मायाजाल- ५
गेली अनेक वर्षे इंद्रजीतशी मैत्रीचं नातं होतं. पण त्याला कधी इतका रागावलेला हर्षदने पाहिला नव्हता.
"त्याला आता प्रज्ञा माझ्यापेक्षा जवळची वाटू लागली? ही लक्षणं काही चांगली नाहीत! जर त्यानं मनात आणलं; तर मुलींवर मोहिनी घालायला त्याला फार वेळ लागत नाही! प्रज्ञाला जाळ्यात ओढण्यात तो यशस्वी झाला तर-----नाही! नाही! काहीही झालं तरी मी असं होऊ देणार नाही. जीत जरी माझा मित्र असला तरीही प्रज्ञा हे माझं प्रेम आहे. तिला माझ्यापासून कोणी हिरावून घेत असेल; तर ते मी खपवून घेणार नाही!" तो स्वतःशीच चरफडत होता.
पण दुसऱ्याच क्षणी तो स्वतःशी हसला.
" मी का काळजी करतोय? त्याच्या मनात काहीही असो; त्याला कसं दूर ठेवायचं हे प्रज्ञाला चांगलंच माहित आहे. ती त्याला जवळीक वाढवू देणार नाही.. डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची हे तिचं ध्येय आहे. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर कुठेही तिचं लक्ष जाणं शक्य नाही. मला घाबरायचं काही कारणच नाही!"
पण जीतची हुशारी आणि त्याचं देखणं रूप, समोरच्या माणसावर छाप पाडणारं व्यक्तिमत्व---- या सगळ्या गोष्टींकडे त्याचं दुर्लक्ष करून चालणार नव्हतं! त्याने ठरवलं,
"मला काहीही करून तिला तिकडे जाण्यापासून थांबवलंच पाहिजे!".
*********
हर्षदकडे बराच वेळ गेला होता; त्यामुळे इंद्रजीत प्रज्ञाकडे फार वेळ थांबला नाही. त्याने प्रज्ञाला काही सूचना दिल्या. महत्वाच्या अभ्यासाच्या वस्तूंची यादी देऊन, "घ्यायला विसरू नकोस तिकडे हे घेऊन आली नाहीस, तर तुझी फक्त पिकनिक होईल----- तिकडे येण्याचा हेतू साध्य होणार नाही--- " हे सांगायला तो विसरला नाही. नीनाताईंना म्हणाला,
"तिकडे इंटरनेटला प्राॅब्लेम होतो. अाणि फोनला रेंज मिळत नाही. हिचा फोन किंवा मेसेज आला नाही; तर काळजी करू नका. ---- आणि खाण्यापिण्याच्या वस्तू जास्त देऊ नका. तिकडे सगळी व्यवस्था आहे." त्याला निघण्याच्या तयारीत बघून नीनाताई म्हणाल्या,
"तू लगेच कुठे निघालास? बस! तुझ्यासाठी काॅफी करून आणते. काॅलेजमधून आला असशील नं?"काॅलेजमध्ये त्याचे कपडे हलक्या रंगाचे असत. त्याच्या भडक रंगाच्या लेटेस्ट फॅशनच्या कपड्यांकडे बघून प्रज्ञा हसली.
प्रज्ञाला हसताना बघून जीत ओशाळून म्हणाला,
"मी घरी जाऊन आलो. आणि आताच हर्षदकडे चहा घेतला. मलासुद्धा तिकडे जाण्यासाठी थोडी तयारी करायची आहे! पुढच्या वेळी नक्की गप्पा मारत बसेन! आता निघतो!"
*********
इंद्रजीत बिल्डिंगच्या बाहेर पडला; हे पाहिलं; आणि हर्षद आईला म्हणाला,
"आई! चिवडा छान झालाय! निमेशला तू केलेला चिवडा खूप आवडतो! थोडा पॅक करून देतेस का?"
आईने दिलेलं पॅकेट घेऊन तो प्रज्ञाकडे गेला.
प्रज्ञाने मोठी बॅग काढली होती. स्वेटर, कपडे भरायला सुरुवात केली होती. अजून निघायला दोन दिवस होते; पण प्रथमच ती कुठेतरी एकटी जाणार होती. उत्साहाने तिने जायची तयारी करायला सुरूवात केली होती.
" काकू! आईने निमेशसाठी चिवडा पाठवलाय! अरे! प्रज्ञा! एवढी कसली तयारी चाललीय? कपडे बॅगेत भरून कुठे चाललीयस? आणि मुंबईत अजून थंडी सुरू झाली नाही! हा स्वेटर कशासाठी?? " सगळं माहीत असून तो मुद्दाम विचारत होता.
" आमच्या काॅलेजचं शिबिर आहे चार दिवसांसाठी! डोंगराळ भाग आहे; म्हणून थोडी खबरदारी!" प्रज्ञा हसत म्हणाली. तिच्या आनंदावर विरजण घालणं हर्षदच्या जिवावर आलं होतं,, पण इलाज नव्हता. तिने इंद्रजीतबरोबर शिबिराला जाणं त्याच्यासाठी धोक्याचं ठरणार होतं..
"तिथली थंडी हिला झेपेल का? आणि तिकडचे लोकही चांगले नसतात. खुप मागासलेले लोक आहेत! तुला तिथे गेलंच पाहिजे का? काॅलेजमध्येही तू अजून नवीन आहेस! फार कोणाला ओळखत नाहीस! तुझ्या काॅलेजमधल्या मैत्रिणी तरी आहेत का तुझ्याबरोबर?" हर्षदचे प्रश्न संपत नव्हते. प्रज्ञाला सल्ला देताना हर्षद माहिती कढून घेण्याचा प्रयत्न करत होता.
" नाही रे! आमच्यापैकी फक्त मलाच ही संधी मिळाली आहे! पण काॅलेजमधले इतर स्टुडंट आणि डाॅक्टर्स आहेत नं! " प्रज्ञा म्हणाली.
"काकू! माझं असं मत आहे की या वर्षी तरी हिने जाऊ नये! काॅलेज नवीन आहे, बरोबर येणारे विद्यार्थी अनोळखी आहेत; खूप मोठी रिस्क घेताय तुम्ही! तिकडे जाताना घाटात दरडी कोसळतात. जर काही करणास्तव गाडी बंद पडली तर रस्ता खराब--- आणि वाहतुकीची साधने कमी ---फार हाल होतात. मी त्या बाजूला अनेक वेळा मित्रांबरोबर ट्रेकिंगला गेलो आहे; त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे."
एकदा प्रज्ञाला परवानगी दिल्यावर हर्षदला काय उत्तर द्यावं; नीनाताईंना सुचत नव्हतं. "बस हर्षद! तुझ्यासाठी सरबत घेऊन येते!" म्हणत त्या किचनमध्ये गेल्या.
प्रज्ञाकडे बघत हर्षद परत म्हणाला,
" प्रज्ञा! जाण्यापुर्वी परत एकदा विचार कर!"
प्रज्ञा लहान होती; तेव्हा नीनाताई एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. त्यावेळी प्रज्ञा दिवसभर माईंकडे असे. तेव्हापासून हर्षदची आणि तिची मैत्री होती. त्या घराने तिला एवढा लळा लावला होता; की आपण दुस-या कोणाच्या घरी रहातो; असं तिला कधीच वाटलं नव्हतं.
अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबाचे जवळचे संबंध असल्यामुळे एवढा सल्ला देण्याएवढी मोकळीक हर्षदला नक्कीच होती.
" आता मी त्यांना माझी संमती दिलीय! नाही म्हणता येणार नाही! प्रत्येक वर्गातल्या एकाच स्टुडंटला घेतलंय! ही मला मोठी संधी मिळतेय; ती मी हातची जाऊ देणार नाही. प्लीज! तू आईला काही - बाही सांगून घाबरवू नकोस! मोठ्या मिनतवारीने ती पाठवायला तयार झालीय!" आई हर्षदसाठी सरबत आणायला गेली आहे हे पाहून प्रज्ञाने हळू आवाजात हर्षदला समजावलं.
हर्षद काही बोलायचा प्रयत्न करत होता, "पण----"
त्याला मधेच थांबवून प्रज्ञा पुढे बोलू लागली,
" फक्त अभ्यास करून आणि पुस्तकं वाचून आत्मविश्वास येत नाही, त्यासाठी अनुभव लागतो. उद्या डाॅक्टर म्हणून पेशंटना ट्रीटमेंट देताना मला अनुभवाची गरज लागणार आहे! नेहमी घाबरून घरी बसून राहिले तर मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही. रिस्क कधी ना कधी घ्यावीच लागते! काळजी करू नकोस! जरी मागासलेली असली, गरीब असली, तरीही तिथेही आपल्यासारखी माणसंच रहातात. त्यांना मदतीची गरज आहे. मार्गदर्शनाची गरज आहे. काॅलेजने सगळं व्यवस्थित मॅनेज केलंय! घाबरण्याची गरज नाही." ती हे बोलत असताना नीनाताई आल्या.
"अाणि इंद्रजीत आहे नं तिच्याबरोबर! तो ब-याच वेळा जाऊन आलाय! त्याला सगळं माहीत आहे! त्याच्या भरवशावर आम्ही प्रज्ञाला तिकडे पाठवतोय!" त्याच्या हातात सरबताचा ग्लास देत नीनाताई म्हणाल्या,
हे ऐकून हर्षद मनातून कितीही जळफळला; तरी त्याने चेह-यावर काही दिसू दिलं नाही
"तू तयारी कर, मी स्वयंपाकाचं बघते." म्हणत नीनाताई आत गेल्या.
"तू इंद्रजीतवर फार भरवसा ठेवू नकोस! जरी माझा मित्र असला तरीही तो विश्वासपात्र नाही! तू माझी मैत्रीण आहेस; तुला सावध करणं माझं कर्तव्य आहे!" हर्षद प्रज्ञा तरी आपल्या म्हणण्याचा थोडा तरी विचार करेल; या आशेने तिला समजावू लागला.
प्रज्ञाविषयी हर्षदने इंद्रजीतला सपशेल खोटं सांगितलं होतं. पण इंद्रजीतविषयी त्याचे विचार बनावट नव्हते. तो गेली अनेक वर्षे त्याला ओळखत होता. इंद्रजीतचा स्वभाव किती उच्छृंखल आहे, हे तो पूर्णपणे जाणून होता. तो कोणत्याही मुलीविषयी कधी सीरियस नव्हता, हे त्याने पाहिलेलं होतं. प्रज्ञावर हर्षदचं मनापासून प्रेम होतं. जरी इंद्रजीत तिचं मन जिंकण्यात यशस्वी झाला, तरी फार काळ तो एका ठिकाणी गुंतून रहाणार नाही याची त्याला खात्री होती. त्यामुळे तिला सावध करण्याचा त्याने प्रयत्न केला होता.
" इंद्रजीतचा इथे संबंध कुठे येतो. तो जसा स्टुडंट म्हणून जातोय, तशीच मीसुद्धा जाणार आहे. आणि मला खात्री आहे; गरज पडली, तर त्याची मला मदतच होईल, खूप चांगल्या स्वभावाचा मुलगा आहे तो! स्वतःच्या मित्राविषयी असं बोलणं योग्य नाही, हर्षद!"
" तू ठरवलं आहेस ; तर तुला कोण अडवणार? पण स्वतःची काळजी घे! आॅल द बेस्ट!" म्हणूत त्याने तिथून काढता पाय घेतला.
इंद्रजीतपासून प्रज्ञाला दूर ठेवण्याचा त्याचा हा प्रयत्नही सपशेल फसला होता.
********* contd--- chapter VI