शेतकरी माझा भोळा - 4 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेतकरी माझा भोळा - 4

४)शेतकरी माझा भोळा!
आबासाहेब दोन तीन दिसात मुंबईहून माघारी आले. त्येंच आमदारकीच तिकीट पक्क झाल व्हतं. त्ये शेहरात ऊतरल्याबरूबर त्येंच्या चमच्यांनी क्यानालचा सम्दा परकार त्याच्या कानी घातला. तव्हा आबासाहेब म्हन्ले,
"आस हाय काय? फातो काय करायचे ते."
गावात आल्याबरूबर त्येनी गणपत आन ज्येंचा पैका मिळाला नव्हता त्या समद्याना बलीवल. ज्ये गडबड करण्याजोगे व्हते. त्येंना पैले बलीवलं आन् त्येंचा पैका दिवून त्येंची त्वांड बंद केले... सर्कारनं मोर्च्च्यावाल्यायचा म्होरक्या फोडल्यावाणी! आस्ते आस्ते सम्दे लोक जमा झाले तव्हा सरपंच बाहेर आले. मिशीवर ताव देत म्हन्ले,
"गाववालेहो, मला आमदारकीच तिकीट देणार हायेत. आमदार व्हयाच म्हंजी लै पैका लागणार हाय. तव्हा समद्याना हात जोडून येकच सांगतो ज्येंच्या जिमिनी गेल्या हाईत त्येंचा पैका माझ्याजवळ हाय. कावून देला न्हाई तं मला आमदार व्हयाच व्हतं. म्हंजे ले पैका खर्ची जाणार हाय. तव्हा म्हण्ल ह्यो पैका आपून निवडणुकीसाठी वाफराव, आमदार झाल्यावर प्रत्येकाचा पैका म्या चुक्ता कर्णारच हावो. तुमी ऊगाच सायेबाला सांगलं..."
"पर सरपंच..."
"सांगलं तं सांगल. तुमचा पैका म्या व्याजासगट दिणार हाय. दुसरं आस की, तुम्हाला आताच पैका देला असता तर त्यो तुम्ही चैनीत उडवला असता. म्हणून येकर, दोन येक्कर जिमीनच ईकत घिवून देणार व्हतो. गणपतच्या पोरीचं लगीन लै धुमधडाक्यात लावणार हाय. तव्हा घाबरू नगा सम्द्यांचा पैका बैंकत हाय अस्स समजा. तव्हा येक बार मला आमदार करा. आठ -धा दिसात क्यानालला पाणी बी येणार हाय आन् उद्घाटनाला मंत्री बी येणार हाईत." सरपंचानं एक बार समद्यांना हात जोडले आन् ते घरात गेले.
"फायलत, सरपंच लै चांगला हाय. तुमाला चैनच पडत न्हाई. उगाच सम्दीकडं त्येंची बदनामी केली."
"ठाव हाय रे चमच्या. या गावच्याच बोरी आन बाभळी भी! उस्टा भडवीचा. तुही जिमीन गेली आस्ती आन् तुला सरपंचाना धोका देला आस्ता म्हणजे मंग समजल आस्त..."
"तुह्या मायला मी! कोन्ला भडव्या म्हण्लास रे भडवीच्या ?"
"मला मायवर शिवी घालतूस हरामी. आबासायबाच चमचा हाय. शेळपट सालं! बायको निजवते मालकाजवळ आन् सोत्ता रखवाली..."
"का..काय म्हण्लास? मह्या बायकुला कायबाय म्हण्तोस? आर, तुही बायकू काय सती सावेतरी हाय का रं..."
"थांब रं. दावतोच तुला..." आसं म्हण्ता म्हण्ता दोघांनी येकमेकावर हातातल्या कुऱ्हाडी उगारल्या. बाकीच्यांनी दोगायलाबी आडवल्यामुळं म्होरला अनर्थ टळला... खिन मनानं गणपत घराकडं निघाला. सरपंचानं फसवल आस येक मन म्हणत व्हतं तर दुसरं मन सरपंचाचं बरूबर हाय आसंच म्हणत व्हतं. काय करावं आन् काय न्हाई आशा येगळ्याच स्थितीत गणपत परी पोचला.
