Ukirda books and stories free download online pdf in Marathi

उकिरडा

उकिरडा

रात्री सात आठ वाजताची वेळ आहे. गण्याचं नुकताच जेवण उरकलं होत. त्याची आई त्याच्या बापाला जेवायला वाढत आहे. गण्याचा बाप गावाच्या थोडं लांब असलेल्या तेलाच्या कारखान्यावर काम करतो. सोबत तीन एकराची जमीन आहे पण त्यात जास्त उत्पन्न निघत नसे, म्हणून गण्याची अन त्याच्या बहिणीची फीस भरायला तो कामाला जात होता. अनुला कॉलेजला पाठवायची त्याची लई इच्छा होती. ती पोर आता नववीत आहे. अभ्यासात लई हुशार. दहावी नंतर शिकवायला तो आतापासूनच पैसं जमा करत होता. अन त्याच्या उलटं गण्या यावर्षी आता मॅट्रीक पास होईल का नाही याची बापाला गॅरंटी नव्हती. अभ्यासात तसा कच्चा पण बापाच्या हट्टापायी दहावी पास होऊन दाखवायचं त्यानं ठरवलं होतं.

गण्यानं हात धुतला अन उठू लागला.

“आर ऐ लेका आर ताट उचल की”

गण्याने वाकुन ताट उचलले अन् टीव्हीच्या खोलीतून बाहेर ताट ठेवायला गेला अन् जाता जाता भिंतीला टेकून पाठांतर करणाऱ्या अनुच्या पुस्तकावर पाण्याचा थेंब पाडून गेला. अनूनं रागान बघितलं अन् सुस्कार सोडला. दुर्लक्ष करून पाठांतर करायला सुरुवात केली.

गण्याने ताट अन् तांब्या खाली ठेवला. मध्ये आला टीव्हीच बटणं दाबल अन् भिंतीला टेकुन तागंड्या वर करुन रिमोट हातात घेतला व चॅनल बदलू लागला. तसा अनुला राग आला.

“आबा त्याला सांगा की टीव्ही बंद करायला”

बाप तोंडाला वाटी लावून आमटी पीत होता.

“असू दे तू तोवर जेवन उरक” आई

“नाही गं आजच्या आज ही कविता करायची आहे मगच जेवण मी”

तेवढ्यात आबा नी आमटी संपवली आणि पोरा वर खेकसेले.

“गण्या बंद कर तो टीव्ही नाही तर चपलीन हानीन तिथं येऊन.”

“ये आमटी वाढ ग थोडी”

टीव्हीवर हातीम मलिकेचे संगीत वाजत होते. आबानी रागवताच गण्याला लई राग आला त्यानं दात खातच अनु कढ बघितल अन ताठयातच उठला.

“काय व तुम्हीबी तिची बाजू घेता एवढं हातीम बघूद्या की. तीला बी तो पर्यंत जेवायला सांगा. का सदा मलाच रागवायाच, जावा तिकडं मी नाही कारनार बंद”

पोरग चिडलेल बघून बापान नमत घ्यायचं ठरवलं. दोघबी भांडत बसले तर काय कामाचं. तो हळू आवाजात म्हणला.

“आर पोरा तुझं बी मॅट्रीकच वरीस हाय तूबी वाच थोडं तीला बी वाचू दे कर बंद तो टीव्ही. उद्या बघ ते कुठं पळून चालाय का”

गण्या न टीव्ही कढ बघितल ह्या गोंधळत सुरुवातीची तीन चार मिनिट त्याची बघायची चुकली. उद्या पूर्णच बघता येईल म्हणून त्यानं टीव्ही बंद केला.

अन बाजूच्या पोते रचलेल्या फळी खाली हात घातला. तिथं तीन चार पुस्तकं धूळ खात पडली होती त्यात जे हाताला लागलं ते त्यानं बाहीर काढलं. हातात मराठीच पुस्तक लागलं अधेना मध्ये एक पान काढून तो वाचू लागला. ती जगदीश खेबूडकरांची कविता होती

आकाशी झेप घे रे पाखरा

सोडी सोन्या चा पिंजरा

तुज भवती वैभव माया

फळ मिळते रसाळ खाया …

बापाच जेवण आता उरकलं होत बाहेर येऊ न ओला हात त्यांनी दारावर टाकलेल्या ओढणीला पुसला. अन खाली बसले. इकडं गण्यानं अन मन चार ओळी वाचायल्या नसतील कि लगेच पुस्तकं बंद केल अन फळी खाली ढकलल.

“आता काय झाला?” आबा

“सडांस आल्याय”

“आर हाणला तुझा मोहतूर आताच खाल्लास किर”

अनु हालकस हसत होती. गण्या काहीच बोलला नाही.त्याला लाज वाटत होती.

“काम अन अभ्यास म्हणलं कि हे सुचत आता हातीम बघता ना नसतं सुचलं. बुडं टेकून घडीभर बसला असतास”

“जावू का नगं मगं”

“जा बाबा जा नाही तर माईच काम वाढवशील” दोघ अनु अन आबा एकमेकांकडे बघून हसत होते.

गण्याला राग आलेला बघून माय म्हणाली.

“ये जा तू. काय ऐकतो तर बाप लेकीचं” म्हणत तिने दुरडी झाकली.

गण्या बाहेर आला सिमेंटच्या टाकीत डबड् बुडवून पाणी घेतल. माईन त्याला बॅटरी दिली त्याने घड्याळाकडे नजर टाकली ८:२५ झाले होते.

“जास्त लांब नको जाऊ”

आईने जाता-जाता सूचना दिली. गण्याने घर ओलांडले आणि पांदीच्या रस्त्यावर लागला त्याच्या पुढ तीस-चाळीस पावलावर पांदीचा शेवटचा विजेचा खांब होता. त्याचा बल्ब बंद चालू होत होता. जाताजाता आजूबाजूच्या एक दोन घर होती तिथले टीव्हीचे आवाज येत होते त्याने वीस-पंचवीस पावले चालली नसतील की लगेच वातावरण शांत झाले. टीव्हीचे आवाज आता येत नव्हते आजूबाजूला फक्त रातकिड्याचे आणि नाकतोड्याचे आवाज येत होता.

आत्ताच घराच्या गलक्यातुन बाहेर पडलेल्या गण्याला ती शांतता कशीतरी भासत होती. त्याने बंद चालू होणारा विजेचा खांब बघुन आत्ताच बॅटरी चालू केली तो हळू हळू पुढे जात होता. त्याला ती शांतता नकोशी वाटत होती. हळूहळू चालत चालत तो विजेचा खांबपाशी आला. आजूबाजूला आधी पेक्षा जास्त उजेड होता पण पुढे न दिसणारया अंधारात गुडूप झालेला रस्ता होता. त्याला जाणवलं की आता लख्ख प्रकाश पडला आहे. त्याने खांबाकडे बघितले वरती बल्ब आता बंद चालू होत नव्हता. तो पुढं चालणार म्हटलं की

सररररर् सररररर्...

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काहीतरी गेल्या सारखा आवाज आला. तो त्याने त्या दिशेने भीतीने तोंड केले. त्याच्यावरती विजेचा खांब होता त्याचा मंद उजेड समोर होताच पण तरीही त्याने बॅटरी त्या दिशेने फिरवली समोर रस्त्याच्या कडेला उकिरडा होता. त्या उकिरड्यावर छोट आंब्याचे रोप उगवलं होतं ते वाऱ्याबरोबर हळू हळू डोलत होतं. त्या उकीरड्यावर राख वाळके शेण अन घाणीचा घट घट्ट ढिगारा पसरला होता. त्यानं त्यावर बॅटरी धरली आजूबाजूला एवढी शांतता होती की गण्याला भीतीने त्याचे च हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्याला लक्षात आलं की भीतीने त्याचे चेहऱ्याचे हावभाव बदलले आहेत. त्याने चेहरा पूर्वतः सरळ केला आणि बॅटरी खाली करून सुस्कार सोडला की आपण उगाच घाबरलो. त्याने पुन्हा पांदी कडे जाण्यासाठी पूर्ववत तोंड केले. पण

कड् कड् काड् काड्

हाड मोडलयासारखा आवाज त्या मधून आला त्याने पुन्हा बॅटरी उकिरड्याकडे वळवली आता तो उकिरडा पहिल्यासारखा नव्हता त्या आंब्याच्या रोपाखाली उकिरड्यात काहीतरी हलत होते. भीतीने त्याचे हृदयाचे ठोके वाढले होते. त्याची नजर स्थिर उकिरड्यावर होती. त्याच्या खाली काही तरी हलत होते त्याच्या हाडांचा तो आवाज होता हळूहळू ती आकृती वर वर सरकत होती रोपट्याच्या खालून काळीभोर आकृती वाढत होती तिने तिचा एक हात एक पाय बाहेर काढला ती आकृती अंधुक काळी होती आंब्याचे रोप आता कोलमडून खाली पडले होते. कड् कड् हाड मोडत ती आकृती आता उभी राहिली ती गण्या पेक्षा दुप्पट उंचीची होती. फक्त हात-पाय-तोंड असल्याचा अंदाज येत होता. गण्याला भीतीने काहीच सुचत नव्हते त्याच्या हातातलं डबड् खाली पडलं त्याने घराच्या दिशेने तोंड वळवून पळायचा प्रयत्न केला. अन् त्याच सरशी विजेचा बल्ब बंद पडला त्या आकृतीने गण्याला फरफटतच् नेले काही कळायच्या आतच गण्या उकिरड्यात गडप झाला.

विजेचा खांब पुन्हा लागला डबड् खाली पडलं होतं त्यातील पाणी सांडून ओल झाली हो.ती बॅटरी चालू अवस्थेत जमिनीवर पडली होती त्याचा झोत आंब्याच्या रोपावर पडला होता ते पूर्वी सारखे उभे होते.

***

इतर रसदार पर्याय