सैतानी पेटी भाग १ preeti sawant dalvi द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सैतानी पेटी भाग १

(ही कथा एका इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित आहे)

"Happy Birthday to you...Happy Birthday to you Mamma....Happy Birthday to you"

असे बोलत रॉबर्टने त्याच्या आईचा स्टेफनीचा ९० वा वाढदिवस साजरा केला आणि एका पुरातन वस्तुंच्या दुकानातून घेतलेली एक पेटी तिला भेट म्हणून दिली.

ती पेटी पाहताच स्टेफनी खूपच खुश झाली. ती पेटी ती उघडणार इतक्यात रोबर्टला एक महत्वाचा फोन आला. रॉबर्टने मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागेल आणि मी संध्याकाळ पर्यंत येईन मग आपण बाहेर जेवायला जाऊ असे स्टेफनीला सांगितले आणि तो तिथून निघून गेला.

स्टेफनी आणि रॉबर्ट अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात राहत होते. स्टेफनीला पुरातन वस्तू साठवण्याचा व त्याचा इतिहास जाणून घेण्याचा मोठा छंद होता म्हणून रॉबर्ट स्टेफनीला अशा पुरातन वस्तू नेहमी भेट म्हणून देत असे. जशी आज त्याने तिला ही पेटी दिली.

स्टेफनीला त्या पेटीला पाहताच तिला उघडायची आणि त्या पेटीतील वस्तू बघण्याची खूपच घाई झाली होती. पण तिच्या न्याहरीची आणि औषधांची वेळ झाल्यामुुळेे तिने नाईलाजानेे ती पेेटी थोडया वेळाने उघडायचे ठरवले.

तिने ती पेटी तिच्या खोलीच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवली. स्टेफनी तिची न्याहरी आणि बाकीची कामे आटपून निवांत तिच्या खोलीत आली आणि मग ती त्या पेटीचे निरीक्षण करायला लागली. ती पेटी तिला थोडी विचित्रच वाटली, कारण त्या पेटीला उघडायला कोणतीही कडी किंवा बटन नव्हते. तसेच त्या पेटीवर हिब्रू भाषेत ही काहीतरी लिहिलेले होते. स्टेफनीला तिच्या जवळ असलेल्या प्रत्येक वस्तूचा इतिहास थोडाफार माहीत होता म्हणून तिला ह्या पेटीवर लिहिलेली भाषा ही हिब्रू आहे हे लगेच समजले.

स्टेफनीने त्या पेटीकडे निरखून बघितले आणि मग जेव्हा त्या पेटीला उचलण्यासाठी तिने त्या पेटीला हात लावला तेव्हा त्या पेटीमधून अचानक विचित्र भयानक असे आवाज यायला लागले. पण तिने त्या पेटीवरचा हात काढताच ते बंद झाले. असं तिने २-३ वेळा केले. पण प्रत्येकवेळी तसेच घडत होते. मग तिने त्या पेटीकडे दुर्लक्ष केले व ती फणीने तिचे केस विंचरायला लागली. तर तिच्या लक्षात आले की, जवळ जवळ तिचे अर्धे केस तिच्या हातात आले आहेत. तिला काही कळेना, असे का होत आहे, तसेच ती ह्या विचित्र प्रकारामुळे थोडी घाबरली ही, त्यात तिला पटकन क्लिक झाले की, हे सगळे त्या विचित्र पेटीमुळेच होत असावे. म्हणून तिने ती पेटी हतोडीने तोडायचे ठरवले. ती त्या पेटीवर हतोडी मारणार, इतक्यात त्या पेटीमधून परत तसेच विचित्र आवाज यायला लागले आणि अचानक तिच्या खोलीत जोराची हवा आली व त्या हवेच्या झोतात तिचे शरीर वेडेवाकडे होऊन जोरात जमिनीवर आदळले. तसेच तिची काही हाडे आपणहूनच मोडली गेली आणि ह्या गंभीर दुखपतीमुळे ती जागीच बेशुद्ध पडली आणि ते अचानक आलेलं वादळही क्षमलं.

इतक्यात रॉबर्ट आईबरोबर आज जास्त वेळ घालवता यावा म्हणून लवकर घरी आला. त्याने बेल वाजवली पण कोणीच दरवाजा उघडत नव्हते. म्हणून त्याने त्याच्याजवळ असलेल्या दुसऱ्या किल्लीने घराचा दरवाजा उघडला व "मम्मा...मम्मा" अशी हाक मारत तो स्टेफनीच्या खोलीत शिरला आणि तिला ह्या अवस्थेत पाहून तो अवाक् झाला. त्याने लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेले.

रॉबर्टच्या घरापासून काही अंतरावर पीटर आणि त्याची पत्नी लिसा आपल्या दोन मुली रिहाना (१० वर्ष)आणि जुलिया (१४ वर्ष) सोबत राहत होते. पण रोज रोजच्या मतभेदांमुळे पीटर आणि लिसा विभक्त झाले होते. तसेच लिसा आता दुसऱ्या एका माणसाला डेट पण करत होती. हा घटस्फोट दोघांच्या आपसी संमतीने झाल्यामुळे प्रत्येक वीकएंडला मुलींची जबाबदारी पीटर वर असे.

आज वीकएंड असल्यामुळे सकाळी सकाळीच पीटर मुलींना त्याच्या घरी घेऊन जायला लिसाच्या प्रियकराच्या घरी आला. जिथे सध्या लिसा तिच्या दोन मुलींबरोबर राहत होती. मुलीही दर विकएंडला वडिलांबरोबर वेळ घालवण्यासाठी खूप उत्साहित असायच्या. तेवढ्यात पीटर तिथे आला.
पीटर, रिहाना आणि जुलिया तिघेही लिसाला निरोप देऊन पीटरच्या घरी जायला निघाले. ते तिघे घरी जात असताना वाटेत एका घरासमोर एक माणूस घरातील काही सामान विकताना त्यांना दिसला. ते सामान बऱ्यापैकी अँटिक (पुरातन) दिसत होते आणि ते सामान विकणारा दुसरा तिसरा कोणी नसून स्टेफनीचा मुलगा रॉबर्ट होता, जो त्याच्या आईच्या सांगण्यावरून तिने साठवलेल्या पुरातन वस्तू विकत होता.

पीटर आणि मुली त्या पुरातन वस्तू पाहण्यात गुंग झाले. इतक्यात पीटरची छोटी मुलगी रिहानाची नजर त्या पेटीवर पडली आणि तिने पीटरला ती पेटी विकत घेऊन देण्याचा हट्ट केला. पीटरनेही रिहानाच्या आनंदासाठी ती पेटी विकत घेतली. ही तीच पेटी होती ज्यामुळे स्टेफनीला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यातून ती थोडक्यात वाचली होती.
रिहाना खूपच आनंदी झाली पण तितक्यात तिची नजर रोबर्टच्या घराच्या खिडकीत गेली. जिथे स्टेफनी भरपूर बँडेज लावून पहुडलेली तिला दिसली. जिच्यावर काही दिवसांपूर्वीच एका अज्ञात शक्तीने हल्ला केला होता. ती रिहानाकडे सारखी एकटक बघत होती, पण जेव्हा तिने रिहानाच्या हातात ती राक्षसी, भयानक पेटी बघितली. तेव्हा ती सगळा जीव एकवटून जोरात 'नाही' असे ओरडली. रिहाना तो सर्व प्रकार बघून खूपच घाबरली म्हणून पीटर रिहानाला तडक तिथून घेऊन घरी निघून गेला.

पीटर, रिहाना आणि जुलिया ती पेटी घेऊन घरी आले. रिहाना स्टेफनीच्या विचित्र वागण्यामुळे अजूनही थोडी घाबरलेली होती. इतके असूनही ती पेटी उघडून बघायची तिला खूप उत्सुकताही होती. पण जुलियाला त्या पेटित काहीच इंटरेस्ट नव्हता म्हणून ती स्वतःच्या रूममध्ये निघून गेली.
पीटर रिहानाचा मूड चांगला करण्यासाठी तिला ती पेटी उघडण्यास मदत करू लागला. पण काही केल्या ती पेटी उघडतच नव्हती. कारण त्या पेटीला उघडायला कोणतीही कडी किंवा बटण नव्हते. दोघांनाही हे थोडे विचित्र वाटलं. म्हणून मग पीटरने त्या पेटीला हलवले तेव्हा त्याला त्या पेटीमध्ये काहीतरी सामान असल्याची खात्री झाली.

तो रिहानाला म्हणाला की, "आपण नंतर ती पेटी उघडू. पण आता मला एक गुडन्यूज तुमच्या दोघींबरोबर शेअर करायची आहे" असे बोलून त्याने दोघींना एकत्र बसवून त्याला त्याच्या नोकरीत प्रमोशन मिळाल्याची बातमी सांगितली. त्या दोघीही खुपच खुश झाल्या.

त्यानंतर पीटर, रिहाना, जुलिया तिघांनीही दिवसभर खूपच मजा, मस्ती केली. त्यामुळे तात्पुरता त्या पेटीचा विषय बाजूला झाला.

रात्री डिनर आटपून पिटरने दोघींना त्यांच्या त्यांच्या रूममध्ये झोपवले आणि तो स्वतःच्या रूममध्ये झोपायला निघून गेला. दिवसभराच्या एन्जॉयमेंटमुळे रिहाना खूपच थकली होती म्हणून ती पडल्या पडल्या झोपली.

अचानक मध्यरात्री कसल्यातरी भयानक आवाजाने रिहानाची झोपमोड झाली. तिने लाइट्स चालू केले तेव्हा तिच्या लक्षात आलं की, हा आवाज त्या पेटीतून येत आहे. ती त्या पेटीजवळ गेली आणि तिने ती पेटी उचलली. ती पेटी रिहानाने हातात घेताच ती आपोआप उघडली गेली. रिहाना त्या पेटीतील वस्तूंकडे एकटक बघू लागली.

त्या पेटीमध्ये तिला एक दात, एक मेलेला कीटक, एक लाकडाचा प्राणी आणि एक अंगठी दिसली. ती अंगठी तिला इतकी आकर्षक वाटली की, तिने ती लगेच स्वतःच्या बोटात घातली आणि त्या पेटीला बंद करून कवटाळून ती झोपी गेली.

दुसऱ्या दिवसाच्या सकाळी जेव्हा रिहाना उठली, तेव्हा तिला स्वतःमध्ये काहीतरी विलक्षण असा बदल झाल्यासारखा वाटला. तिला सारखे सारखे एकटे राहावे असं काहीतरी वाटत होते. इतक्यात तिला पुन्हा रात्रीसारखे तेच विचित्र आणि भयानक असे आवाज त्या पेटीतून ऐकायला यायला लागले आणि त्याचबरोबर आश्चर्य म्हणजे आतापण ती पेटी आपोआपच उघडली गेली.

रिहाना सुध्दा वश झाल्यासारखी एकटक त्या पेटीकडे बघत होती. असेच बघता बघता तिच्या एका डोळ्याचे बुबुळ सफेद झाले. हे सर्व होत असतानाच, अचानक तिथे पीटर रिहानाला न्याहरी करायला बोलवायला आला, पीटरच्या त्या अनपेक्षित आवाजाने रिहानाची तंद्री भंग पावली, जणू काही क्षणापूर्वी काही घडलेच नाही अशाप्रकारे, रिहाना न्याहरी घेण्यासाठी पीटरबरोबर निघून गेली.

पण त्या दिवशी डायनिंग टेबलवर अनपेक्षित असं काहीतरी घडलं. रिहाना ताटातील न्याहरी खाता खाता काटेरी चमचा (fork) टेबलवर सारखी सारखी आपटत होती. हे बघून पीटर तिच्यावर ओरडला आणि तिला नीट खाण्यासाठी सांगू लागला तर रिहानाने त्याच चमच्याने अचानक पीटर वर हल्ला केला आणि त्याला जखमी केले.
पण काही क्षणातच तिला तिची चूक सुध्दा कळली आणि ती पीटरला, "माफ करा बाबा. चुकुन झालं, मी मुद्दामून नाही केलं, कृपया माफ करा" असे रडत बोलून विनवणी करू लागली. पण अचानक झालेल्या हल्ल्याने पीटरचा राग अनावर झाला. त्याने लागलीच रागातच रिहानाला तिच्या खोलीत जायला सांगितले. रिहाना रडत रडत धावतच तिच्या खोलीत गेली. पीटरला रिहानच्या अशा विचित्र वागण्याचे आश्चर्य वाटत होते. पण रिहानाच्या अशा वागण्याचा त्याला राग ही आला होता. त्या दिवशी तिघेही घरातच राहिले.

-क्रमश:

(ही कथा आवडल्यास ह्या कथेला लाईक आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. ह्या कथेद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नाही..ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती )
©preetimayurdalvi