श्री दत्त अवतार भाग २० - अंतिम भाग Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्री दत्त अवतार भाग २० - अंतिम भाग

श्री दत्त अवतार भाग २०

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो.
दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे.
वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते .
पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे १४व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले.
त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन १३७८ ते १४५८ हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन १४५७च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले.
तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात.
श्री दत्तसंप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, माणिकप्रभू, नारायण-महाराज जालवणकर, चिदंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थांनी स्वत:च ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव ‘नृसिंहभान’ असे भक्तांना सांगितल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्रीदत्ताचे ‘चौथे अवतारित्व’ मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले.

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले
. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्रीस्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्रीस्वामी समर्थ समाधीतून जागे झाले.
तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे.
श्रीस्वामी समर्थ तेथून श्रीकाशीक्षेत्री प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले.
ते रानात वास्तव्य करीत. क्वचित गावात येत.
गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते श्रीस्वामी महाराज गावात आले की भोजन देत.
मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून ‘श्री’ अक्कलकोट येथे आले त्या वेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते.
चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले.
त्या वेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले.
चोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’ असे म्हणत.
काही दिवसांनी श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामीदर्शनास येऊ लागले.
राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती झाली.
श्रीस्वामी समर्थ राजवाडयात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच चारचार दिवस मुक्काम असे.

अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले.
तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली.
बालोन्मत्तपिशाच्चवृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. "आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन," असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे.
शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानुबाहू होते

तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले.
विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले.
त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते.
सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले.
सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले.
त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते.
त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले.
ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले.
त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता.
इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती.
तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला.
त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते.
त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली.
श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत.
या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.

श्रीनृसिंहसरस्वती ज्या कर्दळीवनात श्रीस्वामींचे अवतारत्व प्रकटले.
‘आपण कोठून आला?’ या प्रश्नाला उत्तर देताना श्रीस्वामींनी सांगितले,
‘प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली.
बांगलादेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले.
गंगा तटाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले.
पुढे आम्ही गोदातटास आलो. गोदावरीचे स्नान करून हिंडत-हिंडत हैद्राबादेस गेलो.
तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंडत मोहोळास आलो.
तेथून सोलापुरास आलो.
तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो तो इथेच आहे.’
श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यात प्रकटले.
तेथून श्रीमाणिकप्रभूंच्या भेटीनंतर श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास शके १७७९च्या आरंभीस आले. श्रीमंत मालोजीराजे त्यावेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते. त्यांची स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती. श्री स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य एकूण ४० वर्षे असून (शके १७६० ते शके १८००) त्यातली २१ वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी दत्तसंप्रदाय बराच वाढविला.

असे पातकी दीन मी स्वामीराया । पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ।

नसे अन्य त्राता जगीं या दीनाला । समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ।

बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की, आपण स्वामींची इतकी सेवा केली, तरी महाराज अजून का प्रसन्न होत्त नाहीत? अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही? ह्याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांनाच दु:खे असतात. दु:ख-संकटे एकामागून-एक येतच राहिली, तर मन खट्टू होते. आपल्याच वाट्याला एवढी दु:खे का? इतके नामस्मरण केले, तरी महाराजांना आपली दया येतच नाही का? आणि निराशेने कधी-कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात, पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे.
कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांचीही इच्छा हीच असते की, आपण प्रारब्धभोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे. आपले स्वामी तर इतके कनवाळू-दयाळू आहेत की, ते दु:खातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात. जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही हेच स्वामी विद्यारण्यांच्या दृष्टांतातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. दु:ख-संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते म्हणूनच,

श्री स्वामी-नाम नौका भवसागरी तराया ।

भ्रम-भोवऱ्यात अडली, नौका कधी ना बुडली ।

धरूनी सुकाणू हाती बसलेत स्वामीराया ॥

आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामीकृपाच!
दुसरं काहीच नको ही एकच भावना अंत:करणात खोलवर रुजवावी.
कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे.
बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दु:खदायकही असत.
यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचीती येते आणि मग सुख-दु:खासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत. कारण स्वामी माउली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती!
दाय म्हणजे देणारा-सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे तो!
फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माउलीवर! ते आपला योगक्षेम तर पहातातच त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात, संकटात-दु:खात आपली काळजी घेऊन
‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ ह्या आश्वासनाची प्रचीती देतात.
श्री गुरुदेव दत्त...

समाप्त