"काय झालं व्हो? कहाला बलीवल व्हतं?" यसोदानं इच्चारलं.
"यस्वदे, आबासायेबान पैका पैलेच उचलला हाय."
"काय म्हन्ता? त्या मेल्याने लुबाडलंच ना? काळं त्वांड घिऊन ह्येच सांगाया आलासा काय? त्येचा मुडदा पाडून कावून आला न्हाईत? मडं जावो मेल्याचं..."
"आग यस्वदे, आस्सा आक्रोस्ताळपणा कामाचा न्हाई. त्यो लै मोठ्ठा माणूस हाय. आपूण येकलेच हावोत का? लै लोकास्नी फसविल हाय त्येंनी."
"पर त्येना लगीनाची पोरगी नसाल ना?"
"आग आबासाब देत्यो म्हणून बोललेत.."
"कव्हा? मझ्या तेरश्याला का नाताच्या बारशाला?"
"दम धर थोडुसा. आत्ताच कोठ दारात सकीची वरात यिवून बसलीया. निघल काय तरी रस्ता...'" म्हंता म्हता बिडी शिलगावून गणपत बाहीर पडला....
व्हता व्हता म्हैना लोटला पर आबासायेबानं गणपतला कवडी बी देली न्हाई. मांजराने उंद्राला खेळवावं तस त्यो त्येला वाटला लावायचा. तिकडं क्यानालाचं काम बी झालं. घोडं कोठ पाणी पेलं की पर निवडणुका बी लांबल्या. क्यानालचं उद्घाटन कराया मंत्री येणार आस सीतापूरात बोल्ल्या जात व्हत. त्या सांच्या पारी गणपत आन् बरेच लोक मारोतीच्या पाराम्होरं जमले व्हते.
"कार तुमचा पैका सरपंचान देला की न्हाई?"
"देईल रे..."
"बसा रं हात चोळीत. त्यो तिकड तुमच्या पैक्यावर मजा मारतो आन् तुमाला भिकेला लावतो."
"आर आस कर्ता का?"
"कसं रे?"
"उद्घाटनाला मंतरी येणार हाय, तव्हा त्येच्या कानावर घाला..."
"म्हंजी बाबा बी गेला आन दसम्या बी गेल्या..."
"त्ये कस?"
"आर त्यो मंतरी का संतरी काय करणार हाय? त्येलाच सरपंचाची गरज हाय. महिन्या-दीड महिन्यात निवडणुका हाता. त्याला त्येच्या कुरसीची काळजी आसणार का न्हाई? त्येला दुस-यांदा मंत्री व्हयाचं आसल की.''
"आपून कहापायी सरपंचासी टक्कर घेवाव? हातरुण फावूनच पाय पसरावं. ऊगाच कोल्ह्यानं उंटाच्या ढुंगणाचा मुका घेयाच्या फंदात पडू न्हाई."
"बसा मंग वाट फात."
आखरीला उद्घाटनाचा दिस बी ऊजाडला. पर गणपतला पैका मिळाला न्हाई. त्या दिसी सीतापूरला जणू जत्रा व्हती. गावोगावचे लोक आले व्हते. समद्यांची जेवायची येवस्था आबासाबाने केली व्हती. सीतापूरला चूल बंद आवताण व्हतं. मंत्री येण्याची येळ झाली तशी सबेच्या जागी ह्ये तोब्बा गरदी झाली. भर उन्हाची येळ व्हती. सरपंचानं केलेल्या तिख्या आन् मिट्या जेवणावर सम्द्यांनी ताव मारला आन् हा.. हा .. हुस्स करीत, ढेकरा देत सम्दे सबेकडे येत व्हते.
"ह्यो मंत्री आजूक कसा आला न्हाई?"
"आर, येड्या टैमावर यील त्यो मंतरी कसा? मंतरी येणार म्हंजी चार-दोन घटे ऊशीर ह्यो पक्का !"
"आबाबा! लै गरदी हाय की."
"मंग आपला सरपंच म्हंजी काय कमी हाय र? आन् आज तर मंतरी येणार हाय."
"फा तर. गावोगावचे चेअरमन काय, सरपंच काय? आन् जिल्यातले समदे नेते काय, समदे जमा केलेत आबासायबानं."
