Kallol books and stories free download online pdf in Marathi

कल्लोळ

आईंना घेउन आले आत्ता हाॕस्पीटलमधे. काय होतंय काय माहीत ? किती जोरत पडल्या त्या बाथरुममधे. डोक्यातून रक्त खूप वाहत होतं . पाहून घाबरलेच मी. घरी कोणीच नाही, अर्थात रोजच कोणी नसतं म्हणा. मी आणि आई दोघीच असतो नेहमी. नेमकं मलाही काय बुध्दी झाली स्वयंपाकघरात जायची? भाजी थोड्या वेळाने फोडणीला टाकली असती तर काय बिघडलं असतं? पण आईंना आंघोळीला पाणी दिलं, स्टुलवर बसवलं, दार उघडंच ठेवून मी स्वयंपाकघरात गेले. आंघोळ झाली की पोथी वाचून जेवायलाच बसतात त्या. आज त्यांच्या आवडीची लाल भोपळ्याची , त्यांच्या नागपुरी भाषेत बाकरभाजी, करायची होती. त्यांची अंघोळ झाली की त्यांना खोलीत बसवून कपडे दिले की माझं काम व्हायचं . तोवर भाजी शिजेल असं वाटून मी गेले पण तेवढ्यात गोंधळ झालाच. आंघोळ आटोपल्यावर उभे राहताना त्यांचा पाय घसरला आणि जोरात आपटल्या. केवढा आवाज झाला, धावत गेले, पण काय करावं तेच कळेना. शेवटी कसबसं त्यांना उचललं, गाउन चढवला आणि शेजारच्या शिवला आवाज दिला. त्याने व मी मिळून त्याच्या गाडीने आता रुग्णालयात आणलंय. त्यांना भोवळ येऊन त्या घाबरलेल्याच होत्या. येताना उलटीही झाली त्यांना म्हणून जास्त काळजी वाटतीये मला. डाॕक्टर येऊन तपासताहेत. पण उलटी झाल्याने मला वाटलं होतं तसं त्यांना अॕडमिट करावंच लागलं. ऐंशी वय असल्याने कोणताही धोका पत्करायची त्यांची तयारी नव्हती. आय सी यु मधे ठेवायला हवं होतं.

काय गरज होती मला स्वयंपाकघरात जायची? त्यांची अंघोळ झाल्यावर गेले असते तर काय बिघडलं असतं? बाकरभाजी तर पटकन होते. खूप अपराधी वाटायला लागलं मला. मी विश्वासला फोन लावला. आईला एवढंसं जरी काही झालं की त्याचा जीव थोडाथोडा व्हायचा. लगेच आॕफीसमधून निघाला आणि तासाभरात रुग्णालयात आला. तो आला तसा माझा जीव भांड्यात पडला.
माझ्या पाठीवर हात फिरवत म्हणाला,” नको काळजी करु, मी आलोय ना आता. सगळं काही नीट होईल.”
मी त्याला सांगायचा प्रयत्न करु लागले,” अरे मी भाजी टाकायला गेले आणि इकडे त्या पडल्या,मी लगेच पळत आले पण....”.
“मला माहितीये विभा, तु माझ्या आईची खूप काळजी घेतेस, मला तिच्याकडे पहायला वेळ नसतो पण तु आहेस म्हणून मी निश्चिंत असतो. माझा विश्वास आहे तुझ्यावर”. हे ऐकलं आणि माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं.इतक्यात डाॕक्टरांनी बोलावलं म्हणून मला तिथे सोडून विश्वास भेटायला गेला.

