चिनू
Sangita Mahajan
(5)
त्या छोट्या पोरीला मारायला सांगितलं होतं म्हणून मी फक्त तिलाच मारायची ऑर्डर दिली आणि या दुसऱ्या बाईला लांब गावी नेऊन ठेवली, जिथे तिच्यावर नजर ठेवता येईल अशा ठिकाणी. आम्ही ज्याचे पैसे मिळतात त्यालाच फक्त मारतो." "पण का मारली तिला?" देशपांडे. "ते माहित नाही साहेब." राका. "आणि बाकीचे साथीदार कुठे आहेत? त्यांचा फोन नंबर पण दे. आणि कुठं भेटतील ते, लवकर सांग" देशपांडे. त्याने सगळं सांगितलं. देशपांडे त्या साथीदारांना पकडायला स्वतः निघाले, जाताना राकावर नीट लक्ष्य ठेवायला सांगितले. सोबत अजून ३ जण होते. राकाने सांगितल्याप्रमाणं ते तिघं एका दारूच्या दुकानात येणार होते. यांनी त्यांचे फोटो पण सोबत घेतले होते. चौघेपण वेळेच्या आधीच तिथे पोचले. त्या दुकान मालकाला आपली ओळख सांगून ते तिघे पण आले कि लगेच इशारा करायला सांगितले. हे साध्या वेषातच गेले होते. थोड्या वेळाने ते तिघे पण आले. दुकान-मालकाचा इशारा होताच पोलीस जास्तच सावध झाले, फोटोप्रमाणं एकदा तपासून पण बघितलं तेच आहेत का म्हणून. तेच तिघे होते. अगदी दंगा-मस्ती करतच येत होते, त्यांना बघूनच ओळखत होतं कि ते किती क्रूर वृत्तीचे आहेत. तिघेही आपल्या नेहमीच्या जागी जाऊन बसले. पोलीस त्यांच्या दिशेनं निघाले, "काय पंटर लोक आम्हाला पण घ्या कि सोबत दारू प्यायला." एक पोलीस म्हणाला. "अरे यांना आपल्याकडची दाखवू एकदम अस्सल," दुसरा पोलीस. ते तिघं एकदम आश्चर्यानं आणि थोड्या रागानं बघत होते. एकेकाला पकडत पोलीस बोलले, "चला तुम्हाला इंपोर्टेड दारू पाजतो पोलीस स्टेशनमध्ये." त्या सगळ्यांना घेऊन पोलीस आले. आल्यावर राकाला बघून त्या तिघांना सगळा उलगडा झाला." "आता सांगा डेड बॉडीचं काय केलं" त्या सगळ्यांच्याकडे बघत देशपांडे म्हणाले. "सांगा लवकर." त्यातला एक जण म्हणाला, "माळ रानावर नेऊन तिला मातीत पुरलं, त्या माळ रानावर जास्त कोणी जात नाही म्हणून तीच जागा निवडली." त्यातल्या एकाला घेऊन देशपांडे आणि कॉन्स्टेबल निघाले. २ तासाच्या अंतरावर ती जागा होती. एकदम भकास आणि ओसाड. लांब लांब पर्यंत तिथे कोणी दिसत नव्हतं. डेड बॉडी असलेल्या ठिकाणी खोदायला सुरुवात केली, थोडं खोदून झाल्यावर दुर्गंध येऊ लागला. आता हळू हळू खोदु लागले बॉडीला धक्का लागू नये म्हणून. बॉडी आता दिसू लागली. बॉडीची अवस्था बघण्यासारखी अजिबात नव्हती. सगळ्यांनी मिळून अलगद बॉडीला उचलले. तिथून सरळ बॉडी फॉरेंसिक लॅबला पाठवली. बॉडीचं पोस्ट-मॉर्टेम झालं आणि रिपोर्ट पण मिळाला. श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू असं त्या रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं. सगळ्या फॉर्मॅलिटीस पूर्ण झाल्यावर सगळे आता पोलीस स्टेशन कडे जाण्याच्या