपडी वजा कॉटेज मध्ये घुसले. दुपारची वेळ असल्याने अपेक्षेप्रमाणे गर्दी नव्हती.

“एक चिल्ड बियर... नॉकआऊट.” टेबलवर असलेल्या जगमधील पाण्याने हात धुवत त्यानं वेटरला ऑर्डर दिली.

“चखण्याला काय देऊ साहेब?” वेटरने विचारलं.

“एक शेंगदाणा... दोन रोस्टेड नागली पापड.”

पाचच मिनिटात वेटर ऑर्डर घेऊन आला. वेटरने ओपनरने बियरचं झाकण उघडायच्या आत अब्बासने बाटलीला हात लावून बियर किती चिल्ड आहे ते चेक केलं. खात्री पटताच त्यानं वेटरकडे पाहून समाधानाने मान डोलावली. वेटर दोन्ही ग्लास बियरने भरून निघून गेला.

“चियर्स इन द नेम ऑफ युवर लॉंग स्टोरी...” अब्बास एक ग्लास उचलत म्हणाला.

“चियर्स...” तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

दोघांनीही थंड बियर घोट घोट रिचवायला सुरुवात केली. अर्धा ग्लास थंड बियर घशाखाली जाताच त्याला जरा फ्रेश वाटलं. विचाराला चालना मिळाली... कुठून सुरुवात करावी... कशी करावी... यावर तो विचार करत राहिला.

“काय झालं? कसला विचार करतोस?” अब्बासने ग्लास संपवत त्याला विचारलं.

“यु s नो अब्बास...” त्यानं अडखळत बोलायला सुरुवात केली.

“आय नो व्हेरी वेल... ब्रेकअप?” अब्बासनं त्याच्याकडे पाहत विचारलं.

“वेल... नॉट लाईक दॅट... खरं सांगायचं तर मला ब्रेकअपचा अनुभव नाहीये असं नाही... आहे... पण त्यावेळी माझं वय हार्डली बावीस होतं रे... मला प्रेम कशाशी खातात ही समज यायच्या आतच ब्रेकअप झाला होता. त्यानंतर मी पुन्हा एकदा प्रेमात पडेल असं आजतागायत कधीच वाटल नव्हतं. पण आजची स्थिती वेगळी आहे. आज मी जे फील करतोय ना... मला वाटतं मी त्यावेळी अनुभवलंच नव्हतं.” एव्हढ बोलून त्यानं एक दीर्घ निश्वास सोडला.

“मला आठवतोय तुझा लास्ट ब्रेकअप...” अब्बास बियर सिप करत बोलला. त्याचा हा दुसरा ग्लास होता.

“तो फक्त ब्रेकअप होता रे... अगदीच देवदास वगैर होण्यासारखी उत्कटता त्या प्रेमात नसावी कदाचित.” तो जरा रिलॅक्स होत बोलला... बियरच्या सेकंड ग्लासचा इफेक्ट होता तो.

“हं... याचा अर्थ तू त्यावेळी रडला नव्हतास? प्रेमभंग कि काय म्हणता तो तुझा झाला नव्हता, नाही का?” अब्बासने मिश्कील हसत त्याला चिडवलं.

“नाही... एव्हढी काही वाट लागली नव्हती... पण...”

“बोल... बोल... थांबू नको... थांबला तो संपला”

“कोण संपला?” त्याला अब्बास काय म्हणाला त्याचा संदर्भ लागला नाही. मेंदूवर नशेचा परिणाम हळुवार पसरत होता.

“संपला नाही रे... संपली म्हण.” अब्बासने रिकामी झालेली बाटली त्याला दाखवत वेटरला डबल ऑम्लेट बरोबरच बियरची ऑर्डर रिपीट करायला सांगितली.

“अब्बास... तुला सोफिया आठवते का रे?” सिगारेट पेटवत तो बोलला.

“येस... ऑफकोर्स... तुझी एक्स गर्ल फ्रेंड.”

“हुं... जेंव्हा ती माझ्या आयुष्यात आली... वाटलं... जिंकल आपण... पण जेंव्हा ती लग्न करून कॅनडाला गेली... आय थॉट... आय लॉस्ट माय लाईफ... पण मी स्वत:ला सावरलं... तिच्यासाठी वेडा झालो नाही. मी सत्य स्वीकारलं.” असं म्हणून त्यानं बियरचा ग्लास तोंडाला लावला. अर्धा अधिक रिकामा करूनच खाली ठेवला. ऑम्लेटचा तुकडा तोंडात टाकत त्यानं सिगारेटचा कश मारला.

“ओके... नाऊ व्हाट?” अब्बासने विचारलं.

“व्हाट?”

“दॅट वॉज युवर पास्ट... पण आता नेहाचं काय? यह तेरा आज है.”

“येस आय नो... यह आज मुझे पागल कर देगा अब्बास... आय कान्ट सिम्पली फरगेट नेहा...” तो इमोशनल होत बोलला.

“सेंटी मत बन... हुवा क्या वो बता” अब्बासने रिकामा झालेला ग्लास भरला.

“तिनं लग्नाला नकार दिलाय” कॉटेजच्या खिडकीतून तो बाहेर पाहत बोलला.

“हं”

“आणि असं जर झालं ना तर... तर... वेड लागेल मला” त्याला भरून आलं होतं.

“त्यावेळी तू फक्त बावीस वर्षाचा होतास. पण किती धाडसानं त्या प्रसंगाला सामोरा गेलास अन् स्वतःला सावरलंस... आणि आज काय झालं... आज तर तू मॅच्युअर्ड आहेस... मला वाटतं अठ्ठावीस एकोणतीसचा असशील तू... नाही?” ऑम्लेटचा तुकडा तोंडात कोंबत अब्बास बोलला.

“नो... आय कान्ट फरगेट हर...” तो नकारार्थी मान हलवत बोलला व बियरचा ग्लास तोंडाला लावला.

“हुं... मॅटर सिम्स सिरीयस...” अब्बास आता सावध झाला.

“वन्स अगेन... आय विल ट्राय टू कन्विन्स हर”

“डोंट वरी... आपण यातनं काहीतरी मार्ग काढू... बट बिफोर दॅट अलाऊ मी टू आस्क यु सम क्वेश्चन्स”

“विचार...”

“तुझं सोफियावर प्रेम होतं, असं तू म्हणतोस... बरोबर? मग लग्न का केल नाहीस तिच्याशी” कोर्टाच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या आरोपीला सरकारी वकिलाने क्रॉस एक्झामीन करावं तशी अब्बासने प्रश्न विचारून सुरुवात केली.

“कारण त्यावेळी माझं वय फक्त बावीस होतं. मी जॉबलेस होतो... शिवाय... ”

“वेट ! हा केवळ वय किंवा जॉब नसण्याचा प्रश्न नाहीये मित्रा...” अब्बासने त्याला मध्येच थांबवलं.

“मग...” तो गोंधळला.

“तुझं सोफियावर प्रेम नव्हतच मुळी.”

“काय?” त्याला हे ऐकून शॉकच बसला.

“येस ! तु तिच्यावर कधीच प्रेम केलं नाहीस.”

“तू असं कसं काय म्हणू शकतोस?”

“कारण तुला प्रेम म्हणजे काय हे माहीतच नाही.” अब्बासच्या आवाजात गंभीरता जाणवत होती.

“यु नो अब्बास ! शी वॉज माय फर्स्ट लव्ह... आय लाईक्ड हर व्हेरी मच” ग्लासातील उरलेली बियर संपवून खाली ठेवत तो बोलला..

“अं... हं... आय डिसअॅग्री विथ यु... तुला प्रेम म्हणजे काय हे माहित नाही याचा अर्थ तुला त्याच्या पाठीमागचं सायन्स माहित नाही असं मला म्हणायच होतं” अब्बासने त्याचा मुद्दा क्लियर केला.

“सायन्स? कसलं सायन्स?” त्याला आश्चर्य वाटलं.

