Tarevarchi ksrt - 1 books and stories free download online pdf in Marathi

तारेवरची कसरत - १

तारेवरची कसरत – १

(वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा व कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा)

(अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.)



आज रोहिणीला जाऊन पंधरा दिवस झाले. दशक्रियाविधी मी शास्त्राप्रमाणे पूर्ण केले. ती इतक्या लवकर मला सोडून जाईल असे मला कधीच वाटलं नव्हतं, त्याला कारणही तसंच होतं. तिला कधीच कसलाच आजार नव्हता, साधी बीपीची गोळी सुद्धा तिला कधी लागली नाही. पण जिन्यावरून पडायचे निमित्त झालं आणि दोनच दिवसात ती मला सोडून या जगातून निघून गेली. आमच्या संसाराचा डाव अर्धवट सोडून जाताना रोहिणी माझ्या आयुष्यात एक खूप मोठी पोकळी निर्माण करून गेली. माझ्या आयुष्यातील तिची जागा भरून काढणं आता शक्य नाही. तिच्या आठवणीत रमून आता उरलेले दिवस व्यतीत करण्याचा माझा मानस आहे.

पण चालायचेच! जन्म आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे हे सत्य मला नाकारता येणार नाही. जन्म-मृत्यूचा हा खेळ असाच निरंतर चालू आहे आणि मला तो स्वीकारायलाच हवा.

म्हणूनच आता मी पुन्हा धीर एकवटून घर आवरायला घेतलं आहे, आज मी घरात एकटाच आहे. म्हणूनच थोडा निवांत वेळ आहे. पहिले काम म्हणजे रोहिणीचा फोटो बाहेरच्या खोलीत दृश्य भागात लावायचा असे ठरवले. तिचा फोटो आईच्या फोटो शेजारीच लावायचा असा माझा विचार होता, कारण त्या दोघींचे माझ्यावरचे प्रेम वादातीत होते. कदाचित थोडे जास्तच होते, त्यामुळे माझ्यावर हक्क गाजवायला दोघीही कुठेच कमी पडायच्या नाहीत. त्यामुळेच रोहिणीच्या फोटोला, आईच्या फोटो शेजारीच ठेवावे हा माझा ठाम निर्णय होता.

म्हणूनच मी आईच्या फोटो शेजारी खिळा ठोकायला स्टूल घेऊन चढू लागलो तेवढ्यात मा‍झ्या पाठीवरून कोणीतरी हात फिरवल्याचे मला जाणवले. मी मागे वळून बघितले तर कोणीच नव्हते. पुढच्याच क्षणी मा‍झ्या कानावर ध्वनी उमटू लागला. तो आवाज कुठून येत होता हे माहिती नसले तरी तो आवाज खूपच स्पष्ट होता, आणि महत्त्वाचे म्हणजे ओळखीचा होता. तो आवाज आईचा होता!

होय, आईचाच होता!!

मला अगदी स्पष्ट ऐकू येत होते.

“बबड्या काय करतो आहेस हे? तिची लायकी तरी आहे का मा‍झ्या फोटो जवळ उभ रहायची? जिवंत असताना तुम्ही काही किंमत दिली नाही आणि आता मेल्यावर असे अपमान? चालायचंच, आपलंच नशीब फुटकं म्हणायचं.”

मुळातच आईचा आवाज इतक्या दिवसानंतर ऐकणे माझ्यासाठी धक्का होता, आणि त्यातही ती नाराज आहे हे मला सहनच झालं नाही. मी धक्क्यातून सावरण्यासाठी स्टुलावरून खाली उतरलो, तोच मा‍झ्या कानात परत एकदा ध्वनी उमटला.

“माझंच मेलीचं नशीब फुटकं. जिवंत होत्या तो पर्यंत इथे बस, तिथे नको.... नुसतं नको नको करून सोडलं होतं आयुष्य माझं.

म्हणलं मेल्यावर तरी सुटका मिळेल पण कसलं काय? मेल्यावरही मा‍झ्या नशीबात सासुरवासच आहे म्हणायचा.

आणि बबड्या काय? नेहमीप्रमाणे आईचंच ऐकणार. ‘गायीचं बछडं’ आहे न ते.”

हा आवाजही मा‍झ्या ओळखीचा होता. हा आवाज रोहिणीचा होता. त्या दोघींचे आवाज ऐकून मला काय होते आहे हे काही सुधारत नव्हते.

“एक सांगून ठेवते, जिवंत होते तो पर्यंत सगळं निमुटपणे सहन केलं मी. पण आता ऐकून नाही घेणार बरका मी. माझा फोटो खिडकी समोर लावा. मलाही आईंच्या जवळ बसायची मुळीच इच्छा नाही. निदान दिवसातून दोनचार वेळा बाहेर तरी डोकावता येईल...” – रोहिणी

खरं तर रोहिणीचा हा पर्याय एकदम उत्तम होत. दोघींची सोय होणार होती. म्हणूनच मी स्टूल खिडकी समोरच्या भिंतीकडे हलवलं. तोच आईचा आवाज परत बोलू लागला.

“शेवटी, टोणग्यानं म्हशीचं ऐकलं म्हणायचं. चला, कसं का होईना आपली सुटका झाली...” – आई तिच्या खास टोमणा मारायच्या शैलीत बोलली, असा टोमणा ऐकून रोहिणीही शांत बसणार नव्हती.

आणि मला अपेक्षित तेच झाले. दोघीही परत एकदा कचाकचा भांडू लागल्या. मला दोघींचे आवाज सहन होत नव्हते म्हणून मी दोन्ही हात कानावर दाबून कान बंद करून घेतले, आणि धावतच आतल्या खोलीत आलो. रोहिणी आणि आईचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता, क्षणभर माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता.

मग वाटू लागले, कदाचित आपल्याला रोहिणी गेल्याचे दुःख पचवता न आल्यामुळे आपल्या मनावर प्रचंड मोठा आघात झाला आहे आणि त्यामुळेच आपल्याला हे असे भास होत आहेत. आपली मनस्थिती बिघडत चालली आहे. गेले काही दिवस आपल्याला शांत झोप नाही, स्वभावातील चिडचिडही थोडी वाढलीच आहे. आता, हे भास कदाचित इथेच थांबणार नाही, आपण तिच्या विरहाने कदाचित ठार वेडे होणार. माझं मन त्या विचाराने बेभान झालं होतं. ते तर पुढच्या क्षणार्धातच मी वेडा होणार या निष्कर्षाप्रत येऊन पोचलं सुद्धा होतं. तोच अचानक वारा वाहू लागला आणि बाहेरच्या खोलीची खिडकी फडफड करू लागली. त्यामुळं मी भानावर आलो आणि उठून खिडकी बंद करायला गेलो.

"फालतुचे विचार करू नका. आमचे आवाज खरंच तुम्हाला ऐकू येत आहेत. तुम्हाला वेड वैगेरे लागलेलं नाहीये." - परत एकदा रोहिणीच्या आवाज ऐकू आला, अगदी तिच्या नेहमीच्या बोलण्याच्या शैलीत.

"माझ्या पोराला वेडं लावलं रे य पोरी न... आता मी काय करू........ " रोहिणीचे ते शब्द ऐकून आवणे तर हंबरडाच फोडला. त्यावर रोहिणी शांत बसणार नाही हे मला समजलं आणि तसंच घडलं. पुढील क्षणार्धात दोघी परत एकदा भांडू लागल्या आणि माझे दुर्देव की मला त्यांच भांडण निमूटपणे ऐकावं लागलं.

"एक मिनिट.... मी वेडा झालेलो नाहीये!!!!" मी कानावर हात ठेवून किंचाळलो. नशीब तेव्हा घरी कोणी नव्हतं नाहीतर समोरच्याला खरंच वाटलं असतं की मला वेड लागले म्हणून.

खरं तर मला काहीच सुधारत नव्हतं. तेव्हा मला एक युक्ती सुचली. मी खिशातून मोबाईल काढला, घरातील हेडफोन शोधले आणि ते कानात अडकवून मोठ्याने गाणी सुरू केली. आता मला दोघींचे आवाज अजिबात ऐकू येत नव्हते. त्यामुळं हळू हळू माझं मन शांत झालं. आता पुढची दहा मिनिटं मी काहीच हालचाल न करता, कानात हेडफोन अडकवून गाणी ऐकत बसलो. मध्ये एकदा मी हेडफोन काढायचा प्रयत्न केला पण लगेच रोहिणी माझ्याशी परत एकदा बोलू लागली आणि घाबरून मी परत एकदा हेडफोन कानात घुसवले. नक्की काय होत आहे याचा शोध कसा घ्यावा याचा विचार करत असताना मला असे समजले की घरात असताना आपल्याला आता गाणी ऐकण्याशिवाय काही पर्याय नाही.

‘मला नक्की काय होत आहे’ आणि ‘मला आई आणि रोहिणीचे आवाज का ऐकू येत आहेत?’ हे माझ्यापुढचं सर्वात मोठं कोडं होतं. खरं तर मला हे कोडं उलगडण्यासाठी शांत विचार करायची गरज होती, आणि शांत विचार करण्यासाठी मला एकांत हवा होता. कानात हेडफोन घालून गाणी ऐकली की दोघींचे आवाज ऐकू येत नव्हते पण असे केल्याने एकांतही मिळत नव्हता आणि विचार करायला लागणारी शांतताही लाभत नव्हती. म्हणूनच साधारण आणखी दहा मिनिटांनी मी पुन्हा एकदा धीर एकवटला आणि कानातील हेडफोनचा आवाज बंद केला. घरात पुन्हा एकदा शांतता होती. काही क्षण असेच शांत बसून घालवले. कुणाचाच आवाज न आल्यामुळं आता हेडफोन काढायला काहीच हरकत नाही या निष्कर्षापर्यंत माझं मन पोचलं, आणि घाबरत घाबरतच मी हेडफोन काढले. अजूनही कुणाचा आवाज आला नाही. म्हणून मी आनंदित झालो आणि जागेवरून उठलो. कदाचित मगाशी आपल्याला भास झाला असेल या कल्पनेने मी उठून घरात चक्कर मारायचे ठरवले, काळजीसाठी हेडफोन आणि मोबाइल सोबतच घेतले, म्हणजे जर आवाज ऐकू आला तर लगेचच हेडफोन कानात लटकवून गाणी ऐकता येणार होती. पुन्हा एकदा धीर एकवटून मी एक एक पाऊल पुढे टाकायला सुरवात केली. माझ्याच घरात मी चोर पावलांनी चालत होतो. पावलांचा सुद्धा आवाज होणार नाही अशी काळजी घेत होतो. खोलीच्या दारापाशी पोचताच मी आधी केवळ डोकं बाहेर काढून पाहिलं. सगळं घर सुमसान होतं. कुणाचा आवाज नव्हता, वाराही पूर्ण थांबला असल्यानं घरात भलतीच शांतता पसरली होती. एकीकडे आई आणि रोहिणीचे आवाज ऐकू येण्याचं बंद झाल्याचं समाधान होतं तर त्याचवेळी ती शांतता मला एकटेपणाची जाणीवही करून देऊ लागली. एकटेपणाच्या विचाराने आणि घरातील आवाज ऐकू येण्याच्या अनुभवाने मी मनातून पुरता घाबरलो होतो. आपल्याच घरात घाबरून वावरण्याची ही माझी पहिलीच खेप होती. तरीही मी सर्व विचार हेतुपुरस्सर बंद केले आणि आधीच बाहेर काढलेल्या डोक्या बरोबर आणखी एक पाय बाहेर काढला. काही क्षण परत एकदा वाट बघीतली, आवाज आणि कसलीच हालचाल न झाल्याने थोडं हायसं वाटलं आणि बिचकत बिचकत मी दुसराही पाय बाहेर टाकून सावधपणे उभा राहिलो. अजूनही आवाज आला नाही, म्हणून मी आता एक एक पाऊल अलगदपणे पुढं टाकत सावधपणे घरभर फिरलो, प्रत्येक खोलीत आधी डोकावून बघायचो आणि आवाज येत नाही याची खात्री करून पुढच्या खोलीत जायचो, दोन्ही बेडरूम आणि किचनमध्ये तपासून झाल्यावर शेवटी मी हॉलमध्ये आलो. तिथंही मी सुरवातीला बिचकत बिचकत फिरलो. पण आता आवाज ऐकू येत नाहीत अशी मनाची खात्री झाल्यावर, आरामात बसण्यासाठी सोफ्यावर टेकलो तोच -



"मी इथंच आहे... बरं का बबड्या. अजिबात घाबरू नकोस." - हा आईचा आश्वासक आवाज

आणि

"मी सुद्धा तुम्हाला सोडून कुठ्ठ कुठ्ठ... जाणार नाही.." - हा रोहिणीच्या लाडिक हट्टाचा आवाज एकाच वेळी कानात घुमले आणि मी जागेवरच दोन फूट हवेत उडालो. त्याचवेळी माझे हेडफोन आणि मोबाईल हातातून खाली पडले आणि मी दोन्ही कानावर हात ठेवून घरभर सैरभैर धावत सुटलो..... त्या दोघी मला अजूनही समजवायचा प्रयत्न करत होत्या पण मी पूर्ण घाबरलो होतो... मला केवळ शांतता हवी होती... ती मिळवण्यासाठी माझ्याच घरात धडपडत होतो.... शेवटी काहीच न सुचल्याने, मी तडक बाथरूमचं दार उघडलं आणि आत जाऊन कडी लावली. सावधपणे कानावरचे हात बाजूला केले. इथे मला एकांत मिळेल अशी माझी खात्री होती. तिथे मिळालेल्या शांततेमुळे मला समोरचं कमोड सुद्धा आरामखुर्चीप्रमाणे भासू लागलं आणि मी शांतपणे विचार करण्यासाठी कमोडवर बसलो.

"बबड्या, अगदी लहानपणची आठवण करून दिलीस बघ तू आज..." - हे आईचे वाक्य परत एकदा कानावर पडले... आणि

"इश्श!!!" - असा आवाज काढून, रोहिणी मनमोकळेपणाने हसू लागल्याचे आवाज माझ्या कानावर पडू लागले. क्षणार्धातच माझी शांतता पुन्हा एकदा हरवली होती. मी कानावर हात ठेवले आणि धावतच बाहेर पडलो आणि घरच्या दरवाजाजवळ पोचलो. चपला घातल्या... आणि बाहेर पडण्यासाठी दाराची कडी उघडायचा प्रयत्न करू लागलो.

"अरे बबड्या, माझं ऐक जरा...." - असे आई समजावत होती. तर रोहिणी नुसते हसतच होती. माझा राग अनावर होत होता आणि दरवाजाची कडी मात्र उघडत नव्हती. मी कितीही जोर लावला तरी ती हलतच नव्हती. शेवटी मी कानावरचे हात काढले आणि दोघींवर ओरडलोच...

"मला खाली जायचे आहे... आई मला अडवू नकोस. आणि रोहिणी तुझं खिदळणं आधी बंद कर."

माझ्या ओरडण्याचा चांगलाच परिणाम झाला. आई एकदम शांत बसली. पण रोहिणी मात्र आपले हसू अवरायचा अयशस्वी प्रयत्न करत होती, तिचं हसणं मला अजूनही ऐकू येत होतं. मी दाराची कडी इघडणार इतक्यात रोहिणी जोरात हसु लागली.

"शांत बस..." - मी परत रागाने म्हणालो. यांचा मात्र उलट परिणाम झाला आणि ती अधिक हसू लागली.

"नाही..... मी शांत बसते.. तुम्ही बाहेरही जा..... पण जायच्या आधी मगाशी बाथरूम मध्ये उतरवलेली पॅन्ट तेवढी परत घाला.." - हे वाक्य ती कसे बसे हसू आवरत म्हणाली. मी तिच्या वाक्याने भानावर आलो आणि एकवार खाली नजर फिरवली तेव्हा तिच्या बोलण्यात तथ्य आहे हे मला समजले आणि मी परत एकदा धावतच बाथरूम गाठले. आता मात्र रोहिणीने तिचे हसू आवरण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही.



या वेळी मी व्यवस्थित तयार होऊन बाहेर पडलो, दार उघडले आणि जिना उतरू लागलो. जिना उतरताना घरात नक्की काय घडतंय याचाच विचार माझ्या मनात सुरू होता. आई आणि रोहिणी दोघींचे आवाज ऐकल्यामुळे त्यांच्या आठवणी उफाळून येऊ लागल्या होत्या. इतक्यात खाली ढोलकी वाजवल्याचा आवाज येऊ लागला. मी ही आकर्षीत होऊन ढोलकीच्या आवाजाकडे चालू लागलो. तारेवरच्या कसरतीची तयारी एक डोंबारी कुटुंब करत होते. खेळ सुरू करण्याआधी ढोलकी वाजवून सगळ्यांना निमंत्रण देत होते. मी ही गर्दीत मिसळून गेलो. त्या गर्दीत आणि त्या ढोलकीच्या नादातच मला माझी शांतता मिळून गेली आणि हळू हळू मी भूतकाळात हरवून गेलो.

- क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED