Ahamsmi yodh - 5 books and stories free download online pdf in Marathi

अहमस्मि योधः भाग -५

घरातून निघून समीर रेल्वे स्टेशनकडे चालत निघाला. आसपास नीरव शांतता पसरली होती..रस्त्यावर काही ठिकाणी दुकानांच्या बंद शटर बाहेर झोपलेली माणसं होती. अधूनमधून एखाददुसऱ्या कुत्र्याचे भुंकणे ही ऐकू येत होते. अचानक पावसाची रिमझीम चालू झाली..घाईगडबडीत निघाल्यामुळे समीर छत्री सोबत आणायला विसरला होता..पावसाची पर्वा न करता त्याने रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली.

थोड्यावेळाने तो रेल्वेच्या फलाटावर पोहोचला आणि तिकीट काढून घेतलं. ट्रेन अजून आली न्हवती म्हणून त्याने स्थानकावरील चहा विक्रेत्याकडून चहा घेतला. चहाने त्याला थोडी तरतरी आली पण तरीही झोप नसल्याने त्याचे डोळे लाल झाले होते. तितक्यात त्याला लांबून ट्रेन येताना दिसली आणि तो ट्रेन पकडण्यासाठी थोडा सावध झाला. ट्रेन मध्ये जास्त गर्दी न्हवती म्हणून त्याला लगेच बसायला जागा मिळाली.काहिकरून संध्याकाळी मुंबईला परत यायचं या हिशोबाने त्याने फ्लाईट ची तिकीट ऑनलाईन बुक करून घेतली.. ट्रेनने मुंबईहून कोल्हापूरला पोहचायला साधारण १२ तास लागतात..पण जाताना फ्लाईट उपलब्ध नसल्याने नाईलाज होता..

तो डोळे मिटून तसाच बसून राहिला.. बसल्या बसल्या त्याला कधी झोप लागली हे देखील समजलं नाही..सकाळी ८:३० च्या सुमारास त्याला जाग आली तेव्हा गाडी पुणे स्थानकावर पोहोचली होती.. आता प्रवाशांची गर्दी वाढली होती..समीरने पटकन जाऊन खायला काहीतरी आणलं..आणि पुन्हा गर्दीतून मार्ग काढत जागेवर येऊन बसला आणि दिग्याला फोन लावला.

" हॅलो..दिग्या..तिकडे सगळं ठीक आहे ना.." - समीर.

" हो..तू लवकरच कॉलेज ला निघून गेलास..असं सांगून गुंडळलं म्हाताऱ्याला.." समोरून दिग्या उत्तर देतो.. "बरं तू कुठे आहेस आता.."

" पुण्यात आहे सध्या.. तीन - साडे तीन वाजतील कोल्हापूरात पोहचायला.." - समीर.

"अच्छा..मी आता जातोय त्या गणपतला गाठायला.." - दिग्या.

"नीट जा रे बाबा..काळजी घे..ठेवतो फोन.." - एवढं बोलून समीरने फोन ठेऊन दिला..आणि इंटरनेट चालू करून त्या प्राचीन "ब्राह्मी लिपी" बद्दलची माहिती वाचू लागला.

*************************************
.

दिग्या घरातून निघण्याच्या तयारीत असतो तेव्हा दत्तू काका त्याला आजोबांच्या खोलीत काहीतरी शोधताना दिसतात तो तिथेच थांबून लपून सगळं पाहत असतो..

" हा म्हातारा काय घोळ घालतोय..कुणास ठाऊक.." दिग्या स्वतःशीच पुटपुटला.

थोड्यावेळाने दत्तू काका निघून जातात..दिग्या ही गुपचूप घरातून बाहेर पडतो..आणि गणपतच्या वस्ती कडे निघून जातो..दोन तीन वेळा येऊन गेल्या मुळे त्याला जंगलातली ती पायवाट अगदी पाठ झाली होती..झपाझप पावलं टाकीत तो जंगलाच्या दुसऱ्या बाजूला एका गावाच्या वेशीवर येऊन पोहोचतो.. गणपतच्या सांगण्याप्रमाणे हेच त्याचे गाव असावे म्हणून दिग्या गावात जातो..पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात गारवा होता..गावात अगदी भयाण शांतता होती..जसजसा तो पुढे जात होता त्याला बायकांच्या रडण्याचे आवाज येऊ लागले..क्षणभर तो जागीच थांबला आणि पुन्हा त्या दिशेने गेला..

समोर बघितलं तर एका छोट्याश्या घरा बाहेर लोकांची गर्दी जमली होती.. काही जण डोक्याला हात लावून उभे होते..बायकांचा रडण्याचा आवाज सुरूच होता..इथे नक्कीच एखाद्याच निधन झालं असणार..

"अहो दादा..!! ऐका ना..काय झालय इथे.??" दिग्या ने तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला विचारलं.

"आरं दादा.. दिसना व्हय तुला.. त्यो गनप्या..गेला म्हातारी ला एकटं टाकून.. तळ्यापाशी घावला पोरांना..मेलेला.. लई वाईट झालं.." तो माणूस म्हणाला.

हे ऐकुन दिग्याला धक्काच बसला..
" कधी झालं हे..? कोणी केलं असणार..?" दिग्याने विचारलं.

" काल दुपारपासून गायब व्हता.. तरी सांगितलं व्हतं..त्या साहेबाच्या नादी लागू नको म्हणून तरी बी नाय ऐकला..पैश्या पाई जीवला मुकला.. चला निघतो मी.." असं बोलून तो माणूस निघून गेला..

तेवढ्यात तिथे पोलिस येतात..आणि सगळी गर्दी एकदम बाजूला होते..दिग्या अजून पुढे न जाता गुपचूप तिथूनच माघारी फिरतो..आणि परती च्या वाटेवर निघतो..

गणपत चा खून का झाला असेल..? ह्या विचारातच तो परत आला..पण येताना त्याला अचानक रस्त्यातच दत्तू काका दिसले.. त्यांना बघून तो घबरलाच..पटकन मान खाली घालून तो दुसरी कडे बघत लपून बसला..सुदैवाने घाईत असल्यामुळे..त्यांनी दिग्याला पाहिलं नाही..

पण आता दिग्या मात्र त्यांचा पाठलाग करू लागला..तो अगदी सुरक्षित अंतर ठेऊन त्यांच्या मागे चालत होता..थोड्याच वेळात ते एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाताना दिसले..

"एवढ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये का आला हा.. याचं काय काम इथे..?" असा विचार दिग्याच्या मनात आला..तो तिथेच लपून बसला..अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने कोणाला तरी फोन लावला..

" हॅलो..दिगंबर बोलतोय.. मित्रा एक काम आहे तुझ्याकडे.. आताच एक म्हातारा हॉस्पिटल मध्ये आलाय..फिक्कट पिवळा शर्ट , पांढऱ्या रंगाचा धोतर...आणि डोक्यावर टोपी..तो का आलाय ह्याची सगळी माहिती हवी आहे.." दिग्या त्या समोरच्या व्यक्तीला म्हणाला.

"अच्छा बघतो मी पण..ते...जरा..चहा-पाणी...मिळालं असतं तर......" - समोरची व्यक्ती.

"घुसखोर..साला..पैसे मिळतील तुला..मी फोन केल्यावर नाक्याच्या पान टप्री जवळ भेट.." दिग्या त्रस्त आवाजात म्हणाला..तो व्यक्ती नक्कीच हॉस्पिटलचा कर्मचारी असेल हे स्पष्ट होतं.

दिग्या पुन्हा हॉस्पिटल च्या गेट कडे टक लावून दत्तू काकांची वाट बघत बसला..तेवढ्यात मागून कोणीतरी येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवलं..आणि तो दचकला.. आता आपण पकडलो गेलो या विचाराने तो घाबरला.मागे वळून बघितलं तर ती स्नेहा होती..

" दिगंबर अरे..एवढं दचकायला काय झालं.. कोणाची वाट बघतोय ??" स्नेहा हसतच म्हणाली..

" तू.....तू..काय करतेस इथे..?" - दिग्या.

"काही नाही..असच बाजारात आले होते.." - स्नेहा.

"अच्छा.. अच्छा.." - दिग्या.

" तुमचं काय चाललंय ?? आणि समीर कुठे आहे? एक साधा फोन पण नाही केला.." स्नेहा जरा चिडूनच म्हणाली..

"ते..आम्ही जरा बिझी असतो ना हल्ली..मी सांगतो सम्याला तुला कॉल करायला...चल निघतो मी.. बाय.." आणि दिग्या घाई घाई ने निघून जातो..

*************************************
.

कोल्हापूर रेल्वे स्थानकाहून एस.टी. पकडून समीर पावणे चारच्या सुमारास दत्तू काकांच्या गावी पोहोचला.. गावाच्या मधोमध उभ्या भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बांधलेल्या पार कट्ट्याला वळसा घालून एस.टी. थांबली तसे कोणी गावकरी आपली बोचकी , गाठोडी घेऊन उतरू लागले..समीरही त्यांच्या पाठोपाठ उतरला.. दिवसभराच्या प्रवासामुळे त्याला थकवा जाणवत होता...

या गावात समीर पहिल्यांदाच आला होता.. थोडं पुढे चालत गेल्यावर..समीर एका दुकानाजवळ पोहोचतो..

" नमस्कार काका , दत्ताराम गायकवाड यांचं घर कुठे आहे.." समीर म्हणाला.

" तुम्ही कोण ? कुठून आलात? " वृत्तपत्रात डोकं खुपसून बसलेल्या त्या व्यक्तीने डोकं वर काढलं आणि विचारलं.

" मी समीर देवधर , मुंबईहून आलोय..मला त्यांच्या मुलाला म्हणजेच अशोक गायकवाड ला भेटायचं आहे.." - समीर.

" अच्छा..मुंबईहून आलात तुम्ही..!!" तो दुकानदार आश्चर्याने म्हणाला. " इथून सरळ गेला की डावी कडे वळा..तिथे मारुतीच्या देवळाच्या बाजूलाच आहे अशोकच घर..."

" धन्यवाद काका.. " असं म्हणून समीर मागेवळून पुन्हा चालू लागला..

" बाप गेल्यापासून दोन वर्षात पहिल्यांदाच कोणीतरी दत्तूच्या पोराला भेटायला आलं.. चांगलं आहे.." तो दुकानदार हळू आवाजात स्वतःशीच बोलला..

हे ऐकल्यावर समीरची पावलं जागीच थांबली..त्याला स्वतःच्या कानांवर विश्वासाचं बसत न्हवता..पुन्हा येऊन त्याने त्या दुकानदाराला विचारलं..

" काका, आता काय बोललात तुम्ही..बाप गेल्यापासून म्हणजे..?? "

" आहो..दोन वर्षापूर्वीच दत्तू गेला..गाडीच्या अपघातात.." - दुकानदार म्हणाला.

" काय बोलताय तुम्ही..हे कसं शक्य आहे..!! " समीर पूर्णपणे भांबावून गेला होता..

" खरंच..तुम्ही जा त्याच्या घरी कळेल तुम्हाला.." - दुकानदार.

मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत तो पुन्हा चालू लागला. त्याची पावलं जड झाली होती..थोड्याच वेळात तो दुकानदाराने सांगितलेल्या घराबाहेर पोहोचतो..

" अशोक दादा.." समीर बाहेरूनच आवाज देतो..
तेवढ्यात घरातून एक तरुण बाहेर येतो..समीरला ला पाहून त्याला आनंद झालेला...तो पूर्वी अनेकदा मुंबईला यायचा म्हणून समीरची आणि त्याची चांगली ओळख होती..

" अरे..समीर तू अचानक इथे कसा काय..?? " अशोक आनंदाने म्हणतो..

" इथे कोल्हापूरला एक काम होतं..म्हणून विचार केला की तुला भेटून जावं.." समीरला अशोक वरही संशय होता..म्हणून त्याने खोटं सांगितलं..

समीरने घरात प्रवेश केला आणि सर्वप्रथम त्याची नजर पडली ती हॉल मध्ल्या भिंतींवर दत्तू काकांच्या हार घातलेल्या फोटो वर..!! मधमाश्यांचे मोहोळ उठावे , तसं असल्यास अनेक प्रश्नांनी समीरच्या मनाला दंश करायला सुरुवात केली.त्याच मन कमालीचं अस्वस्थ झालं..मग आपल्या घरी जो आहे तो कोण..? असे असंख्य प्रश्न त्याला पडले होते..तो पूर्णपणे हादरला होता.

" बाबांना जाऊन दोन वर्ष कशी निघून गेली कळलं ही नाही.." अशोक.

समीर काहीच बोलला नाही..काही बोलायच्या मनस्थितीत तो नव्हताच..

" बरं..घरी सगळे कसे आहेत..आई बाबा..? " अशोकने समीरला विचारलं.

" ठीक आहेत.." - समीर.

" प्रकाश दादांना नमस्कार सांग माझा.. वडिलांचा मृतदेह घेऊन आले होते.. तेव्हाच मी त्यांना अखेरचं भेटलो होतो..अगदी मोठ्या भावा सारखा आधार दिला होता त्यांनी..त्या वेळी.." - अशोक.

" काय.. बाबा आले होते..!! " समीर गोंधळलेल्या नजरेने अशोक कडे बघत म्हणाला..

" हो..तुला या बद्दल काहीच माहीत नाही का.." अशोक.

"नाही.." - समीर.

आता मात्र समीरच्या पायाखालची जमीनच सरकली...लागोपाठ त्याला हा दुसरा धक्का बसला होता..दुसरे तिसरे कोणी नाही तर स्वतःच्या वडिलांवर संशय घ्यायची वेळ त्याच्यावर आली होती..पण संशय घ्यायचा तरी का..? त्यांचा गुन्हा काय..? हे ही माहित नाही..या विचारांनी त्याच डोकं चक्रावून गेलं..

तश्याच संभ्रमावस्थेत त्याने अशोकचा निरोप घेतला आणि परतीचा प्रवास सुरू केला..बस पकडून तो एअरपोर्टवर पोहोचला.. फ्लाईट ला अजून वेळ होतं..वेटींग रुममध्ये बसल्या बसल्या त्याने डोळे मिटले...आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करत होता..डोक्यात प्रश्नांचा गुंता तसाच होता..एक दीर्घ श्वास घेत त्याने खिश्यातून मोबाईल काढला आणि दिग्या ला फोन केला..

एक रिंग वाजली आणि लगेच फोन उचलला गेला..

" हॅलो..दिग्या कुठे आहेस तू.." समीर गंभीरपणे म्हणाला..

" हा भाई...मी बाजारात आहे..तूझा आवाज असा का येतोय..काय झालं..??" भीतीयुक्त उत्सुकतेने दिग्याने समीरला विचारले.

" काहीही झालं तरी घरी जाऊ नकोस..तो माणूस दत्तू काका नाही..कोणीतरी सोंगाड्या आहे.." - समीरने दिग्या ला बजावले.

" अरे..काय बोलतोय तू.." दिग्याने आश्चर्याने विचारले.

" मी निघालोय आता..रात्री दहा पर्यंत पोहोचतो तिथे..तू एअरपोर्टला ये..मग बघू काय करायचं ते.." - समीर.

" इकडे पण जाम लोचे झालेत..तू ये मग बोलू.." - दिग्या.

दिग्याशी बोलून झालयावर समीरने दुसरा फोन केला तो त्याच्या आई-बाबांना पण काळजीत भर टाकणारी गोष्ट म्हणजे दोघांचेही फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते..अनिकेत दादाला फोन करून बघितलं पण तो ही फोन उचलत नव्हता.

" काय चाललंय हे..काही कळायला मार्ग नाही.." समीर वैतागून म्हणाला.

लगोलग समीरचा फोन वाजला..स्क्रीन वर स्नेहा च नाव दिसत होतं..त्याने फोन उचलला..

" काय रे..एवढा बिझी आहेस तू...आठवण आहे की नाही..." - स्नेहा.

समीर काहीच बोलला नाही..

" हॅलो..बोल काहीतरी.." - स्नेहा.

तेवढयात फ्लाईट निघण्यापूर्वी ची घोषणा झाली..
" स्नेहा..आपण नंतर बोलू हा..चल बाय.." समीर घाईगडबडीत म्हणाला.

" हॅलो..समीर..हॅलोऽऽ.." स्नेहा बोलत होती पण तो पर्यंत समीरने फोन कट केला होता..

विमानात सीट शोधून समीरने व्यवस्थित बसून घेतले..घडलेल्या सगळ्या घटनांचा तो क्रमाने विचार करत होता..परंतु अद्याप कोणत्याही निष्कर्षावर तो पोहोचला न्हवता. विमानाने अवघ्या दीड ते दोन तासात कोल्हापूर ते मुंबई हे अंतर कापता येतं..म्हणून दहा वाजे पर्यंत तो मुंबईत दाखल झाला होता..ठरल्याप्रमाणे दिग्या एअरपोर्ट वरच त्याची वाट बघत होता..दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली आणि बाईकवर बसून निघाले..

दिग्याने गणपतच्या खुनाबद्दल आणि दत्तू काकांचं सोंग घेऊन वावरणाऱ्या त्या माणसाचा केलेला पाठलाग हे सगळं समीरला सविस्तर सांगितलं..
समीरने ही दत्तू काकांची सगळी हकीकत दिग्याला सांगितली..

" नक्कीच त्या गणपत कडे अशी काहीतरी माहीती असेल जी आपल्या पर्यंत मुद्दाम पोचू दिली नाही.." - समीर.

" ते आपण शोधून काढूच..मी माझ्या मित्राला मगाशीच फोन करून टप्री जवळ यायला सांगितलं आहे..एव्हाना तो पोचला ही असेल.." दिग्या म्हणाला.

थोड्याच वेळात दोघं टप्री जवळ पोहोचतात.. दिग्याचा मित्र आधीच तिथे त्यांची वाट बघत उभा असतो..

.....................................................................................................................................

क्रमशः

अजुन एक धक्कादायक माहिती समीर आणि दिग्याची वाट बघत असते..!!
आता धोका वाढलाय..!!


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED