Navnath Mahatmay - 6 books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग ६

नवनाथ महात्म्य भाग ६

एके दिवशी गावातील मंडळी जमली असता नाथ त्यांना म्हणाले, ”बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पुर्ण सुख मिळाले नाही, म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे.
भगवंताची निरपेक्ष सेवा करावी.
यातच खरा आनंद आहे.”
त्यांचे हे बोलणे ऐकून साठ वर्षांचे एक गृहस्थ एकदम चिडून नाथांना म्हणाले, ”प्रपंचामध्ये समाधानी रहावे, असे सांगायला काय जाते,पण ते शक्य आहे का?
माझंच बघा, माझा एक मुलगा बारा वर्षांचा आहे, त्याची अजुन मुंज व्हायची आहे.
दुसरा मुलगा अठरा वर्षांचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे.
सर्वांत मोठी मुलगी आहे तिला वीस वर्षे पूर्ण झाली, तरी तिचे लग्न जमत नाही.
मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे.
तिला औषधपाणी करावे लागते.
या सर्वांसाठी माझी मिळकत अपुरी पडते.
अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू?”

नाथांनी त्या गृहस्थाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.
नंतर ते हसून त्याला म्हणाले, ”काळजी करून प्रपंचातील सर्व प्रश्न कधी सुटतात का ?
आजपर्यंत आपण काळजी करत आलात, त्याने तुंमच्या समस्या दुर झाल्या का?
कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटली नाही.
हे कळूनसुद्धा आपल्याला असे वाटत नाही की, आतापर्यंत केली तेवढी काळजी पुरे.
काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर टिकवले आणि चित्त भगवंताच्या नामावर केंद्रित केले, तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त असते.
भगवंत सर्वशक्तीमान असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत.
तो आपल्या भक्ताच्या मार्गातील काटे अलगद दुर करतो.
यासाठी जास्तीतजास्त वेळ भगवंताचे नामस्मरण, चिंतन करावे आपला वेळ त्यात जास्त घालवावा.”
हे सर्व ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चुक समजली व तो नाथांना नमन करुन त्यांना शरण गेला .

गोरक्षनाथांची वाङ्मयसंपदा भरपूर आहे .
आज गोरक्षनाथांनी निर्माण केलेल्या २८ संस्कृत व ४० हिंदी ग्रंथांचा शोध लागला असुन ते वाचल्यानंतर गोरक्षांच्या तत्त्वज्ञानाचा सहज परिचय होतो.
या ग्रंथात सिद्धसिद्धांतपद्धती, गोरखबानी, महार्थमंजरी, अवधूतगीता, योगमार्तंड, अमरौघप्रबोध, गोरक्षशतक इ. ग्रंथ प्रमुख मानले जातात.
यापैकी 'सिद्धसिद्धान्तपद्धती' हा गोरक्षांचा सर्वांत महत्वाचा असा संस्कृत ग्रंथ समजला जातो.
यात नाथांनी लोकल्याणासाठी योगमार्गातील गुह्य ज्ञान प्रकटकरून सांगितले असून बद्ध जीवांना मोक्ष मिळवून देणारा असा हा अत्यंत श्रेष्ठग्रंथ आहे.
तर 'गोरखबानी' मध्ये योग्याने सदासर्वदा आत्म्याचेच चिंतन करायला हवे व त्यासाठी पंच ज्ञानेंद्रियांना अंतर्मुख करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले आहे.

त्यांच्या 'अमनस्कयोग' या ग्रंथात जीवनमुक्तीचे रहस्य विशद करून सांगितले असून हा योग मंत्रयोग, ध्यानयोग, जपयोग यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.
हा योग जाणणारा योगी सुख-दुःख,शीत-उष्ण, स्पर्श, रस, रूप गंध यांच्या पलीकडे गेलेला असतो.
या लययोगाने मन ब्रह्मतत्त्वामध्ये लीन होते व योग्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात.
परंतु योग्याने या सिद्धींच्या लोभात न अडकता आपली पुढची प्रगती साधायला हवी.
हा अमनस्क योग केवळ 'गुरुमुखैकगम्य' म्हणजे केवळ गुरुच्या मुखातूनच प्राप्त होणारा आहे.

