carnel Lamton books and stories free download online pdf in Marathi

भारतीय सर्वेक्षण इतिहासातील सोनेरी पान: कर्नल लॅम्बटन सिद्धेश्वर तुकाराम घुले M.Sc.(Agri.)

२० जानेवारी हा दिवस भारतीय सर्वेक्षण इतिहासातील अधर्व्यू कर्नल लॅम्बटन यांचा स्मृतीदिन! दोनशे पंधरा वर्षांपूर्वी १० एप्रिल १८०२ या रोजी ब्रिटिश कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी भारतीय सर्वेक्षण इतिहासातील साहसी, महत्वाकांक्षी आणि गणितीयदृष्ट्या किचकट सर्वेक्षणाची सुरुवात चेन्नईजवळच्या सेंट थॉमस पर्वतापासून केली. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होण्यासाठी चार दशकांचा प्रदीर्घ कालावधी लागला व हा सर्वेक्षण प्रकल्प हिमालयाच्या पायथ्याशी पूर्ण झाला. कर्नल लॅम्बटन यांनी अत्यंत काळजीपूर्वक सेंट थॉमस पर्वतापासून दक्षिणेस १२ कि.मी. अंतरावर भारतीय द्विपकल्पाच्या मध्यावर अक्षांश व रेखांश नोंदविण्यासाठी आधाररेषा निश्चित केली. साधारणपणे ७८० रेखांशाच्या व्यामोत्तर (दक्षिणोत्तर) भारतीय उपखंडातील २४०० कि.मी. अंतराचा परिसर "ग्रेट इंडियन आर्क ऑफ द मेरिडीयन" म्हणून ओळखला जातो. सर्वेक्षणाच्या या महान व जोखीमपूर्ण मोहिमेत समकालीन युध्दांमध्ये बळी गेलेल्या लोकांप्रमाणेच या मोहिमेमध्येही बळी गेले. त्या कालखंडामध्ये संगणक उपलब्ध नसताही अत्यंत जटिल गणितीय समीकरणांचा वापर करून सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. या मोहिमेचे फलस्वरूप सन १८४३ मध्ये हिमालय पर्वतरांग ही अॅण्डिज पर्वतापेक्षाही उंच असल्याचे सिध्द झाले व जगातील सर्वोच्च शिखर म्हणून माऊंट एव्हरेस्ट या शिखरास मान्यता मिळाली.
कर्नल विल्यम लॅम्बटन यांचा जन्म इ.स. १७५३ मध्ये उत्तर यार्कशायरमधील नॉर्थअलर्टन जवळ क्रासबेग्रेंज येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या पगाराचा अधिक भाग कौटुंबिक खर्च पेलण्याकडे जात असे. आरंभीच्या शैक्षणिक कालावधीत ते एमर्सन या नावाने गणिताचे शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांचे गणितातील प्राविण्य ओळखून डॉ. चार्ल्स हटन या ब्रिटिश गणिती व सर्वेक्षक यांनी त्यांना गणिताचे व सर्वेक्षणाचे प्राथमिक धडे दिले. २८ मार्च १७८१ रोजी, लॅम्बटन यांची नियुक्ती लॉर्ड फॉकनबर्ग यांच्या पायदलामध्ये झाली. त्यानंतर लॅम्बटन यांची सर्वेक्षणातील क्षमता ओळखून अमेरिकेतील स्थलांतरीतांसाठी जमिन मोजणीच्या कामासाठी ३३ व्या ब्रिटीश रेजिमेंटमध्य त्यांची बदली झाली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धामध्ये भाग घेतल्याने त्यांना यॉर्कटाऊन येथे युध्दकैदी म्हणून ठेवण्यात आले. कोनमापक दुर्बिणीतून (Theodolite) काळ्या काचा न वापरता सूर्यग्रहणाचे निरीक्षण केल्याने त्यांच्या डाव्या डोळ्याच्या नेत्रपटलास गंभीर इजा पोहोचली. या घटनेनंतर सर ब्रूक वॉटसन या मित्राच्या मदतीने त्यांनी न्यू ब्रुनस्वीक येथे बराकमास्टर म्हणून नियुक्ती मिळवली. त्या पदावर कार्यरत असताना त्यांना जो मोकळा वेळ मिळाला त्या बद्दल ते म्हणतात, "The foundation of that knowledge, which was one day to bring him to the notice of the world.". यावरून त्यांचा सर्वेक्षणातील ज्ञानाबद्दल असलेला आत्मविश्वास प्रकर्षाने जाणवतो.
नोव्हा स्कॉटिया येथे बराक मास्टर म्हणून कार्यरत असताना त्यांनी गणिताचा सखोल अभ्यास केला. सन १७९५ मध्ये ड्यूक ऑफ यॉर्क यांनी सिव्हील रेजिमेंटमध्ये सामिल होण्याचे आदेश दिले. त्यामुळे तब्बल १३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कर्नल लॅम्बटन कलकत्ता स्थित ३३ व्या ब्रिटीश रेजिमेंटमध्ये दाखल झाले. ही रेजिमेंट सर ऑर्थर वेलस्ली यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. सन १७९६ मध्ये यांना लेफ्टनंट म्हणून पदोन्नती मिळाली आणि ते कर्नल आर्थ यांच्या नेतृत्वाखालील रेजिमेंटमध्ये सामिल झाले. सन १७९९ मध्ये त्यांनी चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धांत भाग घेतला. श्रीरंगपट्टणमला युध्दामध्ये त्यांनी संपूर्ण ब्रिगेडचे नेतृत्व केले व त्यावेळी वरिष्ठ अधिकारी यांची पिछेहाट होताच अत्यंत कुशलतेने लष्करातील डावी फळी सांभाळली. कर्नल लॅम्बटन यांच्या सर्वेक्षणातील ज्ञानामुळे जनरल बेअर्ड यांच्या नेतृत्वाखाली म्हैसूर युध्दामध्ये निघालेल्या युध्द मोहिमेस ता*यांच्या मदतीने योग्य दिशादर्शन केले.
म्हैसूर काबिज केल्यानंतर वेलस्ली यांच्याकडे भूपृष्ठमिती (Geodesy) या नव्या तंत्राचा उपयोग करून सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. यापूर्वी या सर्वेक्षण तंत्राचा वापर विल्यम रॉय यांनी ब्रिटन सर्वेक्षणावेळी केला. त्यांनी मांडलेला प्रस्ताव मेजर जेम्स रॅनेल यांनी अशा प्रकारचे सर्वेक्षण कर्नल कॉलीन मॅकेन्झी यांनी हाती घेतलेने पुन्हा अशा सर्वेक्षणाची आवश्यकता नाही असा शेरा नमूद करून प्रस्ताव नाकारला. रॉबर्ट क्लाईव्ह यांचे नातेवाईक व प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ नेव्हील मेस्केलीन यांनी कर्नल लॅम्टन यांच्या प्रस्तावाचे पुन:परीक्षण केले व त्या प्रस्तावाचे वैज्ञानिक मूल्य जाणून रॅनेल यांची दिशाभूल झाल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे या प्रस्तावास रॅनेल यांचा पाठींबा मिळण्यास मदत झाली आणि सदर सर्वेक्षण प्रस्तावास लॉर्ड क्लाईव्ह यांची मान्यता मिळाली. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जेम्स डिनविड्डी यांचे समवेत काही सर्वेक्षण उपकरणे चीनमध्ये पाठविण्यात आली होती परंतु तिथल्या राज्यकर्त्यांना त्यामध्ये स्वारस्य नसल्याने ती परत पाठविण्यात आली. परतीच्या प्रवासात फोर्ट विल्यम येथे लॅम्बटन यांना सर्वेक्षण साहित्य पाहण्याचायोग आला. त्यामध्ये पाच फूट त्रिज्येची सर्वेक्षण दूर्बिण, रॅम्सडेन साखळी, क्रोनोमीटर इत्यादी साधनांचा समावेश होता. रॅमस्डेन साखळीमध्ये ४० स्टीलचे प्रत्येकी २.५ फुट लांब गज ब्रासच्या कडीने जोडलेले असतात. संपूर्ण साखळी एका सागाच्या पेटीमध्ये योग्यरितीने घडी करून ठेवता येते.
