Akalpit - Part 1 books and stories free download online pdf in Marathi

अकल्पित (भाग १)

सकाळी ६ वाजताचा अलार्म वाजला.
निशाने तो बंद केला..तिला आज मॉर्निंग वॉकला जायचा कंटाळा आला होता..
ते थंडीचे दिवस होते..म्हणून ती परत डोक्यावर चादर घेऊन झोपली..पण नंतर तिच्या लक्षात आले की रिमा तीची वाट बघत असेल..म्हणून ती मनात नसताना ही उठून गेली..
बाहेर अजून अंधारच होता..

निशा नेहमीच्या ठिकाणी पोहोचली. तरीही अजून रिमाचा काहीच पत्ता नव्हता. तसेच रीमा चा फोन ही लागत नव्हता.
"शीट यार, ही रीमा पण ना..जर यायचे नव्हते तर आधीच सांगायचे ना..मेसेज तरी करायचा होता..किती झोप येत होती आज..अरे यार..जाऊ देत...हिला नंतरच बघते मी" असे ती स्वतःशीच पुटपुटली.

खूप वेळ रिमाची वाट बघितल्यानंतर तिने तिचा मॉर्निंग वॉक आणि रोजचा ठराविक व्यायाम एकटाच पुर्ण केला आणि ती घरी गेली.
तिने ठरवले की, ऑफिस मध्ये जायच्या आधी रिमाला भेटूनच जावे आणि थोडे ओरडून तिची गम्मत करावी.
पण सकाळी सकाळीच तिच्या ऑफिस मधून मेसेज आला की, महत्वाचे काम आल्यामुळे तिला अर्धा एक तास लवकर बोलावलंय. मेसेज वाचल्यावर निशाची तर भलतीच सटकली.
"आजचा दिवसच खराब आहे भेंडी..एकतर त्या रिमाने सकाळी सकाळी टांग दिली आणि आता हा बॉस..म्हणे महत्वाचे काम. च्यायला नशीबच वाईट. चलो निशा लगो काम पे" असे ती स्वतःशीच बोलली आणि पटापट तयारी करून ऑफिसला निघाली. तिने रिमाचा फैसला काय तो संध्याकाळी आल्यावर करायचा असं ठरवलं.

आज निशाला रोजच्यापेक्षा ऑफिसमध्ये जास्तच काम होते. त्यामुळे तिला घरी यायला पण खुप उशीर झाला. ती इतकी थकली होती की घरी आल्यावर ती अगदी पडल्या पडल्याच झोपली..पुढे २-३ दिवस जास्त काम असल्यामुळे तिला काही दिवस मॉर्निंग वॉकला ब्रेक द्यावा लागणार होता. त्यामुळे तिने झोपण्यापूर्वी रिमाला तिला २-३ दिवस मॉर्निंग वॉक ला यायला जमणार नाही असा मेसेज पाठवला..आणि मग ती झोपली.

पुढचे काही दिवस निशाचे भलतेच व्यस्त गेले. कधी एकदाचा वीकएंड येतोय याची वाट निशा पाहत होती. म्हणता म्हणता रविवार उजाडला. आज निशाकडे भरपूर वेळ होता म्हणून तिने मेसेज वाचावे याकरिता व्हाट्स अँप ओपन केले. तर रिमाचा मेसेज डीलिव्हर झालाच नव्हता. अगदी एक टिक होते. तिने लगेच रिमाला फोन लावला तर तो स्वीच ऑफ येत होता. निशा भलतीच काळजीत पडली. रीमा ठीक तर असेल ना? तिला स्वतःलाच प्रश्न पडला.

ती तातडीने रीमाच्या घरी गेली. पोहचताच समोर पाहते तर काय!! तिच्या घरासमोर खूपच गर्दी होती आणि आत कोणीतरी जोरजोरात ओरडत होते. क्षणभर तर निशाच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिच्या मनात नको-नकोते विचार येऊन गेले. तरी हिम्मतीने ती लोकांच्या गर्दीतून वाट काढत रीमाच्या घरात पोहोचली.

