प्रेम खरंच असतं का?... Deepali Hande द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम खरंच असतं का?...

आज मला लवकर ऑफिसला जायचं होतं. ऑडिट होणार होतं ऑफिस मध्ये आणि काम खूप पेंडिंग होतं म्हणून आज मी मुद्दामच आवरून लवकर निघालो होतो आणि लवकरची बस पकडली होती. बस बऱ्यापैकी रिकामी होती. अजिबात गर्दी नव्हती मला आरामात बसायला जागा मिळाली होती.

तेवढ्यात मला एक मुलगी बसमध्ये पाठमोरी उभी असलेली दिसली. सडपातळ असा बांधा, तिचे सैलसर वेणी घातलेले लांबलचक केस. फिक्कट निळ्या रंगाचा सलवार कुर्ता घातला होता तिने. खूपच साधा असा तिचा अवतार होता. तरीही ती पाठमोरी इतकी आकर्षक दिसत होती. माझ्या आजूबाजूला बसलेले अगदी सगळेच तिला मागून बघण्यात गुंग होते. होतीच ती इतकी आकर्षक. अचानक बसचा ब्रेक लागला आणि सगळे भानावर आले, तिचा स्टॉप आला होता आणि ती उतरून गेलीही. मी तिचा चेहरा बघण्याचा खूप प्रयन्त करत होतो पण मला तो बघताच आला नाही. खूपच नाराज झालो होतो मी बस चालू झाली आणि नजरेआड जाईपर्यंत मी पाठमोरीच तिला बघत होतो. चेहरा बघू नाही शकलो तिचा पण मागूनच इतकी आकर्षक दिसणारी मुलगी नक्कीच सुंदर असणार अशी खात्रीच होती मला. तिच्या अंगभर कपड्यामधून हाताचा जो काही उघडा भाग दिसला त्यावरून तिच्या नितळ कांतीचा अंदाज येत होता. ती निघून गेली मी मात्र ती किती सुंदर असेल हि कल्पना करत बसलो.

आता हे रोजचच झालं होत मी बस मध्ये चढावं आणि ती उतरे पर्यंत मागूनच तिला नेहाळत बसावे. जणू हा प्रवास कधीच संपू नये असं वाटत होतं मला. ऑडिट तर कधीच संपलं होतं आणि कामही आटोक्यात आलं होतं माझं पण फक्त आणि फक्त तिला पाहता यावं म्हणून लवकरच्या बसने जात होतो ऑफिसला.

आजही ती कालच्याच तिच्या जागेवर उभी होता आणि आजही मी तिला नुसाता ठोंब्या सारखा बघत होतो; प्रेमात पडलो होतो मी तिच्या हो हो अगदी तिचा चेहराहि न बघता, तुम्हीं म्हनाल काय खुळा आहे हा पण खरंच झालो होतो मी खुळा तिच्या प्रेमात.

तेव्हड्यात काही शाळेत जाणारी मुलं बस मध्ये चढली आज त्यांच्या शाळेत काही तरी उपक्रम होता म्हणून नेहमीच्या वेळेपेक्षा जरा उशिरा शाळेत चालले होते. ती मुलं मस्ती करत करत बस मध्ये चढले तशी पण बसमध्ये जास्त गर्दी नव्हती त्यामुळे जास्तच ऊत आला होता त्यांना; तर मस्ती करत करत ती मुलं तिच्या बाजूने पुढे गेले आणि एका मुलाने मागे वळून तिच्याकडे बघितलं आणि भूत बघितल्यासारखा तिला बघून तो घाबरला आणि जोर जोरात आरडाओरडा करायला लागला तो. आजूबाजूच्या लोकांनी त्याला शांत केलं. कावरी बावरी होऊन तिने देखील स्वतःचा चेहरा ओढणीने झाकून घेतला.

मला मात्र प्रश्न पडला मागून एवढी आकर्षक दिसणारी मुलगी, हातावरची तिची तुकतुकीत आणि चमकदार त्वचा पाहता चेहऱ्याची पण आसपास तशीच असेल असा मी अंदाज बांधला होता आणि त्यावरून अतिशय सुंदर अशी प्रतिमा मी निर्माण केली होती तिची मनातल्या मनात आणि "एवढ्या सुंदर मुलीला बघून कोणी कसं काय घाबरू शकत?"

पुढे बसणाऱ्या लोकांची कुजबुज आव्हान चालू झाली होती कि, अश्या लोकांना स्पेशिअल वेहिकल दिली पाहिजे सकाळ सकाळ असा चेहरा बघून दिवस खराब होतो इ. इ. काही लोकं तर मुद्दाम तिला ऐकू जाईल अश्या मोठ्या आवाजात नाक मुरडत बोलत होते. स्रीयांची संख्या ह्यात जास्त होती.

