श्री दत्त अवतार भाग ५ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्री दत्त अवतार भाग ५

श्री दत्त अवतार भाग ५

९) माणिकनगर (बिदर )सोलापूर कर्नाटक

हैद्राबाद बस मार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणा पासून १ कि.मी अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे. कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते.

सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभुमी आहे

राम नवमीच्या दिवशी सद्गुरु दत्त प्रभुंनी बया बाईंना (माणिक प्रभूंची आई) दृष्टांत देऊन मी तुझ्या उदरी पुत्र रुपाने जन्म घेईल असा आशिर्वाद दिला.

२२डिसेंबर १८१७ साली (मार्गशीर्ष शुध्द चतुर्दशी) दत्त जयंतीच्या दिवशी बसवकल्याण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म झाला.

माणिक नगर, बसवकल्याण, बिदर या परिसरा मध्ये प्रभुनीं अनेक अवतार लीला केल्या आहेत.

त्यापैकी एक म्हणजे ज्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापूरला वास्तव्यास असतांना दिवाळीच्या दिवशी आपल्या अनेक शिष्यांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक शिष्याच्या घरी भोजनासाठी गेले आणि त्याच वेळी ते देह रूपाने गाणगापूरला सुध्दा होते.

त्याच प्रमाणे श्री माणिक प्रभूजी बिदर जवळील झरणी नृसिंह येथे मुक्कामास असतांना त्यांच्या अनेक हिंदू - मुस्लिम भक्तांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक भक्ताच्या घरी भोजनास गेले आणि त्याच वेळी ते देहरूपाने झरणी येथे देह रूपाने गाढ निद्रा घेत होते.

त्यांचे एक वैशिष्ट्य होते की, त्यांच्या दरवाज्यातून कधीही कुणीही विमुख गेले नाही.

शिर्डीचे साईबाबा सुध्दा त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले होते.

श्री माणिक प्रभूजी हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन होते.

त्यांचा आपसात परिचय होता.

त्यांच्या नेहमी भेटी होत असत.

श्री माणिक प्रभूंनी सकल संत संप्रदायाची स्थापना करुन १९ व्या शतकाच्या मध्यकाळामध्ये या महान देशाच्या मध्यकाळा मध्ये एका मुसलमान अधिराज्यामधे (तत्कालीन, निजाम इलाका) हिंदी समाजाच्या एकात्मतेचा प्रयोग यशस्वी करुन आम्हापुढे एक आदर्श ठेवला.

पुढे श्री रामकृष्ण परमहंसांनी याच तत्वाचा उद्घोष केला व महात्मा गांधीनीही हेच तत्व अंगीकारून आपली राष्ट्रीय ऐक्याची इमारत रचली.

हे एकमेव असे दत्त क्षेत्र आहे की, ज्याठिकाणी आजही गादी परंपरा सुरु आहे.

१०) अक्कलकोट सोलापूर, महाराष्ट्र

अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिध्द पुरुष होते.

पंजाब राज्यात पानिपत जवळ छेली या खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुभंगून अष्ट वर्षाची मूर्ती प्रकट झाली.

त्या मूर्तीने लगेच स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला.

त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली.

तप करतांना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले.

एका लाकूड तोड्याने झाड तोडतांना त्याच्या कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला.

त्यामूळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोक कल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले.

फिरत फिरत स्वामी १८४४ साली मंगळवेढ्यास आले.

तेथे बारा वर्षे राहून चैत्र शुध्द द्वितीया १८५६ साली अक्कलकोटला आले.

अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य २२ वर्षे म्हणजे त्यांच्या समाधी कालापर्यंत होते.

त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे.

त्यांचे वास्तव्य नेहमी वटवृक्षाच्या खालीच असे.

त्यावेळचे इंग्रज पत्रकार व इतिहासकार जनरल अल्कार्ट हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन ब्रिटन मध्ये गेल्यावर असे जाहीर केले की, आजच्या काळात प्रभू येशू पहावयाचे असेल तर ते अक्कलकोटला आहेत .

स्वामींनी चैत्र शुध्द त्रयोदशी सन १८७८ मध्ये अक्कलकोट इथे दुपारी १२ वाजता समाधी घेतली.

११) माणगाव (सिंधुदुर्ग, कोकण महाराष्ट्र)

योगीराज प.पु.वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी) यांचे हे जन्मगाव.

दत्तभक्त श्री गणेश शास्त्री आणि सौ.रमाबाई या ब्राह्मण दांपत्यांच्या पोटी श्रावण कृष्ण पंचमी शके १७७६ला माणगाव येथे स्वामीचा जन्म झाला.

ते दत्त अवतारी सिध्द पुरुष होते.

कारण गणेश शास्त्रींना गाणगापूर येथे सद्गुरू दत्तात्रेयांनी दृष्टांन्त देऊन मी तुझ्या कुळात जन्म घेईल असा आशिर्वाद दिला होता.

श्री टेंबे स्वामींचे आयुष्य म्हणजे केवळ दत्तात्रेयांच्या कृपेने विकसीत झालेले आणि सर्वांच्या आयुष्यात सुगंध पसरविणारे ब्रह्मकमळ असे भक्त समजत .

स्वामींनी पायी भारत भ्रमण करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला.

त्यांच्या कार्याला दत्त संप्रदायात तोड नाही.

त्यांना सर्व विद्या अवगत होत्या.

श्री टेंबे स्वामी हे उत्तम वैद्य, मंत्रसिध्द, यंत्र - तंत्रज्ञ, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाड:मयातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी, वक्ते, हठयोगी, उत्कट दत्तभक्त व साक्षात दत्तात्रयस्वरूप होते.

स्वामीजींना अनेक विद्या अवगत होत्या.

अशा महान योगीराजाने गरुडेश्वर येथे १९१४ मध्ये समाधी घेतली.

 माणगाव हे क्षेत्र कोकणांत सिंधुदूर्ग जिल्ह्यात सावंतवाडी जवळ आहे.

१२ ) श्री क्षेत्र कडगंची (गुलबर्गा, कर्नाटक)

वेदतुल्य अशा गुरु चरित्र ग्रंथाचे लेखन कडगंची येथे झाले.

हे स्थान श्री सायंदेव दत्त देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे.

गाणगापूर पासून ३४ कि.मी.अंतरावर हे पुण्य स्थान आहे.

सायंदेव साखरे हा श्री नृसिंह सरस्वतींचा प्रिय व श्रेष्ठ भक्त होता.

त्याच्याच ५ व्या पिढीत सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला.

श्री सिध्द मुनींनी सांगीतले आणि सरस्वती गंगाधर यांनी लिहीले तोच गुरुचरित्र ग्रंथ होय.

गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री सिध्दनाम धारक संवादे असा उल्लेख आहे.

त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर होय.

१३) मंथनगड (मंथनगुडी) महेबुब नगर (आंध्रप्रदेश)

श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा प्रिय शिष्य वल्लभेश हा कुरवपूरला नवस फेडण्यासाठी जात असता याच ठिकाणी चोरांनी त्यास अडवून त्याची हत्या केली.

त्यामुळे श्रीपाद वल्लभ स्वामींनी अवतार संपल्यानंतर सुध्दा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येथे प्रकट होऊन आपल्या प्रिय शिष्यास परत जिवंत केले, तेच हे ठिकाण.

हैद्राबाद रायचूर बस मार्गावर मतकल पासून हे क्षेत्र १० कि.मी.अंतरावर आहे.

क्रमशः