Nabhantar - 9 books and stories free download online pdf in Marathi

नभांतर : भाग - 9

भाग – 9

अनु व आई बाबा गेल्यानंतर सानिका तिथेच बाहेर बसली होती. तिच्या मनात विचारांचे मंथन सुरु होते - कशा काही क्षुल्लक गोष्टींमुळे - कारणांमुळे इतके छान नाते तुटले, इतक्या वर्षांची मैत्री तुटली. का ? तर निव्वळ गैरसमजातून ? गैरसमज ! हं, कोणतेही नाते टिकवण्यासाठी त्यातील विश्वास महत्वाचा असतो तरच ते नाते मजबूत राहते परंतु गैरसमजामुळे मनात थोडी जरी शंका आली तरी ते नाते कोलमडायला सुरुवात होते आणि शेवटी तिथेच ते संपते. परंतु आमच्या बाबतीत बघायचे झाले तर नाते घट्ट होते फक्त थोडासा विश्वास कमी पडला होता त्याचाच कोणीतरी फायदा घेऊन आम्हाला असे जाणून बुजून वेगळे केले. पण असे कोणी केले असेल... तिला खूप विचार करून सुद्धा काहीच उमगत नव्हते. आणि कुणाला असे करून फायदा मिळणार होता ? काहीच समजेना तिला..

अचानक ICU च्या पॅसेज मधून तिला पावलांचा धावत येण्याचा आवाज ऐकू आला. तसे तिने वर पहिले - पल्लवी येत होती. "कसा आहे आकाश आता ?" आल्या आल्या पल्लवीने काळजीच्या सुरात सानिकाला विचारले. "बरा आहे तो, डॉक्टर म्हणाले घाबरायचे काही कारण नाही पण थोडं ऑब्सर्व्हेशन खाली ठेऊया कारण मेंदूमध्ये थोडा रक्तस्राव झाला आहे." सानिका पल्लवीला सांगत होती. ते ऐकून मात्र पल्लवीचे हुंदके काही थांबेनात, तिला तसे रडताना पाहून सानिकाला सुद्धा काही कळेना की अचानक हि अशी रडायला का लागली ? इकडे पल्लवीची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. काही केल्या रडायचे ती थांबतच नव्हती. शेवटी सानिका तिला घेऊन हॉस्पिटल कॅन्टीन मध्ये गेली, तिथे दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली.

“सानिका मला माफ कर. मला माहितीय कि मी माफी मागण्याच्या लायकीची नाहीय तरीही मला तू माफ कर.” पल्लवी तिला मुसमुसत कळकळीने सांगत होती. सानिकाला काही कळेना कि ती अशी का म्हणतेय म्हणून. “तू काय बोलतेयस ते मला कळत नाहीय, प्लिज नीट शांत होऊन सांगशील का काय झालय ते." सानिका पल्लवीला म्हणाली.

"आकाश चा अपघात झाला तेंव्हा मी तिथेच होते, त्याची ती अवस्था बघून मला काही सुचत नव्हतं; पण तरीही धीर करून मी त्याला इथे घेऊन आले." पल्लवी कशी बशी रडत रडत सानिकाला सांगत होती.

“अग तू का माफी मागतेयस खर तर मी तुझे आभार मानायला हवेत कारण तूच आकाशला वेळेवर दवाखान्यात घेऊन आलीस म्हणून तो वाचला तुझे उपकारच आहेत खर तर !” सानिका तिला भावनिक होत म्हणाली. “अग उपकार कसले, माझ कर्तव्यच आहे ते, एकवेळ माझ्या प्राणांच्या मोबदल्यात त्याचे प्राण वाचणार असतील तर तेही मी करण्यास तयार आहे कारण मी पापच तसे केले आहे. पण मला नाही वाटत इतक करून सुद्धा त्याच क्षालन होईल म्हणून” निराश होत पल्लवी म्हणाली. “आता मला सांगशील काय कि तुझ्या मनात काय सुरु आहे ते ?” सानिकाने पल्लवीला सावरण्याचा प्रयत्न करत विचारले. “सांगते ऐक.... खर तर तुला वाटत असेल मी तुमच्या लग्नाला का नाही आले ? माझ्यामुळेच तर तुम्ही परत एकत्र आलात आणि तरीसुद्धा मी का नाही आले. पण त्या आधी तुला एक गोष्ट ऐकावी लागेल. तुमच्या दोघांबद्दल जे गैरसमज पसरवले होते ते दुसरे तिसरे कोणी नसून मीच पसरवले होते. कारण आकाश आणि अनु माझे बेस्ट फ्रेंड होते आणि ते अजून कोणाचे बेस्ट फ्रेंड होऊ नये अस मला नेहमी वाटायचं पण तुझे ते झालेच ! पुढे त्याला प्रेम सुद्धा जडले तुझ्यावर आणि कर्मसंयोधाने तुला सुद्धा हेच सगळ वाटलेलं त्याच्याविषयी. हे सगळ दोघंही तुम्ही मलाच सांगायचात. मला खूप त्रास व्हायचा त्याचा. म्हणून मीच ते पराक्रम केले. पण मला माहित नव्हत कि इतकी वर्ष तुम्ही वेगळे राहाल. मी इतकी सुद्धा वाईट नव्हते कि तुमचं अस तुटलेलं बघून खूष झाले, उलट मला खूप दुःख झाल कि माझ्यामुळे अशा चांगल्या नात्याला गालबोट लागल. मी तुला – आकाश आणि अनु ला पुन्हा एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तुला शोधायाच होत परंतु तुझा पत्ताच मला माहित नव्हता, आकाश ला शोधू लागले पण तो सुद्धा सापडेना. मध्यंतरी मग माझ आणि लग्न झाल. आणि काही महिन्यातच आकाश एका कॅम्प ला भेटला. तिथे खर तर त्याच्या पायावर डोक ठेऊन माफी मागणार होते पण कसतर स्वतःला आवरत तुझ्याविषयी सांगितलं आणि त्याला तुला भेटण्याविषयी तयार केल. पुढे मग तुमचं लग्न झाल अस मी ऐकल. खर तर माझी सुद्धा खूप इच्छा होती लग्नाला येण्याची पण कोणत्या तोंडानी येणार होते मी. आजच मग आकाश ला त्याच्या क्लिनिक मध्ये भेटले, झालेला सगळा प्रकार सांगून त्याची माफी मागितली. त्याला खर तर यावर विश्वासच बसला नाही, पण त्याने तो खूप कष्टी झाला. मोठ्या मनाने त्याने मला माफ केले. त्यावेळी खर तर तो तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करत होता. माझ्याकडे त्याने एक भेटवस्तू देऊन ठेवली जी हळूच मी तुला द्यायची अस ठरल होत. पण आम्ही क्लिनिक मधून परत येताना तिथल्या पायरीवरून तो सटकला आणि त्याच्या डोक्याला मार बसला. खर तर मी इतकी रीलॅक्स झाले होते कि माझ्या डोक्यावरच ओझ कमी झाल्यासारखं वाटत होत. पण देवाला कदाचित ते मान्य नव्हत, मी ताबडतोब अॅम्ब्युलन्स ला फोन केला आणि एक्स्टरनल हेमोरेज मॅनेज केला. इथे आल्यावर मला अपर्णा सिस्टर दिसल्या त्यांनी मला ओळखलं पण त्याच वेळी त्यांनी आकाश ला बघितलं व त्यांना काय बोलावे हे सुचेना बहुतेक. पण त्यांनी प्रसंगावधान राखत अनुला फोन करून बोलावून घेतलं. मी अनुला भेटले नसल्याने मला अपराध्यासारखे वाटत होते त्यामुळे मी तिथून निघून गेले, पण शेवटी मनाचा निर्धार करून तिची माफी मागायला आले इथे परंतु ती निघून गेली होती..” पल्लवीने सगळी हकीकत तिला सांगितली.

पल्लवीची हकीकत ऐकून सानिकाला धक्काच बसला होता. अशी कशी हि वागली, त्याची बेस्ट फ्रेंड ना मग अस वागत का कोणी ? पण लगेचच ती सावरली. तिला धीर देत म्हणाली, “हे बघ पल्लवी, झाल गेल विसरून जा. ह्यांनी तुला माफ केलाय ना मग डोक्यातून काढून टाक ते विचार. आपण सगळे पुन्हा नव्याने सुरु करूया.” सानिकाचे ते बोल ऐकून पल्लवी खऱ्या अर्थाने रीलॅक्स झाली.

कॉफी संपवून दोघेही हलक्या मनाने पुन्हा ICU च्या इथे आले तोच इथे एकाच गडबड उडालेली दिसत होती. २ - ३ नर्स हातात काही कागद घेऊन इकडून तिकडून धावत होत्या. डॉक्टर्स त्यांना काही सूचना देत होते. वॉर्डबॉय स्ट्रेचर घेऊन येत होते आणि काही वेळाने त्यांनी आकाश ला त्यावरून बाहेर आणले. सानिका आणि पल्लवी ला काहीच समजेना काय सुरु आहे ते. सानिकाला तर धक्काच बसला मघाशी बघितलेलं तर डॉक्टर म्हणाले होते की स्टेबल आहे म्हणून आणि आता अचानक त्याला शिफ्ट का करत आहेत ? पटकन पुढे होत तिने डॉक्टरांना विचारले की काय झाले, हे काय सुरु आहे ? "पेशंट मध्ये जरा क्रिटिकल लक्षणे दिसायला लागली त्यामुळे आम्ही त्यांना ऑपरेशन थेटर मध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे." डॉक्टर म्हणाले. "तुमची काही हरकत नसेल तर मी सुद्धा तुमच्या सोबत आलं चालेल का ? मी सुद्धा डॉक्टर आहे." सानिका डॉक्टरांना विनंती करत म्हणाली. खरं तर डॉक्टर परवानगी देत नव्हते परंतु त्यांना सुद्धा एका अनुभवी डॉक्टर ची गरज होती त्यामुळे शेवटी तिला परवानगी मिळाली. फक्त जिन्यावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याला मार लागल्यामुळे, मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्याची अवस्था नाजूक झाली होती. तरी देवाच्या कृपेने रक्तस्राव खूप झाला नव्हता. डॉक्टरांच्या टीम सोबत तिने सुद्धा १0 तास अथक परिश्रम घेऊन त्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली होती. त्याने सुद्धा ट्रिटमेंटला चांगला प्रतिसाद दिला होता. हळू हळू तो रिकव्हर होत होता. कदाचित जगण्याची तीव्र इछाच त्याला यातून बाहेर काढत होती.

काही दिवसांनी आकाश ला घरी आणले. तो आता पूर्ण शुद्धीत आला होता व अपेक्षेच्या मनाई त्याच्या तब्येतीत खूप सुधारणा झाल्या होत्या. अर्थातच सानिका त्याची पूर्ण काळजी घेत होती - एक पत्नी म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून सुद्धा !

आकाशला कदाचित ताण नको म्हणून तिने त्याच्यासमोर अनु किंवा पल्लवी कुणाचेच नाव काढले नाही वा त्यांना त्याच्या समोर आणले नाही. तिने ठरवले होते की त्याची तब्येत पहिल्यासारखी झाली की मग त्यांना बोलावून घ्यायचे. त्याप्रमाणे काही दिवसांनी तिने अनु याच शहरात असल्याचे त्याला सांगितले; ते ऐकताच त्याला खूप आनंद झाला ! त्याला अनुला भेटण्याची तीव्र इच्छा झाली. सानिकाने मग अनुला आणि मंदार ला घरी भेटायला बोलावले. आकाश ला मागचे सर्व चांगले दिवस आठवू लागले होते. आता वाट पाहायची होती ती फक्त उद्याची ! उद्या अनु घरी येणार आणि मागच्या काही वर्षात राहिलेली मैत्रीची सर्व कसर आपण येणाऱ्या दिवसात भरून काढू असा विचार करत आकाश अनुची वाट पाहू लागला....

क्रमशः


सदर कथानक हे पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


- © डॉ. प्रथमेश कोटगी

(सदर कथेचे पूर्ण हक्क हे लेखकास्वाधीन असून यातील अंशतः किंवा पूर्ण भागाचे पुनः प्रकाशन करायचे असल्यास वा चित्रीकरण करायचे असल्यास लेखकाची तशी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED