नभांतर : भाग - १ Dr. Prathamesh Kotagi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नभांतर : भाग - १

भाग - १

संध्याकाळी साधारण 5 ची वेळ...

अनु लगबगीने मुख्य रस्ता ओलांडून रिक्षा स्टॉप पाशी पोहोचली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरणात सुद्धा तितकीच लगबग जाणवत होती. सूर्यास्ताची वेळ जवळ आल्याने पक्षी आपापल्या घरट्यांकडे परतण्यास उत्सुक होते; अगदी त्याचप्रमाणे शाळेतून घरी परतणारी मुले, दिवसभर ऑफिसमध्ये कामाच्या ओझ्याखाली दबून गेलेली सर्वजण सुद्धा आपापल्या घराकडे तितक्याच लगबगीने परतत होते. कोणी बस तर कोणी गाडी असे करत मार्गक्रमण करत होते. परंतु अनुला मात्र घरी परतण्याची घाई अजिबात नव्हती. उलट तीच घरातून लगबगीने बाहेर पडली होती आणि तिला वेळ अजिबात दवडायचा नव्हता. त्यामुळे तिने रिक्षेला प्राधान्य देत ती इथे आली होती. “सहारा हॉस्पिटल कडे घ्या” असे रिक्षेवल्याला बसता क्षणी तिने सांगितले. तिची लगबग आणि हॉस्पिटल असे ऐकताच रिक्षावाल्याने सुद्धा तितक्याच लगबगीने रिक्षा चालू करून रस्त्यावरच्या रहदारीत घातली.

रिक्षाच्या वेगाबरोबर अनुचे मन सुद्धा सैरभैर धावू लागले…. संध्याकाळचा चहा नुकताच घेऊन ती सोफ्यावर निवांत बसली असतानाच तिला अपर्णा सिस्टरचा फोन आला होता, “हॅलो डॉ. अनुराधा बोलतायत का ?” “हो, आपण कोण बोलताय ?” समोरच्याला उत्तर देत अनुने विचारले. “डॉक्टर मी अपर्णा सिस्टर तुम्ही ज्या कॉलेज मध्ये शिकलात तिथे हॉस्पिटल मध्ये मी नोकरी करत होते.” अपर्णा सिस्टर म्हणाल्या. “सिस्टर किती दिवसांनी !! माझा नंबर कसा शोधून काढलात !?! आणि तुम्हाला ओळखणार नाही होय मी किती मस्करी करता अजून सुद्धा !" अनु हर्षभराने उत्तरली. "तस काही नाही डॉक्टर, माझ्याकडे होता नंबर पण कामाच्या नादात फोन करायचा राहूनच जात होतं आणि तुम्ही तर माझ्यापेक्षा व्यस्त असणार म्हणून मी मग फोन करायचा टाळत होते. ते सगळं जाऊ दे, आपले डॉक्टर आकाश आता इथे आलेत ! ते सांगायला म्हणून मी तुम्हाला फोन केला." कसनुसं हसत सिस्टर म्हणाल्या. "काय !! आकाश तिथे आलाय ? आपल्या कॉलेज ला ???" असं म्हणत अनु जवळ जवळ जागेवरच उडालीच !! "नाही आपल्या कॉलेज ला नाही, मी आता सहारा हॉस्पिटल ला नोकरी करतेय, आज मला इथे ते दिसले म्हणून मी तुम्हाला फोन केला." सिस्टर शक्य तितक्या लगबगीने म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवून दिला. अनुला क्षणभर विश्वासच बसत नव्हता आकाश ! चक्क इथे माझ्याच शहरात !! ते सुद्धा घरापासून जवळच्या हॉस्पिटल मध्ये !! ज्याला आपण इतके वर्ष शोधात होतो तो चक्क आता इतक्या जवळ येऊन पोहोचला होता !

अगदी शब्दशः अनुची मती गुंग झाली. नाहीतर तिने पटकन सिस्टर ना विचारले असते की तो कधी आला ? कशासाठी आला ? आता डॉक्टर म्हटल्यावर जॉब साठीच गेला असणार ना हॉस्पिटल ला ! फिरायला थोडीच जाणार तिकडे तो !! पण भानावर आल्यावर तिच्या लक्षात आले हे सर्व विचारायचे राहूनच गेले म्हणून.. मागचा पुढचा कसलाही विचार न करता तिने पटकन हॉस्पिटल गाठायचे ठरवले. सतःचे पटकन यावरून घेतले. गडबडीत फ्लॅट लॉक केला व धावतच ती जिन्याकडे आली. एरवी लिफ्ट ने जाण्यासाठी असून राहणारी अनु आज जिन्यावरून धावत उड्या मारत गडबडीने जातेय याकडे शेजारच्या जोशी काकूंचे हमखास लक्ष गेले. त्या पॅसेज मधूनच तिला ओरडल्या - सावकाश जा ग ! पडशील धावपळीत कुठे तर. पण तिचे लक्ष कुठे होते त्याकडे ! ती फक्त आकाशचाच विचार करत होती. कसा असेल ? आता कसा दिसा असेल ? वगैरे वगैरे... आणि त्यानादात ती धावत रिक्षात येऊन बसली होती. पण तिला अचानक लक्षात आले की, सिस्टर नी मोजकच बोलत फोन ठेऊन दिला होता. हळू हळू ओळखीच्या खुणा मागे जाताना दिसत होत्या, त्यायोगे तिच्या लक्षात आले की आपण आता हॉस्पिटल जवळ येऊन पोहोचलो होतो. साधारण 20 मिनिटांच्या प्रवासानंतर ती हॉस्पिटलच्या दरात पोहोचली होती. ती आतमध्ये गेली. स्वतः डॉक्टर असल्यामुळे हॉस्पिटल चे वातावरण तिला नवीन नव्हते. रिसेप्शन जवळ नातेवाईकांची रेलचेल, वेटिंग रूम मध्ये आपला नंबर कधी येतो या आशेने बसलेले पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक, डिस्पेन्सरी जवळ औषधे नेण्यासाठी होणारी धावपळ अशा परिचित वातावरणात ती रोज काम करत होती. त्यामुळे तिला आकाश ला कुठे शोधायचे हे बरोबर माहितीत होते. रिसेप्शन जवळ जाऊन तिने डॉ. आकाश ना कॉन्टॅक्ट करा असे सांगितले व समोरून काही प्रश्न यायच्या आत आपले आयकार्ड दाखवले. ते आयकार्ड वाचून खरतर खूप काही बोलणार असणारी रिसेप्शनिस्ट आपल्या मनावर ताबा ठेवत शांत राहिली व म्हणाली, "इथे कुणीही डॉ. आकाश काम करत नाहीत, आपला कदाचित काहीतरी गैरसमज झाला आहे." हे ऐकून अनु एकदम चकित झाली. सिस्टर ने आपली फिरकी घेण्यासाठी तर फोन केला नव्हता ना !! पण इतक्या वर्षांनी सिस्टर नि फोन केला म्हणजे त्या मस्करी तर नक्कीच करणार नाहीत, मग इथे तो काम करत नाही असे कसे सांगत आहेत ? काही न कळून अनु विचारात पडली. तितक्यात तिला "डॉक्टर इकडे या" असा ओळखीचा आवाज कानावर पडला, म्हणून तिने मागे वळून पहिले तर सिस्टर अपर्णा तिथे उभ्या होत्या. "कुठे आहे आकाश ? इथे तर सांगतायत कि तो इथे काम करत नाही म्हणून आणि तुम्ही असं थोडकयात सांगून अचानक फोन का ठेवलात मघाशी ?" अनु सिस्टरवर प्रश्नांचे भडीमार करत होती. "माझ्या मागून या म्हणजे सगळे समजेल" सिस्टर फक्त इतकंच म्हणाल्या आणि आपल्या मागून यायची खून करत त्या पुढे चालू लागल्या. अनु सुद्धा काही न कळून त्यांच्या मागून जाऊ लागली. तिला वाटलं आकाश कदाचित याना हाताशी धरून आपली मस्करी करतोय अगदी इंटर्नशिप ला असताना केली तशी. पण आपण सुद्धा खूप हुशार ! आता त्याच गोष्टीला मी नाही फसणार असे मनातल्या मनात बोलून ती स्वतःशीच हसली. पुढे चालणाऱ्या सिस्टर ना याचा काहीच मागमूस नव्हता. काही अंतर चालून ते लिफ्ट कडे आले व दुसऱ्या मजल्यावर पोहोचले. त्यानंतर डावीकडे पॅसेज मध्ये जाऊ लागले. वाटेत गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेले सिनियर डॉक्टर्स व त्यांच्यामागून फिरणारे ज्युनियर डॉक्टर्स त्यांच्यामागे सिस्टर्स अशी वरात दिसत होती. त्या पॅसेज च्या शेवटी ICU लिहलेली पाटी तिने वाचली. आकाश सर्जन असल्याने तो तिथे असण्याची तिला दाट शक्यता वाटत होती. आता बघतेच तुझ्याकडे इतकी वर्ष मला सोडून राहतो काय ? माझ्याशी बोलत नाही काय ? असे म्हणून सिस्टर ने उघडलेल्या दरवाज्यातून अधीरतेनेच प्रवेश केला. चेहऱ्यावर खोटा रागाचा आव व नजरेत आनंद घेऊन ती तिथे आकाश ला शोधू लागली. पण सिस्टर नी तिला हातानेच तिथल्या बेड कडे इशारा केला... अनु मनातून चरकली, पुढे जाऊन ती पाहू लागली. पण आपल्याला कितीही एखादी गोष्ट नको असते तरी ती परिस्थिनुसार स्वीकारावी लागते.

तो आकाशच होता ! निपचित बेड वर पडला होता. उजव्या बाजूला हार्ट मॉनिटर चालू होते. अशा ओळखीच्या वातावरणात अनुला अनोखळी धक्का बसला. तिला काय सुचेनाच. सिस्टर तर फक्त डोळ्यातून पाणी काढत होत्या. इतक्यात एक सिनियर डॉक्टर आत आले, "पेशंटचे नातेवाईक तुम्हीच का ? हे बघा पेशंट ला विश्रांती गरजेची आहे त्यामुळे तुम्ही बाहेर या त्यांना डिस्टर्ब करून नका, आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून घ्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. सिस्टर अपर्णा तुम्ही त्या पूर्ण करून घ्या आणि पेशंट वर २४ तास लक्ष ठेवा." इतके बोलून ते डॉक्टर बाहेर गेले. त्यांच्या पाठोपाठ अनु आणि सिस्टर सुद्धा यंत्रवत बाहेर आल्या. अनुला काय करावे हे सुचेनाच. तरी त्यातून सावरत तिने आकाश चे सर्व सामान ताब्यात घेतले त्यातून त्याचा फोन काढला. तो लॉक होता - अर्थातच ! मनाशी काही विचार करत तिने एक पासवर्ड टाईप केला पण तो चुकीचा निघाला. अर्थातच आकाश काही इतके दिवस तोच पासवर्ड कसा ठेवेल म्हणून तिने अजून एक पासवर्ड टाईप केला आणि आश्चर्य फोन अनलॉक झाला ! तिने पटापट कॉन्टॅक्टस घडले व my life असे लिहलेल्या कॉन्टॅक्ट ला फोन लावला. "हॅलो आकाश अरे किती उशीर ? मी अजून किती वेळ वाट बघायची इथे ?" पलीकडून काहीसा रागीट पण परिचित आवाज कानी पडला. पण तो आवाज कुणाचा हे तिला कळेना. "हॅलो, आपण कोण बोलत आहात ?" अनुने पटकन कंपित स्वरात विचारले. "मी आकाशाची पत्नी बोलतेय आपण कोण ? हा फोन तुमच्याकडे कसा ? आणि आकाश कुठे आहे ?" पलीकडून काहीशा साशंकतेने विचारणा झाली. "सगळं सांगते पण प्लिज तुम्ही आकाश च्या आई बाबाना घेऊन सहारा हॉस्पिटल ला या" इतके बोलून तिने फोन ठेऊन दिला. ती मटकन तिथे जवळ असणाऱ्या बाकावर बसली. तिचे पाय थरथरत होते. डोक्याला मुंग्या आलेल्या. प्रसंगच असा आला होता की ज्याची तिने अपेक्षाच केली नव्हती. इतक्या वर्षांनी आकाश भेटतो तो पण असा ?! आणि त्याच लग्न सुद्धा झालय ?! अर्थात ते कधी ना कधी होणार होतच. मी मघाशी ऐकलेला आवाज ओळखीचा वाटतोय तरी मला का आठवत नाहीय ? कोण असेल त्याची बायको ? आपल्या मेंदूवर ताण देत ती डोकं हातावर ठेऊन बसली. सिस्टर तिच्या पाठीवर हात फिरवून तिला धीर देत होते. खरंतर त्यांना सुद्धा तिला खूप काही विचारायचं होतं, खूप काही सांगायचं होतं पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. तासाभराने त्यांना ICU कडे जवळपास धावत येणारी पावले दिसली. आकाशचे आई बाबा व त्यांच्याबरोबर आणखी एक ओळखीचा चेहरा..... सानिका !!! म्हणजे हि आकाशाची बायको आहे ?!!!?? आता तर अनुला आणखी धक्के पचवायची ताकत राहिली नव्हती !! तीच डोकं अक्षरशः सुन्न झालं होतं.

पण तिच्याकडे न बघता सानिका सरळ आत गेली.

आकाशच्या मनात आणि ओठांवर फक्त एकच नाव गुंजत होते, सानिका ! त्याला शुध्द नव्हती नाहीतर त्याला लक्षात आल असत कि सानिका त्याचा हात घट्ट धरून त्याच्याजवळ बसली होती. बाहेर अनु, आकाशचे आई – बाबा, सानिकाचे बाबा चिंताग्रस्त होऊन बसले होते. इकडे शुध्द हरपल्या मुळे आकाशचे मन वर्तमानाशी संपर्क ठेऊ शकत नसल्याने आपोआप भूतकाळाचा माग घेत काळचक्र भेदून त्याला घेऊन मागे जात होते…..

क्रमशः

कथेचा वास्तवाशी कुणाशीही संबंध नाही, आणि आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

- © डॉ. प्रथमेश कोटगी.

(या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून, सदर कथा वा त्यातील कोणताही भाग पुनः प्रकशित करण्यास किंवा त्यावर चित्रीकरण करण्यास लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)