शोध अस्तित्वाचा (भाग २) preeti sawant dalvi द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शोध अस्तित्वाचा (भाग २)

वैशालीताईंना सब इनस्पेक्टर मानेंनी समिधाची फोनवर सर्व माहिती दिली आणि कॉन्स्टेबललl हाक मारली व त्याच्या हातात एक पत्ता देऊन थेट समिधा आणि नंदिनीला त्या पत्त्यावर सोडण्यास सांगितले.

"निवारा", एक दुमजली इमारत..

इथेच समिधाची आणि वैशाली ताईंची पहिली भेट झाली होती..

कॉन्स्टेबल समिधा आणि नंदिनीला इमारतीच्या आत सोडून निघून गेला..

समिधा दरवाजाजवळ जाताच तिला समोर एक बाई उभी दिसली..

तिने समिधाला आत यायची खूण केली..तिला बसायला सांगितले..तेवढ्यात एक मुलगी पाणी घेऊन आली..

त्या बाईने बोलायला सुरुवात केली, "समिधा नाव न तुझे, ही तुझी मुलगी ना? किती गोड आहे ग!!"

समिधा एकटक तिच्याकडे बघत होती..

ती पुढे म्हणाली," अरे!!मी माझा परिचय तुला दिलाच नाही..माझे नाव वैशाली देव, 'निवारा' ही माझीच संस्था आहे..तू मला ताई बोललीस तरी चालेल..इथे सर्व मला ह्याच नावाने हाक मारतात..मला मगाशी माने सरांनी फोनवर तुझ्याबद्दल सांगितले..तेव्हा मीच म्हणाली त्यांना की, तुम्ही योग्य जागी फोन केलात..तिला आणि तिच्या मुलीला तडक इथे पाठवा. मी बघते पुढे काय करायचे ते.."

त्या पुढे म्हणाल्या, "समिधा आता अजिबात भूतकाळाचा विचार करायचा नाही..तू इथे निवांत रहा.. इथे तुला काही धोका नाही..२-३ दिवस जाऊ देत..आधी तू व्यवस्थित स्थिर हो इथे..मग बघू पुढे काय करायचे ते..तोपर्यंत तू हा परिसर पहा, इथल्या दुसऱ्या मुलींशी भेट, त्यांच्याशी बोल..तुला नक्की इथे छान वाटेल..इथे कोणीही कोणत्याही गोष्टी तुझ्यावर लादनार नाही.."

असे म्हणून त्यांनी सुमनला हाक मारली.

सुमनला इथे येऊन २-३ वर्षे झाली होती..ती आणि संस्थेमधल्या २-३ जणी मिळून कैटरीनचा व्यवसाय करत होत्या आणि इथल्या स्वयंपाकाची जवाबदारी ही त्यांच्याकडे होती..

अशा अनेक महिलांना या संस्थेत येऊन जगण्याची नवी उमेद मिळाली होती..

सुमन येताच वैशाली ताई म्हणाल्या, "बाळ सुमन, ही समिधा आणि ही तिची मुलगी नंदिनी..(असे म्हणून त्यानी नंदिनीला ला जवळ घेतले)

जा, समिधाला वरची खोली दाखव आणि दोघींना कपडे ही दे बदलायला आणि काही खायला पण दे..मला १-२ मीटिंगला जायचंय, मी संध्याकाळ पर्यंत माघारी येईन."

"समिधा बाळ काहीतरी खा आणि छकुलीला ही खाऊ घाल..दोघी थोडा आराम करा..आपण नंतर बोलू सविस्तर." असे बोलून त्या निघून गेल्या..

सुमन समिधाला वरच्या मजल्यावर घेऊन आली..तिने तिथल्या एका खोलीचा दरवाजा उघडला..

सुमनने समिधाला तिच्यासाठी आणि नंदिनीसाठी घालायला कपडे दिले आणि तिला फ्रेश व्हायला सांगून ती खाली असलेल्या स्वयंपाक घरात गेली..

तिथून तिने त्या दोघांसाठी खायला आणले..

नंदिनीला बघून तिला खूपच छान वाटले..

ती समिधाला म्हणाली, "तुझी मुलगी खूप गोड आहे ग..माझी पण अशीच मुलगी असती पण आणि तिला रडू कोसळले.."

समिधा तिच्याकडे बघतच राहिली..पण तिला काय बोलावे हे सुचत नव्हते..

सुमनलाही ते उमजले, तिने स्वतःचे डोळे पुसले आणि समिधाला म्हणाली, 'तू आराम कर आणि छकुलीला पण झोपवं..मी तुला संध्याकाळी पूर्ण इमारत आणि परिसर दाखवते..' असे बोलून सुमन निघून गेली..

समिधाने नंदिनीला खाऊ घातले आणि तिला झोपवले..तिला स्वतःला काहीच खायची इच्छा नव्हती..

ती कालपासून तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांना आठवत होती की, कसे क्षणात तिचे जग बदलले होते..

पण म्हणतात ना तिच्या आई-वडिलांची पुण्याई म्हणून तिला माने साहेब आणि वैशाली ताईंसारखी चांगली माणसे भेटली होती..

त्यामुळेच ती आणि नंदिनी दोघीही सुखरूप होत्या..तिने नंदिनीला घट्ट मिठी मारली..कारण आता तीच तिच्या जगण्याची उमेद होती..

येथील परिसर खूपच मोठा होता..आणि मधोमध 'निवारा' ही इमारत उभी होती..

वैशाली ताईंनी समिधासारख्या कैक महिलांना आधार दिला होता, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले होते..

आज समिधा आणि नंदिनीला इथे येऊन बरेच दिवस झाले होते..त्या दोघी बऱ्यापैकी इथे स्थिरावल्या होत्या आणि इकडच्या वातावरणात एकरूप ही झाल्या होत्या..

पण.......…......

समिधाला एकच प्रश्न सारखा पडत होता की, पुढे काय??

ती या विचारातच होती, एवढ्यात तिथे वैशाली ताई आल्या. त्यांनी समिधाच्या खांद्यावर अलगद हात ठेवला..समिधा एकदम दचकली.

त्या समिधाला म्हणाल्या,"घाबरू नकोस मीच आहे..माफ कर, इतके दिवस तुझ्याशी बोलायला निवांत वेळ मिळाला नव्हता. रोज काही न काही काम निघायचे. म्हटले आज बोलूया तुझ्याशी. कशी आहेस बाळ? तुला करमतय ना इथे?"

"हो. खूपच छान आहे ही जागा, इथले लोक आणि इथला परिसर सुद्धा. इथले वातावरण खूप प्रेरणादायी आहे. मी खरच स्वतःला नशीबवान समजते की मी ह्या संस्थेचा एक भाग बनू शकली यासाठी मी माने साहेब आणि तुमची आयुष्यभर ऋणी राहीन" समिधा म्हणाली.

ती पुढे बोलू लागली,"कसं असतं ना ताई, मी लहानपणापासून माझ्या आईला बघत आली आहे..माझ्या आईवर माझ्या बाबांचे वर्चस्व होते. ती आयुष्यभर त्यांच्यासाठी जगली, त्यांना हवे तेच तिने केले..ह्या सगळ्यात तिचे स्वतःचे अस्तित्व हरवूनच गेले कुठंतरी..वैशाली ताई मला संगीताची खूप आवड होती आणि मला त्यामध्येच करियर करायचे होते..पण बाबांची याला संमती नव्हती.. यावरून आमचे खूप वाद व्हायचे..पण त्यांना ती गोष्ट मान्यच नव्हती. म्हणून त्यांनी लवकरच माझे लग्न करायचे ठरवले आणि सुयश माझा नवरा माझ्या आयुष्यात आला..सुयश हळूहळू मुलगाच झाला आमच्या घरचा..बाबांनी डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवला..त्यांनतर नंदिनी आली आमच्या आयुष्यात. बाबा तर किती खुश होते. तिला कुठे ठेवू कुठे नको असे व्हायचे त्यांना..त्याचाच फायदा सुयश ने घेतला आणि त्याने गोड बोलून बोलून बाबांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्यांचा विश्वासघात केला. त्याने माझ्यावर कधीच प्रेम केले नाही..त्याला फक्त पैसा हवा होता मी नाही..पण नंदिनी.... ती तर त्याची मुलगी होती ना तिचा तरी विचार करायचा.. माझ्यासाठी सगळं संपलय. पण नंदिनीसाठी तरी मला जगायला हवे. ताई खरच कळत नाहीये की पुढे काय करू ते?" आणि ती रडू लागली.

वैशाली ताई म्हणाल्या, "समिधा डोळे पूस बघू. असे खचून जाऊ नये..असे समज की देवाने एक संधी दिलेय तुला तुझ्या पद्धतीने आयुष्य जगण्याची..ती अशी रडून वाया नको घालवुस. तुला नंदिनीला मोठे करायचंय..आता तूच तिची आई आणि बाबा आहेस..मग तुला स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तुला तुझ्या हरवलेल्या अस्तित्वाचा शोध घ्यायचाय. कायम लक्षात ठेव. नव्या जोमाने कामाला लाग. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील नक्कीच. तूला काहीही मदत लागली तरी मी तुझ्यासाठी नेहमीच असेन.."

समिधाला आता थांबायचे नव्हते..तिने एक पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर तिने वैशाली ताईच्या मदतीने संगीतात पुढचे शिक्षण सुरू ठेवले.

ती इतकी कामात व्यस्त झाली होती की नंदिनी सोबत बोलायला, खेळायला तिच्याकडे पुरेसा वेळच नव्हता..

तिला हे देखील माहीत होते की, ती जे काही करतेय ते फक्त आणि फक्त नंदिनीच्या उज्वल भविष्यासाठी.

कारण आता तिला नंदिनीची आई आणि वडील दोघांची भूमिका पार पडायची होती.

नंदिनी एव्हाना संस्थेत सगळ्यांची लाडकी झाली होती. त्यामुळे समिधा नसताना ही नंदिनीच्या शाळेपासून, जेवणापासून तिला झोपवण्याची जवाबदारी संस्थेतल्या सगळ्यांनी बायकांनी घेतली होती.

तरीही नंदिनी रोज रात्री समिधाची वाट पाहे..कोणी कितीही बोलले तरी ती वाट पाहत असे..

आणि समिधा आल्यावर, "आई आली!! आई आली!!" असे बोलून बिलगत असे..नंदिनीला असे खुश पाहून समिधाचा थकवा कुठच्या कुठे पळे..

समिधाचा तिच्या कामात जम बसला होता. नंदिनी पण मोठी होत होती..त्यातच समिधाचे शिक्षणही पूर्ण झाले.

आणि तिला चेन्नईमध्ये असलेल्या मोठ्या संगीत प्रशिक्षण केंद्रात शिक्षिकेची संधी सांगून आली.

पण त्याबाबतची तिची पहिली मुलाखत मात्र ह्याच शहरात होती व शेवटची मुलाखत चेन्नई मध्ये होती.

समिधा देवाच्या कृपेने पहिली मुलाखत पास झाली आता तिला शेवटच्या मुलाखतीसाठी तिला चेन्नईला जायचे होते..

ह्या नोकरीवर तिचे भवितव्य अवलंबून होते. कारण हे प्रशिक्षण केंद्र जगातील प्रसिद्ध ५ संगीत केंद्रांपैकी एक होते.

तिथे नोकरी मिळणे म्हणजे संगीत प्रेमींसाठी 'सोने पे सुहागा' अशी बाब होती.

समिधा खूपच आनंदी होती. ह्या प्रशिक्षण केंद्राने संगीतातील अनेक विद्वानांना घडविले होते.

समिधा चेन्नईला जायला निघाली. नंदिनी आणि वैशाली ताईंनी तिला बेस्ट ऑफ लक दिले👍.

तिच्या पूर्ण प्रवासाचा आणि एक दिवस राहण्याचा खर्च त्या प्रशिक्षण केंद्राद्वारे करण्यात येईल असे तिला सांगण्यात आले होते.

समिधा तेथे पोहोचली. तिथला परिसर पाहून ती भारावून गेली. तिने त्या केंद्राच्या दालनात प्रवेश केला. तिचे डोळे भरून आले.

ह्याच संधीची ती कधीपासून वाट बघत होती. तिची मुलाखत सुरळीत पार पडली..

क्रमशः

(ही कथा कशी वाटली हे कमेन्ट मध्ये लिहून कळवा. तसेच ही कथा आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद🙏)

@preetisawantdalvi