Tambumadhala Shinema books and stories free download online pdf in Marathi

तंबूमधला शिनेमा !

“लोक हो sss, इकडे लक्ष द्या. आज रात्रौ ठीक दहा वाजता ‘अनिता टुरिंग टॉकीज’ येथे पाहायला विसरू नका दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांचा धमाल विनोदी चित्रपट - ‘पांडू हवालदार’.... याल तर हसाल न याल तर फसाल…” अशा जाहिरातीनी उभ्या मलकापूरचे कान टवकारले जायचे. एक माणूस भोंगामाईक आणि सायकल घेऊन सगळ्या मलकापूरभर पायपीट करत असे बडबडत फिरायचा. त्याच्या मागून तसेच सूर ओढत लहान मुलांचा लवाजमा असायचा. मग रिकामटेकड्या शौकीन रसिकांच्या उपस्थितीत सुमूहुर्तावर मुख्य बाजारपेठेत झाडावर सिनेमाचे सुरेखसे पोस्टर लटकायचे. पोस्टर बघून हुरहुर लागायची, मग लोकांना कधी एकदा तंबूत जातो आणि सिनेमा बघतो असं होऊन जायचं! हे 'अनिता टुरिंग टॉकीज' म्हणजे काय? तर दोन-अडीच एकर शेताच्या सपाट तुकड्यावर, चारी बाजूला गोलाकार मळकट पांढर्या कापडाच्या कामट्यांच्या आधाराने उभारलेल्या भिंती, आत तशाच कापडाचा उभा केलेला मोठा उंच आयताकार पडदा. त्याच्या समोर प्रेक्षागार, प्रेक्षकांच्या मागे प्रोजेक्टर आणि तिथून पडद्यावर पडणारा सिनेमा. प्रवेश द्वारा जवळ 'अनिता टुरिंग टॉकीज'असा बोर्ड लावलेला होता. दिवसा हा तंबू अगदीच बापुडवाणा दिसे पण रात्री कात टाकायचा, झगमगीत बल्बचे लाईट, दणदणीत आवाजात गाणी लावली की लोकांना स्वप्नांच्या रंगील्या रुपेरी दुनियेची सफर घडवणारा जादूगारच जणू! असं आपलं तंबू- थिएटर स्वस्त आणि मस्त.. शिवाय नैसर्गिक ए.सी. होतं... खाली काळीभोर जमीन आणि वर नीळंशार चांदण्यांनी भरलेलं आकाश! 💖


शशी कोठावळे यांच्या मालकीचा होता हा तंबू, तेच त्याचे मॅनेजर. रोज रोज सिनेमे बघून आणि दाखवून शशीदादा एखाद्या अभिनेत्यासारखेच दिसायला लागले होते. गोरापान रंग, भुरकट केस आणि जितेंद्र सारखा एका बाजूला स्टायलिश भांग असे त्यांचे देखणे रूप. वर ते पिवळा, जांभळा, लाल असे हिरो सारखे ठिपके, फुले असलेले डिझायनर शर्ट वापरत. असे मॉडर्न कपडे घालून गावातून ते चालले की पडद्यांवरचा हिरो रस्त्यात चालल्याचा भास होई! आत्ता सारखेच त्या काळात देखील लोक सिनेमातली फ्याशन लगेच उचलत. बच्चनची बेल बॉटम पँट आणि टिचके शर्ट घालून, माने पर्यंत केस वाढवलेली मुले पँटचा फर्रा..फर्राsss असा आवाज काढत चालत. आपल्याला ते शोभते का हा तुच्छ विचार कधीही कोणीही करत नसे. सगळेच स्वत:ला राजेश खन्ना, जितेंद्र, बच्चन, असले भारी नट समजत. मग इंग्रजी सिनेमाचा प्रभाव पडला बेलबॉटमचा घेर कमी होत होत नळकुट्या घट्टसर जीनपँट पर्यंत आला.. उठा-बसायला आले नाही तरी तरूण जीनपँट घालून आखडून चालू लागले! 👦


