एक चुकलेली वाट - 3 Vrushali द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक चुकलेली वाट - 3

एक चुकलेली वाट

भाग ३

" आह...." ती त्या अंधाऱ्या खोलीतील जुनाट बेडवर परमोच्च आनंद उपभोगत होती. साधारण दहा बाय पंधराच्या आकारातील अंजली लॉज नावाच्या एका जुन्या इमारतीतील ती खोली होती. शहरापासून थोडंसं बाहेर... तो जुना लॉज आपल्या जुनाट खुणा मिरवत उभा होता. बऱ्याच वर्षांपासून साध्या रंगाचाही स्पर्श न झाल्याने भिंतीतून बऱ्याचश्या झाडांनी आपली मूळ रोवली होती. त्यांच्या मुळानी अडवलेल पाणी भिंतीतून झिरपत सगळ्या खोल्यांतून पसरलं होती. त्या ओलसर खोल्यांमधून सोय म्हणून जेमतेम उभ राहता येईल तेवढाच बाथरूम बांधला होता. खाजगीतील अविट गोडीचे क्षण उपभोगत असताना प्रकाशाची कायमच अडचण होते म्हणून पडदे व खिडक्या सदा न कदा बंद असल्याने कधी कधीच त्या खोलीला प्रकाशाचा स्पर्श व्हायचा. बाकी आतील सार वातावरण काहीस प्रकाशविरहित, ओलसर आणि कुबट. पण त्याच्या शरीरातील कणाकणाला स्पर्श करू पाहणाऱ्या तिच्यावर, सुखाच्या लहरींवर स्वार असताना आजुबाजूच्या वातावरणाचा काही परिणाम होत नव्हता किंबहुना तिला त्या वातावरणाची गरजही वाटत नव्हती.... ती बेधुंद होती.... तिच्या मऊ अंगावर उमटणाऱ्या शहाऱ्याच्या तरंगानी मदहोश होत, त्या हव्या हव्याश्या वाटणाऱ्या वेदनेत ती तडफडत होती. तिच्या सर्वांगातून सळसळणाऱ्या विजेला त्याच्या रांगड्या बहुपाशाच कडच आवरू शकत होत.त्याच्या गात्रांतून निर्माण होणारी बेधुंद आवर्तने सावरायचं सामर्थ्य तिच्या घर्मबिंदूनी लखाखून तळपणाऱ्या अनावृत्त देहात होत. शेवटी तो क्षण आला. त्यांच्या अस्फुट श्वासांसोबत त्याच्या शरीरात उफाळणारा धगधगीत लाव्हा तिच्या प्रेमरसात मिसळून शांत झाला. त्याच्या भरभरून प्रेमाने ओथंबून ती शांतपणे त्याच्या हातावर झोपी गेली. प्रेमात सर्वस्व उधळून रित झालेलं मन समाधानाने काठोकाठ भरून गेल्यावर ती तृप्तीची भावना तिच्या अंगाअंगावर पसरली होती. त्याचे डोळे मात्र सताड उघडे होते. त्यात कुठेच तृप्तीचा उल्लेखही नव्हता. उलट हव्यासाने प्रसावलेले त्याचे डोळे कसल्याश्या अभिलाषेने छताची ओल न्याहाळत होते.

" पोलिसांनी तुझंही स्टेटमेंट घेतलं का..?" तिच्या डोक्याला जोराने हलवत त्याने विचारलं. अचानक हालचालीने ती दचकून जागी झाली. क्षण दोन क्षण त्या काळोख्या जागेत आपण नक्‍की कुठे आहोत हे तिच्या लक्षात येईना.

" अं..." तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव तसेच होते. परंतु आता आवेग ओसरल्याने किंवा खोलीतील अपुऱ्या प्रकाशाने त्याला ते नीटसे दिसले नसावे.

" मी काय विचारतोय....पोलिसांनी तुझंही स्टेटमेंट घेतलं का..?" तो गुरकावलाच.

" हो.." त्याच्या अचानक बदललेल्या पवित्र्याने तो गोंधळली.

" तू काय सांगितलं..??" त्याच अस्पष्ट आवाजात ओरडणं चालूच होत.

