भूक बळी भाग २ Vrushali द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भूक बळी भाग २

संध्याकाळची रात्र झाली होती. मागच्या कित्येक दिवसांत क्वचितच स्टोव्ह पेटला होता. आता तर बाटलीतील रॉकेलही तळाला गेलं होत. कोणाकडून मागावं तर आजूबाजूची मंडळीही तिच्यापेक्षाही गरीब. त्यातही अर्धेअधिक गावी पळालेले. नाही म्हणायला तिच्या गल्लीच्या दुसऱ्या टोकावर राहणारा कोणीतरी अजून इथेच होता. त्यांची तशी फारशी ओळख नव्हती. केवळ सार्वजानिक शौचालयाचा मार्ग त्यांच्या दरवाजातून जायचा म्हणून केवळ तोंडदेखली ओळख. त्यातही तिच्या भरलेल्या अंगावरून फिरणारी नजर तिला नेहमीच बोचायची. लॉकडाऊन झाल्यानंतर त्याच कुटुंब तिला दिसलं नव्हतं, कदाचित गावी गेले असावे. तिला एकटीच पाहून त्याने बरेचदा लाळघोटेपणा करत तिची चौकशी केली होती. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट व्यक्त होणारे भाव वाचून तिने नेहमीच त्याला नकार दिला होता. आतापर्यंत तिला आपला नवरा परतून येण्याची आशा होती परंतु संध्याकाळच्या फोननंतर तीही मावळली. अजून दोन महिने उपाशी काढणे तिच्यासाठी अशक्य होते. तीच काय तर तिच्या जागी अजून कोणी असत तर कदाचित इतका काही तग धरून राहील नसत. बाजारात जाऊन खरेदी करावी तर गाठीला शंभर रुपयेही नव्हते. उसने घ्यायला कोणी शेजारी नव्हता. विकायला गळ्यातलं मंगळसूत्र आणि हातातल्या दोन पातळ बांगड्यांव्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्या वस्तीच्या आसपास सोनाराच्या काय तर साधा भंगारवालाही नव्हता. गल्लीच्या टोकाला राहणाऱ्या त्या माणसाकडे मदत मागण्यावाचून काही पर्याय उरला नव्हता... पण तो मदत का करेल... त्याच्या नजरेतील अपेक्षा ओळखूनही त्याच्याकडे मदत मागणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं होत.. न मागितली तर असच उपासमारीत जगन अशक्य होत... काय करावं... आपल्या शीलाच्या संरक्षणार्थ उपाशी मरण अथवा त्याला शरण जात जगन... ती स्वतःच्याच विचारांत गुरफटली. तसही उपाशी राहायची तिला सवय होती परंतु ह्या प्रकारची उपासमार ती प्रथमच अनुभवत होती.

समोरच्या भिंतीवर ती एकटक नजर फिरवत राहिली. गरम झाल तस खिडकीचा पडदा जरासा किलकिला केला. एक थंडगार वाऱ्याची झुळूक तिच्या घामाने भिजलेल्या शरीराला थंडावून गेली. तेवढ्याशा गारव्यानेही तीच अंग शहारलं. ती थरथरली तस सोबतीला म्हणून भिंतीवरच कॅलेंडर उगाच फडफडलं. त्या आवाजाने तिची तंद्री भंग झाली. काहीतरी आठवलं म्हणून मोबाईलच्या बॅटरीचा प्रकाश फेकत कॅलेंडरच पान परतलं. चार दिवसांनी वटपौर्णिमा होती. मागच्या वर्षी ती किती नटली होती. बाजूच्या मिश्रा वहिनींनी तर दोन वेळा तिची नजर काढली होती. नुसत्या त्या आठवणीनेच ती मोहरली. क्षणभर आपल्या विचारांचाच तिला वैषम्य वाटलं. इतक्या खालच्या पातळीचा विचार कसा शिवू शकतो मनाला. कॅलेंडर तसंच भिंतीला लटकवत ती तिथेच भिंतीला पाठ लावून बसली. वाऱ्याने नुकत्याच थंड झालेल्या भिंतींच्या स्पर्शाने तिच्या पाठीवर शिरशिरी उमटली. एक ती सावित्री चक्क यमाशी सामना करायला गेली होती... आणि मी.. शी.. तिला स्वतःचीच किळस आली.

आपले पाय ओढून पोटाशी घेत तिने त्यावर आपली हनुवटी टेकवली. पोटातील घुरघुर तिला स्पष्ट ऐकू येत होती. आतडं पिळवटून टाकणारी भूक तिला पोटतिडकीने हाक मारत होती. ह्याक्षणी धरणी दुभंगून जावी आणि तिला पोटात घ्यावं मग सगळाच गुंता सुटून जाईल. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले. पोटातून छातीपर्यंत एक तीव्र सणक उमटली. हात पाय भुकेनं आणि भीतीने थरथरू लागले. डोक्यात उफाळणाऱ्या विचारांनी तीच डोकं भणाणून निघालं होत. क्षणभर तिला घरी पैसे न ठेवून जाणाऱ्या नवऱ्याचा राग आला. बाहेरगावी चाललंय तर साधी बायकोची काळजी नसावी का..? काळजी.. हा शब्दच तीच काळीज चिरत गेला... ती कधी होती...? दैनंदिन व्यवहाराची जुजबी माहिती देऊन झाल्यानंतर लाईन रेशनची असो वा रॉकेलसाठी दिवसभर भर उन्हात तीच तर उभी राहायची. साधी दमलीस का म्हणून पण कधी तिची विचारपूस केली नाही का आजारपणात तिला आराम दिला नाही. नवरेपणाची कर्तव्ये क्वचितच पार पडली असतील पण हक्क मात्र न चुकता जवळजवळ रोजच. त्यात वावगं असं काहीच नव्हतं. हजारो जोडप्यांची हीच कहाणी असेल पण काही योग्यही तर नव्हतं. दिवसभर काम करायचं, आल्यावर भरपेट खायचं आणि तिच्यात झोकून द्यायचं... तिची इच्छा असेल नसेल तरीही. त्या व्यतिरिक्त असं काहीच नव्हतं त्यांच्यात. त्याचा कार्यभाग झाल्यावर तिच्याकडे पाठ करून तो पुन्हा त्याच्याच विश्वात रममाण असायचा. ' मी सावित्री व्हायला हवं...पण तो सत्यवान आहे का..? पावित्र्याची कसोटी तर सीतामाईची पण लावली होती परंतु तिच्यासमोर राम होता. मी ज्याच्यासाठी माझं पावित्र्य राखायचा प्रयत्न करतेय त्याने माझा विचार तरी केलाय का... मागचे दोन महिने घरात पैसे नाहीत.. काही सामान भरलेलं नाही अश्या परिस्थिती मी कशी जगले असेल त्याची साधी विचारपूसही नाही... दोन महिने अजून येणार नाही एवढं सांगून सरळ फोन बंद.' तिच्याही नकळत दोन आसू ठिबकले तिच्या डोळ्यांतून. आज इतकी अगतिकता का भरून राहावी..? इतकी वर्ष रेटलीत ना... मग आताच हा भावनांचा गुंता का बनावा..? का अपेक्षा केली जावी. मागच्या दहा वर्षांत एक दिवसही कधी वेगळा गेला नाही तिथे आज काही वेगळं घडावं ह्याची का अपेक्षा केली जावी. माझ्या विचारांत गुंगून मी इथेच मारून जाईन. दोन महिन्यानंतर माझ्या हाडांचा सापळा निघेल कदाचित. त्यावर त्या माणसाच्या डोळ्यातून दोन आसू कदाचित निघतीलही... हक्काची मादी गेल्याचे....

पोटातील दुखणं वाढू लागलं तस तिचा जीव कळवळला. विचारांनी मेंदू पोखरायला सुरुवात केली. आता काही खाल्लं नाही तर हे शरीर कदाचित स्वतःचेच लचके तोडील... ती भीतीने शहारली. पोटातील भूक तिला अस्वस्थ करू लागली. इतका वेळ तिला मागे खेचणार मन आता तिला घराच्या बाहेर ओढू लागलं. नैतिक आणि अनैतिक गोष्टींच्या पलीकडे असणारी पोटाची भूक तिला विवश करत होती. दुखणार डोकं आणि जडावलेलं अंग बळजबरीने उचलत तिने स्वतःला कसाबसा तयार केलं. खाटेच्या लाकडी हातावर पडून असणारी ओढणी उगाचच अंगभर लपेटली. तेवढ्याही वेळात घरातल्या अंधारात कोणीतरी तिला पाहत असल्याचा भास झाला. थरथरणाऱ्या हातानी तिने दरवाजाची कडी उघडली. बाहेरचा अक्राळविक्राळ अंधार तिच्या घरातल्या अंधारात मिसळून गेला. हळूच कानोसा घेत तिने दार लोटलं. हवेतील किंचित थंडाव्यानेही ती थरारली. पुढे काय वाढून ठेवलय त्या कल्पनेने तिचा ऊर धपापू लागला. डोळे बंद करत तिने एक दीर्घ श्वास घेतला. इतक्या दिवसांच्या उपासाने तसही अंगातील त्राण सरलच होत. त्यात मनातल्या भीतीने तिला पुढे पाऊल उचलणंही जमेना. चूक की बरोबर... ती थबकली. गटारावरच्या किड्यांची किरकिर तिला अस्वस्थ करत होती. मध्येच उद्या मारत एक बेडूक तिच्या पायातून पुढे सरकला. भीतीने ती अस्फुटशी किंचाळली. पण तिचा आवाज घशातच विरला. गल्लीच्या टोकावर जायची तिची हिम्मत होईना. सावित्री, सत्यवान, यम... साऱ्या आकृत्या तिला अंधारात दिसू लागल्या. जणू रिकाम्या गल्लीतील पसरलेला अंधार तिला गिळू पाहत होता... तिला पळायचं होत... पण कुणापासून... तिची भूक तिला पुढे ढकलत होती आणि भीती पाठी खेचत होती. तिच्या फुललेल्या नाकपुड्या ताठरल्या. भीतीने विस्फारलेल्या डोळ्यात रक्त उतरलं. मागे वळायचं का पुढे जायचं...तिचे पाय जागीच गोठले. मानेवरून घामाचा ओघळ अगदी संथपणे उतरला. पण तेवढयात काहीतरी झाल. पाठीच्या मणक्यातून एक सणक वरती चढली... वेदनेची की भीतीची... तिला आधार हवा होता पण तीच घर तिच्यापासून दूर जात होत. आधारासाठी ती घराच्या दिशेने वळली पण तिच्यात तेवढी ताकदच नव्हती. तिचा शक्तिहीन देह तसाच जमिनीवर आदळला. सर्वांगातून वेदनेचा लोळ उठून शांत होत गेला. जमीन हालत होती की फक्त तिचा भास होता... गल्लीतला अंधार आता तिच्यात सामावू लागला होता. अर्धवट मिटत जाणाऱ्या निष्प्राण डोळ्यांसमोर आता फक्त आणि फक्त अंधार होता...


समाप्त