बघते तर काय!! रिमाचा अगदी अवतार झाला होता. केस विस्कटलेले होते. डोळे पार काळवंडले होते. पण नजर खुनशी वाटत होती. ती जोरजोरात हात-पाय आपटत होती. तिचा आवाज ही बदलला होता. विचित्र अश्या घोगऱ्या आवाजात ती जोरजोरात ओरडत होती. 'सोडणार नाही मी हिला, घेऊन जाणार, घेऊन जाणार!!'
अगदी ४-४ माणसांना पण ती आवरत नव्हती. तिथे असलेल्या ४-५ जणांनी तिचे हात-पाय गच्च बांधले. तरीही ती ओरडत होती, 'सोडा मला, सोडा मला!! मी घेऊनच जाणार हिला, सोडणार नाही!!' अचानक कोणीतरी तिच्या कपाळाला अंगारा लावताच ती बेशुध्द पडली. हळूहळू सगळी गर्दी पांगली. निशाला क्षणभर समोर पाहिलेल्या दृष्यावर विश्वासच बसत नव्हता. हे सगळे तिने सिनेमामध्ये बघितलेले होते आणि गोष्टींमध्ये ऐकले होते. पण प्रत्यक्षात अनुभवण्याची तिची ही पहिलीच वेळ होती.

रीमाच्या आई -वडिलांची तर हालत खुपच बेकार होती. निशाला बघून रीमाच्या आईला क्षणभर खूपच आनंद झाला आणि मग ती निशाला मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागली. निशाने रीमाच्या आईला धीर दिला. तिने थोडे थांबून सविस्तर सगळे काही रीमाच्या आईला विचारले.

ती म्हणाली, " काकू काय झालंय रीमाला ती अशी विचित्र का वागतेय. काय अवतार करून घेतलाय तिने स्वतःचा. किती दिवस झाले ना तिचा फोन ना मॅसेज. म्हणून म्हटले आज तिला घरीच गाठते. तर हे सगळे बघून डोक्याचा पार भुगा झालाय. म्हणजे नक्की काय झालंय रिमाला मला कोणी काही सांगेल का?"

काकूंनी आतापर्यंतची सगळी हकीकत निशाला सांगायला सुरुवात केली.
"अग काही दिवसांपूर्वी रीमाच्या ऑफिसची पिकनिक लोणावळ्याला गेली होती. एका दिवसाचा स्टे पण होणार होता म्हणून तिने आमची परवानगी घेतली आणि आम्हीही तिला जायला होकार दिला. ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत आली सुद्धा. पण तेव्हापासून नुसती शांत. काहीच बोलत नव्हती. अगदी जेवली ही नाही. मला वाटले प्रवासाने थकली असेल म्हणून मी पण तिला काही विचारले नाही. दुसऱ्यादिवशी मी तिला उठवायला तिच्या बेडरूममध्ये गेली. तर ती बेडवर नव्हतीच मुळी. मला वाटले बाथरूम मध्ये असेल. पण तिथेही नव्हती. सगळे घर धुंडाळले. कुठेच नाही. इतक्यात आपला बंटी जोरात किंचाळला म्हणून मी आणि रिमाचे बाबा धावतच आवाजाच्या दिशेने गेलो बघतो तर काय!!
रीमा वरती छताला चिकटलेली होती आणि विक्षिप्त पणे हसत होती. ते पाहून तर बंटी थरथर कापत होता..आमची पण बोबडी वळाली. बंटीचा आवाज ऐकून शेजारचे पण सगळे धावून आले. त्यादिवशीचा सगळा प्रकार खूपच भयानक होता. आठवला तरी अंगावर काटा येतो बघ!

अगदी तेव्हापासून रोज हाच प्रकार घडतोय. सगळे डॉक्टर झाले. वैद्य झाले. अंगारे-धुपारे झाले. थोडा वेळ ती शांत व्हायची. एकदम नॉर्मल वाटायची. पण पुन्हा काही वेळाने परत तेच सुरू व्हायचे. बंटीने या सगळ्या प्रकरणाचा खूपच धसका घेतला म्हणून त्याला निलू मावशीकडे पाठलंय पुण्याला. निशा बाळा कळतच नाहीये ग काय करू ते."
असे म्हणून ती रडू लागली.

निशाने एकवार रिमाकडे बघितले. ती शांत झोपली होती. निशाने काकूंकडे रीमाच्या ऑफिसच्या मित्र-मैत्रिणींचे फोन नंबर मागितले. काकूंनी रिमाचा फोनच तिच्या हाती दिला. तो स्वीच ऑफ होता. निशाने तो ऑन केला आणि तिच्या व्हाट्सएप वरच्या तिच्या ऑफिस ग्रुप मधले नंबर स्वतःच्या मोबाईल वर फॉरवर्ड करून घेतले आणि ती तिथून तडक निघाली.

निशाला जाणून घ्यायचे होते की नक्की असे काय झाले त्या दिवशी पिकनिकमध्ये ज्यामुळे रिमाची ही अवस्था झाली. रीमा तिची फार जिवलग मैत्रीण होती आणि तिला ह्या अवस्थेत पाहून निशाला फार त्रास होत होता. एकंदरीत हा प्रकार भयंकर पण वाटत होता.

सकाळी मॉर्निंग वॉक ला जाताना बऱ्याच वेळा रीमा निशाला तिच्या ऑफिसच्या गमतीजमती सांगत असे. त्यामध्ये अनिल, नितीन, स्नेहा, रजत, अनिता यांची नावे सारखीच असतं. त्यांचा खूप छान ग्रुप जमला होता. असेही रीमा नेहमीच म्हणत असे. परंतु, ऑफिस पिकनिक ते पण लोणावळा इथे.. याबद्दल रीमाने निशाला कधी काही सांगितलेले तिला आठवत नव्हते.

निशाने त्या पाचही जणांना फोन करून तिच्या घरी बोलवायचे ठरवले. त्याप्रमाणे तिने सगळ्यांना फोन ही केले. आधी काहींनी नाही जमणार, वेळ नाहीये आणि अशी बरीच कारणे दिली. पण मग निशाने रीमाच्या अवस्थेबद्दल सगळ्यांना सांगितल्यावर सगळे एकदा भेटण्यास तयार झाले.

निशा नुकतीच संध्याकाळी रिमाला बघून घरी आली होती. इतक्यात तिची डोअरबेल वाजली. तीने दार उघडताच चार जण तिच्या दरवाजात उभे होते. निशाने त्यांना आत बोलावले. सगळेच चेहऱ्याने थोडे टेन्स दिसत होते. तिने सगळ्यांशी ओळख करून घेतली. अनिल, नितीन, स्नेहा आणि अनिता. पण रजतला थोडे आऊटडोअर काम असल्यामुळे त्याला ५-१० मिनिटे उशीर होणार होता असे समजले.

ती सगळ्यांशी बोलणार इतक्यातच रजत ची एन्ट्री झाली. निशा त्याला बघतच राहिली. रजत दिसायला खूपच देखणा होता. इतका की बघताच क्षणी कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. बिलकुल तसाच जसा रिमाने निशाला वर्णन केलेलं. रिमाला तो खूप आवडायचा आणि कदाचित रिमाही त्याला आवडत असावी. असो, निशा एकदम भानावर आली आणि त्यालाही तिने बसायला सांगितले.

निशाने रिमा पिकनिक वरून आल्यापासून झालेला सगळा प्रकार त्या सगळ्यांना सांगितला. हे ऐकून सगळेच शॉक झाले. कारण त्यांना ह्या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती.

निशा म्हणाली, 'तुम्हाला खरंतर मी सांगितलेल कितपत पटलं आहे कोणास ठाऊक. पण मी जे काही तुम्हाला सांगितले ते सर्व खरं आहे. ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. मला काल काकूंकडून कळले की पिकनिक वरून आल्यापासून रीमा अशी विचित्र वागत आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना इथे बोलावले आहे. तुम्ही ५ जण रिमाच्या ऑफिसमध्ये तिच्या अगदी जवळचे होता. तुम्हीच मला त्या दिवशी काय झाले हे सांगू शकता. प्लीज मला कोणीतरी सांगा. नक्की काय घडलेल त्यादिवशी ते? मला रिमाची हालत बघवत नाहीये. आता तुम्हीच माझी मदत करू शकता.' असे बोलून ती चक्क रडू लागली.

सगळे वातावरण खूपच गंभीर झालं. स्नेहा आणि अनिताने निशाला धीर दिला. इतक्यात रजतने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, "खरं तर ही ऑफिसची पिकनिक नव्हती. मला रीमा खूप आवडायची. कदाचित मी ही तिला..माहीत नाही.. पण मला असं वाटायचं..
म्हणून मला तिला प्रोपोज करायचे होतं पण एका शांत ठिकाणी. आमच्या ग्रुप मध्ये मी अनिलच्या सगळ्यात जवळचा आहे. म्हणून मी ही कल्पना त्याला सांगितली तर त्याने पिकनिकचा प्लॅन सुचवला. कारण रीमा एकटी माझ्याबरोबर कुठेच आली नसती. माझ्या काकांचा लोणावळ्याला बंगला आहे. म्हणून मीच सगळ्यांना ही जागा सुचवली. सगळ्यांनी होकार पण दिला. अगदी रीमाला पण तिच्या घरून मंजुरी मिळाली. मी खूप खुश होतो. सगळे मी ठरवल्याप्रमाणे होत होते.

मग आम्ही सगळे लोणावळ्याला जायला निघालो. पोहोचेपर्यंत दुपार झालेली. तिथे आजुबाजूला खाण्याची काहीच सोय नसल्यामुळे आम्ही खायचे सामान सुद्धा बरोबर नेले होते. खूपच सुंदर बंगला होता तो. जास्त मोठा नाही पण खाली २ खोल्या, बैठकीची खोली आणि स्वयंपाकघर आणि वरती पण २ खोल्या आणि एक अडगळीची खोली. समोर मोठे गार्डन.

मला तर गेल्यापासून सगळंच रोमँटिक वाटत होतं. सगळे खूप खुश झाले बंगला बघून. पण का कोणास ठाऊक रिमाला तिथे गेल्यापासून नकारात्मक भावना येत होत्या. तिने आम्हाला हे बोलून पण दाखवले. पण कोणीच तिच्याकडे लक्ष दिले नाही. ती तिकडे थांबायला ही तयार नव्हती. आपण इथून जाऊया लवकर हेच तिचे चाललेलं. मी तिला समजवल्यावर ती एक रात्र थांबायला तयार झाली.
मग आम्ही पूर्ण दिवस खूप मजा केली. सगळ्यांनी पूर्ण रात्र जागवायची असे ठरले. कोणीच झोपले नाही. फक्त रीमा सोडली तर..कारण सकाळपासून तीची तब्बेत बरी नव्हती.
म्हणून स्नेहा तिला वरच्या खोली मध्ये सोडून आली. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत निघालो. त्यामुळे माझा प्रोपोज करण्याचा प्लॅन पूर्ण फिस्कटला.
असो, नंतर २-३ दिवस रीमा ऑफिसला आलीच नाही. तिचा फोन पण स्वीच ऑफ होता. मी खूपच उदास झालेलो. मग अचानक एकेदिवशी तिच्या आईचा ऑफिसमध्ये फोन आला की, ती पुण्याला शिफ्ट झालीये आणि तिला तिथे नवीन जॉब मिळाला आहे म्ह्णून. मग तेव्हापासून ती कोणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नव्हती. आज तुझा फोन आला आणि रिमाच नाव ऐकून मी चकितच झालो आणि काळजीही वाटली. म्हणून तडक इथे निघून आलो."

बाकी सगळ्यांनी ही रजतच्या बोलण्याला संमति दिली. तरीही निशाचे समाधान होत नव्हते. तिला सारखे वाटतं होते, नक्कीच अकल्पित असे काहीतरी तिथे घडलंय.

तिने रजतला विनंती केली की, मला तो बंगला बघायचाय.

क्रमश:

(कथा आवडल्यास ती नक्की share करा, धन्यवाद )
©preetisawantdalvi

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED