शेतकरी माझा भोळा - 10 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेतकरी माझा भोळा - 10

१०) शेतकरी माझा भोळा!
संपाचा पाचवा दिस उजडला. पर संप मिटायची काय बी चिन्न दिसत न्हवते. कामगार पाच म्हैन्याचा पगार देईस्तोर आन लेबर लोक आर्धी ऊचल फायजेत म्हणून हटून बसले व्हते. डिरेक्टर मंडळ दोन पगार म्हैन्याचा पगार आन् पच्चीस टक्के ऊचल देयाया राजी झालं पर तोडगा निघत न्हवता. कामगारायचा आन् लेबरायचा नेता लै भारी व्हता. भासण करताना त्यो फाडफाड बोलत व्हता. डिरेक्टर मंडळानं कसा भ्रस्टाचार केला त्येची यादी सामानावाणी तोंड पाठ वरडू वरडू सांगत व्हता. कोन्त्या डैयरेक्टरनं लक्झरी घेतली, कोन्त्यानं तारस पडलं, कोणी जीब घेतली, कोन्त्यानं वावर घेत्लं ते छाती बडवून सांगत व्हता. त्येच्या भासणानं संपाला बसलेले कामगार आन् लेबर लईच चेकाळायचे आन् खेकडा भित्तीला पक्का चिकटल्यावाणी तंबाला चिकटून ऱ्हायाचे.
"यस्वदे,कोंड्या कोठं हाय?" त्या फाटे गणपतने इच्चारलं.
"तुम्हाला ठाव न्हाई? त्यो उपोस्णाला बसला हाय."
"उपोसणाला?कोंडबा? कहाला आगावपणा करावं?"
"समद्या गावातले लोक बसल्येत. सिवा आपला ऊस उबाच हाय की..." दोगं नौरा-बायकू बोलत आसताना ईलास पळतच आला,
"गणपत....ए गणपत..."
"ईलासभौजी? आसं पळाय काय झाल?" यस्वदानं काळजीनं इच्चारलं.
"भाबी...गणपत, तुहा ऊस पेटला रे..."
"क... क... काय?..." आस म्हन्ता म्हन्ता गणपत आन् यस्वदा वावराकडं लगबगीनं निघंले. सीतापूरात त्ये येक नवच खूळ निघालत. कारखाना बंद पडला व्हता. गाळप व्हयाची या संप मिटायची कायबी दिसनात. तव्हा कोन्ही तरी डोस्क्यातून काढलं...
"आरं, ऊसाचा फड पेटवा रे. ऊस जळाला म्हंजी सरकारला पैयसा देवावच लागतो..." आसं म्हणाया उशीर दोन-तीन दिसात फडच्या फडं जळालते. फड जळाल्याचा रिपोट जाताच पंचनामा व्हवून त्येची म्हाईती तहेसीलात जायाची. लोक फड पेटव म्हणून लै मांघ लागलते पर गणपती तैय्यार झाला न्हाई.
"यस्वदे, ह्यो काय परकार म्हणावा?"
"कोण पेटवला आसल फड?"
"गणपत झालं ते झालं. तू तर सोत्ताच्या हातानं फडाला काडी लावणार नव्हतास. आता तरी तुला दीड- दोन लाक रुपयै मिळतील..." बोलता बोलता त्ये वावराजवळ पोचले. दुरूनच जाळाचा आन् धुराचा लोट आबाळाकडं पळताना दिसत व्हता. वावराजवळ पोचताच सम्द्या फडानं आग धरलेली दिसत व्हती.
"ईलाशा, आता रे?" गणपतने रडक्या आवाजात इच्चारलं
"पोलीस पाटलासंग ठाण्यात जाऊन रिपोट लिहावा लागतो."
हलके हलके आग थंड व्हत व्हती. तसा गणपत ईलासला घिऊन पोलीस पाटलाकडं पोचले. त्येंना फाताच पाटलानं इच्चारलं,
"काय गणपत? आखिर तू बी फड पेटवला रं?"
"न्हाई हो पाटील, म्या न्हाई पेटवला जी..." गणपत दोन हात जोडून म्हण्ला.
"पेटला झालं! व्हय ना? गणपत, येक काम मातर करावं लागल?"
"त्ये कोन्च?"
"मिळालेल्या भरपाईच्या धा टक्के पैसा पोलीसायला देवावं लाग्ते."
गणपत काय बी बोलायच्या पैयले ईलास म्हन्ला, "पाटील, तुमी का दुसरे हाय का आन गणपत का परका हाये? तव्हा सम्द्यासंग ऱ्हावू द्या."
पोलीस पाटलाच्या मोटारसायकलीवर पाटील गणपत ठाण्यात पोचले.
"काय आन्ल पाटील?"
"सायेब, गणपत, येचा ऊसाचा फड.."
"यानेच जाळला."
"न्हाई वो, सायब. म्या न्हाई जाळला."
"चूप नाटक करतोस, हरामी. साल्या, आम्हाला का मुर्ख समजतो?"
"सायेब, कहाची बी आन खातो. पोराची, पोरीची, बायकुची आन घिऊन..."
"पाटील, आम्ही याला आत टाकतो. अहो, याने स्वत:च ऊस जाळल्याची कम्प्लेन आहे. तुम्ही असं करा, आता दोन वाजत आहेत. सहा वाजता याच्या कुटुंबाला पाठवून द्या. जमानत करू.."
"गणपत, काळजी करु नगस. समदं ठीक हुईल..." म्हन्ताना पाटील गेले...
सांच्याला साहा वाजता पाटलासंग यस्वदा आन् सखी ठाण्यात पोचल्या. त्येंना फाताच फौजदार म्हन्ले, "पाटील, तुम्ही जावून बाँडपेपर घेवून या. म्हणजे मग याची जमानत करता येईल."
"जी." आसं म्हणत पाटील ठाण्याबाहीर पडले.
"सायेब, खर सांगतो जी, मझे धनी निरदोस हायेत. सम्दा गाव फड पेटवून देत असताना हे म्हणाचे, नग तस फोकटचा पैका नग. उपासी ऱ्हावू पर ईज्जतीन..."
"ईज्जत? नाही का?" सखीकडे फात फौजदार म्हण्ला आन् जागेवरुन ऊठत यस्वदेला म्हणाला, "चला. तुमच्या मालकाला बाहेर काढू."
सायेबाच्या माघ माघ यस्वदा गणपतच्या खोलीजोळ पोचली.
"ही घ्या चाबी. ऊघडा कुलूप." म्हन्ताना सायेबानं चाबी यस्वदाजवळ देली. यस्वदान चाबी कुलूप काढल. दार ढकलताच सायेबानं तिलाच जोरानं आतमंदी ढकलल.
पुना दाराला कुलूप लावून त्यो म्हन्ला, "ईज्जत नाही का? बघा... हवालदार....'
"जी साब..."
"बाहेर थांब. कुणीही आलं तरी आत सोडू नको."
"जी साब." हवालदार म्हन्ला आन् निघून गेला. फौजदार सखीजवळ पोचला.
तिला खाली-वर फात आसताना यस्वदा वरडली, "सायेब, तुमाला तुमच्या बायकुची आन... पोरीला .... तिला काय बी करु नगसा. तुमच्या पाया पडते...."
"चूप सटवी ! ओरडशील तर पोरीचा जीव घेईन." म्हन्ता म्हन्ता फौजदाराने सखीच्या पदराला झटका देला....
पंद्रा-ईस मिन्टानं ईस्कुटलेल्या सखीला आन् यस्वदीला घिवून गणपत ठाण्याच्या बाहीर पडला आन् फौजदाराने रोकलेलं पिस्तौल पुना पैंटीत आडकवलं....
त्या दिसानंतर दोन-चार दिस गणपत, यस्वदा, सखी कुणीबी घराबाहीर पडलं न्हाई. न्हाई म्हन्ता म्हन्ता सम्द्या गावाला तो परकार समजला व्हता. सम्द्या सीतापुरात ती येकच चरच्या व्हती. तिकडं कोंडबा आमरण उपोस्णाला बसला व्हता. आमनेसामने दोन टैंट पडले व्हते. येका टेंटमंदी कामगारायचं उपोसण व्हतं तर दुसऱ्या टेंटमंदी शेतकरी अपोसणाला बसले व्हते. कारखाना सुरु करायचा आग्रेव शेतकऱ्यायनं धरला व्हता तर पगार देल्यासिवा कार्खान्यात पाय ठिवणार न्हाई आस्सी भीस्म परतिग्या कामगारायनं केली व्हती. दोघायचा येकच कामन पाईंट म्हणा या दुस्मान येकच व्हता त्यो म्हंजे डिरेक्टर बोरड्. शेतकऱ्यायच्या बाजून तात्यासायेब लडत व्हते. रोज साईटवर यिवून शेतकऱ्यायला भडकावत व्हते. दोपारचे च्यार वाजत व्हते. ज्येचा ऊस गेला न्हवता, जाळला व्हता त्ये सम्दे शेतकरी कार्खान्याच्या साईटवर जमले व्हते. शेतकऱ्याचा कोणी तरी नेता येणार व्हता तर कामगारायचा मोठा पुढारी भाषण ठोकायला येणार व्हता. शेतकरी नेत्याची येळ दोपारी येकची व्हती तर कामगार फुडाऱ्याची येळ दोपारी तीनची व्हती पर आजूक कोनीच आल न्हवतं. उपोसणाचा सातवा दिस व्हता. उपोसणाला बसलेले कामगार, लेवर शेतकरी समदे मड पडल्यावाणी पडून व्हते, त्वांडातून सब्दबी फुटतन्हवता.
बराबर पाच वाजता चार-पाच जीपा कार्खान्यावर थांबल्या. दोघायचे नेते येगयेगळ्या जीपीतून ऊतरले. त्यांच्या त्यांच्या लोकायनी आपापल्या नेत्यायला माळी घातल्या, घोसणा देत त्येंना टैंटपस्तोर आणल. कोण कोणाचं आन् कोणाची कोन्ती घोसणा येंचा मेळ बसत न्हवता. टेटमंदी येताबरुबर सबा सुरु झाल्या. दोघायला बी येळ न्हवता, कोणी बी थांबाय तैयार न्हवता. दोन्ही
फूढा-यांची भासणं येकदाच सुरु झाली. पैयले-पैयले दोघायचा बी पाईन्ट येकच व्हता त्यो म्हंजे वांझुटे डिरेक्टर! पर शेतकऱ्याचा फुडारी कामगारावर त्वांडसुक घिवू लागला आन् त्ये ऐकून कामगार फुडारी का मांघ ऱ्हाणार? त्योबी शेतकऱ्याच्या मायभनीवर शिव्या घालू लागला. त्ये ऐकून जमलेले कामगार-लेबर-शेतकरी येकमेकाना शिव्या घालू लागले. शिवीगाळ कर्ता-कर्ता आपोआप हात ऊचलल्या गेले आन मंग सुरु झाला येक येगळाच दंगा! जो-त्यो हातात पडल त्येनं ठोकू लागले. टकुरे फुटले, हात-पाय मोडले, रगताचे थारोळं साचू लागलं. तेव्हढ्यात कार्खान्यातून कोण तरी पोलीसालं बलीवलं. धा मिन्टात पाच-पंचेईस पोलीस आले पर हज्जारो लोकायसमुर त्ये कर्णार तरी काय? कोन्ही बी ऐकत न्हाई ह्ये फाताच फौजदारानं पिस्तौल काढले आन् आबाळात गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकताच समद्यायचा जोश कमी झाला. होशमंदी येताना कित्येकांच्या प्यांटी वल्या कच्च झाल्या. जीव मुठीत धरुन सम्दे जीव वाचवया पळत सुटले. धा-पंद्रा हज्जाराच्या जमावाने आमरण उपोस्णाला बसलेल्या न्हवं झोपलेल्या समद्यायला तुडवलं आन् त्यापायी कैकांचा जीव गेला. त्येतच कोंडबाचा बी मुडदा पडला....
बाहीर आंदार पडला न्हवता पर सांचा पार झाला व्हता. गणपत घराबाहीरच्या वट्यावर बसला व्हता. घरामंदी यस्वदा आन् सकी व्हती ! त्या ठाण्यातल्या परकारापासून कोन्हीच कोन्ला बोलत न्हवते. तेव्हढ्यात कार्खान्याहून लोक पळत आले.
"गणपत... गणप्या, आरं कार्खान्यावर दंगा झाला."
"आरं, कोंडबा..."
"त्यो तर ऊपोसणाला बसला व्हता. आच्यानक दंगा सुरु झाला. मारामारी झाली. पोलीस आले. त्येनी गोळीबार केला."
"तू...तू...पळ जा... कोंडबाला सोध...''
"धनी, म्या येवू?'
"नग. म्या फातो.. तू सकीजोळ थांब." म्हन्ताना गणपत पळत-पळत कार्खान्याकडं जावू लागला. तेव्हा कार्खान्याहून आबासाबची जीव गावाकड जात व्हती. आतमंदी आबासायेबासंग ईलास बसला व्हता. जीप गणपतजोळ न थांबता निघून गेली आन् गणपत कार्खान्याकड...
कलाकेंदराच्याफुडून जाताना त्येचा मालक गणपतला आवाज देत व्हता पर त्येच्याकडं न फाता गणपत कार्खान्याच्या रस्त्याला लागला. कार्खना काही फरलांग ऱ्हायला असताना येक जीप येत व्हती. जीप गणपतच्या म्होरी थांबली. जीबमंदी गावातले येक-दोघं मान्स व्हते.
"कोंडबा, तुझा मुलगा आहे?"
"व्हय. पर..."
"काही झालं नाही पण त्याची जीप कुठं आहे?"
"जीप? ती तर आबासायेबास्नी ईकली."
"विकली? केवढ्याला?"
"नगदी काय बी न्हाई घेतले. जीबीचे सम्दे हाफ्ते आबासाब सारतो म्हन्ले."
"हे बघा, गणपतराव, आणखी आबासाहेबांनी एकसुद्धा हप्ता भरलेला नाही. जीप त्यांच्या नावावर करता येत नाही."
"पर सायेब, ते जावू द्या. उद्या परवा फावूत. काखान्यावर दंगा झाला म्हणं. कोंडबा तिकडच हाय. म्या जातो..." म्हन्ताना सायेब काय म्हन्ले त्ये न आईकता त्यो कार्खान्याकडं निघाला.
त्यो कार्खान्याच्या साईटवर पोचला. तव्हा तेथं व्हते पोलीस आन् जखमायपायी धाय मोकलून रडणारे मान्स ! कोण कामगार? कोण लेबर? कोण शेतकरी? समद्यायचं रगत येक व्हवून त्येचा चिकल झाला व्हता. त्यो चिकल तुडवीत कोंडबाला सोधत असताना आवाज आला,
"कोण रं तू?"
"साहेब, म्या गणपत. पोरालं धुंडतोय." गणपत कोंडबाला धुंडत व्हता. चिंध्या झालेल्या टेंटाजोळ त्यो गेला. सम्दीकडं नदर टाकताना चेंदामेंदा झालेली लई माण्सं त्येला दिसत व्हती. मातर कोणाच्या बी चेहेऱ्याचा पत्त्या न्हवता. त्वांड, नाक, डोळं सम्द फुटून चेहऱ्यावर रगताचा थर साचला व्हता. कपड्यावरून त्येन कोंडबाला वळखलं. कोंडबा सांतपणे पडला व्हता. येव्हढा मार लागूनबी त्यो कसा सांत पडला व्हता. गणपतला येगळीच शेन्खा आली. जवळ आलेल्या हवालदाराला त्येनं सांगलं,
"सायेब, ह्यो-ह्यो कोंडबा... मझ पोरगं हाय, बगा तर वो लै मार लागला की व्हो. सायेब, पोराला दवाकान्यात कव्हा धाडणार? मही जीब बोलवू का?"
"ये पागला, आर त्यो मुडदा कसा बोलल रे त्याला दवाखान्यात न्यायचं हाय...पोस्टमार्टेम..."
"न्हाई..." गणपत जीवाच्या आकांतानं वरडला...
दुसऱ्या दिशी फाटे सर्कारी जीपीतून कोंडबाचं मडं घिऊन गणपत घरी पोचला. सारी रात दवाखान्यात गेली व्हती. जीब घरामोरी थांबली तशी यस्वदा धावत आली.
"अहो, सकी कुठाय?"
"सकी.. सकी.. मला काय ठाव?"
"अहो, आसं नग म्हणू व्हो. तुमी गेल्यावर न्हाय का सरपंचाची जीप आली. जीबीमंदी ईलासबी व्हता. त्यो म्हण्ला..."
"काय म्हण्ला?"
"सकीच्या बापानं म्हंजी तुमी तिला कार्खान्यावर बलीवलत म्हणं. मंग त्यो सखीला घिऊन गेला."
"हे...हे...त्वा काय केलं यस्वदे? त्येनं...त्येन... त्या भडव्यानं.. सखीला... आपल्या सखीला.. त्या कलाकेंदरवाल्या मालकाला ईकल असणार."
जमलेल्या गरदीतून कोणी तरी म्हन्ल, "गणप्या, तुही जीप काल रातभर कलाकेंदरावर व्हती. फाटेच आबासाहेब त्या जीबीतून गावात आल्येत..."
"धनी, त्यो त्यो बगा...बगा....मझा कोंडबा, बगा...बगा...जीपीतून आला हाय. लै....लै.....मोठा सायेब झाला वो. धन.... धनी.. आन् ती-ती बगा ती आपली सखी!... तिच्यासंग त्यो...त्यो.. तिचा ...तिचा....तिचा नौरा बगा. कार्खान्याचा चेरमन हाय! धनी, आता काळजी नगं. तुमचा जावाई साखर कार्खान्याचा चेअरमन म्हंजी मंग आपला फड येका दिसात धनी..... अहो ...धनी..."
"यस्वदा...यस्वदा..." म्हन्ताना गणपत बी धाय मोकलून रडू लागला...
०००नागेश शेवाळकर