मी बुचकुळ्यात पडलो होतो कि असं कसं होऊ शकतं.

आता तिचा चेहरा पाहण्याची उसुक्ता फारच वाढली होती माझी. आज काहीही झालं तरी हिचा चेहरा बघायचाच हे मी ठरवून टाकलं. म्हणून त्यासाठी मी तिचा पाठलाग करणार होतो. ऑफिसमध्ये उशीर होण्याचं टेन्शन नव्हतच मला कारण एकतर मी कार्यालयीन वेळेपेक्षा खूपच लवकर निघालो होतो तिला बघण्यासाठी म्हणून आणि उशीर झाला तरी ऑफिस मध्ये चालत होतं.

तिचा पाठलाग करायचाच होता काही हि करून तिचा स्टॉप जवळ आला तसा मीही जागे वरून उठलो आणि तिच्या मागे थोडंसं अंतर ठेवून उभा राहिलो. तिचा स्टॉप आला तिच्या मागोमाग मीही उतरलो. थोडा वेळ त्या बस स्टॊपवरच घुटमळलो आणि थोड्या वेळाने तिच्या मागे चालायला लागलो तास बराच अंतर ठेवून चालत होतो मी कारण कोणाला संशय येऊ नव्हता द्यायचा आणि महत्वाचं म्हणजे मला तिच्या हि नकळत तिचा चेहरा बघायचा होता म्हणून.

मी हळूहळू चालत होतो तिच्या मागे मागे इच्छित स्थळी पोहचल्या वर तिची चाल थोडीशी मंद झाली आणि एका ऑफिस सारख्या दिसणाऱ्या ठिकाणी ती पोहचली मी ओझरता बोर्ड वाचला तर कसलं तरी पुनर्वसन केंद्र होत ते. एन्ट्री करायला म्हणून तिला हाफ यू टर्न घेऊन सेक्युरिटी केबिनमध्ये जावं लागलं तेव्हा तिचा चेहरा मला अगदी क्लिअर दिसला आणि चेहरा बघून मला खूपच शॉक बसला. जागीच थिजून गेलो होतो मी. तिचा चेहरा उजव्या बाजूने पूर्ण खराब झाला होता जळाल्या सारखा दिसत होता.

थोड्या वेळाने मी जेव्हा भानावर आलो तोपर्यंत ती निघून गेली होती. मी माझी जड झालेली पाऊलं उचलून निघालो तिकडून. काहीच कळत नव्हतं मला, संवेदना सुन्न झाल्या होत्या माझ्या. जाता जाता मी पाठीमागे वळून बघितलं त्या वेळी मला त्या ऑफिसचा बोर्ड व्यवस्तीत दिसला त्यावर लिहिलं होतं "ऍसिड अटॅक पुनर्वसन केंद्र".

मी तसाच तिकडून निघालो. जणू काय माझी दुनियाच उध्वस्त झाली होती. मी चालत होतो रस्त्याने पण माझं सगळं लक्ष तिच्यात होतं. आता मला स्वतःचाच राग येत होता असं कसं मी चेहरा न बघता प्रेमात वैगेरे पडलो.

दोन दिवस मी ऑफिसला देखील गेलो नाही. तिचा विचार काही केल्या डोक्यातून जात नव्हता. मनापासून प्रेम केलं होत मी तिच्यावर. सतत मी फक्त आणि फक्त तिच्याच विचारात होतो. काय करावं कळतच नव्हतं.

असाच तिचा विचार करत असताना मला जाणवलं कि जे काही झालं त्यात तिचा काय दोष आहे?

कोणत्या हि मुलीला स्वतः बरोबर असं काही व्हावं हे स्वप्नात तरी वाटत असेल का?

जे काही झालं त्यात समाजाची घाणेरडी मानसिकताच कारणीभूत आहे.

जे काही झालं ते मी बदलू शकत नाही. पण तिच्यावर प्रेम करून आणि आयुष्यभर तिला साथ देऊन तिच्या यातना थोड्या तरी नक्कीच सुसह्य करू शकतो. मग ठरवलंच आता काहीही झालं तरी मागे फिरायचं नाही.

माझं प्रेम स्वार्थी नाही जे एखाद्याच्या चेहऱ्याला बघून कमी होईल. आता काहीही झालं तरी मी तरी तिची साथ सोडणार नव्हतो.

आता खरा प्रश्न होता तिच्याशी ओळख कशी करायची? त्याच विचारात मी होतो; पण काही सुचतच नव्हतं.

असाच एक दिवस विचार करता करता बस मध्ये चढलो आज बस मध्ये अजिबातच गर्दी नव्हती बँक हॉलिडे होता कशाबद्दल तरी, पण आम्ही प्राव्हेट वाले आम्हाला सुट्टी असणं म्हणजे केवळ अशक्य. असो, तर असाच चढलो विचार करत मी बस मध्ये आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ती रोज उभी असते त्या जागे वर पाहिलं. पण आज ती जागा रिकामी होती. मन खट्टू झालं. मनाला समजावलं आज बहुतेक तिला पण सुट्टी असेल. मग वळलो माझ्या नेहमीच्या सीटकडे आणि मला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. आज ती चक्क बसलेली होती आणि योगायोगाने माझ्या नेहमीच्याच सीटवर.

मग काय माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आणि किती तरी वेळ तिच्याकडे वेड्यासारखा बघत होतो. तिला लक्षात आला आपल्याकडे कोणी तरी बघताय म्हणून तिने माझ्या कडे वळून बघितलं आणि गडबडली थोडी; घाई घाईने उठू लागली.

मी भानावर येऊन म्हटलं, "अहो मिस बसा बसा मला बाजूला बसायला जागा आहे अर्थात तुमची हरकत नसेल तर बसतो मी".

तिने स्मित केलं आणि म्हणाली; "बसा ना, माझी काहीच हरकत नाही."

"मग मगाशी अश्या उठून का चालला होतात?" मी.

अचानक तिच्या चेहर्या वरचे हावभाव झर झर बदलले, मग ती म्हणाली; "लोकांना माझ्या बाजूला बसायला आवडत नाही, कोणी माझा चेहरा पण बघायला मागत नाही; त्यांचा दिवस खराब जातो."

तिच्या अश्या बोलण्यावर मला काय बोलावं तेच कळत नव्हतं, मला शांत बसलेलं पाहून ती हसली आणि म्हणाली, "एवढे सिरीयस नका होऊ मला सवय आहे त्याची, चला माझा स्टॉप आला मला उतरायला हवं."

मी तिला जागा दिली उतरायला, तेव्हढ्यात काही तरी आठवलं मला आणि मी तिला म्हटलं; "आहो मिस तुमचं नाव तर सांगून जा."

ती हसून म्हणाली; "मी आरती आणि तुम्ही?"

मी तिच्या हसण्याकडे नुसतं मंत्रमुग्ध होऊन बघतच राहिलो, तिने डोळ्यांसमोरून हात हलवला तेव्हा मी भानावर येऊन म्हटलं; "मी देव."

ती पुन्हा हसली. मी माझी जीभ चावून म्हटलं; "म्हणजे माझं खरं नाव देवधर आहे, पण प्रेमाने मला सगळे देव म्हणतात."

"बरं मग देवा पुन्हा भेटू", असं बोलून ती निघून गेली आणि मी नेहमी प्रमाणे मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताच राहिलो.

आता रोज मी बस मध्ये चढून तिचा स्टॉप येऊन तिच्याशी बोलत उभा राहत असे मग ती उतरली कि मग माझ्या जागेवर जाऊन बसत असे.

बस मध्ये बरेचसे लोक आता माझ्या कडे विचित्र, काही जण वेडाच आहे ह्या नजरेने, काही जण केविलवाण्या नजरेने बघत होते, कारण मी आरतीशी बोलत होतो.

आमची मैत्री इतकी घट्ट झाली होती कि आता आम्ही कधी 'अहो जाओ' वरून 'अरे तुरे' वर आलो कळलंच नाही.

आता आम्ही एकत्र फिरायला देखील जायला लागलो होतो. वीकएंडला तर आम्ही एकत्रच फिरत होतो.

एकमेकांची कंपनी आम्ही फारच एन्जॉय करत होतो, जणू काही आम्हाला आता कोणाची गरजच नव्हती. रस्त्याने चालताना पण बरेचदा लोकं आमच्या कडे विचित्र नजरेने बघत होते, पण आम्हाला काहीच फरक नव्हता पडत जणू काही आम्ही आमच्या वेगळ्याच जगात वावरत होतो.

एकदा तिने तिच्या बरोबर झालेला दुःखद अनुभव सांगितलं ज्या नंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं.

आरतीचं मास मीडिया मधलं शिक्षण पूर्ण झालं होत, आणि नुकतीच ती एका नावाजलेल्या न्युज चॅनेलमध्ये नोकरीला लागली होती.