तयारीला लागले. ऍम्ब्युलन्स मध्ये बॉडी ठेवण्यात आली त्यासोबत दोघेजण पोलीस बसले. बाकी सगळे पोलीस व्हॅनमध्ये बसले. देशपांडेंनी पोलीस स्टेशनला सूचना दिली कि आम्ही यायच्या आत रागिणी आणि उल्हास दोघांना पण पोलीस स्टेशनला बोलवून घ्या. सूचनेप्रमाणे कॉन्स्टेबल रागिणीच्या घरी गेले. रागिणी दारातच तांदूळ निवडत बसली होती. "तुम्हाला दोघांना पण साहेबानी बोलावलं आहे पोलीस स्टेशनला." कॉन्स्टेबल म्हणाला. पोलीस स्टेशनला बोलावलं म्हटल्यावर रागिणीला चिनू सापडली असणार असं वाटलं. कुठेतरी आशेची पालवी तिच्या मनात फुटली. त्या भाबडीला काय माहिती चिनुची अवस्था काय झाली ते. तिने मोबाईल उचलला आणि उल्हासला फोन करू लागली. एवढ्यात कॉन्स्टेबलने फोन काढून घेत म्हटलं "त्यांना फक्त घरी बोलावून घ्या काही तरी कारण सांगून, पोलीस स्टेशन असं सांगू नका." असं सांगण्याचं कारण म्हणजे पोलिसांचं नाव ऐकून त्याला संशय आला असता. आणि तो फरार झाला असता. त्याला काहीच सांगितलं नव्हतं. फक्त त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती. रागिणीने फोन करून फक्त घरी यायला सांगितलं. १/२ तासात तो अगदी घाई-गडबडीत घरी आला, घरामध्ये पोलिसांना बघून पार घाबरूनच गेला तो, त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. दोघांना घेऊन कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनला आले. संध्याकाळी ७ वाजता सगळे पोलीस स्टेशनला पोचले. रागिणी, उल्हास आणि बाकी सगळे त्यांचीच वाट बघत होते. आणलेल्या सगळ्या कैद्यांना लॉक-अप मध्ये टाकलं. त्यांना बघून उल्हास काय समजायचं ते बरोबर समजला. रकमेला बघून रागिणी लगेच तिच्याजवळ गेली आणि विचारू लागली "चिनू कुठं आहे?" "अगं माझी चिनू कुठं आहे सांग लवकर" रागिणीने तिला गधगध हलवत विचारले. रकमा फक्त रडत उभी होती, रागिणीला बघून तिला अजून जास्त रडू येत होतं. देशपांडे त्यांच्या जागेवर बसले. रागिणीला चिनुबद्दल सांगायचं म्हणजे अवघड होतं, देशपांडेंनी लेडी कॉन्स्टेबलना इशारा केला, त्या दोघी रागिनीजवळ जाऊन थांबल्या. रागिणी विचारू लागली "काय झालं साहेब चिनुचा काही तपास लागला का?" देशपांडे पुढं झाले आणि म्हणाले, "ते तुमच्या मालकालाच विचारा." रागिणी गडबडली, ते असे का म्हणतात तिला काहीच कळेना. "या नराधमानं मारलं तुमच्या पुतणीला." देशपांडे. हे ऐकून तर रागिणी अवाक होऊन उल्हासकडे बघू लागली. क्षणभर ती स्तब्ध झाली. काहीच बोलेना, काहीच हालचाल पण नाही. जणू तिच्या भावनाच मेल्या. लेडी कॉन्स्टेबलनी तिला खुर्चीत बसवलं. थोड्या वेळाने ती थोडी भानावर आली. जोरजोरात रडू लागली. ती वेडीपिशी झाली. जागेवरून उठली आणि उल्हासच्या दिशेने जात म्हणाली, "तुम्ही मारलं माझ्या छकुलीला? काळीज कसं झरलं नाही तुमचं? एवढासा लहानगा जीव किती तडफ़डला असेल. देशपांडे उल्हासला घेऊन आतमध्ये गेले रिमांडमध्ये घेऊन त्याला विचारलं, "सांग आता का केलंस असं?" तो म्हणाला, "पैशासाठी, तिच्या बापानं सगळी इस्टेट तिच्या नावानं केली, ती १८ वर्षाची झाल्यावर सगळी संपत्ती तिच्या नावे होणार होती. जशीजशी ती मोठी होईल तसा मी अस्वस्थ व्हायला लागलो. मग एक दिवस प्लॅन केला तिला मारण्याचा. या मारेकऱ्यांना शोधून काढला आणि त्यांना पैसे आणि फोटो दिले. आणि एकटी ऐवजी दोघीना न्यायला सांगितलं कारण रकमा घरी आली असती तर सगळ्यांना समजलं असतं. दुसरं कारण म्हणजे सगळे असंच समजले असते कि रक्मानच चिनुला पळवलं. पण साल्ल्यांनी सगळा डाव उध्वस्त केला. त्या रकमेला जिवंत सोडून त्यांनी मूर्खपणा केला." "पैशाच्या लोभामुळं इतकं नीच काम केलास, लाज नाही वाटली? आयता पैसा पाहिजे होता काय, आता बस तुरुंगात प्लँनिंग करत." न्या रे याला. उल्हासला लॉक-अप मध्ये ठेवल्यावर देशपांडे उठले आणि चिनुची डेड बॉडी ऍम्ब्युलन्स मध्ये असल्याचे सांगितले, हे ऐकताच रागिणी बाहेर पळत गेली. पाठोपाठ कॉन्स्टेबल, देशपांडे आणि रकमा पण गेले. बॉडी पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवली होती. रागिणी ते काढण्याचा प्रयत्न करू लागली. पण पोलिसांनी सांगितलं कि बॉडी बघण्यासारखी नाही आहे. रकमा, रागिणी आणि चिनुच्या बॉडीला त्यांच्या घरी पोचवण्यात आलं. शेजाऱ्यांनी त्यांच्या काही नातेवाईकांना फोन करून कळवलं. बघता बघता हि बातमी गावभर पसरली. आखा गाव चिनुच्या घरी जमलं. जो तो हळहळत होता. सगळ्यांनी मिळून अंत्य संस्कार आटोपला, कारण बॉडी जास्त वेळ ठेवायला परमिशन नव्हती. रागिणी आणि रकमेवर आभाळच कोसळलं होता. आखा गावच रडत होतं. एवढी निरागस पोर, आधीच आई-बाबाचं छत्र हरवलेलं आणि आता एवढे हाल हाल होऊन गेली.
ठरलेल्या वेळेत सर्व कैद्यांना कोर्टात हजर करण्यात आले, सारे पुरावे आणि रिपोर्ट्स सबमिट करण्यात आले. अर्थातच सर्व अपराध्यांना ठरलेल्या दिवशी शिक्षा सुनावण्यात आली. उल्हासला पण शिक्षा झाली त्याचं रागिणीला काहीच वाटलं नाही कारण उल्हासने गुन्हाच खूप भयानक केला होता त्याला शिक्षा हि मिळायलाच हवी होती. पैशाच्या मोहाने त्याने खूपच गंभीर गुन्हा केला होता.
बघितलात मित्रांनो काय झालं त्या छोट्याशा चिमुरडीसोबत. काही दोष होता तिचा? एवढी लाडात वाढलेली पोर काय हाल झाले तिचे. सगळ्यांनी त्या दोघांच्यावर विश्वास ठेऊन चिनुला त्यांच्या हवाली केलं होतं, झालं काय? आज खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जगात माणुसकी आहे? कसा विश्वास ठेवायचा कोणावर? माणुसकी हरवत चालले का? समोरच्यावर पटकन विश्वास ठेऊ नका. त्याची अचूक पारख करायला शिका.
******