मुलीही काही कमी नव्ह्त्या कोणाचा साधना कट, तर कुणाची विद्या सिन्हा बट, तर एखादी गावठी नटी कुरळ्या बटांची महिरप मिरवे. कोणी जया सारख्या पदर लपेटून घ्यायच्या तर कोणी स्वत:ला साधना, जयश्री गडकर समजत काजळाने डोळे रेखत असायच्या. 👸 स्लिव्हलेस, पोटिमा असले सगळे ब्लाउज़, मैक्सी, वनपीस हे प्रकार गेली पन्नास वर्षे अस्तित्वात आहेत आणि परत परत तेच नावे बदलून बाजारात येतात. तर सांगायचा विषय काय… आमचे शशीदादा सगळ्या लेटेस्ट फ्याशन लगेच स्वत: फॉलो करायचे. आधी केले मग सांगीतले म्हणायचे मग तरूण पिढी त्यांच्या पावलावर पाऊल टाकायची. 👨


रात्री शशीदादा प्रेक्षकांना आत सोडायचे काम करायचे. ५० पैसे मोठ्यांना आणि २५ पैसे लहान मुलांना असा तिकिटाचा दर होता नंतर वाढून एक रुपया झाला. तेंव्हाच्या कमाईच्या दृष्टीने सिनेमा तसा महागच वाटायचा. सिनेमा सुरु झाला की थोड्या वेळाने काही रसीक लोक तंबूचे कापड वर करून बाजू बाजूने हळूच आत घुसायचे. काही जण मुलांना अंधारातून पुढे घुसायला सांगून स्वतः मागून फक्त मोठ्यांचे तिकीट घेऊन यायचे. (मुले फुकटच घुसवायची आणि पैसे वाचवायचे!) अशा या उद्योगांमुळे शशीदादाना किती पैसे मिळायचे देवच जाणे! आपल्याकडे जमेल तितके आणि जमेल तसे फुकट मिळवायचा जन्मसिद्ध हक्क कोणीही सुजाण नागरीक सोडत नाही.., सोडणार ही नाही… मग तो कोणत्याही गावचा असो. फुक्कट मिळणाऱ्या गोष्टीना पैसा का मोजा? असं साधं सोपं गणित. 🙆


मग झगमगत्या, प्रकाशीत कमानीतून तिकिट देऊन दिमाखात त्या रुपेरी दुनियेत प्रवेश करायचा. तंबूत पुढे समोर मोठा पडदा आणि एका दोरीने जमिनीचे दोन भागात विभाजन केलेले होते. डावीकडे बायकांनी आणि पुरुषांनी उजवीकडे बसायची पद्धत होती. आपापली पथारी आपणच घेऊन जायची आणि अलकड पलकड मारायची, कंटाळा आला की खुशाल पाय पसरून निवांत बसायचं. (उगीच खुर्चीत बसून अवघडण्यापेक्षा बरे!) मलकापूरला सात-आठ महिने थंडी आणि त्यातच हा open to sky तंबू नदीकाठी वसलेला मग काय बसायला पोते, पांघरूण, कानटोप्या, स्वेटर, कुत्र्यांना हाकलायला काठी, खाऊ... अशी सगळी जय्यत तयारी करूनच पंचक्रोशीतून लोक त्या तंबूत शिनूमाला जायचे. मनोरंजनाचे दुसरे कोणतेही साधन नव्हते म्हणून कोणताही सिनेमा असो, तंबू भरलेलाच असायचा, अगदी फुल्ल! अनेक जण तर बैत्याची गिऱ्हाइके होती…. म्हणजे रोज पैसे द्यायचे नाहीत, वर्षातून एकदा कधी तरी मनाला वाटतील तेवढेच पैसे द्यायचे आणि मनसोक्त सिनेमा बघायचे. रोज रात्री दहा वाजता सिनेमाचा एकच शो असे. सिनेमा आहे तितके दिवस रोज तोच सिनेमा बघणारे अनेक महाभागही होते, अगदी सिनेमा पाठ झाला तरी कंटाळायचे नाहीत नटाचे डायलॉग त्यालाच सांगत बसायचे! मग शशीदादाना कोल्हापुरातून पुढच्या सिनेमाचे रीळ मिळे आणि रसिकांच्या उपस्थितीत झाडावर आधीचे पोस्टर उतरून नवीन पोस्टर लावण्याचा सोहळा साजरा होई. आगामी आकर्षण म्हणून पुढच्या चित्रपटांची पोस्टर्सही झळकायची.


तंबू भरला की तीन वेळा घंटा होई गाणी थांबत आणि सिनेमा सुरु होई. सुरुवातीला ‘अनिता’ चा फोटो पडद्यावर दिसे, सोनेरी केसांची, बॉबकट केलेली, चाफेकळी नाकाची सुंदर परी अनिता म्हणजे शशीदादांची लाडकी भाची. त्यानंतर सिनेमा सुरु व्हायचा. इकडे बायका दुसरीला 'मान खाली कर, कश्शाला मढ्या सारखी ताठतीस गं?, मागं सरक, आमाला दिसंना' अशा ग्वाड गोष्टी करून आपल्यालाच चांगला सिनेमा कसा दिसेल हे बघायच्या. तुल्यबळ बाई पुढे असेल तर मग दोघींची जुगलबंदी सुरु…'जा की फुडं लाव जा झेंडा..आली मोट्ठी शहाणी'... मग सिनेमा सुरु होई पर्यंत दोघींचा हा तोंडी सिनेमा ट्रेलर सुरुच! पोरांना निजवून पोत्यावर टाकलं की या मोकळ्या शिनुमा बघायला आणि भांडायला. पोरं रडायची, ओरडायची मग या प्रेमळ आया थोपटता थोपटत धोपटून त्याना गप्प करायच्या. अगदी सिनेमा सुरु होईपर्यंत सारख्या वटवट..कलकल.. करत एकमेकीशी किंवा पुढच्या-मागच्या बाईशी मनसोक्त कचा कचा भांडायच्या. कुणाचं पोरगं रडायला लागलं तर त्याची आई ओरडून घ्यायची सगळ्यांचं … ‘ए बाई गप कर की त्याला, जा बाहेर घेऊन नैतर , कशाला यावं तान्ही पोरं घेऊन ?’ कुणी म्हातारी खोकली तर…. ‘या वयात कशाला हिची थेरं? कशाला आली आसंल, घरी जाऊन हो जा म्हणाव खुडूक...’ अशी तिला ऐकू जाण्याएवढी कोकीळकंठी कुजबुज सुरु व्हायची. 🙊


एकदा परिक्षा झाली म्हणून आनंदाने एक जुना हिंदी सिनेमा बघायला आम्ही मुली-मुली गेलो. हिरो त्याला स्वर्गीय आईची आठवण येत असल्यामुळे 'माँ.. माँ' करत रडायला लागतो असा भावूक सिन सुरु होता... बायका डोळ्याला पदर लावून त्याच्या सुरात सूर मिसळत होत्या, नाके पुसत अश्रू गाळत होत्या. हिरोच्ं रडणं अगदीच पोटात कळ आल्यावर मूल तोंड करतं अगदी तस्सं दिसत होतं… आणि आमच्यातली एक ते बघून 'बघ की कसं रड्तंय' म्हणून हसायला सुरु झाली. मग काय बाकीच्यांनाही हसू आवरेना आणि सगळ्याच खो खो हसू लागलो. 😆 हिरो रडतोय…आम्ही हसतोय….बाजूच्या रडूबाई रणरागिणी मात्र चांगल्याच खवळल्या, ‘घोडयांनो, काय झालं गं तुम्हाला दात काढायला? कशाला पण हसता काय?? सटवाई हसवती काय तुम्हाला?'..... आम्हाला काही हसू आवरेना..खुदू खुदू सुरुच.. बायकांचं मेन्टल भडकलं, संतापून ओरडू लागल्या ……'आता गप बसा...परत खिदळला तर थोबाड रंगवीन.’ इथपर्यंत मामला हातघाईवर आला. मग अंधारात चुपचाप उठलो मागे जाऊन बसलो आणि मनसोक्त खिदळत रडका सिनेमा पाहू लागलो. सात्विक संतापाने या ढालगज बायानी खरंच मारलं तर आमची बाजू कोण घेणार? लोक रडत असताना हसणे, या पापाला कोण पाठीशी घालणार? 😅


या बायकापण नुसत्या रडून थांबायच्या नाहीत, संत तुकाराम, संत सखू मधे विठू माऊलीचे, कुठ्ल्याही देवाचे दर्शन झाले..की मनोभावे हात जोडत. डोळे मिटून एक-दोन थपडा मारून घेत.(अशा वेळी हसू नये नाहीतर परीणाम गंभीर होतात) काहीवेळा तर सिनेमात सासू सुनेला छळायला लागली की चूकचूक...करत मान हलवून सहानुभूती दाखवत. ‘मरत का नाही ही थेरडी’, ‘अवदसा आली बघ हिच्या अंगात’ असे संतापाचे, उत्स्फूर्त अभिप्रायही देत. ललिता पवार तेंव्हा समोर दिसली असती तर नक्की मार खाल्ला असता तिने या बायकांचा. आशा काळे, सुलोचना याना बघून डोळ्याला पदर लावणे, हुंदके देत रडणे चाले. (तरी बरे त्या वेळी लोकाना रडवण्याचे सुवर्ण पदक विजेती अलका कुबल नव्हती!) साध्या-सालस सुनेला ‘कशाला ऐकतीस गं त्या म्हातार्डीचं’ असे प्रश्न विचारणे, निळू फुले आले की ‘आला बघ निळ्या फुल्या...याला नुसतं बघितलं तरी माझ्या डोक्याची शीर उठती’ असे टोमणे त्याला जणूकाही ऐकू जातात, अशा आवेशात मारणे हे सगळे अगदी राजरोसपणे चाले. राज शेखर, प्राण याना बघून तर बायका कडाकडा बोटं मोडायच्या… शिव्या शाप द्यायच्या… ही खरंतर अस्सल दादच असते, त्यांच्या अफलातून अभिनयाला.. पण तरी इकडून त्या हिरो-हिरोईनला डिरेक्शन देणाऱ्या, 'अस्सं कर,तस्स्ं कर' करून सल्ले देणाऱ्या बायका बघून मजाच वाटायची तेंव्हा.. 😝 आम्ही काही वेळा सिनेमा न बघता यांच्या तोंडाकडे बघायचो… आणि जास्त मज्जा लुटायचो! अशी ही बायकांची बाजू म्हणजे जिवंत उत्साहाचा खळ खळ वाहणारा झराच… 👭


पुरुष मंडळी मात्र लावणी आणि एखाद्या फाडू नटीच्या एन्ट्रीला शिट्ट्या मारणे, टाळ्या वाजवणे यापलीकडे कधी सिनेमात एवढे गुंगलेले पाहायला मिळाले नाहीत. एकतर ते धूर्तपणे बारकी किरकिरी पोरेटारे वस्ताद बायकांच्या गळ्यात मारायचे, त्या मुळे तिकडे मुले रडण्याचे पार्श्वसंगीत नसायचे. सगळे अगदी मनोभावे सिनेमा टक लावून बघायचे. ‘पिंजरा’ मधल्या लावण्यांमध्ये संध्यावर ५-१० पैशाची नाणी उडवणारे महाभागही होते. बाकी ‘हे सगळं खोटं असतं’ या कटू सत्याला पुरूष लगेच स्वीकारत… त्यामुळे तिकडे उगीच ओक्साबोक्षी रडत नाके पुसणे, भांडणे, कलकल असला सनसनाटी माहोल नसे. पडद्यावर सासू सुनेला छळो किंवा सून सासूचा कुड्ड़ू काढो… हे आपले संता सारखी तोंडे करून विडी, काडी, पान,कात, चुना अशा महत्वाच्या गोष्टींची देवघेव करत खरंच निवांत सिनेमा एन्जॉय करायचे. मधून मधून हिरो साठी उगीच 'वा रे वाघा...एsssहो बाजूला जवळ जाऊ नकोss..'असल्या कॉमेंट मारायचे आणि हसायचे. एकूण काय तर पुरूष वॉर्ड सुस्तावलेल्या अजगरा सारखा भासे.. तिकडे स्त्री वॉर्ड़ात मात्र अस्सल सळसळत्या नागीणी !


कधी कधी सिनेमाचे ‘रीळ’ तुटायचे आणि तो जोडायला वेळ लागायचा. तोपर्यंत हौशी कलाकार प्रोजेक्टरच्या लाईटसमोर बोटं नाचव आणि पडद्यावर विविध आकृत्या तयार कर, भूत-भूत असे ओरडून लहान मुलांना घाबरव असे उद्योग करून सगळ्याची करमणूक करत. शॅडो डान्सचा शोध यातूनच लागला असावा. रीळ तुटायला लागले की सिनेमाची मजा जाई, अगदी चकली करताना तुटल्यावर होतो तस्सा! कधी फक्त अभिनय, आवाज गायब किंवा कधी फक्त आवाज आणि चित्रच गायब असे करत करत कसाबसा तो सिनेमा रात्री उशीरा संपे. बायका परत गप्पांचे फड रंगवायच्या, पुरूषवर्ग पानाची चंची काढायचा. पण एकही सिनेचाहता कंटाळून निघून जायचा नाही, पैसे वसूल करणारच. मग आम्ही सगळी पुलावरून चालत, कुडकुडत सगळे घरी यायचो. पुलाच्या खाली नदीतली, पुलावरची भुतं दिसू नयेत म्हणून स्वत:च्या पायाकडे बघत लोकांच्या घोळक्यातून पळत पळत घर गाठायचे. मोठ्ठा घोळका असल्याने भूतं पळायची असा एक दृढ विश्वास होता. 😆


आमच्या लहानपणी मुले बिघडू नयेत म्हणून पोस्टर पाहूनच पालक सिनेमाचे परीक्षण करत. त्यांच्या अंतीम निर्णयापुढे बोलण्याची कुणाची टाप नव्हती. गाजलेली सगळी गाणी आम्ही भजने म्हटल्यासारखी म्हणायचो. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘बॉबी’. तो काळा अखूड स्कर्ट आणि ठिपक्यांचे कपडे घालून उभी असलेली डिंपल आणि गोंडस चेहेऱ्याचा ऋषी पोस्टरवर होते. तिचे कपडे घरात सेन्सॉर झाले आणि आम्हाला तेंव्हा तो सिनेमा पाहायची परवानगी मिळाली नाही.😓 नंतर कॉलेज मधे गेल्यावर पाहिला. पब्लिकची सगळी सहानुभूती नट आणि नटीलाच असायची. सोळा वर्षाची सुंदरी डिंपल आणि अवघ्या एकविसाव्या वर्षी ऋषीचा तो निष्पाप चेहेरा लोकांच्या मनात ठसला. ‘अंदरसे कोई बाहर ना जा सके’ गाणं पाहून ते काही चुकीचं किंवा पाप करतायत असं वाटलंच नाही. 😃 हीच खरी गमतीची गोष्ट आहे. ऋषी कपूरही अलीकडेच काळाच्या पडद्याआड गेले आणि हा तंबूतला गाजलेला सिनेमा पटकन डोळ्यासमोर आला.


असा आमचा सर्वांगसुंदर खुल्लम खुल्ला तंबू काळाच्या ओघात कधी तरी बंद पडला…. मन मात्र तिथेच विसरलंय.... पण आजही मनाला वाटतं की तो तंबू तसाच उभा असावा…एक पोतं नेऊन त्या थंडगार धरणीमातेवर टाकावं… आजूबाजूला आया-बायांची सुरेल कल-कल सुरू असावी… आणि काळ्याकुट्ट नभांगणीच्या तारका मोजत…. पुन्हा एकदा गावातल्या तंबूत बसुन ‘बॉबी’ बघावा, त्यातली गाणी मोठमोठ्याने म्हणावीत….

फक्त शशीदादाचं रीळ तेवढं तुटू नये!!! 💕

©विजयश्री तारे-जोशी


P.s.- अलीकडेच ‘drive-in theater’ ही संकल्पना पाहिली आणि कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मला माझं बालपण high definition picture quality मध्ये परत मिळते की काय असे वाटू लागले आहे…. याचे उगम स्थान नक्कीच आपल्या तंबूत असावे अशी खात्री पटली मला..! तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे नक्की कळवा. तंबूमधल्या सिनेमाचे आणखी अनुभव वाचायला नक्की आवडेल. 😊

इतर रसदार पर्याय