रजत निशाला त्या बंगल्यात न्यायला तयार झाला. आपण येत्या दोन दिवसात निघुयात असे बोलून रजत आणि बाकी सगळे निघाले.
बाहेर आल्यावर अचानक स्नेहा म्हणाली, 'अरे यार, मी माझी पर्स निशाच्या घरातच विसरली. तुम्ही पुढे व्हा मी आलेच.'
निशाच्या घराचा दरवाजा उघडाच होता.
तिने हाक मारली, 'निशा.'
निशा हॉलमध्येच होती.
'अरे स्नेहा, काय झाले काही विसरलीस का?' निशा म्हणाली.
'हो, माझी पर्स विसरले होते......ही बघ मिळाली..चल बाय' असे बोलून स्नेहाने सोफ्यावरची पर्स उचलली व ती बाहेर निघणार इतक्यात ती थांबली आणि निशाला म्हणाली,"निशा मला तुला काही सांगायचंय, रिमाबद्दल. खर तर मगाशीच सांगणार होते. पण सगळ्यांनी माझी मस्करी केली असती. कारण तू जे काही सांगितलंस ते अजून पण कोणाला पटलं नाहीये. कारण सगळेच या गोष्टीवर विश्वास ठेवतात असे नाही.'
ती पुढे म्हणाली, 'पिकनिकच्या दिवशी लोणावळ्याच्या त्या घरात गेल्यापासूनच रीमा खूप अस्वस्थ होती. रात्री आमची सगळ्यांची मस्ती चालली होती. पण रिमाच लक्षच नव्हते. तिने सगळ्यांना बरं वाटत नाहीये. डोके दुखतय अस सांगितले. मग मीच तिला वरच्या रूम मध्ये घेऊन गेले. रीमा कशाला तरी घाबरत होती. तिने मला तिला झोप लागेपर्यंत तिथेच बसायला सांगितले. म्हणून मी तिथेच बसून होते. तेवढ्यात अनिलने मला हाक मारली आणि रिमाचा डोळा ही लागलेला म्हणून मी खाली गेले. पण मोबाइल तिथेच राहिला म्हणून परत आले, मी फोन घेतला आणि बघते तर रीमा खोलीमध्ये नव्हती. मला वाटले बाथरूमला गेली असेल.
पण ती तिथेही नव्हती कारण बाथरूमचा दरवाजा तर उघडा होता. मला क्षणभर वाटले माझ्या पाठीमागे कोणीतरी उभे आहे. मी वळून बघितले तर कोणचं नव्हते. इतक्यात कसला तरी आवाज आला म्हणून मी खोलीच्या दरवाजाकडे गेले तर रीमा मला अडगळीच्या खोलीत जाताना दिसली. मी तिला हाक पण मारली पण तेवढ्यात तो दरवाजा बंद झाला. मी तो उघडला आणि आत गेले तर आत रीमा नव्हती. इतक्यात माझा लक्ष त्या खोलीच्या दरवाजाकडे गेला तर रीमा तिथे उभी होती..खरं तर ती रीमा नव्हतीच ती रिमाचा चेहऱ्यात दुसरीच कोणीतरी होती. तिचे केस मोकळे होते, डोळ्यांची बुबुळे एकदम सफेद आणि ती विचित्रपणे हसत होती. नशीब तेवढ्यात रजत तिथे आला. त्याने मला जोरात हाक मारली. खाली येण्यासाठी. आणि मग मी बघते तर समोर कोणचं नव्हते. मी रीमाच्या खोलीत होते आणि ती तर पलंगावर शांत झोपली होती मग मी जे काही पाहिले ते काय होते? मला काहीच समजले नाही. पण मनातून मी खूपच घाबरले होते. नंतर मी पूर्ण रात्र खालीच होते आणि मला आलेला अनुभव मी कोणालाच नाही सांगितला. कारण कोणीच विश्वास ठेवला नसता' ,इतके बोलून ती निघून गेली.
निशा विचार करत होती. या सगळ्यांचे मूळ त्या घरातच आहे आणि हे सगळे फक्त रिमालाच जाणवले होते म्हणूनच कदाचित तिला झपाटले असेल. मला तिथे जावंच लागेल पण जाण्याआधी मला गुरुजींना भेटावं लागेल. ह्या वर तेच योग्य उपाय सांगू शकतात.
निशाने गुरुजींच्या मठात फोन केला आणि त्यांच्याशी भेटायची वेळ ठरवली.
शहराच्या एका बाजूला शांत ठिकाणी गुरुजींचा मठ होता. गुरुजी आणि त्यांचे काही अनुयायी तिथे राहायचे. गुरुजी नेहमी पांढरे वस्त्र परीधान करत असतं. त्याचे रूप अत्यंत तेजस्वी होते. ते दिवसभर ध्यानधारणेत मग्न असत. त्यांनी ध्यानधारणेतून प्रचंड सामर्थ्य प्राप्त केले होते. ते रोज मोजक्याच लोकांना भेटत असतं. जर एखाद्याची बाब जास्त गंभीर असेल तरच ते स्वतः जातीने लक्ष घालत. नाहीतर ते त्यांच्या सल्ल्याने किंवा उपदेशाने त्यांच्याकडे येत असलेल्या लोकांच्या समस्यांचे निवारण करत आणि ह्या सगळ्याचे ते पैसेही घेत नसतं. निशा काहीही मोठा निर्णय घेताना गुरुजींचा सल्ला जरूर घेत असे आणि आज तिला गुरुजींशी भेटणे फारच महत्वाचे होते. कारण आजची बाब फारच गंभीर होती.
निशा तिला दिलेल्या वेळेवर मठात पोहोचली. तिथले वातावरण इतके सकारात्मक होते की, क्षणभर ती सगळेकाही विसरली.
इतक्यात गुरुजी आले. त्यांनी तिला येण्याचे कारण विचारले. निशाने आतापर्यंत घडलेले सर्वकाही त्यांना सांगितले आणि 'आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे' असेही ती म्हणाली.
गुरुजींनी सर्वात प्रथम रिमाची भेट घ्यायचे ठरवले आणि नंतरच त्या बंगल्याची शहानिशा करण्याचे ठरवले. त्यांना निशाच्या एकंदरीत बोलण्यावरून येणाऱ्या संकटाची थोडीफार कल्पना आली होती. त्याप्रमाणे त्यांनी तयारी केली.
निशा आणि गुरुजी दोघेही रिमाच्या घराजवळ पोहोचले. रजतला ही निशाने तिथेच बोलवून घेतले. रिमामध्ये जे काही होते त्याला गुरुजी इथे आलेले नको होते म्हणून तिने घरात तांडव सुरू केला. सगळ्या वस्तू इकडेतिकडे आपटत होत्या. रिमाचे आई-वडील घाबरून खोलीबाहेरच उभे होते. आत जायची कोणालाच हिम्मत नव्हती. इतक्यात गुरुजी तिथे पोहोचले. त्यांनी प्रथम सर्व घरामध्ये नजर फिरवली. मग ते रिमाचा खोलीत गेले.
रीमा जोरजोरात घोगऱ्या आवाजात ओरडत होती,' तू कशाला आला आहेस इथे? निघून जा..निघून जा..मी हिला सोडणार नाही..घेऊन जाणार..घेऊन जाणार..' आणि जोरजोरात हसायला लागली.
गुरुजींनी सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी रिमाच्या डोक्यावर हाथ ठेवला आणि तिच्या कपाळाच्या मध्यभागी अंगठा ठेवून काहीतरी मंत्र पुटपुटला. घरातील वातावरण एकदम बदलले. सगळे घर हलू लागले. रीमासुध्दा तडफडू लागली होती. रागाने तिचे डोळे लालबुंद झाले होते. पण गुरुजींनी न डगमगता मंत्र बोलणे चालूच ठेवले. थोड्याच वेळात सर्व काही शांत झाले. रीमा ही शांत झोपली. त्यांनी तिच्या डोक्याला अंगारा लावला. मग गुरुजींनी रिमाच्या आई वडिलांना आत बोलावले आणि त्यांना म्हणाले, 'काही काळजी करू नका. आता मी आलोय. बरं झालं निशाने योग्यवेळी मला येथे आणले नाहीतर अनर्थ झाला असता. असो, आता सध्यातरी घाबरण्याचे काही कारण नाही. सर्व ठीक आहे. हा अंगारा तिच्या पलंगाखाली ठेवा. मी याचा कायमचा सोक्षमोक्ष लावायला लवकरच परत येईन' असे बोलून गुरुजी, निशा आणि रजत लोणावळ्याला निघाले. रजतच्या काकांच्या बंगल्यावर.
त्या तिघांना पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली. बंगल्यात जायच्या आधी गुरुजी पूर्ण बंगल्याच्या आवारात फिरले. त्यांना कोणीतरी बंगल्याच्या आतून बघत आहे असा भास झाला. पण खरोखरच बंगल्याच्या खिडकीत कोणीतरी होते. गुरुजी जे समजायचे ते समजून गेले. कारण त्यांना ह्या सगळ्याची थोडी फार पूर्व कल्पना होती. त्यांनी सगळ्यांनी एक एक खोली तपासायला सुरुवात केली. पण कोणालाच काही जाणवले नाही. इतक्यात निशाला स्नेहा ने सांगितलेला अनुभव आठवला. तिने तो गुरुजींना सांगितला.
सगळे अडगळीच्या खोलीकडे वळाले. त्या खोलीत थोडेफार सामान होते पण पूर्ण खोली धुळीने माखली होती. सगळ्यांनी तिथे शोधाशोध करायला सुरुवात केली. इतक्यात निशाला एक जुना फोटो मिळाला. तो एका जोडप्याचा फोटो होता. निशाने रजतला विचारले, 'हे तुझे काका काकी ना?'
रजतने फोटो बघताक्षणी नाही म्हटले.
'मग हे कोण असतील?' निशाने विचारले.
'मला काकांना विचारावे लागेल' रजत उत्तरला.
इतक्यात बाहेर कसलातरी जोरदार आवाज झाला. सगळे दरवाजाकडे निघाले. पण निशा कशाला तरी अडकून खाली पडली आणि दरवाजा बंद झाला. रजत आणि गुरुजी दोघेही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. तर इथे खोलीमध्ये निशा खूपच घाबरून गेली होती. तिने दरवाजा उघडण्याचा खूपच प्रयत्न केला पण काही केल्या तो उघडतच नव्हता.
इतक्यात तिला कोणीतरी मागे उभे असल्याचा भास झाला. तिने मागे वळून पाहिले तर ती जोरात किंचाळली. कारण तिच्या समोर रीमा उभी होती पण ती रीमा नव्हतीच. जसे स्नेहाने वर्णन केले अगदी तशीच. ती तिच्याजवळ येणार इतक्यात दरवाजा उघडला. गुरुजींनी अगदी खेचतच निशाला बाहेर काढले आणि तो दरवाजा बंद केला. तसेच त्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी मंत्रांनी सिद्ध केलेला धागा बांधला.
निशा थरथरत कापत होती. आता तिथे थांबणे शक्य नव्हते. गुरुजींनी निशाच्या डोक्यावर हाथ ठेवून तिला शांत केले आणि ते म्हणाले, 'आपल्याला इथे परत यावे लागेल पण आता रिमाला घेऊनच. ही बाब सोपी नाही. नक्कीच काहीतरी अकल्पित असे इथे घडलंय. मला योग्य तयारी करूनच इथे यावे लागेल. तोपर्यंत तुम्ही ह्या फोटोमधल्या व्यक्ती कोण आहेत हे शोधा आणि मला उद्या मठात येऊन भेटा.नक्कीच या व्यक्तींचा काहीतरी संबंध ह्या घटनेशी जरूर आहे. सध्यातरी रिमाला काही धोका नाही. चला मग भेटू उद्या.' असे बोलून रजतने गुरुजींना मठात आणि निशाला तिच्या घरी सोडले.
क्रमश:
(पुढे काय होईल? त्या फोटोतले जोडपे कोण असेल? गुरुजी ह्या सगळ्याचा कसा सोक्षमोक्ष लावतील? रीमा बरी होईल का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी अकल्पित ह्या कथेचा पुढचा म्हणजेच अंतिम भाग जरूर वाचा. जर तुम्हाला माझ्या लिहिलेल्या कथा आवडत असतील तर त्या तुमच्या मित्र-मैत्रिणी, कुटूंबामध्ये सामायिक (share) करा आणि या कथेला Like करायला विसरू नका. धन्यवाद.)
©preetisawantdalvi