नाथांचा 'अवधुतगीता' हा ग्रंथ नाथपंथीयांमध्ये प्रमाणग्रंथ मानला जातो इतकी त्याची योग्यता मोठी आहे.
कारण ह्या गीतेत श्रोता आहे तो कार्तिकेय आणि उपदेशक आहे भगवान् श्रीदत्तात्रेय.
या ग्रंथात सर्वव्यापक असा केवळ आत्माच असून तेथे कसल्याही प्रकारचा भेदाभेद असू शकत नाही हे वेदान्ताचे सार सांगितले आहे. ('आत्मैव केवलं सर्वं भेदाभेदो न विते')
आत्मा हा शुद्ध, निर्मळ, अव्यय, अनंत, शुद्ध ज्ञानस्वरूप आणि सुखदुःखातीत असा आहे.
तो आतून व बाहेरून चैतन्यरूपाने नटलेला आहे.
साकार व सगुण हे सर्व खोटे असून निराकार, शुद्ध, नाशरहित व जन्मरहित असा एक आत्माच सत्य आहे.
त्याला आदि, मध्य व अंत अशा अवस्था नाहीत.
तो पुरूष नाही की स्त्री वा नपुंसकही नाही.
तो षडंगयोगाने वा मनोनाशाने शुद्ध होत नाही.
कारण तो स्वभावतःच शुद्ध आणि निर्मळ आहे.
अशाप्रकारे या 'अवधूतगीते'त आत्मतत्त्वाचा ऊहापोह असून सर्व नाथसिद्धांना गुरुस्थानी असलेल्या भगवान् दत्तात्रेयांच्या मुखातूनच या गीतेचा उदय झालेला असल्यामुळे समस्त नाथपंथात या 'अवधुतगीते'ला फार महत्वाचे व मानाचे स्थान प्राप्त झाले आहे

गोरक्षनाथांचा उपदेश व तत्त्वज्ञान
ते म्हणतात, 'ज्याने जिभेवर नियंत्रण मिळविले त्याने सर्व काही जिंकले.
फाजील आहार घेतल्याने इंद्रिये प्रबल होऊन ज्ञान नष्ट होते.
जो मनुष्य आसन, आहार व निद्रा यांच्या संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करतो तो वृद्धावस्थेवरच नव्हे, तर मृत्यूवरही मात करतो.
मांस, मदिरा भक्षण करण्यापासुन जो आनंद मिळतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आनंद योगसाधना करून मिळतो.
कोणत्याही प्राणी जीवाची हत्या कधीच करू नका.
त्याच्यावर दया करा.
कारण सर्व योगसाधनेचे व अध्यात्माचे मूळ दया हेच आहे.
आपले आचार-विचार शुद्ध राखण्यासाठी साधकाने काम, क्रोध, अहंकार, विषयविकार, तृष्णा आणि लोभ यांचा त्याग करायला हवा.
ब्रह्माला विसरू नका,ब्रह्मज्ञानाचीच चर्चा चालू असायला हवी.
अल्प-स्वल्प आहार हाच शरीररक्षणाचा उत्तम उपाय आहे.
त्यायोगे नाड्यांमध्ये मलाचा संचय होणार नाही व प्राणायाम सोपा होईल, व चक्रांचा भेद होईल आणि योग्याला अनाहत ध्वनी ऐकू येईल.
कमी खाण्याप्रमाणेच साधकाने कमी बोलायला हवे.
योग्याने वादविवादात कधीही भाग घेऊ नये.
तसेच मुर्खांशी मैत्री करू नये.
योग्याने हे सर्व नियम पाळून आपल्या कुंडलिनीला जाग आणून त्या महाशक्तीला ब्रह्मारंध्रामध्ये नेऊन बसवायला हवे.
तसेच योग्याने आत्मस्थ होऊन प्राणायामाची साधना नियमितपणे करायला हवी.
आपल्या शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी दर तीन-चार महिन्यांच्या अंतराने त्याने कायाकल्पही करायला हवा.