खूपच खुश होती ती. मोठी रिपोर्टर बनून काही तरी वेगळं करून दाखवण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार होत तिचं.

तिच्या ऑफिसला जायच्या रस्त्यावर एक कॉलेज लागत होतं. कॉलेजच्या बाहेर टपोरी मुलांचा घोळका बसलेला असायचा नेहमीच. त्यात एक राजू नावाचा मुलगा होता. तो तिच्या वर एकतर्फी प्रेम करत होता. होतीच म्हणा ती तशी सुंदर. पण आरतीला तो अजिबात आवडत नव्हता. आजच्या भाषेत बोलायचं झालाच तर ती त्याला बिलकुल पण घास टाकत नव्हती आणि त्याला ती काहीही करून हवीच होती. रोज तिच्या मागे पुढे करायचा. हजार वेळा तर तिला प्रोपोस करून झालं होत त्याच. पण तीचं ठरलेलं उत्तर असायचं.

आजही तो आला तिच्या जवळ तिला विचारायला, त्या वेळी त्याने हातात काही तरी मागे लपवून ठेवलं होतं. तिने नेहमीप्रमाणे त्याच्या कडे दुर्लक्ष करून त्याला नकार देऊन पुढे निघाली, तर तो परत तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला; "शेवटचं विचारतोय हो कि नाही"

तिने पण त्याला ठणकावून सांगितलं "पहिल्यांदा विचार नाही तर शेवटचं नाही म्हणजे नाही".

तो चवताळला आणि म्हणाला; "तू माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही होऊन देणार तुला".

क्षणात काय झालं कळलं नाही पण त्याने मागून ती वस्तू पुढे आणून तिच्या चेहऱ्यावर ओतली, काही कळायच्या आता तिच्या चेहऱ्याची आग व्हायला लागली चेहर्या वरची त्वचा विरघळायला लागली आणि ती बेशुद्ध पडली. जेव्हा शुद्धीत अली तेव्हा हॉस्पिटल मध्ये होती ती, तिचे आई-वडील हतबल होऊन रडत होते. पोलीस जवळ उभे होते. तिला कळतच नव्हतं काय चालय ते.

जेव्हा ती पूर्ण शुद्धीत अली तेव्हा तिला तिच्या वेदनांची जाणीव पुन्हा व्हायला लागली. ती जिथे तिचा चेहऱ्याची आग होत होती तिथे हात लावण्याचा प्रयन्त केला पण डॉक्टरांनी तसं करण्यापासून रोकल तिला. तिची आई तिच्या जवळ येऊन डोक्या वरून हात फिरवून रडत होती. ती आई ला विचारण्या साठी तोंड उघडणार तर तिला जाणवलं कि तिला एका बाजूने तोंडाची हालचाल करताच येत नाहीये. ती प्रश्नार्थक नजरेने सगळ्यांकडे बघत होती.

पोलीस पुढेआले त्यांनी विचारलं काय झालं ते सविस्तर सांगा, तुम्ही बेशुद्ध कश्या पडलात? ज्या कॉलेज समोर तुम्ही पडलात त्याच कॉलजेच्या वॉचमॅनने तुम्हाला ह्या हॉस्पिटलमध्ये आणलं आणि आम्हाला हॉस्पिटलवाल्यानी कळवलं. बेशुद्ध पडे पर्यंत काय घडलं ते सांगा.

मग तिने थोडाफार तोंड हालत होतं त्याने तिच्या बरोबर घडलेलं इथंभूत कथन केलं आणि परत बेशुद्ध पडली. आई घाबरलीच होती पळत जाऊन तिच्या वडिलांनी डॉक्टरला बोलावून घेतलं.

डॉक्टरांनी तपासून म्हटलं, "जास्त वेदनेमुळे ती बेशुद्ध पडलीये; कृपया तिला खूप जास्त त्रास देऊ नका".

तिच्या घराची परिस्तिथी खूप चांगली होती त्यामुळे तिच्या चेहर्यावर शस्रक्रिया करून तो थोडाफार सुधारला होता पण थोडाफारच.

मी पहिला होता तिचा आधीच फोटो, तिनेच दाखवला होता तो खूपच सुंदर होती ती दिसायला. अगदी अप्रतिम असा सौन्दर्य होतं तिचं.

