तू_ही_रे_माझा_मितवा... - 10 Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तू_ही_रे_माझा_मितवा... - 10

#तू_ही_रे_माझा_मितवा...💖💖💖💖

#भाग_१०

“वेद,तू असाच मूर्खपणा करणार असशील तर मी ठेऊ का फोन?” ती लटक्या रागाने म्हणाली.

“फोन ठेवायचा विषयच नाही,रात्रभर फोन ठेवायचा नाहीये तू आज,बोलत रहायचंय”

तिचा हा नेहमीचा अधिकारवाणीचा स्वर त्याला खूप प्रिय होता,कुठलीही आर्जवे नाही,नेहमी आवाजात हुकुमत आणि ह्याच तिच्या मनस्वी रूपाने त्याला प्रेमात पाडलं होतं.

“अजिबात नाही, आज एका दिवसात खूप मानसिक चढ उतार झालेत,डोळे आपोआप मिटतायेत माझे” ती चटकन बोलून गेली.

“ये वेडाबाई मग अगोदर सांगायचं ना,ओके ठीक आहे.झोप तू आता.आपण असंही उद्या भेटणार आहोत ना रात्री.”

“उद्या कसं काय?मला यायला उशीर होईल वेद.”

“होऊ दे,मी वाट बघेन.”

“अजिबात नाही हा वेद,ऑफिसला उशीर होतो रे.”

“ये यार अस नाही.”तो चिडक्या स्वरात म्हणाला.

“वेद तुला ऐकावं लागेल आणि हो कुठल्याही संभाषणात, चर्चेत, भांडणात माझा शब्द शेवटचा. आहे मान्य?

“बरं बाबा,आता सरळ ऑफिसात भेटू. उद्या दिवसभर फोन तर तू करणार नाहीस हो ना.”

“हो,बरोबर.”

“ठीक ये यार काय आता.बाय,गुड नाईट”

“अजून काही?”

“Miss you यार सोना”

“missing you too ….झोप आता सोमवारी भेटू,उद्या रात्री फोन करेन पोहचले की.”

“ओके”

फोन ठेवल्यावर स्वतःशीच गोड हसत तिने स्क्रीनवरच्या फोटोवर ओठ टेकवले. त्याच्या कानात बोलल्याप्रमाणे हळुवारपणे. म्हणाली-
“स्वीटकॉफी”

समोर हवेच्या झुळकीसरशी फुलं-पानं हळुवार डोलत होते.तिला आवडतात म्हणून लावलेल्या गुलबक्षीच्या फुलांचा गोडसर,धुंद सुगंध तिला नेहमी त्याची जाणीव करून द्यायचा.त्या उमललेल्या मोहक फुलांकडे पाहून नकळत तिचे डोळे भरून आले.रेवा आणि त्याच्या मैत्रीविषयी येणारी अभद्र शंका तिने झटकून टाकली. बसल्या जागेवरूनच दीर्घ श्वास घेत तिने तो सुगंध श्वासात भरून घेतला. त्या सुगंधसरशी त्याची जाणीव मनभर पसरली आणि “त्याला असंच मनात बंदिस्त करून घ्यावं,कुणाचीही नजर याच्यावर पडायला नको” असा प्रेमखुळा विचार डोक्यात आल्यावर तिला हसू आलं आणि आपण असे एकांतात उगाच हसतोय हा विचार करून

“प्रेम वेडं असतं किंबहुना वेड लावतं”

असा निष्कर्ष स्वतःप्रत काढून ती झोपायला गेली.