" मी सांगितलं की मी तर भेटलीच नाही तिला सोमवारी आणि काही कॉन्टॅक्ट पण नाही झाला. मंगळवारी तिला संपर्क करायचा प्रयत्न केला तर फोन बंद येत होता. म्हणून मग तिच्या बहिणीला गाठलं. तीही घाबरलेली होती. सर्वांसमोर बोलायला संकोच वाटतं होता तिला. मग स्टेअरकेसच्या जागी भेटली आणि रडायलाच लागली रे. पण तिलाही हेच सांगितलं होत मी." चेहऱ्यावर निरागस भाव आणत तिने सगळी कथा कथन केली.

" अजुन काही सांगितलं का??" पोलिसांपेक्षा ह्याचेच प्रश्न जास्त. उत्तरावर तिने फक्त मान नकारार्थी डोलावली.

" हेच उत्तर द्यायचं सगळीकडे. वाक्य बदलू नको. उगाच नसता ससेमिरा नको तो पोलिसांचा.." त्याने धमकीवजा सूचना दिली. तिने तो जवळ घेईल ह्या मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहिलं. पण तिच्याकडे लक्ष न देताच त्याने सिगारेट पेटवली.

" पण..." तिचा काहीतरी बोलायचा अस्पष्टसा प्रयत्न.

" आता नको ती रडरड नको लावूस..." सिगारेटचा भकाभक धूर सोडत तो रूमबाहेर निघून गेला. त्याच्या पाठीकडे बघत ती तशीच उदासावाणी त्या जुन्या कळकट पलंगावर बसून होती.
__________

" साला कोणीच काही नीट सांगत नाही...." वैतागत अनिकेतने फाईल टेबलवर आपटली. सकाळपासून रिपोर्ट्स आणि स्टेटमेंट बघून त्याच डोकं भणभणत होत. चेहऱ्यावरून ओघळणारा घाम कसातरी पुसत तो खुर्चीत कोसळला. आधीच दुपारची असह्य गरमी त्यात सरणाऱ्या दिवसानंतर काहीतरी नवीनच धागा मिळायचा.

ठरल्याप्रमाणे मीनाक्षीची जबानी तर झाली. त्यातून फारस काही बाहेर निघाल नाही पण बऱ्याचशा मैत्रिणींची नाव निघाली. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि जबान्या घेऊन शिंदे आणि परबही कंटाळून गेले होते. मित्र मैत्रिणी, परिवार सगळ्यांच्या जवळपास सारख्याच जबानीने अनिकेतही कंटाळला होता. भरीस भर म्हणून एकही म्हणावा तसा पुरावा सापडत नव्हता. आजवर कमीत कमी पाच वेळा त्यांनी ती पहाडी पायदळी घातली असेल.

" ती मीनाक्षी अजुन कोणाचं नाव घेत होती..." मीनाक्षीच्या बोलण्यात वारंवार कोणत्यातरी नावाचा उल्लेख होत होता. नेमक तेच नाव अनिकेतला लक्षात येत नव्हत.

" सारिका " परब ताडकन उत्तरले.

" हं..." सध्या त्यांच्या नजरेच्या टप्प्यातील हीच एक व्यक्ती होती. कदाचित ती तरी काहीतरी सांगेल.

" साहेब, देसाई आहेत लाईनवर " फोन कानापासून दूर पकडतच शिंदे ओरडले. का कोण जाणे शिंदे देसाईंना फार घाबरायचे. त्यांची दहशत फोनवर पण कायम होती. शिंदेंचा चेहरा पाहून अनिकेत नकळत हसला.

" बोला देसाई साहेब " आवाजातील वैताग जाणवणार नाही इतक्या हळू स्वरात अनिकेत बोलला. त्यानंतर मात्र प्रत्येक क्षणानंतर फक्त ' हा '... ' ओके '.... ' हं '.....' ठीक आहे ' एवढंच बोलण्यासोबत त्याचे हवाभावही ही बदलत होते. ' हं....' एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने फोन ठेवला.

" काय झालंय " शिंदेंनी हळूच विचारलं.

" फायनल मेडिकल रिपोर्ट्स आलेत. आपल्या मिळालेली डेडबॉडी ही सोनिया पाटील हीचीच आहे....ह्या रिपोर्ट्सनुसार साधारण सहा दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झालाय. म्हणजे सोमवारी.... त्यानंतर तक्रार गुरुवारी नोंदवली. आपणही गुरुवारी पहाडीवर पोचलो..... आता तिच्या कुटुंबीयांना कळवायला हवं.." शेवटचं वाक्य स्वतःशी पुटपुटत अनिकेत ने तिच्या घराचा नंबर डायल केला.