“प्रेम म्हणजे पहाटे पडलेलं गुलाबी स्वप्न नव्हे ज्यात तुम्ही बाहेरची दुनिया विसरून स्वतःला हरवून बसलेले असतात. प्रेमासोबत त्याचे काटे पण येतात. प्रेम एकटं नसतं... मत्सर, मालकी हक्क, संशय, असबंध वर्तणूक वगैरे गुण पण त्याच्या सोबत येतात.”

“ते ठीक आहे रे...” अब्बासला नक्की काय म्हणायचय हे त्याच्या लक्षात आलं नाही.

“प्रेमात तीन मुख्य गोष्टी इंव्हॉल्व असतात... आकर्षण, ओढ आणि वासना”

अब्बासचा हा फॉर्म त्याला नवीनच होता. तो काहीतरी सायंटीफिक सांगतोय हे नक्की.

“आता मला सांग... तुला सोफिया आवडायची... म्हणजे नक्की काय?”

“अं... मला तसं एक्सप्लेन नाही करता येणार...”

“हं... मग ऐक... मी सांगतो... तुला सोफिया आवडायची म्हणजे तुला तिच्या बद्दल निव्वळ आकर्षण होतं म्हणूनच तू तिला... सहज नाही म्हणता येणार... पण प्रयत्नांती विसरलास.”

“हुं... मे बी... हे नवीनच कळतंय मला.” त्याच्या गोंधळात भरच पडली.

“नॉट मे बी... इट्स अ फॅक्ट” अब्बास स्वताच्या मतावर ठाम होता.

“ओके... आकर्षण तर आकर्षण... नाऊ टेल मी मिस्टर सायंटिस्ट व्हाट डू आय फील फॉर नेहा?”

“सेम थिंग... आकर्षण... स्वतःचा मालकी हक्क स्थापित करणे... वासना”

“वासना? व्हाट आर यु टॉकिंग अबाऊट?” अब्बासची प्रेमाची व्याख्या ऐकून तो सुन्नच झाला.

“तुम्ही लोक या सत्या पासून नेहमी दूर का पळता... तुम्हाला वासना शब्द का आवडत नाही... समजा तुझ्यात तशी वासना नाहीये तर मग तुला नेहाशी लग्न का करायचयं?”

“कारण... माझं तिच्यावर प्रेम आहे... बस्स...”

“लव स्टार्ट विथ आइज अँड एंड विथ सेक्स... तू विसरतोस... प्रेम म्हणजे आकर्षण, ओढ आणि वासना” अब्बासने त्याला आठवण करून दिली.

“ओके मिस्टर प्रोफेसर ऑफ लव्ह... आकर्षण, ओढ आणि वासना... ठीक आहे... अग्रीड... पण पुढे काय? मी तिच्याशिवाय जगू शकत नाही” त्यानं सिगारेट पेटवत सांगितलं.

“तुला माझा मुद्धा लक्षात येत नाहीये.”

“कोणता मुद्दा?”

“सोड... दुसरा प्रश्न... प्रेम आंधळ असतं असं का म्हणतात?”

“कारण आपण हृदयाचं ऐकतो मेंदूचं नाही.”

“हृद्याच ऐकतो म्हणजे काय?”

“मला नक्की सांगता येणार नाही. पण हृदय म्हणजे दिल.”

“नो डियर... हृदय म्हणजे फक्त एक बॉडी पार्ट आहे... त्याचं कार्य निराळ आहे... जी व्यक्ती प्रेमात पडते ती व्यक्ती त्याच्या भावनांच ऐकते... दृदय किंवा दिल याच ऐकत नाही... म्हणजे ती व्यक्ती व्यवहारिक बाजूचा विचार न करता केवळ भावनिक होऊन निर्णय घेते... म्हणून प्रेम आंधळं असतं असं म्हणतात” अब्बासने रिकामा झालेला ग्लास पुन्हा भरला.

“त्याने काय फरक पडतो यार...” अब्बासला काय म्हणायचं हे त्याच्या लक्षात येत नव्हतं.

“त्याने फरक पडतो.” अब्बास ठामपणे बोलला.

“काय फरक पडतो?” त्याला आता इरीटेट व्हायला लागलं होतं.

“व्यक्ती प्रेमात पडते म्हणजे नक्की काय होतं रे?”

“नाही सांगता येणार.”

“त्या व्यक्ती मध्ये अशी काहीतरी गोष्ट असते जिच्यामुळे प्रेमात पडणारी व्यक्ती आकर्षली जाते. राईट?”

“राईट...”

“मग तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता”

“हुं...”

“असं का होतं? कळतय का?”

“मला कसं कळणार याsर...”

“हार्मोन्स... वयाच्या सोळाव्या वर्षी हे हार्मोन्स शरीरात कार्यरत होतात... मग एखादी सुंदर तरुण व्यक्ती बघितली कि तिचं आकर्षण वाटायला लागतं... त्या हार्मोनचं नाव आहे डोपामायीन...”

“अब्बासभाई... मी फक्त बी.ई. सिविल इंजीनियर आहे. बायोकेमिस्ट्रीचा विद्यार्थी नाही... प्लीज कम टू द पॉइंट... आपण माझ्या लग्नाबद्दल बोलतोय.”

“येतोय... तुला अपेक्षित पॉईंटवरच येतोय मी... तू कुठे काम करतोस?” अब्बासने विचारलं.

“तुला माहितीये... एका कॉर्पोरेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत”.

“हुं... किती वर्षा पासून काम करतोयस तू तिथं?”

“तीन वर्षापासून”

“तुझा बॉस जेंव्हा तुला फायर करतो... तेंव्हा तू काय करतोस?”

“काय?” त्याला संदर्भ लागला नाही.

अब्बासने पुन्हा तोच प्रश्न केला.

“जर माझी चूक असेल तर मी सॉरी म्हणतो... चूक नसली तरीही इग्नोर करतो.”

“बॉसने तुला भोसडलं तर तुला राग येत नाही का?”

“येतोना... बऱ्याचदा खूप राग येतो... पण काय करणार?”

“मग तू तिथे काम का करतोस? तू सोडून का देत नाही कंपनी?”

“नाही यार... बॉस नावाचा प्राणी सगळीकडे सारखाच असतो. अश्यावेळी आम्ही प्रोफेशनली विचार करतो इमोशनली नाही.”

“एक्झाटली... तुम्ही प्रोफेशनली वागता इमोशनली नाही... आणि जे इमोशनली रिअॅक्ट होतात ते एकतर कंपनी बदलतात किंवा असमाधानी, दुखी तरी असतात... राईट?”

“राईट...”

“आता मला एक सांग मित्रा... कंपनीत तुम्ही महत्वाचा निर्णय इमोशनली का घेत नाही?”

“कारण... भावनेच्या भरात निर्णय घेतला तर आपल्या हातून एखाद्या वेळी घोडचूक होण्याची शक्यता असते.”

“अगदी बरोबर... करियर मध्ये तुम्ही प्रोफेशनल वागता... पण प्रेमात नाही... इथे मात्र तुमच्या भावनांना समुद्रासारखी भरती आलेली असते... बरोबर?”

“बरोबर...”

“म्हणूनच... लव इज कॉल्ड ब्लाइंड... गॉट इट?”

“येस उस्तादजी”

“इफ यु गॉट इट देन बॉटमअप अँड लेट्स गो...” असं म्हणत अब्बास खुर्चीतून उठून उभा राहिला.

“हेंs s ?” तो अक्षरशः जागेवरून उडालाच,

“अरे हे काय? तू माझ्या लग्ना बद्दल काहीच बोलला नाहीस?”

“पर्ल्स बीफोर स्वाईन !” अब्बासने पुटपुटत खुर्ची मागे ढकलली व आलोच म्हणून करंगळीत दाखवत तो वॉशरूमकडे निघून गेला.