गोरक्षनाथांच्या काळात भारतातील अनेक धर्मसंप्रदायांमध्ये वामाचार सुरू झाला होता,आणि पंचमकरांना (मांस, मद्य, मैथुन इ.) प्रमाणाबाहेर महत्व प्राप्त झाले होते.
स्वतःला साधक म्हणविणारे आपल्या वासनापुर्तीसाठी याचा सर्रास उपयोग करीत होते.
याला पायबंद घालण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी साधनांची पवित्रता, शुद्ध चारित्र्य आणि संयमपूर्ण नीतिमान जीवनाचे महत्व आपल्या ग्रंथाद्वारे व उपदेशाद्वारे साधकांना पटवून देण्याचे फार मोठे कार्य केले, व स्वतःचाच आदर्श त्यांच्यापुढे ठेवला.

त्यांचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी शैव संप्रदायाचे संघटन करून तो संप्रदाय बलशाली केला, व त्यात नीतिमान, सदाचारी व संयमी साधक निर्माण केले.
तसेच त्यांनी या पंथात जातिभेद वा धर्मभेद कधीही मानला नाही.
त्यांनी यवनांनाही तितक्याच मुक्तपणे आपल्या पंथात प्रवेश दिला.
आद्य शंकराचार्यांनी मोक्षासाठी जसे ज्ञानमार्गाला प्राधान्य दिले तसेच गोरक्षनाथांनी त्याच ध्येयपूर्तीसाठी योगमार्गाला महत्व दिले.
त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ आधार 'सांख्यमत' हा असून 'पिण्डी ते ब्रम्हांडी' या गोष्टीवर त्यांचा मुख्य भर आहे.
आपल्या शरीरात सारे ब्रम्हांड सुक्ष्म रूपाने वसत आहे.
मृत्यूनंतरची मुक्ती ही गोरक्षांच्या तत्त्वज्ञानात बसत नाही.
मंत्रयोग, लययोग, हठयोग आणि राजयोग यांच्या साहाय्याने नाथयोगी आपल्या देहालाच शिवस्वरूप बनवून याच देही मुक्त होऊ शकतो आणि यासाठीच षट्चक्रे, पंचआकाश, नवद्वारे इ. चे सम्यक् ज्ञान नाथयोग्याला असणे आवश्यक आहे.

कुंडलिनी जागृतीलाही नाथसंप्रदायात विशेष महत्वाचे स्थान आहे.
कारण या कुंडलिनीशक्तीच्या द्वारेच जीवशीव सामरस्याचा अनुभव नाथयोग्याला येतो.
मात्र हा अनुभव गुरुकृपेवाचून मिळणे दुरापास्त असल्यामुळे नाथपंथात गुरुला अपरंपार महत्व आहे.
अशा गुरुच्या ठिकाणी ३६ लक्षणे वा गुण असावयास पाहिजेत. एवढेच नव्हे, तर शिष्यातही ३२ लक्षणे वा गुण असल्यावाचून त्यास शिष्य होता येत नाही.
या संप्रदायात शरीर हेच मोक्षप्राप्तीचे किंवा कैवल्यप्राप्तीचे साधन असल्यामुळे ते उपेक्षणीय समजले जात नाही.
आमच्या उपनिषदांतही याचसाठी शरीररक्षणाला महत्व दिलेले आढळून येते.
हठयोगाच्या साहाय्याने साधकाला याचि देही याचि डोळा हा मुक्तीचा सोहळा अनुभवता येतो असे नाथांचे तत्त्वज्ञान सांगते.