त्या पुढची रात्र त्या सगळ्यांचे दुःखाने आक्रोश करणारे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर फिरत होते. एका कुटुंबाने आपलं सर्वस्व गमावल होत. आपल्या मुलीचं शेवटचं दर्शनही होऊ नये ह्यापेक्षा कपाळ करंटेपणा तो काय. ' सोनियाबद्दल काही कळल का ' अस प्राण डोळ्यात आणून विचारणारा बाप मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून बर्फासारखा थिजला होता. नवऱ्याच्या बाजूला मूकपणे बसत केवळ डोळ्यांनीच मुलीची खुशाली विचारणारी आई काळीज फाटेल अशी आक्रोशत होती. आपल्या बहिणीच्या काळजीने सैरभैर झालेल्या बहिणी तिच्या मृत्यूची वार्ता ऐकून सुन्न होत्या. आणि.... ज्याच्याशी.. तिची सात जन्मांची गाठ बांधली जाणार होती... त्याच दुःख तर... तो आतल्या आत तुटून गेला होता.... त्याला ना रडता येत होत ना धीर द्यायला जमत होत... एक कुटुंब हा हा म्हणता प्राक्तनाच्या वादळात उन्मळून पडल होत. त्या अभागी कुटुंबाला दिलासा देण्याची हिम्मत अनिकेतमध्ये नव्हती.
_____________

" काय झालंय अनिकेत..." बेडवर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर तळमळनाऱ्या अनिकेतला हलकेच थोपटत अनुराधा ने विचारलं. या आधी अनिकेत ला इतकं अस्वस्थ तिने कधीच पाहिलं नव्हतं.

अनुच्या प्रश्नावर अनिकेत च्या डोळ्यात पाणी तरळल. पोलीस खात्यात राहून अनिकेत कणखर तर बनला होता परंतु त्याच्या मनाचा कोपरा अजूनही हळवाच होता. कधीतरीच तो असा भावनेत भरकटून जाई. तेव्हा अनुराधा हा एकच त्याचा भक्कम आधार होता. मनातील तगमग अश्रुंवाटे दूर करायला त्याला अनुराधाचीच मायेची कुस लागे.

तिने हळूच त्याचे गाल कुरवाळत त्याचा चेहरा आपल्याकडे ओढला. ' बोल ना अनिकेत.." अनिकेतचे पाणीदार डोळे अश्रूंनी डबडबून गेले होते.

" मी पण असच कोणाला तरी गमावल ग...." अनुच्या कुशीत शिरत अनिकेत रडू लागला. अनुही सावकाश त्याच्या डोक्यावर थोपटत होती. हेच तर नात असतं ना... बहुपदरी....

" नको त्या आठवणी आता..." अनुराधा ला फार काही खोलात माहित नव्हतं पण तरीही ती त्याला धीर देत होती. अशाच एका हळव्या क्षणी कधीतरी तो बोलता बोलता बोलून गेला होता. अनिकेतची कोणी मोठी बहीण होती.. त्याने तीच नाव कधीच नाही सांगितलं. दोघांच्या वयामध्ये ही बरच अंतर होत. अनिकेत साधारण नऊ दहा वर्षांचा असेल, अचानक दुपारी त्याची बहीण घरातून गायब झाली. मैत्रिणींसोबत खेळत असेल म्हणून आधी दुर्लक्ष केलं. पण तिन्हीसांजा झाल्या तरी घरी परतली नाही म्हणून मग सगळे घाबरले. घरच्यांनी रात्रभर बरीच शोधाशोध केली पण दुसऱ्या दिवशी मिळाला तो तिचा मृतदेह. त्यानंतरची कित्येक वर्ष त्याने आपल्या कुटुंबाला तडफडताना पाहिलंय. मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न होऊन त्याची आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच. बाबाही त्या आघाताने कधी मानसिक संतुलन गमावून बसले ते कळलंच नाही. एका सामान्य कुटुंबाची कायमची वाताहात लागली. अनिकेतच्या नशिबाने त्याच्या काकांनी त्याला सांभाळलं... बाकी पालनकर्ते असूनही अनिकेत वाढला तो अनाथासारखाच. मायेचं छत्र हरवल की पोरक आयुष्य उभ्या उभ्याच करपून जात... तसच झालं होत त्याच. आयुष्याने धक्के खातानाच कधीतरी अनुराधा भेटली. अगदी नियतीने घडवल्यासारखी ती भेट. पण तिच्या परीस स्पर्शाने त्याच आयुष्य उजळून निघालं. कधी आई तर कधी वडील आणि कधी कधी त्याची बहीण होऊन ती त्याला सांभाळे. त्याच्या बालपणी हिरावून घेतलेल सगळी सुख तो जगनियंता अनुराधाच्या रूपाने त्याच्यावर उधळून टाकत होता.

' किती गोडू दिसतो हा झोपेत...' त्याची झोप तुटू नये म्हणून हलकेच तिने आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले. त्याही गाढ झोपेत त्याला तिचा स्पर्श जाणवला असावा म्हणूनच त्याच्या ओठांवर एक गोडसर स्मित उमटलं.
___________

फोन च्या आवाजाने निशाची तंद्री तुटली. दोन दिवसांपासून तेच तेच सांत्वनाचे फोन घेऊन ती वैतागली होती. खोट्या सांत्वनाच्या नावाखाली लोकांना फक्त चर्चेला विषय मिळाला होता. कोणी येऊन सोनियाच्या वर्तणुकीबद्दल बोले तर कोणी आई वडिलांनी मुलांना कसं धाकात ठेवायला पाहिजे ह्याचे धडे देत असे. ज्यांना सोनियाबद्दल काहीही माहिती नव्हती ते देखील तिच्या माहित नसलेल्या अफेअर बद्दल तासनतास बोलत. काही महाभाग तर निशा आणि तिच्या बहिणीवर लक्ष ठेवण्याची धमकावणी वजा सूचना देऊन गेले. एकूणच मरणानंतर सोनियासोबतच बाकी परिवारदेखील उगाचच बदनाम होत होता. भेटायला येणाऱ्या लोकांच्या नजरेत तर जणू ती स्वतःच गुन्हेगार होती. शेजारी कर्तव्य म्हणूनसुद्धा काही गोष्टी करेनात. त्यांना काय झालं ह्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. शब्दांनी टोचून टोचून रक्तबंबाळ करायला कोणीतरी मिळाल्याचा आसुरी आनंद होता. कसा आहे हा समाज... ना जिवंतपणी नीट जगू देतो ना मेल्यावर तडफडनाऱ्या आत्म्याला शांती मिळू देतो...

असेल अशाच कोणाचा तरी फोन म्हणून तिने दुर्लक्ष केला. अशा वातावरणात तिच्या आवडीची रिंगटोन तिला कर्कश्य वाटत होती..... पण पलीकडे कोणाला तरी फारच घाई होती. जवळपास सतत दहा मिनिटे फोन वर फोन वाजतच होता. त्या कर्कश्य आवाजाला वैतागून शेवटी तिने फोन हातात घेतला. स्क्रीनवर रोहनचा नंबर झळकत होता. ' हा का आता फोन करतोय अजुन..' ती अजून वैतागली. तिला आता ओळखीच्या कोणाशीही बोलायचं नव्हतं. आपल्या मित्र मैत्रिणींकडून तिला अजून मनस्ताप नको होता. पण फोन उचलल्याशिवाय हा थांबणार नाही हे तिला कळून चुकलं.

" हॅलो.." निशाने थोड्या अनिच्छेने फोन उचलला.

" हॅलो, निशा... रोहन बोलतोय... कशी आहेस...." निशा फोन कट करेल की काय ह्याची भीती वाटून रोहनने एका दमात सगळ विचारलं.

" ठीक आहे.." कोरड्या आवाजातच निशा उत्तरली.

" सगळ कळलय आम्हाला... पण... तू.. तू.. काळजी करू नको.... आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत... " रोहन कसंबसं बोलला. अशा वेळी काय बोलतात हे त्याला माहीत नव्हतं.

" हं...." तिला अजून काही बोलायची इच्छा नव्हती. रोहनला देखील सुचत नसावं काही. दोन्ही बाजूला पोकळ निरव शांतता होती फक्त.... पुढाकार कोणीच घेतला नाही... तो कॉल तसाच संपला.
________________

" ओये हिरो....काय करतोय..." पाठीमागून येत अनिताने रोहनच्या पाठीत धपाटा घातला. कॉलेज कट्ट्यावर असूनही निशाच्या काळजीने त्याच मन कशातच लागत नव्हतं. भिरभिरत्या नजरेने तो उगाचच तिला शोधत राही. आताही तिने कॉल कट केल्यानंतरही तो त्याच स्क्रीनकडे वेड्यासारखा पाहत होता. सोनियाच्या मृत्यूनंतर सततच्या पोलिसांच्या फेऱ्यानी कॉलेजचे गुलाबी वातावरण गढुळले होते. सोनियाच्या मैत्रिणीसोबतच निशाच मित्रमंडळ देखील त्यांच्या तपासाच्या फेऱ्यात अडकल होत....

रोहनला उदास बघून अनिता समजून गेली की तो नक्की कशाचा विचार करतोय. ह्या क्षणी तिला निशाचा खूप राग आला. ' काश.. ही मुलगी आयुष्यात आलीच नसती..' तिच्यासाठी हीच वेळ होती रोहनला निशाच्या विचारांमधुन बाहेर काढायची. " मला माहितेय रोहन तू कशाचा विचार करतोयस..... बस करं ना आता. त्या पोरीला जराही पडलेली नाही तुझी.. आणि तू मात्र... "

" अरे... परिस्थिती बघ ना जरा... तिच्या बहिणीचा खून झालाय... काय दुःख असेल त्या कुटुंबाचं.... अशा वेळी तिला धीर द्यायला हवा. त्यात कुठे पर्सनल इश्यूजमध्ये घेतेस... "

" रोहन प्लीज... मला काही ऐकायचं नाहीये... पण आता त्या निशाशी बोलणं म्हणजे पोलिसांच्या नसत्या चौकश्या मागे लावून घेणं... मला नकोय ते... " अनिता तडतडली.

" काहीही काय बोलते अनु... तिच्याशी बोललो म्हणून पोलीस चौकशी करणार का.... काहीतरी तुझं.."

" तरीही.... तू दूर राहा तिच्यापासून.." रागाने अनिताच्या अंगाची लाही लाही होत होती.

" अग पण.... " रोहनला काहीतरी बोलायचं होत.

" जर पुन्हा तिच्याशी बोललास तर मग आपली मैत्री संपली समज..तूच ठरव तुला कोण पाहिजे..." त्याला बोलायलाही न देता अनिता रागाने निघून गेली.

रोहन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तसाच उभा होता. सूर्य एव्हाना मावळतीकडे झुकत होता.
____________________

सभोवती दूर दूर पर्यंत धुक्याचा पांढरट पडदा पसरला होता. सकाळची खट्याळ कोवळी किरणं धुक्याचा पडदा फाडून ओलसर थंडगार स्पर्श करत होती. फांद्याफांद्यातून पाखराची खळखळ चालली होती. छोट्या छोट्या पिल्लांना लवकर यायचं प्रॉमिस करत काही पक्षी चारापाण्याच्या शोधात घरट्यातून उडालेले होते. ज्यांना उशीर झाला होता त्यांची घाईने फडफड चालू होती. अनिकेत आज जरा लवकरच घरून निघाला होता. सकाळीच काहीतरी विचार डोक्यात आल्याने त्याला तत्काळ त्यावर अंमलबजावणी करायची होती.

" परब एक चहा सांगा हो..." पोलीस स्टेशनमध्ये पाऊल टाकताच अनिकेतने चहाची ऑर्डर सोडली. आपल्या जाग्यावर बसायच्या आधीच घाईने त्याने ड्रॉवरमधून फाईल काढून टेबलवर मांडल्या.

एव्हाना शिंदे लगबगीने त्याच्या टेबलाजवळ एक फाईल घेऊन आले. " हे बघा साहेब." शिंदेंनी काही पेपर अनिकेतच्या हातात दिले. काहीतरी महत्त्वाचं असल की शिंदे असच करत. त्यांच्या उत्साहाला नुसत उधाण आलेलं असे. अनिकेतने बाकीची काम बघायचं सोडून आधी ते पेपर चाळले.

पेपरवर नजर फिरवत असताना त्यांचे चेहऱ्यावरचे भावही भराभर बदलत होते. " वाह शिंदे.." काहीतरी खजिना मिळाल्याच्या आनंदात अनिकेत चित्कारला.

क्रमशः