तिच्या माहितीच्या आधारवर पोलिसांनी राजू आणि त्याच्या मित्रांना पकडलं आणि न्यायदेवतेसमोर उभं केलं; त्याच्या मागे कोणी बडी असामी नव्हती म्हणून त्यांना सोडवायला वा त्यांच्या विरुद्धचे पुरावे नष्ट करायला कोणी आला नाही आणि म्हणूनच कि काय त्यांना १० वर्ष कारावासाची शिक्षा झाली, पण काय ती पुरेशी होती?

आरतीचं आता पुढे काय होणार? तिचा आयुष्य तर उध्वस्तच झालं ना! त्यांना शिक्षा देऊन सगळं पूर्ववत होणार होत का?!

आता मीडिया उद्योगामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे दिसणं किती महत्वाचं आहे ते! आता आरतीचा चेहरा खराब झाला होता त्यामुळे तिची ती नोकरी तर आपसूक गेलीच होती पण तिच्या चेहऱ्यावरील आयुष्यभराच्या व्रणांमुळे तिला कोणीच नोकरी देण्यास तयार नव्हते आणि जरी कोणी झाले तरी ते तिच्या वर दया दाखवून तिच्या गुणवंतेच्या आधरावर नाही, वरून तिला असा पण सांगण्यात येत असे कि कृपया तुमचा चेहरा इतर कोणाला दिसणार नाही ह्याची पण दक्षता घ्या; उगीच तुमच्या चेहऱ्यामुळे कोणाला कामात त्रास नको.

मग काही दिवसांनी तिला ऍसिड अटॅक पुनर्वसन केंद्रा बद्दल कळलं, हि संस्था आरती सारख्या पीडित मुलींना त्यांनी सुरु केलेल्या वेगवेगळ्या उद्योग धंद्यामध्ये ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार काम देऊन स्वावलंबी बनवते. आरती तिच्या शिक्षणामुळे आणि इंग्रजी वर चांगला प्रभुत्व असल्यामुळे तिथे चालत असलेल्या कॉल सेंटर मध्ये व्यवस्थापक म्हणून काम बघत होती.

'बापरे' किती सोसलं होतं ह्या मुलीने आणि तेही तिची काहीही चूक नसताना!

चूक एकच होती तिची कि ती फार सुंदर होती किंबहुना अजूनही आहे पण आपला करंटा समाज अश्या सुंदरतेला जपायचं सोडून अशी विटम्बना करत त्याची. आज जग कुठे चालाय माणूस चंद्राच्याही पुढे जाऊन वेगवेगळ्या ग्रहांचा अभ्यास करतोय आणि आपण काय करतोय?

ह्या संपूर्ण विश्वाच्या पसाऱ्यात आपलं अस्तित्व खरं तर एखादया कस्पटा समान, पण हे जे फुकटचा घमेंड घेऊन बसलेत त्यांना कोण समजावणार?

जाऊदेत अशी लोकं कधीच सुधारणार नाही पण आता मात्र मी मनाशी पक्कच केलं होतं; आज पर्यंत जे झालं ते झालं पण आता मात्र मी तिची साथ सोडणार नव्हतो अगदी काहीही झालं तरी.

आता महत्वाची गोष्ट राहिली होती ते म्हणजे तिला माझ्या प्रेमाची कबुली द्यायची आणि तिच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा बोलून दाखवायची, मी आता फक्त योग्य अश्या संधीच्या शोधात होतो.

ती संधी मला लवकरच मिळाली. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, हल्ली सामाजिक माध्यमांमुळे वाढदिवस वैगेरे सारखी गोष्ट काही कोणापासून लपून राहत नाही. तसाच तिलाही माझा वाढदिवस कळला होता.

"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असच तुझे वाढदिवस दरवर्षी येवो आणि तू तो आनंदात साजरा करावास"- आरती

"तुला हवाय का मी माझा वाढदिवस दरवर्षी आनंदात साजरा करावा?" - मी

"अर्थात. कोई शक?" - आरती (नेहमीच्याच तिच्या खट्याळ हास्यात)

"मग मला तुझ्या कडून काही तरी हवं आहे ज्याने दरवर्षी हे शक्य आहे" - मी

"अरे माग ना तुझ्या साठी तर जान पण हाजीर आहे" - आरती

"जान नकोय मला तुझी, तर आयुष्यभराची साथ हवी आहे; देशील? लग्न करशील माझ्याशी?" - मी

मी अस म्हणताच तिचा चेहरा खारकन उताराला. मला माझं उत्तर मिळालं आणि शांत होऊन बसलो.

बराच वेळ झाला कोणी काहीच बोलत नव्हतं. एकप्रकारची जीवघेणी शांतात होती आमच्या दोघात.

बऱ्याच वेळाने तिने मौन सोडलं आणि म्हणाली, "तू जे म्हणतोयस ते ह्या जन्मात तरी शक्य नाहीये, ज्याचा विचार करतोय ना तू ते सगळं गोष्टीत सिनेमात चांगल्या वाटतात रे; खऱ्या आयुष्यात माझ्या सारख्या मुली बरोबर आयुष्य घालवायचं एवढं सोप्पं नाहीये, इकडे कोणी माझा चेहरा दिसला तर दिवस वाईट जाईल असा म्हणतात आणि तू मला बायको बनवायचं म्हणतोयस. तुझ्या घराचे तयार होतील? समाज काय म्हणेल? नाही हे शक्य नाही."

असं बोलून चेहरा ओंजळीत पकडून ती रडायला लागली.

मी तिची हनुवटी वर करून तिला म्हटलं, "तुझ्या रडण्यावरून मला हि तर खात्री झाली कि तुझही माझ्यावर प्रेम आहे, तू फक्त एकदा हो म्हण ह्या दुनियेचा विचार नको करुस, तुझ्या दुखात ह्यांनी फक्त तुझ्या जखमांवर मीठ चोळलं आहे, आणि माझ्या घरच्यांचं म्हणत असशील तर त्याच टेन्शन तू नको घेऊस ते मी बघून घेईन."

" हां आता तुझ्या घरच्यांना मी आवडणार नाही असं तुला वाटतंय का?" मी

"काही पण" असा बोलून लटके रागावून मानेला झटका देऊन ती तोंड फुगवून बसली.

इतकी सुरेख दिसत होती ती तिच्या अश्या रूपात, कि माझी नजरच हटत नव्हती तिच्या वरून.

"काय पाहतोस? असं म्हणून ती लाजून माझ्या मिठीत शिरली.

आता अर्धा गढ तर सर झाला होता आता मोठी खिंड लढवायची होती ती म्हणजे आई बाबांची परवानगी.

घरी गेलो तर वातावरण रोज सारखाच होतं. मी गेलो आणि फ्रेश झालो आणि आईला हाक मारून बोलवलं,
"आई इकडे जरा बाबांजवळ बस मला तुमच्या दोघांशीही महत्वाचं बोलायचय."

"थांब रे बाळा माझं जेवण बनवून व्हायचं बाकी आहे, काही महत्वाचं नसेल तर जेवल्यावर बोलू", आई.

मला आईच पटलं म्हटलं ठीक आहे जेवल्यावर बोलू.

जेवण वैगेरे झाली मग बाबांनीच विचारलं, "बोल देव काय बोलायचं होत महत्वाचं?"

मी आई बाबांना समोर बसवून आरती बद्दल सांगितलं, पहिले तर त्यांना आनंदच पण मी जसं तिचा आधीचा आणि आत्ताच फोटो समोर ठेवला तसं त्यांनी संभ्रमाने माझ्याकडे बघितलं मी त्यांना तिच्या बरोबर घडलेल्या अन्यायाबद्दल देखील सांगितलं; ते सुद्धा हळहळले तिचा त्रास ऐकून, पण त्या साठी मी माझं जीवन पणाला लावणं त्यांना अजिबात पटलं नाही. ते देखील त्यांच्या जागे वर बरोबर होते म्हणा आणि मी देखील माझ्या जागेवर, माझ्या हट्टापायी त्यांनी लग्नाला परवानगी दिली.

आरतीच्या घरून पण हिरवा कंदील मिळाला, आणि एक छानसा दिवस पाहून आम्ही कोर्टात जाऊन लग्न देखील केलं.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आरतीने आत्महत्या केली, तिला जाऊन पाच दिवस झाले आहेत पण काल पासून मला सतत तिचं अस्तित्व जाणवतंय. मला सतत कानात आवाज ऐकू येतोय तुझ्या मुळे माझं उरलसुरलेलं आयुष्य वाया गेलं, तुला सोडणार नाही मी.

मला सांगा ना माझं काय चुकलं? आरतीला समजावा ना माझं किती प्रेम आहे तिच्यावर. तिचा काही तरी गैरसमज झालाय ओ, कृपया तिला समजावा.

*****

"हाय, मी आरती."

"आं आं घाबरू नका, मी विनाकारण तुम्हाला त्रास देणार नाही, तसं पण माझी ह्या जगातून जाण्याची वेळ झालीये."

"मी फक्त तुम्हाला पूर्ण सत्य सांगायला थांबलीय इथे, जे तुम्हाला अर्धवटच माहितीये."

"हा तर देव, 'देव कसला राक्षस नाव असायला पाहिजे होत त्याच'. आश्चर्य वाटत असेल ना किती कृतघ्न मुलगी आहे, जो मुलगा तिच्यावर एवढं जीवापाड प्रेम करतो त्याला चक्क राक्षस म्हणतेय.

आता मी जे काही सांगणार आहे ते कळल्यावर तुम्ही पण म्हणाल राक्षस हेच नाव त्याच्यासाठी योग्य आहे.

माझं लग्न झालं तिथं पर्यंत तर तुम्हाला माहीतच आहे, त्या पुढे काय झालं ते मी तुम्हाला सांगते"

मी खरं तर खूपच आनंदात होते त्या दिवशी; माझं लग्न होत होतं, तेही माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलासोबत, प्रत्येक मुलीचं स्वप्न असता ना कि कोणी तरी असावं आयुष्यात जे आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करेल.

माझ्या बाबतीत त्या गोष्टीची तर मी अपेक्षाच सोडली होती, कारण तुम्हाला माहितच आहे राजू नावाच्या गुंडाने माझ्या वर ऍसिड अटॅक केल्यामुळे माझा चेहरा एका बाजूने खराब झाला होता, पण देव आला माझ्या आयुष्यात; मी स्वतःला फारच भाग्यवान समजत होते. मी त्याच्या वर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता आणि हीच माझी घोडचूक होती.

आमच्या लग्नाला मोजकेच लोकं होती. माझे आई वडील आणि माझ्या सर्वात जवळची मैत्रीण आणि त्याचे दोन मित्र. त्याचे आई बाबा लग्नाला येऊ नाही शकले त्यांना गावी जावं लागलं होतं काही तरी महत्वाचं काम आला होतं म्हणून, मला तिथेच ते खटकलं होत, पण माझ्या आनंदावर विरजण पडायला नको आणि नंतर घरी गेल्यावर विचारू म्हणून सोडून दिल. आमचं लग्न झालं पाठवणी होऊन मी घरी आले.

प्रत्येक मुलीच्या घराबद्दल काही तरी अपेक्षा असतात तश्या माझ्याही होत्या, पण घरी गेल्या बरोबर माझी निराशा झाली, घरात काहीच सामान नव्हतं आणि इतकी घाण होती जसं काय वर्षानु वर्ष इथे कोणी राहतच नाहीये. मला आश्चर्य वाटलं कारण ह्याने तर मला सांगितलं होत कि तो त्याच्या आई वडिलांबरोबर राहतो आणि ह्या घराची अवस्था बघता असं वाटत नव्हतं. मी विचारलं असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि रागात उठून बाहेर जायला लागला.

जाता जाता मला म्हणाला, "तयार होऊन बस; परत आल्यावर असे फालतू प्रश्न विचारून माझा मूड खराब नको करुस; मी जेवण बाहेरून घेऊन येतो, उद्या बघू सामानाच."

मी पण म्हटलं आज आता त्याचा मूड नको खराब करायला, म्हणून मी आधी घर आवरायला घेतलं. झाडून पुसून स्वच्छ केलं, घाणेरडी चादर बदलली आणि स्वतः तयार व्हायला गेले.

त्याला लाल रंग फार आवडतो म्हणून मी लाला रंगाची पारदर्शक साडी घेतली होती त्याच्यासाठी सरप्राईझ म्हणून आणि त्यावर सेक्सी असा ब्लॉऊज देखील, हलकासा मेकअप केला आणि छान अशी तयार होऊन बसले मी त्याची वाट बघत.

थोडाच वेळात तो आला; अगदी नशेत तर्रर्र आणि आल्या आल्या माझ्या वर तुटून पडला. तोंडातून इतका वास येत होता त्याच्या, ओरबाडत होता तो अगदी मला मी विरोध करण्याचा प्रयन्त केला तर त्याने २-३ कानाखाली लागलेल्या माझ्या मी जोरात हिसका देऊन त्याच्या पासून लांब पाळण्याचा प्रयन्त केला, तर त्याने मला पकडलं आणि माझी साडी अक्षरशः ओरबाडून काढली आणि त्याच साडीने मला बांधून ठेवलं. बलात्कार केला माझा. फरक इतकाच होता कि हा समाज मान्य बलात्कार होता.

तो शांत झाल्यावर माझ्या पासून बाजूला झाला मी जोरात रडून त्याला म्हटलं असा का वागलास माझ्याशी? मी काय वाईट केलाय तुझं?

