bhuchant lagin - 2 books and stories free download online pdf in Marathi

भुताचं लगीन (भाग २)


दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता.
दिगंबर : मन्या..ए...मन्या अजून किती वेळ झोपशील? बघं दुपार झाली, उठ आता‌!
त्याचा आवाज ऐकून मनोज जागा झाला आणि उठून इकडे तिकडे पाहू लागला.
दिगंबर : काय रे मन्या काय बघतोय?
मनोज : काही नाही रे, फक्त मला सांग! ती आली होती का? सकाळपासून.
दिगंबर : कोण ती?
मनोज : ती..ती चंद्रीका
दिगंबर : नाही.
मनोज : बरं झालं, तोवर आपण इथून निघून जाऊ.
दिगंबर : का? काय झालं
मनोज : दिग्या तुझा विश्वास नाही बसणार, पण काल रात्री मी एक भयानक प्रकार पाहिला, आणि मला समजलं की ती चंद्रीका एक जिवंत व्यक्ती नसून अतृप्त शक्ति आहे.

दिगंबर : what nonsense मन्या..ऽ उगीच मूर्खा सारखं काहीतरीच बरळू नको!
मनोज : अरे देवा शप्पथ खरं सांगतोय मी, विश्र्वास ठेव माझ्यावर!
दिगंबर : मला ठाऊक आहे, तुला इथे रहायचं नाही,पण उगाच असल्या भाकडकथा मला सांगून माझ्या कामावरचा focus हलवू नको!
तुला जर जायचे असेल तर तू जा , पण मी तर माझं काम पूर्ण झाल्याशिवाय येणार नाही!
असं म्हणतं दिगंबर खोलीच्या बाहेर निघून गेला.

"दिग्या ला कसं समजवायचं आता? त्याला एकट्या ला सोडून पण मी जाऊ शकत नाही, या चंद्रीके च खरं रुप त्याच्या समोर मी आणणार च ! पण त्याआधी त्याचा राग शांत करतो" असं म्हणत मनोज दिगंबर कडे गेला.

मनोज : दिग्या.. sorry मित्रा, मला वाटतंय मला भास झाला असेल.
दिगंबर : मला नाही बोलायचं तुझ्याशी , तू चंद्रीके बद्दल उगाच काहीही तर्क लावतोय, ती माझी चांगली मैत्रीण आहे.
मनोज : म्हटलं ना मला भास झाला म्हणून,आता त्या मुलीसाठी माझ्यावर रागवणार का? छोड ना यार अब माफ करदे, इस जालिम दोस्त को.
असं म्हणतं मनोज, दिगंबर ची चेष्टा मस्करी करू लागला.

दिगंबर : बरं चल..केलं तुला माफ, पण एका अटीवर....!
मनोज : कोणती अट?
दिगंबर : तू आज रात्री तुझा स्पेशल पुलाव बनवायचा!
मनोज : ohh एवढं च ना, बनवेन की त्यात काय एवढं!

रात्रीच्या ९ वाजता.
मनोज : दिग्या..ऽ हा घे तुझ्यासाठी खास पुलाव.
दिगंबर : अरे व्हा..व्हा.. काय झक्कास झालाय!
मनोज : हो ना ! बरं एेक आपल्याला प्रोजेक्ट च्या कामासाठी उद्या आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे.
दिगंबर :- अच्छा..! ठीक आहे.
असं म्हणतं दिगंबर ऑफिस च काम पूर्ण करू लागला.

इकडे मनोज दिगंबर च्या नकळत वाड्याबाहेर पडला,
"आज या चंद्रीके च सगळं पितळ उघडं पाडायलाचं हवं"
असं म्हणतं तो, रात्री पाहिलेल्या विहिरी पाशी येऊन काहीतरी शोधू लागला, काही पुरावा न मिळाल्याने वैतागून पुन्हा वाड्यात गेला.
अचानक मागून कोणीतरी पाहतंय असे भास त्याला होऊ लागले,मागे वळून पाहिलं तर कोणीच दिसत नव्हतं,
तो पुन्हा पुढे बघून चालू लागला, आता नक्कीच त्याचा कोणीतरी पाठलाग करतय हे त्याच्या लक्षात आलं,म्हणून तो पाठीमागे पाहणार तेवढ्यात स्वयंपाक घरात काहीतरी पडल्याचा आवाज आला, त्यामुळे तो स्वयंपाक घरात गेला.
स्वयंपाक घरातल्या लाईट्स आॅफ होत्या, त्यामुळे सगळीकडे अंधार पसरलेला
"अरे यार ही लाईट कशी बंद झाली?" असं म्हणतं मनोज ने लाईट चालू केली,
तेवढ्यात समोरच्या कोपऱ्यात कुणीतरी पाठमोरं बसलेलं त्याला दिसलं,
"कोण आहे तिकडे?" असं म्हणतं म्हणतं तो त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहिला.
त्याने पाहिलं की ती व्यक्ती काहीतरी खात होती.

"अहो कोण तुम्ही"असं म्हणत त्याने त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला,तसं त्या व्यक्तीने मागे वळून पाहिलं, ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून चंद्रीका होती, हे कळताच तो दोन पावलं मागे सारकला, त्याक्षणी तिचं रुप खूप भयानक दिसत होतं, तिचा तो अर्धा जळलेला चेहरा , तोंडातून गळणारी रक्ताची लाळ, विस्कटलेले केस , तिच्या एका हातात असलेल्या मांजराचे ती लचके तोडत होती, तिचं हे भयानक रूप पाहून मनोज जीव मुठीत घेऊन दरवाजा उघडून पळू लागला.
"दिग्याऽ.. दिग्या ऽ...वाचवं मला"
तेवढ्यात तिने दरवाजा आतून बंद केला,
"कुठं पळून जाशील आऽ.... तुला काय वाटलं, तू मला काल विहिरीपाशी पाहीलस हे मला समजलं नाही, हाऽ...हाऽ...हाऽ...,आता तू मेलास ! अशा विचित्र स्वरात हसत हसत तिने मनोजच्या अंगावर झडप घालून त्याच्या अंगावर नखांचे अनेक वार केला, तसा तो जागीच बेशुद्ध पडला.

.........

दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता.
दिगंबरच्या मोबाईल चा अलार्म वाजला, तसा तो जागा होऊन उठून बसला, मनोज त्याच्या पलंगावर दिसला नाही,
"मन्या कुठे गेला सकाळी-सकाळी , की रात्री झोपायला आलाच नाही? पाहायला हवं"असं म्हणतं तो मनोज ला शोधत शोधत खोलीतून बाहेर गेला, पूर्ण वाडा शोधून काढला, पण मनोज कुठेही दिसला नाही.

शेवटी वैतागून तो पुन्हा खोलीत आला.
"काय यार , कुठे गेला असेल मन्या, काल तो म्हणाला होता की उद्या एका कामाकरता बाहेर जायचं आहे म्हणून, पण तो मला एकट्याला सोडून जाणाऱ्यातला नाही,
तरी बघू तिकडे गेला असेल तर संध्याकाळपर्यंत येईल परत, वाट बघतो!" म्हणतं दिगंबर त्याच्या कामात दंग झाला.

संध्याकाळचे ७ वाजून गेले, दिगंबर ची काम करता करता नकळत झोप लागली होती,
तेवढ्यात त्याला कोणीतरी आवाज देऊन उढवतय असं लक्षात आलं, "दिगंबर.. दिगंबर...उठ ना! बघं ७ वाजून गेले."
दिगंबर : थांब रे मन्या.., झोपू दे थोडा वेळ" तो समोर कोण आहे, हे नबघताच म्हणाला.
"अरे दिगंबर...मी चंद्रीका !"
चंद्रेकेचा आवाज ऐकून तो ताडकन उठून म्हणाला,
"तू..? आणि मनोज कुठे आहे, अजून आला नाही का?"
चंद्रीका : मला नाही माहित, मी तर आत्ताच बाहेरून आले.
दिगंबर : अगं बघं ना, मनोज सकाळपासून कुठे दिसला नाही.
चंद्रीका : अरे असेल इथेच कुठेतरी, येईल लवकरच.
दिगंबर : हो ना यार , मी खूप miss करतोय त्याला, खूप एकटं एकटं ‌वाटतय.
चंद्रीका : तू काळजी कशाला करतोय, मी आहे ना!
दिगंबर : ते आहेच गं पण, मला मनोज ची काळजी वाटतेय.
चंद्रीका : बरं तू थोडा वेळ आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल,
असं म्हणत ती तिथून बाहेर पडली.

.........

रात्रीचे २ वाजून गेले,
मनोज असा अचानक गायब झाल्यामुळे दिगंबर च कशातच लक्ष लागत नव्हतं, बराच वेळ खोलीत बसून वैतागल्याने तो व्हरांड्यातून फेऱ्या मारत होता.
त्याक्षणी वातावरणात भयान शांतता पसरलेली कुठुनतरी हळुवार चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते, पण मनोज च्या विचारात मग्न असल्याने दिगंबर ने त्या आवाजांकडे दुर्लक्ष केलं, तेवढ्यात अचानक कुठुनतरी मोठ्या ने किंचाळण्याचा आवाज ऐकू आला , तसा दिगंबर भानावर येऊन व्हरांड्यातून खाली इकडे तिकडे पाहू लागला.पण कुणीच दिसत नव्हते, भास झाला असेल असं म्हणत तो त्याच्या खोलीत जायला निघाला, तेवढ्यात पुन्हा एकदा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला.
नक्कीच वाड्यातूनच कुठुनतरी आवाज येतोय, या विचाराने तो आवाजाच्या दिशेने चालू लागला, वाड्याच्या एका कोपऱ्यातल्या खोलीपाशी तो येऊन थांबला,
खोलीचा दरवाजा अर्धा उघडा होता, खोलीचं दार मागे ढकलून तो आत गेला,
खोलीत पूर्ण अंधार पसरलेला, तो चालत चालत पुढे जात होता,तेवढ्यात त्याच्या पायाखाली काही अडकल्याच त्याच्या लक्षात आलं, त्याने मोबाईल चा टाॅर्च चालू करून पाहिलं त्याच्या पायाखाली कुणाचातरी हात सापडला, हे पाहून तो दोन पावलं मागे सरकला.
जमिनीवर अशा विचित्र अवस्थेत मनोज पडलेला होता, हे पाहताच, तो मनोज ला आवाज देऊ लागला.
"मन्या..एऽ.. मन्या.. काय झालं तुला, उठ ना"
मनोज च्या अंगावर नखांचे अनेक वार झालेले होते, त्यामुळे तो पूर्ण निपचित पडून होता, त्यांची ही अवस्था पाहून दिगंबर च्या डोळ्यात पाणी आलं, त्याला मिठी मारून तो रडू लागला.
"मन्या साॅरी मित्रा , तुझं ऐकून इथून जायला हवं होतं, माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली"
दिगंबर च्या आवाजाने मनोज जागा झाला, पण तो अशक्त असल्याने त्याला फार काही बोलत येत नव्हतं.
मनोज : "दि...दि...दिग्याऽ..."
दिगंबर :"मन्या...बोल , कुणी केलं हे"

इतक्यात मागून कुणाच्यातरी हिंसक आवाजाची घर्र...घर्र..ऐकू येऊ लागली,
"मी केलं मी! ही..ही..ही.....सगळे मरणार, मी कुणालाच नाही सोडणार"

असा आवाज कानावर पडताच,
दिगंबर ने मागे वळून पाहिलं, तर तिथे भयानक रूपात चंद्रीका उभी होती, तिचा अर्धा चेहरा जळलेला होता, डोळे रक्तासारखे लाल बुंद झाले होते,एखाद्या जंगली पशुसारखी ती मोठमोठ्याने ओरडत होती, तेवढ्यात तिने तिच्या शक्ती ने मनोजला जोरात भिंती वर फेकून, स्वत:च्या ताब्यात घेतलं,
तिचं हे भयानक रूप पाहून दिगंबर ला ती कोण आहे, याची जाणीव झाली.
दिगंबर : चंद्रीका तू..! सोड त्याला प्लिज.
चंद्रीका : नाही कधीच नाही सोडणार तुझ्या लाडक्या मित्राला.
दिगंबर : पण का? त्याने काय वाईट केलं आहे तुझं?
चंद्रीका : मी कोण आहे , हे त्याने ओळखलं आणि जो मला ओळखतो त्याची मी हीच अवस्था करते, ही..ही..ही
अशा विचित्र स्वरात ती खिदळत म्हणाली.
दिगंबर : त्याचं काही चुकलं असेल तर त्याला माफ कर, पण त्याला सोडून दे!
चंद्रीका : हा..हा..हा...मी त्याला सोडू !
दिगंबर : हो, त्या बदल्यात मी तुला हवं ते देईन.
चंद्रीका : खरंच देशील?
दिगंबर : हो खरंच देईन
चंद्रीका : मग तू माझ्याशी लग्न कर आणि माझ्याबरोबर माझ्या जगात चल, पिशाच्च जगात जिथे सगळे अतृप्त आत्मे एकत्र येतात,
येशील ना? लवकर सांग हा..,तो पर्यंत मी तुझ्या मित्राला इथून घेऊन जाते,
असं म्हणत ती मनोज ला घेऊन गायब झाली.

"या मनोज च्या अवस्थेला सर्वतोपरी मीच कारणीभूत आहे, जर त्याचा जीव वाचवण्यासाठी मला माझा जीव गमवावा लागला, तरीही चालेल, पण त्यासाठी ही चंद्रीका नक्की कोण आहे, हे पहायलाच हवं" असं म्हणत तो खोलीत जाऊन त्याच्या आईने दिलेल्या हनुमान च्या तस्वीरी समोर प्रार्थना करू लागला.
तेवढ्यात कुठुनतरी त्याला देवळातला घंटानाद ऐकू येऊ लागला.
"देवळातला घंटानाद ऐकू येतोय, म्हणजे नक्कीच इथे दूरवर कुठेतरी मंदिर आहे,हा शुभ संकेत आहे!
पाहायला हवं याची नक्कीच काहीतरी मदत होईल" असं म्हणत तो वाड्या बाहेर पडला, घंटानादाच्या दिशेने तो चालत चालत वाड्यापासून जवळ जवळ दीड किलोमीटर अंतरावर कालीनगर या नगरात येऊन पोहोचला, कालीनगरात एक काली मातेच जागृत देवस्थान आहे, हे समजताच त्याने मंदिराकडे धाव घेतली.
देवी च दर्शन घेऊन तो मंदीराच्या पुजाऱ्यांना भेटायला गेला.

शंकर शास्त्री हे त्या पुजाऱ्याच नाव, सुमारे ९० वय वर्ष असलेले, देवी चे निस्सिम भक्त, शिस्तीचे पक्के आणि कालीनगरातले सर्वात बुद्धिमान व्यक्ति ही त्यांची ओळख!
नगरात त्यांना सगळे शास्त्री जी म्हणतात.
दिगंबर त्यांना भेटायला गेला, तेव्हा ते मंदीराच्या मागे असलेल्या एका छोट्या खोपटात ध्यानमग्न होते,
मंदीरातला एक सेवेकरी बाहेर पहारा देत होता.

दिगंबर : नमस्कार मी दिगंबर, मी ह्या नगरापासून दूरवर असलेल्या विश्वनाथ जहांगीरदारांच्या वाड्यातून आलोय, मला या मंदिराच्या पुजाऱ्यांना भेटायचं आहे.

सेवेकरी : शास्त्री जी ध्यानमग्न आहेत, मी त्यांना तुमच्या निरोप देऊन येतो, ते बोलवतील तुम्हाला!
असं म्हणत सेवेकरी शास्रीजीं जवळ गेला.

सेवेकरी : शास्त्री जी.. शास्त्री जी..... एक दिगंबर नामक तरूण विश्वनाथ जहांगीरदारांच्या वाड्यातून तुम्हाला भेटायला आला आहे.
शास्त्री जी ध्यानमग्न अवस्थेत होते.
विश्वनाथ जहांगीरदार हे नाव ऐकताच ते ध्यानाची तंद्रीतोडत खडबडून जागे झाले.

शास्त्री जी : जहांगीरदारांच्या वाड्यातून? ताबडतोब आतमध्ये पाठवा त्याला.

दिगंबर : नमस्कार मी दिगंबर , मी विश्वनाथ...

शास्त्री जी : हो समजलं मला! ये बैस आणि सांग काय म्हणाली चंद्रीका?

"तुम्हाला कसं माहित"? दिगंबर आश्र्चर्या च्या स्वरात
म्हणाला.

शास्त्री जी : तू विश्वनाथ जहांगीरदारांच्या वाड्यातून आलास, त्याच क्षणी मी ओळखलं!

दिगंबर : हो ! ती चंद्रीका नक्की कोण आहे,याचा शोध मी घेतोय , तुम्ही माझी मदत करा,असं म्हणत दिगंबर ने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली.

शंकर शास्त्री : तुला ठाऊक नाही दिगंबर ,पण याच दिवसाची मी गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहत होतो, या दृष्ट शक्तिला पराभूत करण्यासाठी कोणीतरी हिंमत दाखवेल अशी आशा अलीकडे संपत चालली होती, परंतु कालीमातेच्या कृपेने आणि तुझ्या रूपाने आता त्या दृष्ट आत्म्याचा नायनाट होईल असं वाटतंय.

४० वर्षींपूर्वीची गोष्ट आहे, विश्वनाथ जहांगीरदारांच्या वाड्यामागे एका लहानशा घरात चंद्रीका आणि तीचे वडील रहायचे,
तिचे वडील रामभाऊ हे वाड्याचा सारा कारभार पाहायचे,
रामभाऊ हा अत्यंत लालची आणि क्रूर माणूस होता, जहागीरांच्या संपत्ती वर त्याचा डोळा होता, आपल्या मुलीला त्या घराची सून म्हणून पाठवायचे आणि सगळी संपत्ती हडप करायची असी त्याची भावना होती.
चंद्रीकेच्या वडीलांनी जहांगीरदारांचा धाकटा मुलगा विश्वनाथ याच्या बद्दल
चंद्रीकेच्या मनात लहानपणापासूनच लग्नासाठीच आकर्षण निर्माण केलं,
ती दिवसरात्र त्याच्याच विचारात असायची, विश्वनाथ वर जीवापाड प्रेम करायची, पण विश्वनाथ ला तिचं एकतर्फी प्रेम कधीच मान्य नव्हतं,त्याला ती कधीच आवडली नाही.
पण तिचं नेहमी त्याच्या पुढेमागे करणं त्याला व त्याच्या कुटुंबीयांच्या सहनशक्ती च्या पलीकडे जाऊ लागलं.

शेवटी एक दिवस तिच्या एकतर्फी प्रेमाला वैतागून विश्वनाथ चे वडील सदाशिव जहागीरदारांनी, विश्वनाथ च लग्न त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकाच्या मुलीशी लाऊन द्यायचं ठरवलं.
ही लग्नाची गोष्ट रामभाऊ आणि चंद्रीके पासून गुप्त ठेवण्यात आली.
पण लग्नाच्या दिवशी ही बाब कुठुनतरी चंद्रीकेला समजली, आणि तिच्या रागाचा पारा चढला.
ती तावातावाने वाड्यासमोर सजलेल्या लग्न मंडपात जाऊन सदाशिव आणि विश्वनाथ ला शिव्या,शाप देऊ लागली.

हा प्रकार पाहून वाड्यातील नोकरांनी तिला हाताला धरून बाहेर काढलं, तशी ती अधिकच संतापली.
रागाच्या भरात तिने मंडपा बाहेर ठेवलेलं राॅकेल अंगावर ओतून, लग्न मंडपात धाव घेतली, समोर चालू असलेल्या यज्ञकुंडातलं जळकं लाकूड स्वत:च्या अंगाला लावून आत्महत्या केली.
त्याक्षणी मरता मरता ती शपथ घेऊन म्हणाली, "विश्वनाथ...तू मला फसवलस, नाही एका वर्षात तुझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं, तर नावाची चंद्रीका नाही,मी लवकरच येईन! तुमचा काळ बनून."
आणि शेवटी ती म्हणाली तसंच झालं, आत्महत्ये नंतर ती अतृप्त शक्ति बनून वाड्याभोवती वावरू लागली आणि हळूहळू तिने जहागीरदारांचा सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं,
पण एवढं करून ही तिचा बदला पूर्ण झाला नाही, ती अजून ही अनेक निष्पाप लोकांचे बळी घेतेय, आणि आता तुझ्याशी लग्न करून तिला तिची शक्ती जागृत करायची आहे.

पण आता बस्स! तिला इथेच थांबवायला हवं आणि त्यासाठी मी कोणतंही कठीण शिवधनुष्य पेलायला तयार आहे.

शास्रीजीं च हे सारं बोलणं दिगंबर एकाग्र होऊन ऐकत होता,
त्यांची मदत त्याच्यासाठी लाखमोलाची होती.

दिगंबर : खरंच चंद्रीकेची ही गोष्ट खूप भयानक आहे, पण ही सारी हकीकत तुम्हाला कशी माहित?

शंकर शास्त्री : कारण जहागीरदारांचा मी नेमलेला पंडित होतो, विश्वनाथ च लग्न त्याक्षणी माझ्या हस्ते संपन्न झालं, त्यामुळे चंद्रीकीचे आत्महत्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिली होती.

दिगंबर : पण बरं झालं, कालीमातेच्या कृपेने आपण भेटलो, आणि ही सर्व हकीकत मला समजली, आता मला माझ्या जीवाची अजिबात पर्वा नाही,
फक्त त्या चंद्रीकेचा नायनाट करून , मनोज ला पुर्वरत करायचं आहे.
त्यासाठी तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे.

शंकर शास्त्री : निश्चितच, पुढील दोन दिवसांनतर पौर्णिमेची रात्र आहे, आणि पौर्णिमेला अशा वाईट शक्तींची उर्जा काम करत नाही, त्यामुळे हे कार्य आपण त्याच दिवशी करू,
तू चंद्रीके ला जाऊन सांग की दोन दिवसांनी आपण लग्न करू,
त्या दिवशी पौर्णिमेला सुरूवात झाली की, तू तिला वाड्याखाली घेऊन ये, तिथे मी पूर्वतयारी निशी उभा असेन,
तुला ३ वर्तुळकार रिंगण दिसतील, एका रिंगणात मी बसेन, दुसऱ्या रिंगणात तू चंद्रीकेच्या नकळत तिला बसव आणि तिसऱ्या रिंगणात तू स्वत: बसून ध्यानमग्न हो, परंतु ध्यानमग्न असताना तुला अनेक भास होतील, तुझे नातेवाईक,मित्र यांची हाक ऐकू येईल, तरीही तू कशालाच बळी पडू नको.

त्यानंतर पुढे जे काही होईल,ते मी बघेन !
आणि हो, हे सारे नियम तू काटेकोर पणे पाळ , नाहीतर अर्धाचा अनर्थ व्हायला वेळ लागणार नाही.

दिगंबर : हो नक्कीच मी सगळे नियम काटेकोरपणे पाळेण,
चला आता येतो मी!
असं म्हणत शास्त्री जींना नमस्कार करून दिगंबर पुन्हा वाड्यात परतला आणि चंद्रेकेला मोठमोठ्याने आवाज देऊ लागला.
"चंद्रीकेऽ..ए..चंद्रीकेऽ..कुठेस तू बाहेर ये, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे!"
दिगंबर ची हाक ऐकून चंद्रीका त्याच्या समोर येऊन उभी राहिली.

चंद्रीका : लग्न अरे व्वा...व्वा किती छान! चल मग आत्ता करू लगेच ही..ही...ही...
ती घर्र...घर्र...त्या विचित्र स्वरात हसत म्हणाली.
दिगंबर : अगं..ऽ असं काय करतेस, लग्नाची तयारी नको का करायला, दोन दिवसांत तयारी होईल, म्हणून दोन दिवसांनी लग्न करू.
चंद्रीका : तू म्हणशील तसं, ही....ही....ही....!
अशा विचित्र स्वरात खिदळत ती तिथून गायब झाली.

कसेबसे दोन दिवस निघून गेले.
पौर्णिमा सुरू व्हायला थोडा वेळ बाकी होता, तिकडे शास्त्रीजी सर्व तयारीनिशी सज्ज झाले होते.
इकडे चंद्रीका हिरवी साडी, हिरवा चूडा असा साजश्रुंगार करून लग्नासाठी उतावीळ झाली होती, तिच्या या उतावीळ पणाची दिगंबर ला एक वेगळीच भिती वाटत होती.

अखेर संध्याकाळचे ७ वाजले, दिगंबर चंद्रीके ला बोलण्यात गुंतवून वाड्याखाली घेऊन आला, समोर शास्त्रींच्या पूर्वसूचनेनुसार सारं काही मांडण्यात आलं होतं,
पहिल्या पिवळ्या रिंगणात बसून शास्त्री जी यज्ञ करत होते,
शास्रीजींनी लांबून हातवारे करून चंद्रीकेला दुसऱ्या पांढऱ्या रिंगणात बसवायला सांगितले त्याप्रमाणे दिगंबर ने तिला तिच्या नकळत रिंगणात ढकलले ,उरलेल्या तिसऱ्या लाल रिंगणात दिगंबर स्वत: जाऊन बसला.

रिंगणात ढकलताच चंद्रीका मोठमोठ्याने ओरडू लागली.
"विश्वासघात... पुन्हा एकदा विश्वासघात...ऐ शास्त्री..तू परत आलास..आऽ...सोडणार नाय, कुणालाच सोडणार नाय!"

शास्त्रीजींच्या सांगण्या प्रमाणे दिगंबर रिंगणात ध्यानमग्न होता, चंद्रीका तिच्यातला वाईट शक्तींचा वापर करून त्याचा ध्यानभंग करण्याचा प्रयत्न करत होती.

पण शास्त्रीजींच्या मंत्राद्वारे तिचे सगळे डाव तिच्यावरचं उलटत होते.
तशी ती अधिकच उग्र होऊन रिंगणात बाहेर पडायचा प्रयत्न करत होती.
पण रिंगणाभोवती लागलेल्या आगीमुळे तिला बाहेर यायला मार्ग नव्हता.
हळूहळू ढगांच्या आड लपलेल्या चंद्राचा प्रकाश तिच्या वर पडू लागला, त्यामुळे ती अधिकच क्षीण होऊ लागली,तशी ती जंगली पशुसारखी आरडाओरडा करू लागली.

शास्त्री जीं द्वारे चालू असलेल्या यज्ञकुंडातल्या आगीच्या पवित्र लहरी , तिच्या वाईट शक्तींचा नायनाट करू लागल्या, तशी ती दुर्बळ होऊ लागली आणि बघताबघता चंद्रीकेच्या अतृप्त शक्ति चा नायनाट होऊन, तिला मुक्ती मिळाली.

वातावरणात निर्माण झालेला तणाव, मोकळा झाला,
खोलीत निपचित पडून असलेल्या मनोज च्या अंगावरील वार निघून गेले व तो पूर्वरत होऊन धावत-धावत वाड्याखाली आला,
"दिग्या.. दिग्या..तू ठीक आहेस ना"
"हो मन्या.. आता आपलं संकट मिटलय!" असं म्हणत दिगंबर ने मनोज ला मिठी मारली.

"आता तुम्ही दोघेही निर्धास्त रहा, चंद्रीकेला आज खऱ्या अर्धाने मुक्ती मिळाली,
चला..आता येतो मी!"
असं म्हणत शास्त्री जी तिथून निघून गेले.

शास्रीजींना निरोप देऊन दिगंबर आणि मनोज पुन्हा आपल्या प्रोजेक्ट च्या कामाची तयारी करू लागले.


. समाप्त 🙏😊
.
.✍️ @shivani Patil.इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED