अष्मांड - भाग ३ Kumar Sonavane द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अष्मांड - भाग ३

धक्क्यावर बरीच गर्दी होती. अनेक लोक इकडून तिकडे घाई घाईत जात होते. काही आपली नाव पाण्यात उतरवायची तयारी करत होते. तर काहीजण नुसतेच उभे होते. त्यापैकीच एकाकडे जात शंकरने राम राम केला. त्यानेही किंचित हसून शंकरला प्रत्युत्तर दिले. आणि दोघांमध्ये काहीतरी बोलणं सुरु झालं. त्यांच्या बोलण्यात मोहनला काहीच रस नव्हता. त्याने आपली नजर पुन्हा समुद्र किनाऱ्यावर वळवली. मगाशी पाहिलेले चित्र अजूनही तसेच होते. गडबड गोंधळ, इकडून तिकडे जाणारी माणसं, मोटारींचा आवाज करत खोल समुद्रात मासेमारीसाठी निघालेल्या मोठ्या बोटी आणि त्यांच्या मागोमाग पाण्यात उतरणाऱ्या लहान लहान होड्या.

"फट्ट फट्ट फट्ट" अचानक शेजारून येणाऱ्या आवाजाने तो दचकला. शंकर त्या नावेची पुन्हा एकदा तपासणी करत होता. नावातील सर्व उपकरणं व्यवस्थित आहेत आणि नाव उत्तम स्थितीत आहे याची शंकरला पूर्ण खात्री झाल्यावर ती बोट शंकरच्या हवाली करून तो इसम गेला.

लांबून अगदीच किरकोळ वाटणारी ती नाव जवळ जाऊन पाहिल्यावर एक वेगळीच छाप पाडत होती. अगदी भव्य नाही पण आत पुष्कळ जागा होती. इतकी कि दोघे बाप लेक आत गडागडा लोळू शकतील. नावेची बांधणीही अत्यंत सुबक आणि सुरेख होती. मूळची शिडाची असलेल्या नावेला मालकाने मागे एक इंजिन बसवून घेतले होते. नावेच्या अग्रभागापासून ते ५-६ फुटांपर्यंत आडव्या फळ्या टाकून एक कामचलाऊ डेक बनवला होता. त्याखाली एखादी व्यक्ती आरामात झोपू शकेल एवढी जागा होती. मध्यभागातील डोलकाठीचा खांब अजूनही तसाच होता. त्याला फडफडत असलेले पांढरं कापड ती शिडाची नाव असल्याची खुण अजूनही टिकवून होतं. नाव जुनी असली तरी चांगली मजबूत होती. डोलकाठीच्या बरोबर खाली एक फळी आणि नावेच्या मागच्या बाजूला दोन आडव्या फळ्या टाकून बैठकीची व्यवस्था केली होती. या दोन्ही फळ्यांच्या मध्ये भरपूर खुली जागा होती. बैठकीच्या मागच्या बाजूला मोटर होती जिला एक पंखा बसवलेला होता जो पूर्णपणे पाण्यात बुडला होता. मोटारीच्या शेजारीच एक लाकडी दस्ता होता. जिकडे वळायचे तिकडे तो फिरवायचा मग पाण्यात बुडलेली लाकडी फळीही त्यानुसार फिरायची आणि पाण्याला एकाबाजूला अवरोध निर्माण होऊन नाव दुसऱ्या दिशेला ढकलली जायची.

पहिल्याच भेटीत एखादी सुंदर मुलगी नजरेत भरावी तशी ती नाव मोहनच्या मनात भरली होती. आपली पहिलीच समुद्र सफर या नावेतून होणार म्हणून तो भलताच उत्साहात होता. तसा तो बऱ्याचवेळेस नावेतून समुद्रात गेला होता पण खोल समुद्रात लांबपर्यंत कधी गेला नव्हता.

शंकरने सामानाची जुळवाजुळव केली. आणि ते व्यवस्थित बोटीत ठेवून दिले. देवाचं नाव घेत शंकरने चाप जोरात ओढला तशी 'फट फट' असा आवाज करत मोटार पुन्हा एकदा सुरु झाली अन धक्क्याचा सहारा सोडून नावेनं समुद्राकडं धाव घेतली. आणि त्याचबरोबर सुरु झाली मोहनची पहिली समुद्र सफर.