अब्बास जाताच खुर्चीवर मागे डोकं टेकलं व डोळे मिटून घेत तो विचारात हरवला... त्याला त्याची व नेहाची शेवटची भेट आठवली... शनिवारचा दिवस होता तो... शनिवारी तिचा गायनाचा क्लास असायचा. डीलक्स आईसक्रीम पार्लर मध्ये चार वाजता भेटायचं ठरलं होतं. दुर्दैवाने त्याला उशीर झाला होता. तो वेळेत पोहोचू शकला नाही.

“वेळेवर आलास?” ती उपरोधिकपणे म्हणाली.

“आपल्या रस्त्यांची कृपा. मी बम्पर टू बम्पर ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो”.

“मी पण त्याच मार्गाने आले ना.” तिच्या स्वरात त्याला दुखरेपणा जाणवला.

“सॉरी... तुला अडचणीतून मार्ग काढायला जमतं.” भांडणात त्याला वेळ वाया घालवायचा नव्हता. त्यानं बटरस्कॉच आईस्क्रीमची ऑर्डर दिली.

ती खूपच सुंदर दिसत होती. तिची राहणी साधी सरळ होती. तिला परवडत असूनही त्यानं तिला कधी महागड्या दागिन्यांचा वापर करताना आजवर पाहिलं नव्हतं.

"ओके... काम डाऊन... आय विल नेवर बी लेट. प्रॉमिस.” तो तिच्या नजरेला नजर देत बोलला.

“ही आपली शेवटची भेट आहे. मी तुला पुन्हा भेटणार नाही. इट्स ओवर...” ती म्हणाली.

"काय? पण का?”

“मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही... आणि का करू शकत नाही तेही समजावून सांगू शकत नाही... कृपया समजून घेण्याचा प्रयत्न कर.” कसं तरी तिने हे वाक्य पूर्ण केले.

“भविष्यात मला फोन करण्याचा किंवा मला भेटायचा प्रयत्न करु नको... जाते मी... काळजी घे... बाय.” आणि छोट्या रुमालाने आपले अश्रू पुसत ती घाई घाईत निघून गेली.

त्याला भयानक धक्का बसला. भेटण्यापूर्वी असा काही प्रकार घडेल याची त्याला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती.

क्षणार्धात त्याचे आयुष्य उध्वस्त झालं होतं. त्या दिवसानंतर मात्र ती त्याला पुन्हा भेटली नव्हती. मोबाईल ट्राय न करताच त्याला अंदाज आला होता कि तो स्वीच ऑफ असणार म्हणून, पण प्रयत्न केला नाही असं व्हायला नको म्हणून बर्‍याचदा तोही करून झाला. त्याचा अंदाज खरा ठरला. फोन स्वीच ऑफच होता. त्यानं बर्‍याच अँगलने विचार केला परंतु सर्व व्यर्थ. या ब्रेकअपमागील कारण त्याला अजूनही सापडलं नव्हतं.

“साहेब जेवणाची ऑर्डर देणार का?” त्याची विचारांची साखळी वेटरच्या आवाजाने तुटली.

“अजून नको... त्याच्या आधी कृपया एक बाटली विष आणून दे...” वेटरला धक्काच बसला. त्यात तो जरा वेंधळाही होता आणि भोळा सुद्धा. त्यानं पट्कन मॅनेजरकडे धाव घेतली आणि ग्राहकाने काय ऑर्डर दिली ते सांगितले.

मॅनेजर दाक्षिणात्य हिंदी डब चित्रपट पाहण्यात तल्लीन झालेला होता. स्क्रीनवर चाललेला प्रणय तो अगदी भक्तिभावाने पाहत होता.

"काय झालं भोला?" स्क्रीनवरची नजर जराही विचलित न होऊ देता त्यानं वेटरला विचारलं.

“सर त्याला विष पाहिजे...” भोला झोपडीकडे बोट दाखवत घाबरून म्हणाला. वास्तविक त्याला गिऱ्हाईकाचं आयुष्य वाचवायचं होतं. भोला खरच भोळा पण मनाने चांगला होता.

“भोला मी तुला काय शिकवलंय? ग्राहक आपल्या साठी देव आहे, ग्राहकांचे समाधान हेच आपले समाधान आहे. त्यांची काय ऑर्डर असेल ती पूर्ण कर आणि मला पुन्हा त्रास द्यायला येऊ नको.” एव्हढं बोलून मॅनेजर दक्षिण भारतीय शैलीतील रोमान्सचा आनंद लुटण्यात गुंग झाला.

भोलाने विचित्र दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिथून लगेच तो अदृश्य झाला.

“मग तू काय ठरवलंस?” अब्बासने खुर्चीवर बसत मुद्याला हात घातला.

“माझ्याकडे कोणताही प्लॅन नाही.” तो म्हणाला.

“प्लॅन? कशासाठी?"

“विदाऊट प्लॅन मी तिच्याशी कसे काय लग्न करु शकतो?” त्यानं विचारलं.

"लिसन केअरफुली... इट्स लास्ट वार्निंग... नेहाला विसरून जा.” अब्बासने अचानक आपला आवाज बदलला.

त्यानं त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले.

“पण का?”

“याचा अर्थ असा की नेहा तुझ्यापेक्षा हुशार आहे. तिला समजलं... पण तुला कळलेलं नाही.”

“तिला काय समजलं जे मला समजलं नाही.” त्याचा गोंधळ कमी होत नव्हता.

“शेवटचा प्रश्न... तुझ्यावर कौटुंबिक जबाबदारी आहे का?”

“अर्थातच... आहे.”

“तुझी सगळ्यात लहान बहीण तिसरीला आहे, धाकटा भाऊ... जो इयत्ता नववीत आहे आणि तुझे वृद्ध आईवडील.”

“तुला काय म्हणायचं नक्की?”

“नेहाशी लग्न केले तर काय होईल? तुला कल्पना आहे का मिस्टर समीर अहमद शाह. तुझे कुटुंब अडचणीत येईल. तुझ्या लक्षात येतय का?”

“अब्बाsस !” तो एवढेच बोलू शकला. त्यानं पटकन बियरची बाटली उचलली व तोंडाला लावली.

“कमऑन सामी... मुर्खासारखं वागू नको.”

"काय होईल? आकाश कोसळणार आहे का? बरेच लोक इंटरकास्ट मॅरेज करतात.” त्यानं युक्तिवाद केला.

“समीर... नेहाशी लग्न केलं तर ते केवळ इंटरकास्ट मॅरेज नसेल... त्याला लव्ह जिहाद म्हंटल जाईल. मग तुमचं प्रेम किती खरं आहे त्याच्याशी समाजाला काही घेणं देणं नसेल. राजकारणी त्यावर राजकारण करतील. आपण आणि आपले कुटुंब, नेहाचे कुटुंब संकटात येईल. जातीय दंगली सुद्धा होऊ शकतात. आपण युरोप मध्ये राहत नाही. हे तुमच्यासाठी प्रेम आहे पण तुमच्या कुटुंबासाठी आपत्ती आहे. तू सेलिब्रेटी नाहीस... तू सामान्य आहेस... मी तुला हात जोडून विनंती करतो... तिला विसर.” अब्बास खूप गंभीर दिसत होता. त्याचा एक हात समीरच्या खांद्यावर होता.

“अब्बाsसs s s“ आता मात्र समीर हृदय फाटल्यासारखा कळवळून रडायला लागला. अब्बास सारखा बलवान मनुष्य सुद्धा त्याला थांबवू शकला नाही.

“म्हणूनच प्रेमाला आंधळं म्हणतात रे... या भानगडीत पडण्याच्या आधी तू हजारदा विचार केला पाहिजे होतास. तू रस्त्यावरचा गुंड नाहीस, विकृत नाहीस, तू उच्च शिक्षित तरुण आहेस. तू तिला विसरलं पाहिजेस मित्रा... तुझ्या व नेहाच्या परिवाराच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी... भोsलाss एक चिल्ड बियर प्लीsजs s” अब्बासने मोठ्याने ओरडत ऑर्डर दिली.

---------

इतर रसदार पर्याय