मला बहीण होती - भाग दुसरा shabd_premi म श्री द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला बहीण होती - भाग दुसरा

ह्या कथेचा पहिला भाग मी 8 फेब्रुवारी 2019 ला सादर केलेला असून कथेचा दुसरा भाग सादर करतोय....


आम्ही तिला पुरवून आलो, घराबाहेर आता स्मशान शांतता पसरली होती. घरात जाऊन बघितलं तर आई तीच करायला लागली होती, बाबाही आवराआवर करत होते, स्वयंपाक खोली ओलांडून मी माझ्या खोलीत शिरलो तर कुणीतरी एका कोपऱ्यात माझं सामान आधीच नेऊन ठेवलेलं होत, माझी नि तिची खोली एकच होती, खोलीतले दोन कोपरे तिचे तर दोन कोपरे माझे, भिंतीवर लावलेल्या त्या माझ्या फोटोवर माझ लक्ष गेलं, तो लहानपणीचा माझा फोटो अजूनही तिथेच होता, मला आश्चर्य वाटत होतं, तो अजून तिथे कसा काय, अस म्हणतात ना की मेलेल्या माणसाचाच फोटो भिंतीवर लटकवतात...मग मी?
तेवढ्यात आईने हाक मारली "अरे मोरा, चहा घेतोस का रे, दमला असशील ना," मी आईला नाही म्हणालो आणि तिच्या त्या दोन कोपऱ्यांतल्या गादीवर जाऊन बसलो. तिच्या अभ्यासाची पुस्तकं, तिचं दप्तर सार काही बांधून ठेवलेलं होतं, मी ती गाठ सोडली आणि वरची वही उचलली, तिचं अक्षर खूप छान होतं, समोरून वहीचे दोन तीन पानं वाचून झाल्यावर मी वहीला मागून उघडलं, मागच्या पानावर माझं नाव लिहिलेलं दिसलं, मयुरेश दादा तीच माझ्यावरचं प्रेम मला दिसलं, पण माझं प्रेम तिला कस दाखवू.. तिथे तिची पुस्तकही होती, तिचा अभ्यास चांगला होता, पण ती आजारी पडल्यापासून परत कधी हातात पुस्तक घेऊ शकली नव्हती. मी तिच्या आणखी काही वह्या हाती घेतल्या, त्या वह्यांपैकी एका वहीत मला ४-५ पानांचा एक गठ्ठा सापडला, म्हंटल ह्यात काय आहे तर बघुयात, तिने मला लिहिलेली पत्रं होती त्यात, ती पाहताच माझ्या मनात प्रश्न पडला, आई वडिलांना कधी ही पत्र मला पाठवली असती तर काय बिघडलं असत, निदान एक तरी, त्यावर उत्तर त्यांनीच आधीच दिल होत, काय तर तुझं मन लागणार नाही तिथे, त्यामुळे त्यांना न विचारलेल बर, पत्रं हाती घेतलं त्यावर लिहिलेलं होत,

प्रिय हरवलेल्या दाद्यास,

मी तुझीच बहीण छकुली

ओळखत असशीलच ना मला, आई सांगत होती तू लहानपणी भुर्रर्र वगैरे न्यायचास म्हणून, मग आता का नाही नेत तू, आईला विचारून कधी तिने सरळ उत्तर दिलीच नव्हती, मला असा राग यायचा ना त्यांचा, मी तुझी कित्ती वाट बघायची माहितीये का, आपल्या शेजारी ती सरला रहायची ना तिचाही भाऊ असाच फार कुठेतरी शहरात रहायचा, तरी तो दिवाळीत, रक्षाबंधनाला आणि कितीतरी सणांना घरी यायचा, आई त्याला ओवाळायला लावायची, मी ही त्याला ओवाळायची, त्याचाकडून खाऊ मिळायचा पण मग तोच खाऊ माझ्या भावा कडून मिळाला असता तर, असा प्रश्न मला पडायचा, असे कितीतरी प्रश्न मी तुझ्यासाठी लिहून ठेवतेय, कधीतरी तू वाचशील आणि मला उत्तरं देशील ह्याची खात्री आहे मला.
मला आठवतं तुझ्या पाठीवर बसून गावभर फिरणं, पण तू फिरवायचास नंतर कुणीच फिरवत नव्हतं, आईसुद्धा बाहेर जाऊ द्यायची नाही, अधून मधून शेजारच्या सरला आणि शारदा सोबत खेळायची पण तुझ्यासोबत खेळण्याचा तो आनंद कुठेच सापडत नसायचा... काही दिवसांनी तू नाहीसाच झालास, एखादा भूत सुद्धा इतक्या लवकर गायब होणार नाही, पण तू झालास आणि नंतर दिसलाच नाहीस, मी शाळेत चांगली होती, बाई माझं नाव काढायची आईला वगैरे सांगायची, काही दिवसांनी माझी परीक्षा होती, मी परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होणार असे मला वाटत होते, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि मी आईकडे हट्टच धरून बसले, मला कुठेतरी घेऊन चल म्हणून, शेवटी तिने मला खेड्यावर घेऊन गेली, तिथे मला करमायल लागले, अस वाटायचं इथेच रहावे कायम.
अंगणात खेळायला माझे तिथे नवीन सवंगडी बनले रश्मी, जया, सुशीला आम्ही रोज खेळायचो, घराच्या थोडं दूर रिकामी जागा होती. एकदिवस असच खेळता खेळता माझ्या पायाला काही चावल्या सारख झालं, मी ते खाजवून त्याची खाज कमी होईल म्हणून पाहत होते पण तस होत नव्हतं, काही सेकंदांनी परत तिथे खाजवायला लागायचं आणि इकडे आईची घरी जाण्याची तयारी सुरू झाली, त्याच्या त्रास वाढत गेला , मी आईला काही बोलले नाही कारण मी त्यांच्यासोबत आईला न सांगताच जायचे, मी घरी परत आले आणि आजारी पडले, तेही कायमचेच, पुढे काही कळायच्याआधीच माझी शाळा बंद पडली, पेन्सिल, रबर, पुस्तकं, दप्तर कुठच्या कुठे निघून गेले, माझ्याशी बोलायला कुणीच येत नसे, मला कळेनासं झालं, कुणीच सांगायला तयार होत नसे, आई बाबा ही अबोलच, काही दिवसांनी मी खाटेवरच झोपून असायचे. आजाराचा त्रास वाढू लागला, असहनिय वेदना होत होत्या, शरीरावर त्याचे परिणाम दिसुन येत होते.
शरीरावर पूर्णपणे फोडच फोडं झाली होती, आतून गळ्यापर्यंत ती मला त्रास देत होती, हळू हळू माझं बोलता येणाही बंद झालं. मी मी आईला कसे तरी हातवारे करून करून समजावत होते पण तीला जेवढं समजायचं तेवढं ती करायची, बाबा तर कधी कधीच मला दिसत नसायचे. माझे सारच अवयव हळू हळू निकामी होत गेले शिवाय डोळ्यांच्या, त्या डोळ्यांना आस तुझी लागली होती म्हणून ते अजून जिवंत होते...अखेर कितीतरी दिवस तुझी वाट पहिली मी थकले आई वडिलांनाही वाटत होते, कधी ही जाईल आणि कधी आमची सुटका होईल आणि मी निघून गेले.
नियतीचा खेळ सुरू झाला, माझा आणि तिचा प्रवास लहानपणीच संपला. नंतर ती कधी मला दिसली नाही आणि मी ही तिला...
तेवढ्यात जणू काही भूकंप आलाय अस वाटायला लागलं आणि पाहतो तर आई मला गदागदा हलवत होती. तिचे पत्र वाचता वाचता मला झोप लागली होती. आई म्हणे तुला किती आवाज दिले रे मी तू तरीही आवाज देत नाहीये, मी पत्र परत हाती घेतलं तेव्हा ते पत्र अर्धवट असल्याचं दिसलं.....म्हणजे
म्हणजे छकुली माझ्याशी खरंच बोलली असेल का, प्रत्यक्षात नाही पण ती स्वप्नांत येऊन माझ्याशी तिच्या मनातलं सर काही सांगून गेली..ती आणखी माझ्याशी बोलू शकत होती पण आईने मला उठवलं आणि माझं नि तिचं बोलणं मधातच बंद पाडलं...

नियतीच्या ह्या खेळाचा मला खूप राग येत होता..बहीण असून सुद्धा मी बहिणी सोबत राहू शकलो नव्हतो...



(टीप:- सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असून, कथेचा कुठलाही भाग प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे अनिवार्य...)

मयुर श्री बेलोकार

9503664664

Insta@shabd_premi