थोडा वेळ इतर बोटींप्रमाणे सरळ मार्गक्रमण केल्यानंतर शंकरने बोट एकदम काटकोनात डावीकडे वळवली. आता ते किनाऱ्याला समांतर पण दूर समुद्रातून चालले होते, त्यांच्या आता पुढेही कोणी नव्हते आणि मागेही.

"बाबा, आपण कुठं चाललोय?" मोहनने विचारले.

" डोडोमा बेटावर" शंकर त्याच्याकडे न पाहताच बोलला.

"डोडोमा बेट? म्हणजे कालीमातेचे मंदिर आहे तिथं ते? ........ पण तिथं तर कुणीच जात नाही."

शंकर यावर काहीच बोलला नाही.

"ते बेट खरंच शापित आहे का?... सगळेजण असंच म्हणतात."

मोहनने आता मूळ प्रश्नालाच हात घातला होता. हा प्रश्न मोहन विचारणार हे त्याला माहिती होते. पण त्याला काय उत्तर द्यावं शंकरला कळेना.

"तसं काही नसतं " शंकरने पायाशी पडलेल्या पिशवीतून तो लालसर कागद बाहेर काढला. आणि त्यावर नजर फिरवत बोलला, "भूत-प्रेत-शाप हे सगळं माणसाच्या मनाचे खेळ आहेत. या असल्या गोष्टींवर कधी विश्वास ठेवू नको."

"पण तिकडे कोणीच का जात नाहीत?"

"मूर्ख आहेत लोकं काहीतरी वेडगळ कल्पना डोक्यात घेऊन बसतात."

"पण त्याला शापित बेट का म्हणतात?" मोहनला आज त्या बेटाचं रहस्य जाणूनच घ्यायचं होतं. आता मोहनला काय सांगावं याचा तो विचार करू लागला. पण मोहनला असं अंधारात ठेऊन चालणार नव्हतं सत्य काय ते त्याला माहिती असणं जरुरी होतं. ते सत्य मोहनला कसं सांगावं याचा विचार करत तो शांत बसला. पण त्याच्या डोक्यात मात्र सगळ्या घटना विजेच्या वेगाने सरकत होत्या. त्यातली एक एक आठवण अजून ताजी होती. जणू काल- परवाचीच गोष्ट, त्याला अजून चांगले आठवत होते.

नेहमीसारखीच ती पहाट. त्या पहाटेपण शंकर नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांबरोबर मासेमारीला 'डोडोमा बेटावर' गेला होता. त्यावेळेस त्याचं वय अवघ १० वर्ष होतं. तर त्याच्या वडिलांचं म्हणजेच महदूचं ३७. गावात नेहमीच एक स्पर्धा लागलेली असायची 'सर्वात प्रथम बेटावर पोहोचून मासे पकडायची.' प्रथम गेलेल्या नावेला मोक्याची जागा पकडता यायची. आणि अशा मोक्याच्या जागेवर बक्कळ मासे पकडता यायचे. तेही चांगले मोठाले.

नेहमीप्रमाणे आजही ती स्पर्धा त्या पहाटेला नवी नव्हती, आणि आज त्या स्पर्धेत महादूची नाव पहिली होती. महादू आणखीन दोन साथीदारांसकट मासेमारी करायचा. त्यांना रोजच्या रोज पगार द्यावा लागायचा, मग मासे मिळो अगर न मिळो.

बेटावर पोहोचून महादू शंकरला घेऊन कालीमातेच्या दर्शनासाठी गेला. तोवर ते दोघे नावेत मासेमारीची तयारी करू लागले. मिणमिणत्या कंदिलाच्या उजेडात महादू आणि शंकर मंदिरात पोहोचले. तसं आता चांगलं फट्फटलं होतं. पण बेटावर दाट झाडी असल्याने लवकर उजेड पडायचा नाही.

मंदिरात पोहोचून दोघांनीही देवीसमोर डोके टेकले. आणि आज भरपूर मासे मिळावेत अशी प्रार्थना केली. सावडीतल्या प्रत्येक कोळ्याचा तसा शिरस्ताच होता. कोणीही देवीच्या दर्शनाशिवाय मासेमारीसाला सुरवात करत नव्हतं. सावडी गावचं ते ग्रामदैवत होतं. दरवर्षी त्या मंदिरात उत्सवही भरवला जात असे. तसं ते मंदिर फार मोठं नव्हतं. जेमतेम दहा -पंधरा माणसे बसू शकतील एवढेच, तर गाभाऱ्यात फक्त तीन-चार जण उभे राहतील एवढी जागा होती. मूळ गाभारा संपूर्ण दगडी होता. त्यावर एक भगवा झेंडा नेहमी फडफडत असायचा. गाभाऱ्यातली देवीची मूर्ती ५०० वर्ष जुनी होती, तीही दगडीच. काही वर्षांपूर्वीच मंदिराचा विस्तार केला गेला होता. त्या बेटाचं नावही कोणत्यातरी राजाच्या नावाचा अपभ्रंश होता - 'डोडोमा बेट'. त्याच राजाने आपल्या साम्राज्याचे संरक्षण व्हावे म्हणून तिची प्रतिष्ठापना केली होती.

दर्शन घेऊन दोघेही पायऱ्या उतरून खाली आले. चपला घालत असतानाच महादूला पायरीशेजारी काहीतरी दिसले. त्या मिणमिणत्या कंदिलाच्या उजेडातही ती वस्तू लख्खकन चमकत होती. त्याने खाली वाकून मातीत अर्धवट दबलेली ती वस्तू उचलली, त्या वस्तूच्या लखलखीत प्रकाशाने दोघांचेही डोळे दिपून गेले. एक अतिशय पुरातन काळातला हिरा होता तो. त्याच्या भोवती सोन्याचा जाडसर गोफ होता. तो गोफही चमचमत होता. पण त्या तेजस्वी हिऱ्याच्या तेजापुढे गोफेची चमक एकदम फिकी वाटत होती.

महादूचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. एक अतिशय मौल्यवान हिरा, सोन्याच्या गोफेसकट त्याच्या हातात होता.

"हिरा!!" शंकर जवळ जवळ ओरडलाच. महादुने झट्कन त्याचे तोंड दाबलं आणि गप्प राहा म्हणून खुण केली. त्याने मातीत इकडे तिकडे नजर फिरवली तर आणखीन एक सोन्याचा गोफ. पण यात हिरा नव्हता, आणि याचे दोन तुकडे झाले होते. दोघांनी लगेचच खाली बैठक घातली आणि ते आजूबाजूची माती उकरू लागले ... आणखीन काही मिळते का ते पाहण्यासाठी. इतक्यात कोणीतरी आल्याची त्यांना चाहूल लागली. महादुने पटकन खांद्यावरच उपरणं काढलं आणि हातातला ऐवज तो त्या कापडात गुंडाळू लागला.

"इथं काय झालं ते कुणालाच सांगू नकोस." लहानग्या शंकरला त्याने बजावले. शंकरने मान हलवून होकार दिला. दागिने उपरण्यात बांधत असतानाच महादुला ते दोघे साथीदार येताना दिसले. मासेमारीची सर्व व्यवस्था करून ते देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यांना पाहताच महादुने ते गाठोडं मागे लपवलं.

त्या दिवशी मासेमारी न करताच नाव परत मागे का वळवली याचं कारण त्या दोघांना कळेना. तब्येत बरी नाही असं जरी महादूनं सांगितलं तरी खरं कारण काहीतरी वेगळंच आहे हे दोघांच्याही लक्षात आलं होतं. महादूनं ते छोटंसं गाठोडं अंगरख्याच्या खिशात ठेवलं होतं आणि त्यावर आपला डावा हात घट्ट दाबून धरला होता. त्याच्या नजरेत आनंद, उत्सुकता, भय, या सगळ्यांचीच झलक दिसत होती. कधी एकदा घरी जाऊ असं त्याला झालं होतं .

क्रमश: