Gotya - 2 books and stories free download online pdf in Marathi

गोट्या - भाग 2


एक दोन वर्षानंतर गावातच एकाने टीव्ही आणली मग गोट्याचे बाहेरगावी बघायला जाणे बंद झाले. मात्र शाळा बुडवून फिल्म बघण्याचा सपाटा चालू झाला. या शाळेत मात्र एक कडक शिस्त होती. रोज दोन वेळा हजरी व्हायची. गैरहजर असलं की दुसऱ्या दिवशी हातावर छडी पडायची. रोज वही पूर्ण करणे, शब्द पाठ करणे, शुद्धलेखन लिहिणे ही कामे करावे लागत असे त्यामुळे त्याला गोट्या खेळायला खूपच कमी वेळ मिळत असे. तरी देखील तो गोट्या खेळणे सोडत नसे. रिंगणात सर्व गोट्या टाकायचे आणि सांगितलेली गोटी उडवायची, एक खोल गड्डा करायचा त्यास गल म्हणायचे, रेषेच्या आत सर्व गोट्या टाकायचे, गलीत जर गोटी पडली तर तीन वेळा मारण्याची संधी मिळायची अन्यथा एक वेळा. असेच दोन गल असलेला खेळ असायचा, त्या खेळात दोन्ही गल मध्ये एक एक गोटी पडली तर सर्व गोट्या जिंकले जायचे. या सर्व खेळात नेम धरून गोटीला मारणे खूपच महत्वाचे असायचे आणि त्यात गोट्या खूपच तरबेज होता. त्यानंतर हाताच्या मधल्या बोटाने टिचकी मारण्याचा खेळ कोण्या तरी झाडाखाली किंवा पडवीमध्ये रंगात यायचा. राजा राणी, टिक बॉम्ब, आस यासारखे अनेक खेळ गोट्या सहज जिकायचा. त्यामुळे सहसा कोणी ही त्याच्या सोबत खेळायचं नाही. म्हणून तो आपल्या पेक्षा मोठ्या असलेल्या मुलांसोबत खेळायचा. त्यांना ही जिंकू द्यायचा नाही. त्यामुळे अनेकदा वाद आणि भांडणं व्हायची. फक्त हेच नाही तर विटी दांडू, भोवरा, क्रिकेट यांसारखे खेळ देखील खेळायचा. त्याचा नेम सर्वात चांगला असल्यामुळे तो शक्यतो हारायचा नाही. घरात जे काही रिकामे डबे होते त्यात नुसत्या गोट्याच होत्या. गोट्यामुळे एक फायदा झाला. त्याचं गणित विषय खूप पक्के झाले. शंभर पर्यंतची अचूक गिणती असेल, मिसळणे म्हणजे बेरीज करणे आणि काढून टाकणे म्हणजे वजाबाकी करणे या क्रिया अचूक सोडवू लागला. एका काचेच्या भरणीत तो पन्नास गोट्या टाकून ठेवायचा आणि दुकानात ते दिल्यावर त्याला पंचवीस पैसे यायचे. यामुळे त्याला गुणाकार देखील चांगले जमू लागले. इतर विषयापेक्षा गणित त्याला जास्त आवडू लागले. दुकानात पैश्याला एक गोटी मिळायची आणि हा मित्रांना आणि दुकानात देखील पैश्याला दोन गोट्या देऊन पैसे गोळा करायचा. गोट्या खेळता खेळता त्याला पैसे खेळायचा नाद लागला. पैसे मिळावे म्हणून आईचे ही लहान मोठे काम करून पैसे मिळवायचा. शाळा सुटल्यावर शेण गोळा करणे, हौदात पाणी भरून ठेवणे, दळण दळून आणणे असे काम तो मदत म्हणून नव्हे तर पाच-दहा पैसे आईकडून मिळविण्यासाठी करायचा. हे पैसे घेऊन मोठ्या मुलांसोबत आणि माणसासोबत तो पैसे ही खेळू लागला. ही गोष्ट जेंव्हा त्यांच्या वडिलांच्या कानावर गेली. तसे त्याचे वडील त्याच्यावर खूप रागावले. हा असाच खेळत राहिला तर वाया जाईल म्हणून त्यास शहरातल्या शाळेत नेऊन टाकले. येथून गोट्याचे जीवन पार बदलून गेले. त्याला खेळायला कोणी साथीदार मिळत नव्हता. सर्वच मुले शाळा आणि घर यातच व्यस्त असायची. तो गावी आला की मनसोक्त खेळायचा आणि परत शहरातल्या शाळेत जायचा. याचठिकाणी त्याला अभ्यासाचे मर्म कळाले. तो हळूहळू आपला खेळ कमी केला आणि अभ्यासात लक्ष द्यायला लागला. दहावीची परीक्षा विशेष श्रेणीत पास झाल्यामुळे शाळेत त्याचा सत्कार झाला होता. त्याचे जे साथीदार गावात राहिली ते गोट्याच्या यशाकडे आश्चर्याने पाहू लागली. तो मात्र या यशात खेळाचेच गमक आहे असे मनाला सांगत होता. खेळामध्ये जी जिद्द, चिकाटी, संयम आणि अवधान होतं, त्याचाच वापर अभ्यासात केल्यामुळे हे यश मिळविता आलं असा तो आपल्या भाषणात बोलताना सांगितले. चला जेवायला बसा या आवाजाने तो शुद्धीवर आला. खरोखरच लहानपणीचे दिवस सोन्याचे होते, आज ती मजा नक्कीच नाही असे मनात म्हणत तो जेवायला बसला.

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

इतर रसदार पर्याय