अमेयच्या मनातील संशयाने सृष्टीचा अंत झाला. त्याच्या मनातील संशय दूर करण्यात सृष्टी असफल ठरली आणि अमेयने रात्रीच्या गाढ झोपेत सृष्टीचा गळा आवळून खून केला. तिच्या मृत्यूची बातमी त्याने स्वतःच पोलिसांना दिली आणि झोपेच्या जास्त गोळ्या खाल्याने तिचा मृत्यू झाला असावा असे पोलिसांना सांगितले. पण पोलीस सर्व घटनेचा आढावा घेतला आणि काही क्षणात अमेयला हातकडी टाकून तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगाची हवा खाल्यावर अमेयला आपल्या केलेल्या कर्माविषयी पश्चाताप वाटू लागला. पण वेळ पुरती संपून गेली होती. आता ती वेळ पुन्हा परत थोडीच येणार होती. त्याच्या डोळ्यासमोरून तो वीस वर्षांपूर्वीचा काळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकू लागला.
अमेय एक हुशार आणि दिसायला देखणा मुलगा होता. बारावीला चांगले गुण मिळाले म्हणून तो मेडिकल आणि इंजिनिअरिंग करण्यापेक्षा डी. एड. करण्याकडे आपले लक्ष दिलं. त्याच्याच कॉलेज मध्ये सृष्टी देखील होती जी की सुंदर तर होतीच शिवाय बोलकी आणि मनमिळाऊ देखील होती. कॉलेजमधल्या सर्वांशी ती प्रेमाने वागायची. तिच्या मनात किंतु परंतु असा कुठलाच भाव नव्हता. तशी ती अमेयला देखील बोलायची. अमेय मात्र सर्व मुला-मुलीपासून दूर राहायचा. आपला अभ्यास आणि घर याशिवाय त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीशी देणे घेणे नसायचे. त्याच्या या गुणांवर फिदा होऊन सृष्टीने स्वतः अमेयला मागणी घातली. सुरुवातीला अमेय जरासा घाबरला पण वेळ मारून नेत नंतर सांगतो असे म्हणाला. वास्तविक पाहता त्याला देखील सृष्टी आवडत होती मात्र लग्न करण्यासाठी जात आडवी येत होती. दोघेही भिन्न जातीचे होते. सृष्टी मागासवर्गीय होती आणि अमेय उच्चवर्गीय होता. त्याचे डोके विचार करून सुन्न पडत होते. त्यात डी. एड चे दोन वर्षे पाहता पाहता संपले. दोघांची ताटातूट झाली. मात्र मोबाईल नामक विशेष दूताने त्यांचा संपर्क टिकवून ठेवला. एक एक दिवस काळजीत संपून जात होता. शिक्षक भरतीची जाहिरात आली. दोघांनी पण अर्ज केला. अमेयने नोकरी लागल्यानंतर लग्नाचा विचार करू असा निर्णय दिल्यामुळे दोघेही नोकरीसाठी प्रतीक्षा करू लागले. परीक्षा झाली आणि काही दिवसांनी निकाल घोषित झाला. अमेय एवढा हुशार असून देखील त्याची निवड झाली नव्हती आणि इकडे सृष्टीची मात्र जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड झाली होती. सृष्टी खूप खुश होती. तिला सरकारी नोकरी मिळाली याचा खूप आनंद वाटत होता. तर त्याच वेळी अमेयला नोकरी न मिळाल्याचे दुःख ही वाटत होतं. सृष्टी आता रोज शाळेला जाऊ लागली. येता जाता अमेयची रोज भेट व्हायची. खूप गप्पा गोष्टी व्हायच्या मात्र अमेय मनातून आनंदी नव्हता, हे सृष्टी देखील जाणून होती. असेच दोन वर्षे निघून गेली. शासन काही शिक्षकांची भरती करत नव्हते. अमेय रोज जाहिरातीची वाट पाहायचा. एके दिवशी संस्थेतल्या जागेसाठी अमेय गेला. त्यांच्या वडिलांच्या ओळखीने त्याला त्या शाळेत जागा मिळाली. पण पगार खूपच कमी होता. शाळेत प्रचंड हुशार असलेला अमेय या जंजाळात पार होरपळून गेला होता. अमेयला नोकरी मिळाल्याचा सृष्टीला अत्यंत आनंद झाला. मागे ठरल्याप्रमाणे नोकरी मिळाल्यावर लग्न करू या वचनाची सृष्टीने अमेयला आठवण करून दिली. दोघांचे एकमेकांवर अपरंपार प्रेम होते. नेहमीच्या भेटीत ते आपल्या जीवनाविषयी चर्चा करायचे. हो नाही असे म्हणत त्यांचेे लग्न अगदी धुमधडाक्यात झाले. लग्नाला डी. एड. ची सर्वच मित्रमंडळी आली होती. अमेयचे मित्र आणि सृष्टीच्या मैत्रिणी यांनी लग्नात खूप धमाल केली. त्यात राजेश नावाचा मित्र जो की अमेयचा मित्र होता तो त्या लग्नाच्या दिवशी जरा जास्तच दारू ढोसली होती आणि काही ही बकायला सुरू केली. सृष्टीबद्दल तो दोन चार वाक्ये बोलून गेला जे की अमेयला माहीत नव्हते. तसं तर अमेय आणि सृष्टी यांचे प्रेम संपूर्ण कॉलेजला माहीत होते. तसं सृष्टीचा एक स्वभाव होता, ती सर्वांसोबत हसत खेळत आणि प्रेमाने वागत होती. तिच्या ध्यानीमनी नसलेल्या कॉलेजातील अनेक गोष्टी राजेशने बेधुंद नशेत अमेय जवळ बोलून गेला. झाले संसाराची सुरुवातच संशयाने झाली. पहिल्या रात्रीच या विषयावर दोघांचे खूप बोलणे झाले. सृष्टीने सर्व काही सत्य उलगडून सांगितले आणि तुझ्याशिवाय मी कोणावर ही प्रेम केलं नाही असे तिने डोके बडवून सांगितले. पण अमेयच्या डोक्यातून राजेशने त्यादिवशी बोललेले वाक्य डोक्यातून काढायला तयार नव्हता. राग, प्रेम, लोभ, वाद-विवाद, भांडण, तंटा करत आयुष्य पुढे जात होतं. याच काळात त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले देखील उमलली. सृष्टीला शाळेतून यायला उशीर झाला की, अमेयची प्रश्नांची सरबत्ती सुरू व्हायची. कोणी शिक्षक सृष्टीला बोलत आहे असे दिसले की, कोण होता तो ? याची चौकशी सुरू व्हायची. मोबाईलवर शाळेच्या मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुखाशी बोलले तरी प्रश्न तयारच. अमेयच्या या संशयी वृत्तीचा तिला खूप कंटाळा आला होता. ती अधून मधून स्वतःचा पश्चाताप करून घ्यायची की, माझी निवड चुकली का म्हणून..!. असेच एके दिवशी शनिवारी शाळेतून घरी यायला तब्बल तीन तास उशीर झाला होता. अमेयने फोन करून पाहिला तर फोन बंद येत होता. त्याच्या मनात संशयाची सुई गरगर फिरत होती. तब्बल चार तासानंतर पाच वाजता सृष्टी घरी आली. अमेयने तिला घरात ही घेतले नाही की, प्रश्न सुरू, का उशीर झाला ? यावर सृष्टी म्हणाली, घरात चला सर्व सविस्तर सांगते. पण अमेय ऐकायला तयार नाही. इथेच सांग म्हणून अडून बसला. तिला शेवटी नाईलाज होता म्हणून ती उशीर का झाला याचे उत्तर सांगायला सुरुवात केली. शाळा सुटणार म्हणताना आमचे साहेब शाळेत आलेत. त्यांनी शाळेतल्या सर्व बाबींची तपासणी केली. त्यांनी शाळेत आल्याबरोबर आम्हांला मोबाईल बंद करायच्या सूचना दिल्या त्यामुळे मोबाईल बंद करावा लागलं. साहेबांनी सुमारे तीन तास आमच्या शाळेची तपासणी केली. त्यामुळे घरी यायला उशीर झाला. या उत्तराने अमेय समाधानी झाला नाही. त्याने मुख्याध्यापकाला फोन लावून विचारणा केली. जेव्हा मुख्याध्यापकाकडून दुजोरा मिळाला तेंव्हा घरात प्रवेश मिळाला. सध्या साध्या बाबीवर त्याचा संशय बळावत चालला होता. अमेयचे शाळेत देखील मन लागत नव्हते करण त्याच्या मनासारखी शाळा त्याला मिळाली नव्हती. सर्वच बाबतीत अपयश मिळत राहिल्याने तो हळू हळू दारूच्या आहारी गेला. सुरुवातीला फक्त रात्री आणि ते ही कधी तरी पिऊन येणारा अमेय आता सकाळी उठल्यापासून दारू ढोसू लागला. सृष्टीने खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यादिवशी देखील तो खूप दारू पिऊन आला होता. लेकरं आपल्या खोलीत झोपली होती. थोडं देखील होश नसलेला अमेय सृष्टीच्या खोलीत आला आणि तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. सृष्टीने त्याला खूप समजावून सांगत गप्पगुमान झोपण्याची तंबी दिली. एवढ्यावरच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने सृष्टी गाढ झोपेत असतांना, तिचा गळा गच्च आवळून धरला. काही मिनिटाच्या झटापटीत सृष्टी गप्पगार झाली. अमेयला त्यावेळी काही सुधरत नव्हते. त्याच नशेत पोलीस स्टेशनला फोन लावून सृष्टी मेल्याची बातमी दिली. झोपेच्या गोळ्या खाऊन मेली असा बयान त्याने दिला मात्र पोस्टमार्टेम रिपोर्ट काही औरच सांगत होते. पोलिसांनी संशयाच्या बळावर अमेयला अटक केले. तुरुंगात चोवीस तास देखील राहिला नाही की, पोपटासारखं सर्व कहाणी पोलिसांना सांगितली. प्रेमात अमेयने सृष्टीला दिलेले सारे वचन आणि शपथा पार विसरून गेला होता. तो नेहमी तिला म्हणायचा तुला चंद्रावर सफर करायला घेऊन जाईन आणि प्रत्यक्षात मात्र वेगळीच कृती करून ठेवला. संशय ही माणसाला लागलेली फार मोठी समस्या आहे. संशयी माणूस कधी ही सुखी, समाधानी राहू शकत नाही आणि इतरांना राहू देत नाही. म्हणून संशयापासून दूर राहणे कधी ही चांगले.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769