*************************

दिवसभर आईबाबा,ताई यांच्याशी मनमोकळं बोलून आईकडून लाड करवून घेत पुण्याला निघायची वेळ केव्हा झाली ते कुणालाही कळलं नाही. रीमाला वेद्बाद्द्ल सांगतांना तिने रेवाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला होता.का कुणास ठावूक एक अनामिक भीती मात्र तिच्या मनात घर करून बसली होती. कधी नव्हे ते आज घर सोडतांना पाय निघत नव्हता आणि डोळ्यात वेद्ला भेटायची ही ओढ होती.नात्यांच्या ह्या दोन्ही पैलूमध्ये,ओढीमध्ये प्रेम नव्यानेच गवसत होतं, उमलू पाहत होतं.त्यामुळे ते नवखेपण गोड हुरहूर लावत होतं.

भरलेल्या डोळ्यांनी निरोप घेऊन ती निघाली. अडीच तीन तासांच्या ह्या प्रवासात बाबांशी देखील ती खूप विषयांवर भरभरून बोलत होती.पहिली नोकरी,आलेल्या अडचणी, तिच्या विभागात तिची होत असलेली स्तुती हे तिने अगदी शाळकरी पोरीच्या कोवळ्या उत्साहात बाबांना सांगितलं.एरव्ही कधी ते सोडवायला आले की इंदापूरला कानात टाकलेले हेडफोन्स सरळ बिबवेवाडीलाच कानातून बाहेर यायचे.आज त्यांची गरजच पडली नव्हती.पैसा नाही तर थोडासा सुसंवाद ही नात्यांसाठी किती महत्वाचा असतो याची जाणीव नकळत का होईना श्रीकांत मोहित्यांना झाली होती. मन विचारांच्या गुंत्यात अडकून पडलं-
“मुलीच्या अल्लड,उमलत्या वयात,तिच्या फुलपाखरी कॉलेजच्या दिवसांत आपण पालक म्हणून तिच्याशी सुसंवाद ठेवायला,तिला समजून घ्यायला कमी पडलो.आपण आपल्याच शेयर मार्केट, investment, सतत मिटींग्स,मग त्यावरून पत्नीशी दुरावा ह्या सगळ्या गोष्टीत इतके गुरफटले गेलो की राजकन्यांसारख्या पोरींच्या आयुष्यातून मिडास राजासारखे दुरावले जात होतो.आज नियतीने एक सणसणीत चपराक मारली आणि खडबडून जागं केलं.”.
ऋतूच्या साबणाच्या फुग्यासारख्या रंगीत,क्षणात उमलणाऱ्या,मिटणारया गप्पा ऐकून ते सुखावत होते. काही दिवसांपूर्वी जिच्या लग्नाची घाई त्यांना लागली होती तीच ऋतू आता अगदी अल्लड वाटत होती. तिच्या सोसायटीसमोर गाडी थांबली.ह्यावेळी मोहिते आवर्जून तनु आणि प्रियाला भेटले.विचारपूस केली, थोडावेळ थांबून ते परतीच्या वाटेला लागले.

“यार काका ठीक आहे ना?” तनु रुममध्ये आल्यावर आश्चर्याने खुर्चीवर बसत म्हणाली.

“ऋत्या काय झालंय ग घरी? म्हणजे सांगायचं नसेल तर ओके पण काका चक्क हसून बोलत होते आमच्याशी,एरवी म्हणजे.....?”

प्रिया जरा आंबट तोंड करत म्हणाली.

“अगं,सांगते आता मला शेयर करायला काहीच प्रॉब्लेम नाही.फ्रेश होते तोपर्यंत आईने काय काय खायला दिलंय ते खाऊन घ्या. मग गप्पा मारुया ओके?” ती हसत म्हणाली. तिने “पोहचले” म्हणून वेद्ला मेसेज पाठवला आणि चेंज करायला गेली.

घरच्यांबद्दल पहिल्यांदाच इतक्या आपुलकीने बोलणाऱ्या ऋतूकडे तनुप्रिया आवक होऊन बघत राहिल्या.इतरवेळी घरून आल्यावर - हुश्श सुटले! हे पहिलं वाक्य असायचं तिचं आणि काही विचारलं तर-“जाऊ द्या त्याचं नेहमीच असतं,त्यात काय सांगायचं” असा काहीसा सूर असायचा.एकूणच ह्या दोन दिवसांत

“चांगलं झालं की वाईट झालं यापेक्षा नातं वाहतं झालं” हे महत्वाचं ठरलं.

फ्रेश वैगरे होऊन गॅलरीतल्या तिच्या आवडत्या झुल्यावर बसत ताईच्या आयुष्यात आलेल्या वादळाबद्दल,तिच्या गैरसमज,वेडेपणा याबद्दल ती बराच वेळ बोलत राहिली.तिचं सगळं ऐकून घेतल्यावर दोघीही सुन्न झाल्या,जरा वेळ शांततेत गेला,कुणीही कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही पण रीमाच्या ह्या परिस्थितीवरून आता त्या तिघींच्याही मनात एकच कल्लोळ चालला होता ‘-रेवा आणि रेवती’ पण कुणीही त्याविषयी अवाक्षरही बोललं नाही.चांगल्या तासभर गप्पा मारल्यावर ‘उद्या लवकर उठायचंय’ म्हणून त्यांनी गप्पा आवरत्या घेतल्या.दिवे मालवून त्या झोपायला जाणार तोच ऋतूचा फोन वाजला.पलीकडे वेद होता.कितीही नाही म्हटलं तरी हा वेडा कॉल करणारच हे तिने गृहीत धरलं होतं.तो काही बोलणार त्याचा आतच नेहमीप्रमाणे तिची बडबड सुरु झाली-

“वेद, आता बोलायचा देखील त्राण नाहीये माझ्यात सकाळपासून इतकी बडबड केलीयं मी.”

“ऐक ना..मी ...”

“वेद,तू ऐक ना,उद्या ऑफिस आहे ना रे?

“ऋतू एक –एक मिनिट एकून घे..मी ...”

“वेद तू ..”

आता मात्र तिचं बोलणं पूर्ण होण्याच्या आत त्याने तिला थांबवलं.
“ये वेडाबाई खाली ये,मी आलोय.ऐकत जा थोडं,अगदीच बोलू देत नाही.”

“काय ??” तिच्या इतक्या जोरात ‘काय’ म्हटल्याने तनु प्रिया उठून बसल्या.

“काय ग काय झालं” दबक्या आवाजात प्रिया म्हणाली.

“काही नाही ,झोपा तुम्ही मी आलेच.”

डोक्याला हात मारत दोघीही हसत सुटल्या.

ती लॅचची चावी शोधेपर्यंत –“प्रेम,लग्न बिग नो नो फोर मी” असं म्हणणारं कालपरवापर्यंत कुणीतरी होतं बरं का” असा टोमणा मारून प्रिया तिला चिडवत होती.

“आल्यावर बघते दोघींना” म्हणून ती दरवाजा ओढून बाहेर पडली.
वेदचं येणं तसं तिला अगदीच अनपेक्षित नव्हतं पण येईलच अशीही खात्री नव्हती.ती बाहेर आली.

तो गाडीला टेकून उभा होता.विस्कटलेले केस, टीशर्ट आणि जीन्समध्ये ही तेवढाच रुबाबदार दिसत होता.तिला समोर पाहताच त्याने कानाला हात लाऊन ‘सॉरी’ म्हटलं.ती गाल फुगवून कंपाऊंड लगतच्या बाकावर जाऊन बसली.तो ही शेजारी जाऊन बसला.ती रागाने जरा दूर सरकून बसल्यावर तो ही हसत तिच्यापासून अजून दूर जाऊन बसला.
“वेद,मी कालच नको म्हटले होते तुला.आता तू केव्हा परत जाणार,झोपणार केव्हा ,उठणार केव्हा,उद्या ऑफिस आहे ना.”

“ये काय गं सारखं ऑफिस,ऑफिस...तुला बघायचं होतं,बास,माझ्यासाठी विषय संपला.”

त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली नाराजी तिने ओळखली आणि ‘हा इतक्या दूर भेटायला येऊन ही आपण असं चिडून बोलतोय, चुकलंच जरा’ असा काहीसा विचार करत त्याला जरा चिडवत म्हणाली-

“बघू जरा ,चिडल्यावरही खळ्या पडतात का गालाला?”

“आता गोड बोलायचा काही विषय नाहीये” चिडक्या स्वरात तो म्हणाला,खरंतर तिला समोर पाहताच मिठीत घ्यायची त्याची इच्छा झाली होती पण वेळकाळ,स्थळ पाहून ती बाजूला ठेवली त्यात तिने ऑफिससारखा रुक्ष विषय काढल्याने तो अधिक चिडला.

“मग हे असं समोर आल्यावर गोड हसायचा आणि समोरच्याला त्या डिंपलच्या जाळ्यात अडकवायचा ही काही विषय नव्हता.”

त्याच्याच भाषेत त्याला चिडवत ती म्हणाली,तो दूर बसला होता,जरा त्याच्याकडे सरकली.
तसं चेहऱ्यावरची नाराजीची एकही रेष हलू न देता कोरड्या आवाजात म्हणाला.

“सॉरी,तू नाही म्हणत असतांना मी असं यायला नको होतं पण घरी काय झालेलं,ठीक आहेस ना आता तू?”

“हो ठीक आहे ,उद्या बोलूच ते ऑफिस सुटल्यावर आणि चिडू नकोस ना,मी रागावू नाही शकत का तुझ्यावर,थोडंसुद्धा रुसू नको?” लाडीकपणे त्याच मन वळवायच्या प्रयत्नात ती होती.

““ऋतू मला माझ्या प्रत्येक क्षणात तू हवी आहेस, जेव्हा वाटेल तेव्हा मी भेटायला येणार, मला माहित नाही काय होतं असं वाटतं की हे एक साखर झोपेतलं स्वप्न आहे. आता डोळे उघडतील आणि समोर तू नसशील.कितीही वेळ सोबत असलो तरी मन भरत नाही असं वाटतं हे तुझ्यामाझ्यातले क्षण पाऱ्यासारखे निसटून जातील.” तो भान हरपून मनातलं बोलत होता.ती त्याच्याकडे बघतच राहिली.काही क्षण निशब्द गेले.

“ओके,चल निघतो ‘ऑफिस’ आहे” मुद्दाम ऑफिस ह्या शब्दावर जोर देत आणि तिच्या मघाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळत तो म्हणाला आणि जाण्यासाठी उठला.

“बरं बाबा ,चुकलं माफ कर” ती रडकुंडीला येऊन म्हणाली.
तिच्या ह्या रडक्या पण गोंडस चेहऱ्याकडे पाहून एक स्मितहास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरलं.

“ठीक आहे. उगाच गम्मत केली तुझी,माफी वैगरे मागायची गरज नाही.चल बराच उशीर झालाय” तो उठला,ते गाडीजवळ आले.

“नीट जा ,हळू गाडी चालव.” ती काळजीने म्हणाली.

“हम्म,अजून काही.”

“अजून? अजून ते गुड नाईट वैगरे ,स्वीट ड्रीम वैगरे ” ती जरा लाडीकपणे म्हणाली.

“काळी जादू वैगरे येते का ग तुला?” तिच्या डोळ्यात एकटक बघत तो म्हणाला.

“ईई ये काहीतरीच काय? काळी जादू?”

“मग हे असं तुझ्या ह्या गर्द कॉफीरंगाच्या डोळ्यांचं आणि चेहऱ्यावर मुजोरपणे येणाऱ्या बटाचं कारस्थान तरी काय असतं, मी झोपूच नये का?”

“वेद” तिने लाजून नजर चोरली आणि तिला काही सुचेनासं झालं.
तो फक्त हसला.मोठ्या कष्टाने तिचा निरोप घेऊन तो निघाला.

रात्र गहिरी होतं होती,कुठे कुणालातरी कुणी मिळाल्याची स्वप्न तर कुणाला कुणी गमावल्याची स्वप्न,कुणी गर्द गहिऱ्या डोळ्यांच्या डोहाच्या तळाशी शांत विसावलं होतं तर कुणाची स्वप्न चक्क गालवरच्या खळीत विरघळली होती.

ती रात्र एकच,पापण्यांच्या बाहेर गर्द अंधारी तर बंद पापण्यांच्या आत रंगांची उधळण करणारी.

********************

“हे सगळं तुला फोनवर कसं सांगणार होते सांग.” डबडबलेले डोळे पुसत ऋतू म्हणाली.

ऑफीसनंतर सीसीडीमधल्या सगळ्यात शांत कोपऱ्यात ते बसले होते.ऋतूने ही रेवतीचा विषय वगळून,जास्त खोलात न जाता extra marital affairच्या आवरणाखाली काही गोष्टी झाकून ठेवत रीमाच्या घटस्पोटाच्या विचाराबद्दल सांगितलं.रेवती आणि राजेशच्या मैत्रीमुळे लग्न तुटलं असं काही सांगितलं तर वेद हे कुठल्या पद्धतीने घेईल याची कदाचित तिला भीती वाटत होती. त्याचा मनात नसेल ही आता काही रेवाबद्दल पण आपण हे सांगितल्यावर तो त्या दृष्टीने विचार तर करणार नाही ना ह्या एका अनामिक शंकेमुळे ती बैचेन झाली होती.

तिच्या हातांवर आपले हात ठेवत त्याने तिला त्याने धीर दिला.

“ऋतू,आपण आहोत तिच्या ह्या प्रवासात तिच्यासोबत,काळजी करू नको,सगळं ठीक होईल आणि काय सांगावं तिच्या आयुष्यात अजून खूप चांगलं काहीतरी लिहिलं असेल,आता होतं त्यापेक्षा कितीतरी छान आयुष्य.”

“वेद एक विचारू?”

“बोल ना”

“ताई लग्न ठरलं तेव्हा खूप खुश होती,खूप प्रेमात होती त्याच्या. आता पुन्हा नव्याने ती कुणाला आपलसं करेल? वेद प्रेम दुसऱ्यांदा होऊ शकतं?” मनातली धाकधूक शब्दांत उतरली होती ,हा प्रश्न जेवढा तिने रीमासाठी विचारला होता तेवढाच तो स्वतःच्या समाधानासाठी ही विचारला होता.

“प्रेम,प्रेमाची व्याख्या खूप व्यक्तीसापेक्ष आहे ऋतू,खरतरं प्रेमाची अशी कुठलीच प्रमाण लिखित संहिता नाहीये की ज्यात लिहिलंय प्रेम असंच करावं,कुणावर करावं,कितीदा प्रेम व्हावं.याची काही परिमाणं नाहीये.राधा,मीरा,रुख्मिणी सगळ्यांच्याच प्रेमाला मान्यता मिळालीय ह्या जगात.जोपर्यंत प्रेम हे त्याचं प्रतिरूप शोधत नाही तोपर्यंत त्याचा प्रवास चालूच असतो.लोक त्याला पहिलं,दुसरं प्रेम असं काही म्हणत असतील ही पण ते फक्त शोधात असतं आणि त्याला ते सापडलं की ते निर्धास्त होतं,स्थिरावतं. त्यामुळे प्रेमाला पाहिलं,दुसरं ह्या क्रमात बांधणं योग्य नाही.”

“मला तिची काळजी वाटतेय वेद”

“ऋतू तिने इतक्या सकारात्मक पद्धतीने हे सगळं घेतलंय यात ती किती खंबीर आहे हेच दिसून येतंय,त्यात तिला फक्त तुमची साथ हवीये,बरेच प्रसंग येतील जिथे ती एका वळणावर येऊन ह्या सगळ्या मानसिक तणावाने थकून जाईल. तेव्हा फक्त तुमचा सोबतीचा हात आणि ‘आम्ही आहोत सोबत’ हे पाठबळ तिला नवी उमेद देईल.तुम्हीच जर तिच्यासमोर हातपाय गाळून बसलात तर कसं चालेल.”

“हम्म,नाही रडणार तिच्यासमोर.”

“बरं,ती पुण्यात परतल्यावर आपण भेटू तिला.”

“हम्म”

“Now feeling better?”

वेद्च्या बोलण्याने तिला जरा धीर मिळाला खरा पण ‘आपण त्याला सगळंच काही खरं सांगितलं नाही, हे तिचं मन तिला वारंवार बजावत होतं.

“हो दडपण गेल्यासारखं झालंय.अरे हो कालपासून विचारीन म्हणतेय आता आठवलं ते महिन्याअखेरीस आपली ट्रेनीग्रुपची जी ट्रीप आहे त्यातून मी back out करू शकते का? Actually तनु आणि प्रियासोबत मी अगोदरच ह्या छान ऐसपैस सुट्टीचा प्लान बनवला होता.सो...”

“no way वेडी झालीस का तू? गरज वाटली तर तनुप्रियासोबत मी बोलतो पण गोवा,समुद्र ते ही तुझ्याविना मी विचारच करू शकत नाही. शिवाय ....”

“ शिवाय..काय?” तिने सहेतुक त्याच्याकडे बघितलं.

“शिवाय..हेच की तुझ्याशिवाय काहीच नाही तू हवी.” तो काहीतरी लपवत असल्यासारखं बोलला.

“खूप हट्टी आहेस ना तू?”

“अरे विषय आहे का? नवंकोरं प्रेम आहे माझं आणि किती अवघड होतं ते मिळवणं माझं मला ठावूक.आता हट्ट तर करणारच,मग तो कॉफीसाठी असू दे की स्वीटकॉफीसाठी.” तो तिचा हात हातात घेऊन बोलला.

“आणि मी नाही म्हटले तर?” त्याच्या हातातून हलकेच हात सोडवत ती म्हणाली.

“तू नाही म्हणायला मी तुझी परवानगी मागितलीय कुठे?” समोर ठेवलेल्या कॉफीचा एक घोट घेत तो म्हणाला.

“तू असं काही बोलणार असशील तर मी नाही येणार गोव्याला, सांगून ठेवते.प्रॉमिस कर तिकडे गेल्यावर असं काही कॉफी, स्वीटकॉफी बोलणार नाही ते ” लाजेने ती गोरीमोरी झाली होती.

“ओके बाबा तिकडे गेल्यावर कॉफी,स्वीटकॉफीबद्दल अजिबात बोलणार नाही,पक्का प्रॉमिस.”

“हम्म मग ठीक आहे.”

“बोलणार नाही हे प्रॉमिस आहे,’घेणार नाही’ याबद्दल काहीच ठरलं नाहीये हे फक्त लक्षात ठेव.” तिला पाहून हलकेच wink करत तो म्हणाला.

“वेद मी बोलणार नाही,जा. ” गालावरची लाली लपवायचा खुळा प्रयत्न करत ती म्हणाली.

बराच वेळ ते आपल्याच गोडगुलाबी गप्पांत हरवून गेले.समान त्रिज्या असलेलं आणि प्रेम आणि प्रेम हे एकच केंद्रबिंदू असलेलं, पुढे काय वाढून ठेवलं असेल त्यापासून अनभिद्न्य असलेलं त्याचं अवकाश आज प्रेमाच्या असंख्य चांदण्यांनी खुलून दिसत होतं.

क्रमशः

©हर्षदा

{लोभ असावा ,कमेंट मधून दिसावा😍😍😍}