तर तो निर्लज्ज हसायला लागला आणि म्हणाला तुला काय वाटलं माझं प्रेम आहे तुझ्या वर? अरे हाड, तुझ्या सारख्या छप्पन पोरी पैदा करिन. तोंड बघितलाय का कधी आरश्यात?

तुला वाटलंच कसं कोणी तुझ्या सारख्या भयानक दिसणाऱ्या मुलीबरोबर लग्न करू शकतो? तुझ्या सारख्या मुली ज्या स्वतःची औकात विसरतातना त्यांच्या बरोबर असच होत.

"अरे पण माझ्या बरोबर का वागलास असा? जे काही आयुष्य होत माझं त्यात खुश होते मी. का आलास माझ्या आयुष्यात?" मी

"माझ्या मित्राचा बदल घ्यायला, साली बाईची जात काय लायकी आहे रे तुमची आमच्या समोर उभी राहायची आणि त्याला नकार देतेस तू? आणि तुझ्या नकाराची शिक्षा म्हणून त्याने तुझ्या अंगावर ऍसिड फेकलं तर तू त्यालाच जेल मध्ये पाठवलस? म्हणून मग मी तुझा बदल घेण्यासाठी हे केलं, आणि फक्त मीच नाही राजू आणि आमचे अजून ४ मित्र तुझ्या बरोबर तेच करणार आहेत. एन्जॉय, बाय."

असा बोलून तो निघून गेला आणि त्याच्या मागोमाग राजू आणि त्याच्या मित्रांनी रात्र भर माझा छळ केला आणि मी निपचित पडले होते तर माझे हात पाय सोडून निघून गेले, जाता जाता मी त्यांचे शब्द ऐकले आज रात्री पण खूप मज्जा करू. हे ऐकून मला कळलं आता काही माझी ह्या नरकातून सुटका नाही, म्हणून उरला सुरलेलं बळ एकवटून मी उठले आणि स्वतःला त्याच साडीने गळफास लावून घेतला ज्याने त्यांनी मला बांधून ठेवलं होतं.

दिवसभर कोणी माझ्या कडे फिरकल सुद्धा नाही, रात्री आले फक्त माझ्या शरीराबरोबर मजा मारायला, येऊन त्यांनी मला फॅनला लटकलेला देह पाहून "यार अजून थोडे दिवस मजा मारायला मिळाली असती तर बरं झालं असत, काय माल होती राव" असे शब्द निघाले नराधम राजुच्या तोंडून.

त्यांना माझं फक्त मेलेला देह दिसत होता पण माझा आत्मा देखील तिकडेच होता, जे त्यांना माहित नव्हतं; खूप झालं सहन करून आता माझी वेळ आली होती मी दाखवणार होते अन्यायाचा बदला कसा घेतात ते. राजू आणि त्याच्या मित्रांना मी कधीच यमसदनी धाडलं आहे उरला होता तो फक्त हा राक्षस, त्यालाही यमसदनी धाडून मी माझ्या मार्गाने जायला मोकळी झाली आहे.

हा राक्षस त्या दिवशी त्या पाच जणांबरोबर नव्हता म्हणून वाचला होता. आज चार-पाच दिवसांनी तो इकडे फिरकला होता ते पण मागच्या पाच दिवसांपासून त्याच्या मित्रांचा तपास लागत नव्हता म्हणून ते इकडेच असतील म्हणून इकडे शोधायला आला होता. आत आल्या आल्या त्याच्या मित्रांचे मरून पडलेले देह आणि माझा लटकलेला देह बघून आणि त्यांच्या मधून येणार सडका वास ह्यामुळे त्याला ओकारी येत होती, म्हणून तो पळून जाण्याचा प्रयन्त करत होता. पण मी दरवाजा बंद करून त्याला तिथेच अडकवून ठेवलं होत.

त्याला सहज मरण नव्हती देणार मी तो माझा सर्वात मोठा गुन्हेगार होता. मी सुरवातीला माझं फक्त अस्तित्व जाणवून दिल होत त्याला, नंतर मग माझं भयानक रूप दाखवून त्याला घाबरवलं होत, आज तेरा दिवस पूर्ण झालेत मला जाऊन आणि त्या राक्षसाने देखील कंटाळून स्वतःच आयुष्य संपवलं होतं.

तसाच तडपून तडपून मेला जसं मला मारायला भाग पाडलं होत त्यांनी.

आज खऱ्या अर्थाने माझ्या आत्म्याला शांती मिळेल. जी कदाचित कोणत्याच विधींमुळे मिळाली नसती.

एकच विचारणं आहे तुम्हाला प्रेम खरंच असतं का?...

समाप्त

(हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, साधर्म्य आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा.)