खरंच किती बदलतो ना माणुस.? हा तोच विश्वास आहे जो आपल्या आईच्या पूर्ण आज्ञेत होता? मला आठवतंय लग्नं होऊन या घरात आले तेव्हा घर भरलेलं होतं. दादा, आई आणि विश्वास. विश्वासच्या मोठ्या बहिणीचे, विशाखाचे लग्नं झालेलं होतं. माझ्या घरी मी आणि माझे वडील अण्णा दोघेच होतो.आई मी लहान असतानाच गेली. अण्णांनीच माझा सांभाळ केला. या घरात एकछत्री आईंचा अंमल होता. माझं या घरात येणं त्यांना फारसं आवडलेलं नव्हतं. दादांनी एका लग्नात मला पाहीलं आणि विश्वाससाठी मला पसंत केलं. अण्णा आलेले पण त्यांना आवडायचं नाही. ते आले तरी त्या विशेष बोलायच्या नाहीत. मला याचा फार राग यायचा. अण्णांची एकुलती एक मुलगी होते मी. विश्वासने किंवा दादांनी याबाबत बोलावे असं मला वाटायचं. पण ते दोघे कधीच काही बोलले नाहीत. माझा फार संताप व्हायचा त्यामुळे. पण विश्वासला त्याचं काही सोयरसुतक नव्हतं. त्याच्यासाठी त्याची आई म्हणजे सर्वस्व होती. आॕफीसमधून आल्यावरही तो आधी आईच्या खोलीत जायचा. मग आई, दादा आणि तो, तिघांच्या गप्पा रंगत असत, तिथेच चहा, खाणंही व्हायचं, कधीकधी पत्त्यांचा डावही रंगायचा. या सगळ्यात मला सामिल करुन घ्यावं असं या तिघांपैकी कोणालाही वाटायचं नाही. खूप एकटंएकटं, असहाय वाटायचं, कधी खूप संताप व्हायचा माझा. विश्वासचा खूप राग यायचा. वाटायचं माझं घर सोडून मी या माणसासाठी आले या घरात आणि याला तर काहीच पडलेलं नाहीये माझं. मी स्वतःहून त्यांच्यात सामील व्हायचा एकदोनदा प्रयत्न केला पण लक्षात आलं की आईंना फारसं आवडत नाहीये मी त्यांच्या खोलीत गेलेली. मग मात्र मी ते करणं सोडून दिलं. मी एकटीच काहीतरी वाचत नाहीतर काम करत बसायची. याबाबतीत विशाखाताईंना माझी मनःस्थिती नक्की समजेल असं मला वाटलं होतं पण तिथेही माझी निराशा झाली. कोणालाच आईंची नाराजी नको होती. पण माझ्या जयाचा जन्म झाला आणि माझं विश्व बदलले. आता आई काय करतात, विश्वासचं वागणं इकडे मी दुर्लक्ष करायला लागले. जया हेच माझं विश्व बनली, तिच्यासाठी मी आणि माझ्यसाठी ती . ती मोठी व्हायला लागली तसं तिच्याबरोबर माझंही क्षितीज रुंदावायला लागलं, मैत्रीणी मिळाल्या. पुढच्या काळात एका मैत्रीणी बरोबर फॕशन डिजायनींग चा डिप्लोमा करुन आम्ही स्वतःचं ‘रिवाज बुटीक’ चालु केलं, घरीच. त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. आम्हाला मदतीसाठी दोन बायकांनाही कामावर ठेवायला लागणार होतं. मग बाहेरच्या बाजूला शेड टाकून काम मी सुरु केलं. मशिनच्या आवाजाचाही आईंना त्रास व्हायचा, त्यावरुन घरी कटकट चालूच होती. त्या दोघांनाही माझ्या कामाचं अजिबात कौतुक नव्हतं. पण दुर्लक्ष करणे हा मार्ग मला सापडला होता.
अण्णा त्यांच्या मित्रासोबत कर्जतच्या वृध्दाश्रमात रहायला गेले. खूप खुश होते ते तिथे, अनेक मित्रं जोडल्याने त्यांचा एकटेपणा संपला होता. मी अधूनमधून जाऊन भेटून येतच होते. विशाखाताईही अधूनमधून घरी यायच्या. पण आल्यावर प्रथम आईंच्या खोलीत जाऊन गप्पाटप्पा, चहा झाल्यावर बाहेर येऊन थोडंफार माझ्याशी बोलायच्या. मला खूप आश्चर्य वाटायचं त्यांचं. त्याही माझ्यासारख्याच त्यांच्या घरातील एक सुन होत्या मग एका सुनेची बाजू त्यांना समजू शकत नाही? अर्थात घरातल्या या राजकारणाकडे लक्ष द्यायला मला आता वेळ नव्हता. जया, माझं काम आणि घर, मला दिवस कमी पडत होता. जयावर मात्रं आईंदादांचा खूप जीव होता. जयालाही आजीआजोबा फार प्रिय. शाळेतून आली की तिचं जेवण त्या दोघांबरोबरच होई. तिच्यासाठी जेवायला थांबायचे दोघेजण. त्यांच्यातलं ते प्रेम पाहून मला बरं वाटायचं. पुढे मोठी होऊन काॕलेजमधे जायला लागली तेव्हा त्यांचं जेवण बंद झालं पण गप्पा तशाच चालु होत्या.तिचं लग्नं झालं त्यावेळी खूप वाईट वाटलं त्यांना. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या. तिचं लग्नं झालं आणि वर्षभरातच दादा गेले. रात्री झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
दादा गेले तसं घरात आता मी आणि आईच रहायला लागलो. इतक्या वर्षात आम्ही एकमेकींबरोबर कधीच एकत्र जेवायलाही बसलो नव्हतो. सुरवाती सुरवातीला माझ्याशी बोलताना त्यांचा अहंकार आड यायचा. मग मीच आपणहून त्यांच्याशी बोलायला सुरवात केली . विश्वास सकाळीच जायचा तो त्याला यायला जवळजवळ रात्रंच व्हायची. मग विश्वास गेला की माझं काम सुरु व्हायचं. त्याआधीचा चहा मी त्यांच्याबरोबर घ्यायला सुरवात केली. चहा घेता घेता आमच्या गप्पा रंगायला लागल्या .एकमेकींबद्दल असलेली अढी हळुहळु सुटायला लागली. मला आता त्या त्यांच्या लहानपणीच्या, लग्नाच्या हकीकती, किस्से सांगायला लागल्या, माझ्या ऐकू लागल्या. मी त्यांना त्यांच्या मैत्रीणीकडे गाडीवर सोडायला गेले तर आत बोलवून माझी ओळख करुन द्यायला लागल्या. आमचं नातं आता बर्यापैकी निवळायला लागलं. मैत्रीचं नाही म्हणणार मी पण एक छानसं नातं आमच्यामधे निर्माण होऊ पहात होतं. विशाखाताईही यायच्या पण त्या येऊन गेल्यावर तो दिवस आई थोड्या वेगळ्या वागायच्या. पण दुसर्या दिवशी नेहमीसारख्या आमच्या गप्पा व्हायच्या. आता तर जेवणासाठी पण माझ्यासाठी त्या थांबू लागल्या. मला खूप आश्चर्य वाटत होतं, या त्याच आई आहेत ज्या माझ्याशी बोलायला पण तयार नसायच्या? पण मी खूप समाधानी होते.
तेव्हाचा अजून एक प्रसंग माझ्या लक्षात आहे. दादा गेल्यावर त्यांची अर्धी पेंशन आईंना मिळायला लागली. विश्वासला वेळ नसायचा मग मीच ती काढून आणून आईंकडे द्यायचे. एकदा विशाखाताई आल्या होत्या. त्यांनी आईंचे पेंशनचे पासबुक तपासायला सुरवात केली . मला बोलवलं आणि विचारलं “हे सगळे पैसे कुठे गेले?”
मला समजेना त्या काय बोलताहेत. मी पैसे काढून आईंच्या हातात देत असे हे त्यांना बहुतेक माहीत नव्हते. मी काही बोलणार इतक्यात आईच बोलल्या "विशाखा, काय बोलतीयेस तु? ती पैसे काढून माझ्या हातात देते., दर महिन्याच्या पाच तारखेला, अगदी न चुकता. तिच्यावर अविश्वास दाखवू नकोस.” ऐकून मला सुखद धक्का बसला. हे मला अपेक्षितच नव्हतं. विशाखाताईंचा चेहरा मात्र कसनुसा झाला होता.

इतक्यात विश्वास बाहेर आला. “विभा आत जा, आई बोलवतीये तुला “ . विचारांच्या कल्लोळातून बाहेर येत मी आईंना भेटायला आत गेले. आईंना पाहून मला परत एकदा अपराधी वाटायला लागलं. त्यांच्याजवळ जाऊन बसले. इतक्यात त्यांनी डोळे उघडले. “ विभा, मला काही झालेलं नाहीये, मी ठीक आहे. मी पडले त्यात कोणाचीच चुक नाहीये, तुझी तर अजिबात नाही. जा, आता घरी जाऊन थोडी विश्रांती घे, खूप धावपळ केलीयेस सकाळपासनं” माझ्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबेना. तशीच बाहेर पळत आले, डोळे पुसले. आता घरी जाते, छान गरमगरम मुगाची खिचडी करते आईंना आवडते तशी. त्यांचं पांघरुणही आणायला हवं, त्यांना झोप येत नाही त्याशिवाय. भावनांचा कल्लोळ संपला होता,स्वच्छ आकाशात चांदण्या चमकत होत्या

©® अंजली जोगळेकर .

इतर रसदार पर्याय