"आरं... आर बगा तर पाच-सात कारी येयाल्यात.''
"आला... आला रे, मंतरी आला रे."
लाल दियाच्या कारीमदून मंतरी ऊतरले. बगळ्यावानी पांडरे फाक् कापड घातलेले लोक बी उतरले. ढेरी म्होरं समदं शरीर झाकून जात व्हतं. तेवढ्या मोठ्या ढेरीमुळ चालता बी येत न्हवत जणू आवगड जागी खांडुक झालं व्हतं. गोल गरगरीत मंतरी कसा तरी तोल सांबाळत स्टेजपस्तोर पोचला. तेथं त्येंना हात देवून आधार द्येयाला समदे फुड झाले पर चानस हाणला आबासायेबानं. त्येनी मंतऱ्याच्या हाताला धरुन कुर्सीपस्तोर नेल. मंतऱ्याला कुर्सीवर बसून सोत्ता त्येच्या बाजुच्या कुर्सी वर सरपंच बसले. येकदाचा कारेकरम सुरु झाला. आबा सायेबानं समध्यायला शाली आनी नारळ देले. त्यातून सरपंच आन् चेअरमन बी सुटले न्हाईत. त्यापायी येक झाल, आबासाहेबांची आमदारकी पक्की झाली.
मंतऱ्यानं लई मोठ्ठ भासण केलं न्हाई. ते म्हन्ले, "आपूण समदे जमले. मला लई आनंद झाला. ह्यो क्यानाल मी सीतापूर आणि परिसरातल्या समद्या गावायसाठी खुल्ला कर्तो, उंद्याच क्यानालला पाणी सुटणार हाय, समद्यांनी या पाण्यातून केळी आन् ऊसाचं पीक घेताना सोत्ताची, सीतापूरची आन देसाचीबी गरिबी दूर करावी. आपला जिल्ला लई मागासलेला हाय, त्येला फूड आणण्यासाठी आबासायेबान क्यानालचा घाट घातला. आबासाहेबाच्या रुपानं या भागाला येक चांगला पुढारी मिळाला हाय. मी आणिक येक सांगतो.... येत्या आमदारकीच्या निवडणुकीत आबासायेबाला तिकीट देलच म्हून समजा. लई बोलायचं व्हतं पर..."
"बोलाय येयाला तं फायजेत..." सबेला आलेला येक माणूस दुसऱ्याच्या कानात म्हण्ला.
"आणिक येक सांगतो, तुमी आत्ता ऊस लावा. त्येच्यासाठी या भागात येक कारखाना म्या आन आबासायेबानं ऊबारायचं ठरवलं हाय. तव्हा बाजुच्या कारखान्याहून समद्यान बेणं आणावं आन् ऊस लावाय हायगय करु न्हाई..."
त्याच कारेकरमात ज्यांच्या जिमिनी क्यानालात गेल्या त्यांना येक मोटार आन् पाईप मंत्र्यायच्या हातानं देले. गणपतलाबी मोटार आन् पाईप मंत्र्यायच्या हातानं मिळाले. त्ये घिवून त्यो घराकडं निघाला. शेतकऱ्यायनं येळ दवडला न्हाई. दुसऱ्याच दिशी समद्यांनी आपापल्या वावरात पाईप पसरुन क्यानालवर मोटारी बसविल्या. आत्ता पाणी आन् पाण्याच्या फिकरीत समदे व्हते. कैक लोकायनं आपापल्या सोयऱ्याकडं गाड्या-बयलं धाडून बेणं आणलं. गणपतनबी पाईपलाईन केली आन क्यानालच्या वरल्या आंगाला मोटार बसवली. दुसऱ्या दिशी क्यानालला पाणी बी सुटलं. क्यानालात देव आल्यावानी सम्दे तिकडं पळाले. त्यांच्या मांघ-मांघ बायका बी कुक्कू-हाळद घिवून गेल्या. यस्वदानं क्यानालची पुंजा केली. गणपत मोटारीचा खटका दाबला आन् दुसऱ्या मिन्टाला पाईपातून पाणी धो-धो वाहाय लागलं. गणपतनं बेण्याची शोधाशोध सुरु केली...
०००नागेश शेवाळकर