लॅम्बटन यांनी ब्रिटनहून कोनमापक, दूर्बिण (थिओडोलाईट) मागवली व ती भारतात येण्यासाठी सन १८०१ साल उजाडले. बेंगलोर येथे आधाररेषेचे मोजमाप दुर्बिण येण्यापूर्वी पूर्ण केले होते. परंतु ती आधाररेषा त्रिकोणमितीय सर्वेक्षणास जोडलेली नसलेने विचारात घेण्यात आली नाही. १० एप्रिल १८०२ ते २२ मे १८०२ या कालावधीत सुधारीत सर्वेक्षण उपकरणांच्या सहाय्याने मद्रास येथे ७.५ मैल लांबीची आधाररेषा टाकण्यात आली. आधाररेषा मोजताना रॅम्सडेन साखळीच्या सहाय्याने ४०० स्वतंत्र मापे घेण्यात आली. त्यावेळी साखळी २० फुट लांब लाकडी पेटीमध्ये ठेवण्यात आली होती. प्रत्येक पेटीमध्ये तापमानाच्या नोंदीसाठी थर्मामीटर बसविण्यात आले होते. (मोजणीवेळी साखळीचे प्रसरण होते.) या मोजणीवेळी वापरलेल्या साखळीची तुलना थंड पेटीत ठेवलेल्या साखळीबरोबर केली जात होती. याच आधाररेषेने भारतीय सर्वेक्षण इतिहासातील महान त्रिकोणमितीय सर्वेक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या सर्वेक्षणासाठी वापरले जाणारे कोनमापक दुर्बिण यंत्र (थिओडोलाईट) हे उपकरण म्हणजे वस्तुत: उभ्या व आडव्या समांतर वर्तुळाकार चकत्यांवर फिरणारी दुर्बिण होय. या उपकरणामध्ये प्रमाणित वर्तुळाकार कोनमापक चकत्यांवर उंची व क्षितीजसमांतर कोनमापन केले जाते. या उपकरणामधील लंबक, पातळीमापक, सुविधाजनक समायोजन स्क्रू आणि मायक्रोस्कोपीक दुर्बिण यामुळे थिओडोलाईटची अचूकता वाढते. ज्यावेळी लॅम्ब्टन यांनी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले त्यावेळी संपूर्ण जगामध्ये अशापध्दतीची दोन/तीन उपकरणे उपलब्ध होती. विल्यम रॉय यांनी केलेल्या ब्रिटिश सर्वेक्षणावेळी असे उपकरण प्रथमच उपयोगात आणले. या उपकरणाचे उत्पादन विल्यम कॅरी यांनी केले होते. या उपकरणात क्षितिजसमांतर ३६ इंच तर उभ्या १८ इंच व्यासाची चकत्यांवरील मापे मायक्रोस्कोपच्या सहाय्याने घेतली जात होती. या यंत्राचे वजन सर्वसाधारणपणे ५०० किलो होते. त्यास उचलण्यासाठी १२ हून अधिक लोकांची आवश्यक पडत असे. या उपकरणाच्या सहाय्याने लॅम्बटन यांनी मद्रास व बंगळूर आधाररेषेची तुलनात्मक गणना केली असता केवळ अडीच इंचाचा फरक आढळून आला. यावरून या उपकरणाची अचूकता व दर्जा अधोरेखित होतो.
कर्नल लॅम्टन यांनी मद्रास ते कुड्डालूर दरम्यान सप्टेबरच्या अखेरीस त्रिकोणमितीय कामास आधाररेषेवर पूर्वनिश्चित स्थळांवर दक्षिण-पूर्व दिशेवर थिओडोलाईटच्या सहाय्याने कोन मापन केले व लघु याम्योत्तरवृत्त कंस (Short Meridional arc) पूर्ण केला. या कार्यासाठी जवळजवळ एक वर्षाचा कालवधी लागला. यानंतर त्यांनी आपली मोहिम आक्टोबर १९०४ मध्ये पश्चिमेकडील बेंगलोरच्या दिशेने वळवली.
लॅम्बटन यांची मूळ सर्वेक्षण योजना पश्चिमेकडील लहान टेकडयांवरील (दुर्ग) आधारभूत बिंदूचे साखळीच्या सहाय्याने मापे घेण्याची होती परंतु अनपेक्षितपणे अनेक स्थानिक सरदारांनी टेकडयांचे टोकावर प्रवेश नाकारल्याने लॅम्बटन यांना अनेक ठिकाणी उत्तरेकडे आधार साखळीतील त्रिकोणमितीय स्थाने जोडणे भाग पडले. पश्चिमेकडील सर्वेक्षणामध्ये कोणताही अडथळा न आल्याने इतिहासातील सर्वात मोठ्या त्रिकोणमितीय सर्वेक्षणामधील मोजमापे नोदविण्यात आली. या मोहिमेतील निष्कर्षावरून भारतीय द्विपकल्प संकुचित असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. यापूर्वी झालेल्या किनारपट्टीतील सर्वेक्षण व खगोलीशास्त्रीय आधार यावरून मद्रास ते मेंगलोर हे अंतर ४०० मैल निश्चित केले होते परंतु या त्रिकोणमितीस सर्वेक्षणामध्ये तेच अंतर ३६० मैल असल्याचे आढळून आले.
सन १९०५ मध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीस कर्नल लॅम्बटन यांनी मुळ योजनेची म्हणजेच "द ग्रेट आर्क ऑफ मेरिडियन" सुरुवात बेंगलोरपासून केली. या सर्वेक्षणामध्ये उत्तरेकडे सुमारे १०० मैल अंतरावर निजामाचे स्वतंत्र राज्य तर दक्षिणेकडे केप कामारिन (कन्याकुमारी) हे उपखंडीय टोक होते.
सर्वेक्षणामधील पुढील आधाररेषा सन १९०६ मध्ये कोइंबतूरमध्ये मोजण्यात आली. ग्रेट आर्क वर बेंगलोर व कोइंबतूर येथे त्रिकोणमितीय मापे नोंदविण्यात आली. त्यामध्ये प्रत्यक्ष मोजलेल्या अंतरामध्ये केवळ ७.६ इंचाचा फरक आढळला. यावरुन तत्कालीन सर्वेक्षणामधील अचूकतेची कल्पना येते. कोइंबतूर ते कपेकामोरील या आधाररेषेचे काम सन १८०९ मध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले. सन १८१५ पर्यंत कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण द्विपकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले. परंतु सन १८०८ च्या उत्तरार्धामध्ये तंजावर नजिक एक अपघात घडला. बृहदेश्वर मंदिराचे २१७ फुट गोपूरावरून कोनमापन करण्यासाठी अर्धाटन वजनाचा थिओडोलाईट उचलला जात असताना अचानक तुकडा पडल्याने खाली पडला. या अपघाताची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून लॅम्बटन यांनी स्वखर्चाने नवीन थिओडोलाईटची मागणी केली. परंतु नवीन उपकरण येण्यासाठी काही वर्षे थांबावे लागणार होते. ग्रेट आर्क सर्वेक्षणाचेवेळी केलेल्या घटनांच्या नोंदीनुसार लॅम्बटन यांनी सहा आठवडयामध्ये तिरुची येथील कार्यशाळेच्या मदतीने स्वत: दुरुस्तीचे काम पूर्ण केले. दुरुस्त केलेल्या उपकरणामध्ये त्रुटी अपेक्षित होत्या परंतु कोनमापकातील पुनरावलोकन व पुनरावृत्ती करून परीक्षणाअंती त्यातील त्रुटी किरकोळ स्वरूपाच्या आढळून आल्या. त्यामुळे उपकरण पुढील सर्वेक्षणासाठी उपयुक्त ठरले.
कोनमापनातील पुनरावृत्ती व पुनरावलोकन हा ग्रेट आर्क मापनातील अविभाज्य व महत्वाचा भाग समजला जातो. सुरुवातीला हा सन १८०२ मध्ये मद्रास येथे शॉर्ट आर्क मापनावेळी नोंदविणेत आलेले अक्षांश ग्रेट आर्क मापनातील अचूक अक्षांशाप्रमाणे सुधारितपणे नोंदविले. आर्कची लांबी जसजशी वाढत जात होती तसतसे पृथ्वीच्या वक्रीकरण घटक मापदंडाची नव्याने गणना करण्याची आवश्यकता निर्माण होत होती. सर आयझॅक न्यूटन यांनी पृथ्वीच्या ध्रुवीय सकुंचनासंदर्भात निश्चित केलेली १/२३० मूल्यामध्ये सुरुवातीस सन १८१२ मध्ये १/३०४ अशी सुधारणा लॅम्बटन यांनी सन १८१८ मध्ये सुधारीत मूल्य १/३१० असे निश्चित केले.
सन १८१८ मध्ये ले. जॉर्ज एव्हरेस्ट यांची लॅम्बटन यांचे समवेत सर्वेक्षण मोहिमेवर नियुक्ती झाली. त्यांच्या मदतीने निझामाकडून लॅम्बटन यांना हैद्राबाद राज्यात सर्वेक्षणाची परवानगी मिळाली. पुढील सर्वेक्षण मद्रास सरकारच्या अधिपत्याखालील प्रदेशाबाहेर असल्याने ते कलकत्ता स्थित सर्वोच्च ब्रिटीश सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आले. या मोहिमेस अधिकृतपणे शासकीय पातळीवरून "ग्रेट ट्रीगोनोमेट्रीक सर्व्हे (GTS)" नामाभिदान केले.
लॅम्बटन यांनी मध्य भारतामध्ये हैद्राबादपासून नागपूरपर्यंत ७८० दक्षिणोत्तर वृत्तावर सर्वेक्षणाचे काम सुरु ठेवण्याचे नियोजन केले होते. कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील सर्वेक्षणावेळी लॅम्बटन यांना येल्लपुरम या मलेरिया सदृश्य तापाची बाधा झाली. हा आजार पुढील तीन वर्षामध्ये बळावत गेला. परंतु या कालावधीत देखिल त्यांनी वैद्यकीय रजा घेतली नव्हती. वयाच्या सत्तराव्या वर्षी २० जानेवारी १८२३ या दिवशी वर्ध्याजवळ हिंगणघाट येथे त्यांचे संपूर्ण भारतीय द्विपकल्प सर्वेक्षण मोहिमेचे स्वप्न पूर्ण होण्याच्या अगोदर अनपेक्षितरित्या देहांत झाला.
यानंतर एवहरेस्ट यांच्या खांद्यावर लॅम्बटन यांच्याकडील सर्वेक्षण मोहिमेची संपूर्ण धुरा येऊन पडली. त्यांनी "द ग्रेट आर्क" हिमालयन पर्वत रांगामधील मसूरीजवळ बनोग येथे पूर्ण केली. सर्वेक्षणातील नोंदीवरून सन १८५२ मध्ये जगातील सर्वोच्च शिखराची २९००२ फूट (८८४० मी) निश्चित करण्यात आली.
लॅम्बटन यांना त्यांचे सर्वेक्षणातील योगदानाबद्दल ९ जानेवारी १७१७ रोजी रॉयल सोसायटीचे फेलोशीप बहाल करण्यात आली. तसेच ते फ्रेच ॲकेडमी ऑफ सायन्सेस चे मानद सदस्य होते. त्यांच्या सर्वेक्षण कामगिरीच्या सन्मानार्थ निलगिरी पर्वतातील अरुंद रेंज "लॅम्बटन पीकरेंज" म्हणून ओळखले जाते. चेन्नई येथे सेंट थॉमस माऊंट येथे त्यांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलीत करण्यात आला.
आधुनिक संचार सुविधा, संपर्क यंत्रणा व सर्वेक्षण साधने उपलब्ध नसताना देखील मोहिम यशस्वीरित्या पूर्णत्वास नेण्यासाठी कर्नल लॅम्टन यांनी कठोर परीश्रम घेतले व भारतीय उपखंडातील शास्त्रोक्त सर्वेक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या देशातील वैविध्यपूर्ण हवामान, डोंगररांगा, हिमालयासारख्या उत्तुंग पर्वतरांगा, गंगा-सिंधू-ब्रह्मपुत्रा यासारख्या नद्या, दलदलीचा प्रदेश, पूर, संसर्गजन्य आजार यावर मात करून GTS मोहिम कर्नल लॅम्टन आणि जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पूर्ण झाली. आणि भारतीय उपखंडाचा नकाशा अस्तित्वात आला.

इतर रसदार पर्याय