तू ही रे माझा मितवा - 15 Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तू ही रे माझा मितवा - 15

#तू_ही_रे_माझा_मितवा...

#भाग_१५

झपझप पावलं टाकत ऋतू रेवाच्या रूमकडे निघाली,निरव शांततेत पावलांची चाहूल लागून रेवा सावरली,बेडवर वेदच्या शेजारी बसत त्याला तिने फक्त पलीकडच्या कुशीवर वळवण्याचा प्रयत्न केला.

ऋतुजा आत आली तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी होत होती.

ऋतुजाला पाहून तिने उगाच तिच्या स्पेगटीचा बेल्ट ठीक केला.
ऋतू तिच्यासमोर उभी होती,तिच्या नजरेत प्रचंड राग होता.रेवाने ऋतूकडे बघितलं,एक स्त्रीसुलभ असूया तिला तिच्या रुपाकडे बघून वाटली.

‘वेद भानावर असता आणि यांचं असं खाजगीत भेटणं झालं असतं तर वेदची नजर क्षणभरही हिच्यावरून ढळली नसती..कदाचित त्याचा स्वतःवर ताबा ही राहिला नसता..ही इतकी सुंदर दिसतेय’

तिच्या मनात काट्यासारख्या खुपणाऱ्या ह्या विचारला तिने लागलीच दूर केलं.

“रेवा...तू मूर्ख तर आहेसच पण तुझा आणि त्या जोकर साक्षातचा नीचपणा ह्या लेव्हलला जाईल हा विचार मी केला नव्हता.” ती संतापाने थरथरत होती.

“ऋतुजा तोंड सांभाळून बोल...वेद शुद्धीवर नव्हता आणि इथे माझ्या रूमसमोर तो चक्कर येऊन पडणारच होता की
मी सांभाळलं त्याला आणि इथे झोपवलं,सौम्याकडे तुझी चौकशी केली आणि तुला फोन लावायला सांगितला ,तू तर मलाच दोषी ठरवतेय.” ती नाटकी सहानुभूतीने म्हणाली.

“ये रेवा..ही नाटकं आहे ना ती वेदसमोर करायची.मला मूर्ख बनवायचं काम नाही.मला कळत नाही का तुझ्या आणि त्या जोकरच्या बालिश आणि फालतू कुरघोड्या.तुला कणभरसुद्धा अक्कल नाहीये का की वेदचं माझ्यावर प्रेम आहे आणि हे त्याने तुला स्वतः सांगितलं आहे.का तू हे फालतू ट्राय मारते.”

ऋतूचा एवढ्या दिवसांचा संयम पार सुटला होता.

“अस्स..मी मूर्ख आणि जय जोकर का? आणि दहा मुलांना फिरवणारी तू साळसूद का?इतर मुलांसारखा वेद ही तुझ्या ह्या दिसण्याला, मॉड राहण्याला,गोड गोड बोलण्याला फसला आहे, तुझ्या सौंदर्याची पट्टी आहे त्याच्या डोळ्यावर ती गळून पडेल ना तेव्हा त्याला समजेल की तू काय आहेस ते आणि खरं प्रेम काय असतं ते.” रेवा देखील मागे हटायला तयार नव्हती.

“You know Reva, you need help.. Psychiatric help. मी सुंदर आहे,मॉड आहे म्हणून वेदचं माझ्यावर प्रेम आहे असं नाही तो बॉंड आहे आमच्यात...कनेक्शन आहे.तो मला सोडून राहू शकणार नाही,तुला समजतंय का?” ती अगतिक होऊन रेवाला समजवायचा प्रयत्न करत होती.

“तो मलाही सोडणार नाही,हे तूसुद्धा लक्षात ठेव.”

“अग,तो तुला एक चांगली मैत्रीण समजतो मूर्ख,तू काय अर्थ घेते त्याचा.” ती वैतागली.

“तेच तर त्यालाही आणि तुलाही समजत नाहीये तो ज्याला मैत्री समजतो ते प्रेम आहे आणि ज्याला प्रेम समजतो ते निव्वळ आकर्षण आहे,दुसरं काहीही नाही.It will be better तू आमच्यातून निघून जा..” ती आक्रस्ताळेपणा करत म्हणाली.

“You are sick & impossible.” ऋतू नाईलाजाने बाहेर आली.

तिने फोन करून अनुजला खाली बोलावलं आणि हेल्परच्या मदतीने वेदला त्याच्या रुममध्ये शिफ्ट केलं,बेडवर झोपवलं.
तो अजूनही पूर्णपणे गुंगीत होता. त्याच्या अंगावर दुलई व्यवस्थित टाकून तिने त्याच्या केसांतून हळूवार हात फिरवला.
त्याच्या कपाळावर अलगदपणे ओठ टेकवले.तिच्या डोळ्यातून ओघळलेला अश्रू त्याच्या गालांवरून सावकाश खाली येत होता,तो शांत झोपून होता.याला नक्कीच जयने ड्रिंक मधून काहीतरी दिलं असावं हे तिच्या मनात पक्क होतं.

“ऋतू तू जा ,आराम कर..मी काळजी घेईन त्याची.ड्रिंक जास्त झाली असेल त्याला बाकी काही नाही.” अनुज ऋतूला समजावत म्हणाला आणि त्याने वेदचा मोबाईल चार्जिंगसाठी लावला.

“ठीक आहे..”

ती जड पावलांनी रूमकडे निघाली.

मघाच्या चार पाच तासांत काय होऊन बसलं? प्रश्नांवर प्रश्न, उत्तरांना जागा मात्र नाही... !!

**************

चार वाजायला आले होते. सॅमला जाग आली,त्याने बघितलं समोर जय नव्हता.जरा इकडेतिकडे बघितल्यावर तो टेरेसच्या कठड्याशी उभा राहून सिगरेट फुंकत होता.

“ये साक्षात..झोप झाली का?” सॅम देखील आळसावत म्हणाला.

“हो,अगदी मस्त..कित्येक दिवसांनतर रिलॅक्स झोप लागली.”जयच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं.

“जय इतका ऑब्सेस्ड होतात तू त्यांना वेगळं करायला आणि रेवाला वेदच्या जवळ आणायला?Are you sure तुला रेवा आवडत नाही ते?” सॅमने कुतूहलाने विचारलं.

“वेडा आहेस का? मी आणि साक्षात ह्या ch**** मुर्खांसाठी ऑब्सेस्ड होईल?....च्यायला गेले उडत,मला स्वतःला पटवून द्यायचं होतं की..आपण ही काहीतरी धमाकेदार करू शकतो.”

त्याने संपत आलेली सिगारेट दात-ओठ खात कठड्यावर चिरडली आणि सावकाश दुसरी पेटवली.

“Not getting your point.”सॅम त्याचं हे रूप पाहून गोंधळला.

“सॅम तुला आठवतंय कॉलेजला असतांना तुम्ही सगळे मला चिडवायचे ‘झुणका-भाकर केंद्र’ म्हणायचे? गावाकडचा हेल,बोली भाषेतला एखादा शब्द आला तर चिडवून चिडवून जीव भंडावून सोडायचे. मुलींसमोर बिनधास्त अपमान करायचे माझा..मी फक्त हसायचो,स्वतःवर..चिडायचो,चरफडायचो मग शहरी मुलांसारखं वागायचा उगाच प्रयत्न करायचो त्यात अजून माझी फजिती व्हायची..पुन्हा हसं व्हायचं. ही शहरी मग्रुरी, हा अहंभाव, शहरीकरण, चंगळवाद अंगात भिनलेली गर्विष्ठ मुलं,मुली डोक्यात जायला लागले. तुला माहितीये सॅम ट्रेनी बॅचमध्ये सगळ्यात हुशार मी होतो. पण मी बोलायला लागलो आणि एखादं दुसरा गावठी शब्द तोंडातून निघाला की हे सगळे हसून हसून सगळा हॉल दणाणून सोडायचे. मी देखील त्यांच्या सोबत बळजबरीने हसायचो मनात स्वतःला कोसत असायचो. रात्री झोपतांना तो आवाज कानात घुमत रहायचा,चीड यायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा ह्या लोकांत मिसळून जायचो,जखम कधी भरून आलीच नाही,आत ठसठसत असायची, वरून फक्त खपली वर खपली धरली जात होती.
हा वेद ज्याला तू माझा बेस्ट फ्रेंड समजतोय त्याच्यावर किती मुलींचा सिक्रेट क्रश आहे कारण वेद हँडसम आहे,बॉडीशोडी आहे, भन्नाट बोलतो, लिहितो...पहिल्या दिवशी हा कुणाच्या लक्षात यायच्या आधी मी कितीतरी उत्तरं दिली होती पण मी कुणाच्या लक्षात राहण्यासारखा अजिबात नव्हतो आणि हा ? त्या पोरीला क्रॉस काय केलं, लगेच फेमस झाला.मी तर त्याच्या ह्या स्टारडम मुळे झाकोळून गेलो ना?...मग हा सगळ्यात अगोदर डोक्यात गेला!

ही ऋतुजा...नक्षत्रासारखी सुंदर,अगदी अप्सरा..आणि आहेच ती अप्सरा..अगदी मादक अप्सरा. तिचे ओठ,तिचे गाल, तिचे केस... हॉट फिगर....तिला पहिल्यापासून आठवडाभर तिचीच स्वप्न पडायची पण नंतर नंतर कळायला लागलं ही तर बापजन्मात आपल्याला भाव देणार नाही.काय होतं माझ्यात? मी जीवापाड जरी प्रेम केलं असतं तर मला लाथाडून गेली असती ही. बऱ्याच वेळा अनुभवलं, ती आणि तिच्या मैत्रिणी मला जोकर म्हणून हिणवतात. मग जाणवू लागलं वेद आणि ऋतुजामध्ये काहीतरी जमू पाहतंय.मग ही डोक्यात गेली.

आणि सगळ्यात मूर्ख,महामूर्ख म्हणजे ही बसक्या नाकाची रेवा. ऋतुजाला तरी स्वतःचं व्यक्तिमत्व आहे,विचार आहे पण ही? वेदला पहिल्यांदा पहिल्यापासून त्याला शरणच गेलीये. मंदबुद्धीसारखं वेद,वेद..! त्याने हजारवेळा सांगितलंय हिला तू फक्त मैत्रीण आहेस तरी हिचं सारखं वेद-वेद साक्षात नॉनसेन्स. कधी कधी दया येते,खरंच मदत करावीशी वाटते पण पुन्हा जाम डोक्यात जाते.

आता ही शहरी बिनडोक अवलादी माझ्या डोक्यात जायला लागली होती.कॉलेजपासून ही जखम उरावर होती तिला माझ्या पद्धतीने आराम देतोय मी.हे एवढे स्मार्ट,हुशार प्रेझेंटेबल लोक्स एका गावठी साक्षात जोकर असलेल्या कृश बांध्याच्या, मध्यम उंचीच्या, गावठी पोराच्या तालावर नाचत आहे.मी आता ठरवू शकतो वेद्ला ऋतुजाकडे वळवायचं की रेवाकडे? रेवाला वेदकडे किंवा गरज पडल्यास माझ्याकडे देखील...”

तो विचित्र आवाजात,खदखदून हसायला लागला.त्या अंधारात, टेरेसवरच्या डीम प्रकाशात त्याचं हसू विलक्षण विकृत वाटतं असलं तरी त्याला अपमानाची किनार होती.

“साक्षात...you need help man…हे तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाहीये. तू त्यांना नाचवत नाहीये तुझ्याशी असलेली त्यांची मैत्री त्यांना हे करायला भाग पाडतेय,ऋतुजाचं प्रेम तिला हे करायला भाग पाडतंय, साल्या तुझी वेगळी ओळख बनवणं तुझ्या हातात होतं, असा Ch*** गेम खेळायची काहीच गरज नव्हती,स्वतःवर काम केलं असतस तर कदाचित ऋतुजा किंवा ऑफीसमधली एखादी मुलगी तुझ्याही प्रेमात पडली असती.”

“साल्या हे जे तू प्रवचन सांगतोय न मला ते ऐकायला ठीक आहे, गावाकडच्या पोरांना काय प्रोब्लेम येतात ना हे इथं गोव्याच्या रंगीत वातावरणात, दारू ढोसत,फिरंगी पोरी कुरवाळत,बीचवर बसून तुला ** कळणार आहे? ह्या पोरींना ** किंमत देत नाही आता मी. काय पोरी ह्या...साल्या गोव्याला पोरांबरोबर एकत्र आल्याय, राहतायेत, तोकडे कपडेच काय घालून हिंडत आहे,दारू काय पिताय,अंग हलवून नाचता कायहे,गळ्यात गळे, किसिंग अरेरे ..नंगा नाच चालूये. अश्या बेशरम पोरींना गावाकडे काय म्हणतात माहितीये?” पुन्हा त्याने तिरमिरीत सिगरेट पेटवली.

“साक्षात...you are a loser...फट्टू साल्या तुला पोरींनी **** मारलं ना म्हणून तुझी जळालीय.खरंतर दोष तुझ्या मागासलेल्या गावाचा नाहीये.तुझ्या मागासलेल्या विचारांचा आहे.गावाचे असो की शहराचे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत,चॅलेंजेस वेगळे आहे. ते शहरातले म्हणून खूप सुखी असं होत नाही साल्या. हे होऊ शकतं की तुझ्या बाबतीत वागतांना ते चुकले असतील पण तू बोलून दाखवलं हे त्यांना कधी जे आज बोलतोय? कदाचित वेदने, रेवाने तुला समजून घेतलं असतं...पण नाही...तुझं डोकं नासलंय.. कम्प्लीट! तुला कॉम्प्लेक्स आलाय आणि तो तुला हँडल होतं नाहीये. आणि ह्या पोरींनी काय करायचं,कुठले कपडे घालायचे, दारू प्यायची की नाही हे चांगल वाईट ठरवणं त्यांचा प्रश्न आहे. तुला किंवा कुणालाही त्यांना जज करायचा अधिकार नाहीये.” सॅम अतिशय संतापात म्हणाला.

“साल्या सम..तू मला प्रॉमिस केलं होतं,मदत करशील म्हणून ....आता पलटायचं नाही..मी नेहमी तुला एक चांगला दोस्त मानलंय म्हणून तुझ्याजवळ मन मोकळं केलंय.” जय त्याच्याकडे अपेक्षेने बघत म्हणाला.

“मी तुला आता एकच मदत करू शकतो ते म्हणजे गप्प बसू शकतो, मला वाटलं तुझा लव्हचा मामला आहे म्हणून तुला मदत करत होतो,आता आहेस दोन दिवस तर सगळं विसरून मजा कर आणि पुण्याला गेल्यावर उपचार करून घे..YOU NEED HELP.”

सॅम त्याच्या पाठीवर थोपटून निघून गेला.

“साला नशेडी..मला जगण्याचं तत्वज्ञान शिकवतोय..*****साला.”

इतक्या दिवसाचं मनात साचलेलं विष असं ओकून झाल्यावर आलेली विकृत शांतात जयच्या चेहऱ्यावर होती. ह्या तीन शहरी शहाण्यांच्या कळसूत्री बाहुलीचे धागे आपल्या हातात आहे ह्या विचाराने त्याचा विकृत अहं कुरवाळला गेला...शरीराच्या बाहेर आणि आत साचलेल्या विषारी धुरात तो आनंदात उभा होता .... बऱ्याचवेळ!

*****************

त्याला अगदी पहाटेच जाग आली होती.डोकं अगदी जड झालं होतं, इतक्या दिवसांपासून ज्या दिवसाची वाट बघितली तो दिवस, तो क्षण आपण शुल्लक कारणामुळे धुळीत मिळवला याची खंत त्याची अस्वस्थता वाढवत होती. ’ऋतू तिथे वाट बघून थकली असेल, इतक्या रात्री ती एकटी असेल..तिची काय अवस्था झाली असेल? ती मला माफ करेल का?..’

एक न दोन त्याला काही सुचत नव्हतं.ऋतूसमोर जायचं तरी कसं? अजून आपण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या नाही.त्याला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं.त्याने आवरायला घेतलं.
अनुज गाढ झोपला होता, जय अजूनही वरच पडला असेल.जयला शिव्यांची लाखोली वाहत त्याने आवरायला घेतलं.
आता फक्त ऋतूला भेटून माफी मागायची.. एवढंच त्याचा मनात होतं.त्याने फोन ऑन केला.
आवरून छान तयार होऊन त्याने धडधडत्या मनाने ऋतूला फोन केला..ती उचलणार नाही हे त्याने गृहीत धरलं होतं पण तिने उचलला.

“सोना....” पुढे काय बोलावं? कुठल्या शब्दांत एवढी ताकद आहे जे कालचे काही क्षण परत देतील? त्याला काही सुचलंच नाही.तो शांत बसला.

“वेद, मी बीचवर आहे..” ती शांततेत म्हणाली.

त्याने काल घातलेल्या पॅन्टचे खिसे धडधडत चपापले नी एक निश्वास टाकला.एक छोटी डबी खिश्यातच होती,त्याने ती उघडली दोन सुंदर फुलपाखरांचे मोटीफ असलेली ती नाजूक रिंग,थोडंस हसू त्याच्या चेहऱ्यावर तरळलं.त्याने ती डबी मुठीत घट्ट पकडली आणि क्षणाच विलंब न लावता बीचकडे धाव घेतली.

अंधारावरून कुणीतरी हलकेच हात फिरवल्यासारखा अंधार विरत होता आणि उमलू पाहणारा कोवळा प्रकाश ती जागा घेत होता.. हा अंधार प्रकाशाचा भेटण्याचा आणि त्याच क्षणी विरह पावण्याचा खेळ बघत ती गुंगली होती...सूर्योदयाला अवकाश होता. थंडगार हवा चालू होती.

शांतता असल्याने फक्त समुद्रच तेवढा बोलत होता,बाकी सगळं शांत!

तो धावत आला,ती खाली बसली होती.तिच्या ओलेत्या केसांमधून मधूनच एखादा थेंब गालांवरून मानेकडे येत होता.नेहमी वाऱ्याशी दंगामस्ती करणारे केस आज चिकटून बसले होते,डोळ्यांवर पहार ठेवणाऱ्या बटा गालावर हालचाल न करता विसावल्या..तिचं हे शांत ओलेतं रूप सुद्धा तेवढंच लोभस आणि जीवघेणं होतं.
तो शेजारी जाऊन बसला. तिने त्याच्या येण्याची दाखल घेतली नाही.
ती समोर तशीच स्थितप्रज्ञ बसून होती.वेदला हे अपेक्षितच होतं. त्याने तिचा हात हातात घेतला.तिने तो शांततेत सोडवून घेतला.
हा रागही अपेक्षित होता.त्याने पुन्हा हात हातात घेतला ह्यावेळी तिने सोडवला नाही पण त्याच्याकडे बघितलं ही नाही.

“सोना...Please look at me” त्याचा आवाज जड झाला होता.

“......” ती काहीच बोली नाही,तिने ओठ गच्च दाबले,अश्रू आणि हुंदका दाबण्याचा ती प्रयत्न करत होती.

“I know. I made a huge mistake…not a mistake, a blunder..पण माझं थोडं ऐकून घे..” तिचा हातात असलेला हात हळुवार थोपटत तो अजीजीने म्हणला.

“वेद मी रागावले नाहीये फक्त दुखावले गेलेय...” तिच्या डोळ्यातून पाणी घळघळा वहायला लागलं.

त्याने न राहवून तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला.तिने त्याच्या डोळ्यात बघायचं टाळलं,क्षणभर पापण्या मिटून घेतल्या.

“look at me, please यार” त्याने पुन्हा विनवणी केली.

तिने नाखुशीने त्याच्याकडे पाहिलं.कालच्या वाईट स्वप्नाचं सावट नसलेले पण तिच्यावरच्या प्रेमाने ओथंबून वाहणारे त्याचे डोळे..ती पहात राहिली.

“Happy Birthday Sona….. मला एकदा माफ कर..माझा तोल कसा सुटला आणि मी तो विडचा ड्राग ओढला मलाच कळलं नाही...सोना प्लीज.तुला माहितीय ना तू अशी रागावली ,चिडलीस की मला काहीच सुचत नाही.मला आता फक्त हसणारी तू समोर हवी आहेस,नंतर काय शिक्षा द्यायचीय ती दे ,आता ह्या उगवत्या सूर्यासोबत मला तुला मनसोक्त पाहू दे ”

त्याचा हात तिच्या हनुवटीवर होता.तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि गोड हसली, त्या हसण्याने त्याचं काळीज हलकं झालं.

“खूप थंडी आहे नाही...” तो हळुवारपणे नजर न हटवता,अजून जवळ जात म्हणाला.

“हम्म...” त्याच्या डोळ्यांतील आर्जवं वाचून तिला शब्द सुचले नाही.

“एक स्वीटकॉफी..?” त्याचं दुप्पटीने धडधडणारं हृदय तिच्या हृदयाशी स्पर्धा करतं होतं जणू..

“.....” तिचे डोळे बोललेच नाही म्हणून त्याने डोळे मिटले.
तो जरा जवळ आला.

त्याच्या ओठांचा प्रश्न तिला सोडवायचा ही होता आणि पूर्ण ही करायचा नव्हता. काय होतंय ? एक अनामिक हुरहूर....

एक दीर्घ श्वास घेत तिने त्याच्या ओठांवर तिने दोन बोटं ठेवले आणि दूर झाली...

त्याने अविश्वासाने डोळे उघडले..तिच्याकडे पाहिलं.

“एक मिनिट वेद..... मला काही बोलायचंय.

त्याने नाराजीने दीर्घ श्वास घेत चेहऱ्यावरून हात फिरवत..केसामधून फिरवला जरा शांत होत..उपहासाच्या कडवट सुरात तो म्हणाला-

“आत्ता?..आत्ताच बोलायचंय..? ओके चल बोल..मी चुकलोय मला शिक्षा हवीच...बोल.”

क्रमशः

©हर्षदा

लोभ असावा आणि तो कमेंट्समधून दिसावा...