Enjoy life man! - part 1 books and stories free download online pdf in Marathi

एन्जॉय लाईफ यार! - भाग 1

कथा :

एन्जॉय लाईफ यार!

What’s are you say? Oh no, so sad yaar! मंगेशच्या हातातील मोबाईल पलीकडील सागरच्या बातमीने अलगद खाली पडला. मंगेश कसाबसा सावरला. ऐकावे ते नवलच होतं. त्याला दरदरून घाम फुटलेला. या बाबीला कदाचित आपणच जबाबदार असल्याची अपराधी भावना त्याच्या मनात रूंजन घालू लागली. पुढे काय करावे ते त्याला सुचेना.

मंगेशने खिशात कोंबलेला रूमाल काढीत घाम टिपला. बाजूच्या खुर्चीवर बसत त्याने क्षणभर छताकडे बघितले. डोळयातून अश्रू पाझरू लागलेले. खिडकीच्या बाहेर बघत तो विचारचक्रात बुडाला. त्याला घडलेल्या काही घटनांचे प्रसंग आठवू लागले.

संज्या, काय यार तू जगतोस? अरे तू मास्तर आहेस. चांगला पन्नास हजार पगार कमवितोस. पण काय कामाचं? अरे, स्वतःसाठी तरी जगून पहा कधीतरी. कमविलेल्या पैशाचा उपयोग स्वतःच्या आनंदासाठी तरी कर.मंगेशने संजयला गमतीनेच म्हटलं होतं.

होय, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण प्रत्येकांच्या अडीअडचणी आणि जगण्याच्या पद्धती वेगवेगळया असतात, असलेला पैसा चैनित उडविणे म्हणजेच का जीवन आणि त्यात आनंद असतो होय? कधीतरी तू एन्जॉयया शब्दाच्या पलीकडे जावून विचार कर.

हो ना यार! तेच तर मी तुला सांगतो आहे.

तसं नाही रे! तुझी जीवन जगण्याची कला म्हण की, पद्धती म्हण, फार वेगळी आहे, आपल्यासारखंच इतरांनी जगावं, वागावं असा दुराग्रह काय म्हणून रे कामाचा? पैशाने सारं काही विकत घेतलं, इतरापेक्षा महागडया वस्तूचा उपभोग घेतला, आनंद घेतला, म्हणजे जीवन जगलो, असं तू समजतोस? ते मला नाही पटत मुळीच.

मग कुठल्या रे कामाचं जीवन? एवढा पगार कमवायचा आणि स्वतःवर खर्च न करता पैसा साठवत पुढच्या पिढिला जतन करून ठेवायचं, असंच ना! आपण कमवायचं तर त्याचा उपभोग आपण घ्यायलाच हवा!

मला नाही पटले तुझे विचार, कमीतकमी तू आपले बालपणी भोगलेले गंभीर क्षण, दिवस आठवून पहा.... एका एका रूपयाला मोहताज असलेला तुझा तो क्षण, आज सारं काही विसरून तू एन्जॉय म्हणून साध्याश्या अर्थाने घेतो आहेस. आजचा जमाना फार वेगळा आहे. अरे, आज जर तुझ्याकडे पैसा नसेल तर उद्या काय? याचा विचार कधी करतोस का?’

अरे, हो ना! सारं काही आठवते मला, आपण जे भोगलो ते आता भोगायचं नाही. मनातल्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्यात मला. बालपणीचे दिवस आठवतात मला, अरे! शेजारचे मूलं बापाच्या पैशावर मस्त आनंदाने खावू खायचे, त्याक्षणी साधं चॉकलेट खावं ही इच्छाही अधुरी राहायची. मी त्यांच्या तोंडाकडे पाहात बसायचा. निव्वळ तोडांला पाणी यायचं.... किती मन मारीत जगलो रे आपण...? तेव्हाच ठरविलं. आपण मोठं झालो की हवी ती वस्तू वापरायची, पण सगळे लोकं वापरतात ती नव्हे! तर त्यापेक्षाही महागडी, अगदी आपली वस्तू बघून लोकांनींही विचार करावा... लोकांनींही मला झुरावं, मी बालपणी जसा झुरलो अगदी तसाच.... आणि आज बघतोस ना....! तू साधी शंभर रूपयाची टी शर्ट वापरतोस पण मी पाच हजाराची इंम्पोर्टेड लेवीज कंपनीची टी शर्ट वापरतोय.... बघ, तू माझ्याकडे, तूला काय वाटतं? या क्षणी विचार कर, कदाचित तुलाही वाटेल मी एवढी महागडी टी शर्ट केव्हा वापरणार....? कदाचित काही लोकांना मी वापरणाऱ्या वस्तू मुळे झुरणं होणार.... असो... पण मी हा आनंद उपभोगतोय, अगदी मनातील सर्व क्षणांना पूर्ण करण्याचा हा आनंद वेगळाच असतो. कधीतरी तुही विचार कर यावर.... अरे! तुझ्याकडे पैसा असून काय कामाचा.... ऐपत असतांनाही असं कधी भिकाऱ्यागत जीवन जगायचं. मला नाही आवडत तुझं जगणं....

अरे! कसं जगायचं, कसं राहायचं? हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. म्हणून का आपण असंच जग, तसंच जग हा इतरांना आग्रह धरायचा काय?

आग्रह नाही रे! पण असं मनकोंडी होवून जगणं, पैसा असून उपभोग न घेणं, मेल्यावर काय कामाचा रे हा पैसा. तू बघायला तरी राहणार आहेस का? आपल्या कुटुंबातील आपल्या कमाईवर चैनीने जगतीलच ना! तेव्हा स्वर्गातून का नरकातून तू बघायला येणार आहेस होय? तुला पश्चाताप होईल..... आणि म्हणशिल अगोदरच मी माझ्या पैशाचा उपभोग घेतला असता तर बरे झाले असते.मंगेशने ने हसतच संजय मास्तरला म्हटलं, आणि सिगारेट कश मारताच धुर हवेत पसरला होता. क्षणभर त्याकडे एकटक बघत पुन्हा हसतच म्हणाला.

अरे! त्या स्वर्गात काही तू पैसे घेवून जाणार नाहीस. नाहीतर तिथं अप्सरेचा कॅबरी डान्स बघायला तरी मिळालं असतं. तिच्या शो ची तिकीट काढून, यापेक्षा आत्ताच इथे एखादा कॅबरी डान्स बघ ना! जा नागपूरला तिथं प्लाझा थ्री स्टार हॉटेल मध्ये एक स्कॉच घ्यायची. बाजूलाच असलेल्या बारबालेशी थोडं लळीवाळ व्हायचं, कशी जगण्यातील नशा आणि तो रोमांच एकदा करून तर बघ...अहाहा.... काय ती मजा असते. तुला म्हणून सांगतो मास्तर, ते स्वर्गसुख की त्यापेक्षाही.... मी तीला असा स्पर्श करताच..... अहाहा..... जावू दे तुला सांगून काय फायदा? मीच स्वप्नागत आठवतो आहे.

मंगेशने तर संजयच्या डोक्याला चांगलाच झिनझिनाट आणला होता. कुठली गोष्ट त्याने कुठवर नेली होती आणि स्वतःच त्याच्या निरखणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून हसत राहिला.

सागरही त्याच्या या गोष्टींना अगदी मन लावून ऐकतच राहिला. अहाहा.... खरंच मला पण वाटते रे!

जावू दे रे! तुझा विषय बंद कर.... जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्हाला गंमतच सुचते... जगण्याच्या का हयाच तऱ्हा जगात आहेत असं तुला वाटते? हे फार चुकीचे आहे. जगण्याचा आनंद म्हणजे फक्त महागडया वस्तू वापरणं नव्हे!

संजयने राग आल्यागत विषयाला कलाटणी दिली होती. दररोज मंगेश, सागर, संजय फिरायला जातांना हया अशाच गोष्टी निघायच्या. कधीतरी मंगेशचं हे मांडल्या जाणारं जीवन जगण्याचं गणित थोतांड असतांनाही त्यावर नरम-गरम चर्चा व्हायची. त्यादिवशीही अशीच चर्चा झाली होती. मंगेशला हे सारं काही आज आठवू लागलं होतं.

मंगेश रेल्वेत इंजीनिअरींग विभागात गॅंग मेट पदावर नोकरीला होता. त्याला रग्गड साठ हजार रू. पगार मिळायचा. तसे पाहता मंगेशने बालपणी अनंत हालअपेष्टा भोगल्या होत्या. लोकांची हमाली कामे करीत जगतांना त्याचं मन नोकरी मिळताच अगदी बदललं होतं. आजवर भोगलेले क्षण आता पुन्हा जवळही फिरकू दयायचे नाही की भोगलेल्या यातना मनपटलावर आठवणीसह उरू नयेत त्यासाठीच त्याचं जगणं बदलंलं होतं हे त्यालाच ठावूक.....

इतर रसदार पर्याय