नाथांचे हे तत्त्वज्ञान हे द्वैत अद्वैताच्या पलीकडचे आहे.
एकच अद्वितीय असे परमतत्त्व शिव आणि शक्ती अशा दोन अवस्थांमधून प्रकट होते,व शिव हाच शक्तिरूप बनुन सर्व दृश्यसृष्टीमध्ये प्रकटतो असे हे तत्त्वज्ञान सांगते.
गोरक्षनाथांनी सांगितलेला योगमार्ग हा 'हठयोग' आहे. ह=सूर्य आणि ठ-चंद्र. म्हणजेच हा सूर्यचंद्रांचा योग आहे. सूर्य प्राणवायू आणि चंद्र अपानवायू.
या दोहोंचा योग तो हठयोग.
श्रीगोरक्षनाथांच्या तत्त्वज्ञानात योग, ज्ञान आणि भक्ती यांना सारखेच महत्व असून शिवाकडून योगविद्या, ब्रह्माकडून ज्ञान आणि विष्णूकडून भक्ती यांची प्राप्ती होते असे हा संप्रदाय मानतो.
तसेच, ह्या तिन्ही दैवतांच्या शक्ती श्रीदत्तात्रेयांमध्ये एकवटल्या आहेत असेही या संप्रदायात सांगितले आहे.

गोरक्षनाथांच्या धर्मसाधनेत निगम, आगम, मंत्र-तंत्र, वज्रयान, हनियान, सिद्धयोगी इ. चा समावेश होत असला तरी वैदिकांचे शुष्क व नीरस कर्मकाण्ड त्यांनी वगळले.
तांत्रिकांचा व शाक्तांचा वामाचार त्यांनी त्याज्य मानला.
जारण, मारण, उच्चाटन यांच्यापेक्षा देहशुद्धी, ध्यानयोग, कुंडलिनीजागृती यांनी त्यांनी आपला साधनेत महत्वाचे स्थान दिले.
वैदिक कर्मकांडाला व तांत्रिकांच्या वामचाराला विरोध करून त्यांनी आपली योगसाधना कर्मयोग व भक्तियोग यांच्याद्वारे समाजाभिमुख केली.
इंद्रियनिग्रह, आत्मसाधना, मनोविकास यांना महत्व देऊन धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद यांचा विचार न करता त्यांनी भारतीय धर्मसाधनेची बैठक अधिक विस्तृत केली.
गुरु गोरक्षनाथांची महती गाण्यासाठी कित्येक ग्रंथ लिहिले तरी ते अपुरे पडतील, इतके ते महान होते .
अहमदनगर-वांबोरी रस्त्यावर डोंगरगण येथुन मांजरसुंबा याठिकाणी गर्भागिरी पर्वतावर श्री गोरक्षनाथ गड आहे.
या ठिकाणी श्री गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केले होते.
हिरवाईने नटलेल्या डोंगरावर नाथांचे सुंदर मंदिर आहे.
येथे श्री गोरक्षनाथांची काळ्या पाषाणाची प्राचीन स्वयंभू मुर्ती आहे.
याठिकाणी दरवर्षी कार्तिक शुद्ध ञयोदशीला गोरक्षनाथ प्रगट दिन सोहळा साजरा होतो.

गोरक्षनाथ प्रकट दिनाचे दिवशी भक्त आपल्या घरी श्री नवनाथांची प्रतिमा वस्ञाने स्वच्छ पुसुन केशरी गंध लावतात.
फुले अर्पण करुन हार घालतात .
त्यानंतर धुप व तुपाचा दिवा लावतात.
नैवद्यासाठी मलिदा अर्पण करतात.
प्रतिमा पुजेनंतर आसनावर बसुन एकाग्र चित्ताने "ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः" या मंञाचा १०८ वेळेस माळ जप करतात व नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील गोरक्षनाथांचा जन्मकथा असलेला ९ वा अध्याय वाचतात.
नंतर आरती करतात. गाईला नैवद्य देतात.
सर्वांना प्रसाद देऊन यथाशक्ती अन्नदान करतात.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED