पुण्यातलं एक मोठं कॉलेज. निनाद कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कॉमर्स ला होता. त्याचे ठराविक काही मित्र होते. तो नेहमीच त्या मित्रांमध्ये राहून टवाळक्या करायचा. कॉलेजमध्ये त्याचा दरारा होता. तो त्याच्या गँगचा टीम लिडर होता. हो आता त्याच्या टवाळक्या म्हणजे काही खुप मोठ्या नव्हत्या. आणि विशेष म्हणजे त्याचा कोणाला त्रास होत नव्हता. याला कारणही तसेच होते. निनाद एक हुशार विद्यार्थी होता. त्याचे मित्रही ब-यापैकी हुशार होते. अगदी टॉपर नाही पण सगळ्यांचे मार्क्स चांगले असायचे. शिवाय स्पोर्ट्स मध्ये निनाद आणि टीमचा हात कोणीच पकडू शकत नव्हतं. कितीतरी स्पर्धांमध्ये त्यांनी कॉलेजला बक्षिसं मिळवून दिली होती. त्यामुळे प्रिंसिपल आणि बाकी शिक्षक त्यांच्यावर खुश होते.
आता वर सांगितल्याप्रमाणे निनाद आणि टीम सतत काही ना काही करुन इतर विद्यार्थ्यांना त्रास द्यायचे. वरुन complaint न करण्याबद्दल बजावायचे. त्रास म्हणजे एखाद्या मुलाला classroom मध्ये बंद करुन ठेव. नाहीतर उगीचंच एखाद्याला नविन मुलीला propose करायला सांग. असे एक नाही अनेक. रॅगिंगच होती जणू. कारण त्यांच्यासाठी जरी ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या तरी बिचारी नविन जॉईन झालेली मुलं यात पिसली जायची. त्यांचं मोठं नुकसान होत नव्हतं म्हणून ती देखील complaint करत नव्हती. निनाद चं मत होतं की असं केल्याने मुलं धाडसी होतात. कसे होतात त्याचे त्यालाच माहीत. हो पण असे असले तरी निनाद कधी मुलींच्या वाटेला जायचा नाही. त्याने कधी मुलींना त्रास दिला नाही. त्यांच्यापासून हे सगळे लोक चार हात लांबच रहायचे. हे सगळे लोक म्हणजे तुषार, रवी, मन्या आणि सँडी.
कॉलेज चालू होऊन १५ दिवस झाले होते. त्यामुळे कितीतरी नविन विद्यार्थी जॉईन झाले होते. निनादला आयती संधीच मिळाली सगळ्यांना सतवायची. जोडीला सगळे होतेच. अशातंच त्यांनी प्रथमेश नावाच्या फ़र्स्ट ईयरच्या मुलाला सगळयांच्या बाईक धुवायला सांगितले. प्रथमेशने नकार दिला तर ह्या सगळयांनी त्याची कॉलेज बैग हिसकावून घेतली आणि जबरदस्तीने त्याला बाईक धुवायला लावले. प्रथमेश रडायला लागला. आणि हे मित्र जसं काही झालंच नाही अशा आविर्भावात तिथून निघून गेले. नेमकं हे सगळं वृंदाने बघितलं. तिने प्रथमेशसोबतंच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. १५ दिवसांपासून त्यांची तोंडओळख होती. वृंदाला हे सगळं बघून वाईट वाटले. आणि रागही आला. तिने मनाशी ठरवलं आणि प्रथमेशला घेऊन सरळ प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये गेली. वृंदाचं बोलणं ऐकुन प्रिंसिपल सरांना विश्वासंच बसत नव्हता. पण complaint आलेय तर action घ्यायलाच हवी म्हणून त्यांनी निनाद, तुषार, रवी, मन्या आणि सँडी यांना केबिन मध्ये बोलावले.
“What I am hearing? I am not expecting this from you. I want to meet your parents.”
“I am sorry sir. We are sorry. Please don’t call our parents.”, सगळे माना खाली घालून एक सुरात बोलले.
झालेल्या प्रकाराबद्दल प्रिंसिपल सर त्यांना खुप ओरडले आणि रेस्टीकेट करण्यात येईल असे बजावले. हे ऐकुन निनाद आणि त्याचे मित्र घाबरले. त्यांनी प्रिंसिपल सर आणि प्रथमेशची माफी मागितली. प्रिंसिपल सरांनी त्यांना फक्त exam देण्याची परवानगी दिली. परंतु lectures ला बसता येणार नाही असेही सांगितले. झालेला निर्णय मान्य करण्याशिवाय दुसरा काहिच उपाय नव्हता निनाद आणि त्याच्या मित्रांकडे. त्यातल्या त्यात exam देता येणार म्हणून वर्ष वाया जाणार नव्हतं.
वृंदाने complaint केलेय हे समजल्यापासून निनादचा वृंदावर खुप राग होता. कधी एकदा तिला धडा शिकवतो असं त्याला झालं होतं.
“च्यायला, ही वृंदा समजते काय स्वत:ला? भेटू दे एकदा बघतोच तिला.”, कॉलेज बाहेरच्या चहाच्या कट्ट्यावर एक कटिंग चहाचा झुरका मारत, डोळ्यात प्रचंड राग आणि कपाळावर आठ्या आणत, हाताची मुठ टेबलवर आपटत निनाद गरजला.
“हो ना. तिला काय पडली होती complaint करायची. स्वत:च्या कामाशी काम ठेवायचं,”सँडी अजून आगीत तेल ओतत म्हणाला.
“हे बघा, जे झालं ते झालं. उगीच आता कोणत्या नविन लफडयात पडू नका. Exam द्यायला मिळतेय तेच पुष्कळ आहे.”,रवी समजावत म्हणाला.
“हो. एक तर हे शेवटचं वर्ष आहे आपलं. पुढे सगळं career पडलंय. घरी माहीत केलं नाहीये. पण कळायला वेळ लागणार नाहीये. त्यात जर कॉलेज मधून काढलं तर वाटंच लागेल.”, तुषार रविला दुजोरा देत म्हणाला.
“यार पण त्या वृंदाला धडा शिकवायला पाहिजे यार…”,मन्या चहात पडलेला बिस्किटाचा तुकडा काढत म्हणाला. “पण तुमचं म्हणणं पण पटतंय मला.”,चहाचा एक बोट चोखत त्याने सहमती दर्शवली.
“काय यार तुम्ही ? ज्युनिअर आहे ती. तिला अद्दल घडवायला नको का?” ,सँडी पुन्हा आपल्या बोलण्यावर जोर देत म्हणाला आणि त्याने रिकामा ग्लास टेबलवर जोरात आदळला.
“नसत्या गोष्टिंमध्ये energy वाया घालवण्यापेक्षा तू career वर focus कर सँडी. आणि तसंही चूक आपलीच होती. त्यामुळे हा विषय इकडेच थांबव.”,तुषारने देखील रिकामा ग्लास टेबलवर ठेवला आणि टपरीवरच्या पोराला इशारा करुन स्वत:कडे बोलवत तो म्हणाला.
“हो. हा विषय इकडेच थांबवा..”,रवीने तेच पुढे म्हटलं.
“बरं राहीलं..”,असं म्हणत सँडीने जवळ आलेल्या त्या मुलाला चहा आणि बिस्किटांचे पैसे दिले.
सगळयांचं एकमत झालं तसं त्यांनी तिकडून निघण्याचा विचार केला. आणि आपापल्या बाईक काढल्या.
इतका वेळ काहिच न बोलणा-या निनादच्या मनात मात्र काहितरी वेगळंच चाललं होतं. त्याने तसं दर्शवलं नाही. पण काहीही झालं तरी त्या वृंदाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा त्याने मनात निश्चय केला.
इकडे वृंदा मात्र झालं गेलं सगळं विसरली. नविन कॉलेज, नविन मित्र मैत्रिणी यांच्यात रमली. बघता बघता परिक्षा झाल्या. वर्ष संपले. निनाद चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन career च्या नव्या संधी शोधण्यात व्यस्त झाला. तर वृंदाचं कॉलेज लाइफ सुरळीत चालू झालं. ती आता commerce च्या द्वितीय वर्षाला होती. अभ्यास, प्रोजेक्ट, presentation आणि practical knowledge या सगळयासोबत कॉलेज फेस्टिव्हल, picnic अशा सगळया गोष्टी ती मनसोक्त एन्जॉय करत होती. बघता बघता दुसरं वर्ष देखील संपलं आणि तिसरं वर्ष नविन सुरेल स्वप्न घेऊन आलं.
तिच्याच क्लास मधल्या मनन ने तिला propose केलं. त्याच्यासोबत नविन आयुष्याचं स्वप्न रंगवता रंगवता तिसरं वर्ष कधी संपलं तिचं तिलाच कळलं नाही. आता जॉब मिळाला की घरी विषय काढायचा आणि त्यांना एकमेकांबद्द्ल सांगायचं असं दोघांनी ठरवलं.
मनन ची cast वेगळी होती त्यामुळे तिला थोडी धाकधूक होती. पण हा विश्वास देखील होता की सगळं सुरळीत होईल. अचानक एक दिवस मनन चा फोन आला.
“हेलो वृंदा, मला जॉब मिळाला. बेंगलोर ला शिफ्ट व्हावं लागेल. पुढच्या आठवड्यात joining आहे.”, मनन excite होत म्हणाला.
“वॉव यार congrats”,त्याच्यासाठी खुश होत वृंदाने त्याचं अभिनंदन केलं.
“खुप तयारी करायची आहे. ठिक आहे मग नंतर बोलू..”
“ऐक ना..”
“काय गं..?”
“आपल्या लग्नाचं काय?”
“अगं बघू गं. एवढी काय घाई आहे. आत्ताच तर जॉब लागलाय. थोडं settle होऊ दे मला..”
“बरं.”,असं म्हणून तिने फोन ठेवला. तरी मनात रुखरुख आणि अनामिक भीती दाटून आली. तिने प्रयत्नपूर्वक त्यांना दूर सारले.
काही दिवसांनी वृंदाला एका बँकेत accountant म्हणून जॉब मिळाला. घरी बाबा आजारी असायचे आणि एक लहान बहिण शाळेत जायची. आई थोडंफार काम करत होती.. घर आणि जॉब हे सगळं करता करता तिची दमछाक व्हायची. त्यात तिने MBA ला admission घेतली होती.. या सगळ्यात एकंच चांगला दुवा होता तो म्हणजे मनन. त्याच्याशी बोललं की हलकं वाटायचं तिला.
पण असं long distance relationship किती काळ टिकणार. हळुहळू मनन चे फोन कमी होऊ लागले. आणि लग्नाचा विषय देखील तो टाळू लागला. इकडे वृंदाच्या घरी लग्नाचा विषय निघू लागला. वृंदाला कळून चुकले की मनन आता तिच्या आयुष्यात येणार नाही. तिने तिच्या बाबांना लग्न करण्यास होकार दिला.
वृंदाच्या बाबांनी तिचं नाव matrimony site वर नोंदवलं. त्यानुसार तिला हळूहळू स्थळं यायला सुरवात झाली. दरम्यान तिचं MBA पूर्ण झालं.
निनादचा जॉब चांगला चालला होता आणि पगार देखील भक्कम होता. तो CA चा अभ्यास करत होता आणि सोबत एका कंपनीत त्यांचे accounts सांभाळत होता. त्यामुळे त्याच्याही लग्नाची बोलणी त्याच्या घरात चालू झाली. निनाद चं नाव त्याच्या बहिणीने सुलेखाने matrimoni site वर नोंदवलं. असंच एका रात्री बेडवर लोळत असताना निनाद matrimony site बघत होता. बघता बघता निनादला वृंदाचा बायोडाटा दिसला. त्याच्या मनात पुन्हा जुन्या आठवणी आणि वृंदाबद्दलचा द्वेष दाटून आला. त्याने काहितरी ठरवले आणि त्या विचारातंच झोपी गेला.
दुस-या दिवशी त्याने आईला वृंदाचा बायोडाटा दाखवत तिकडे चौकशीसाठी फोन करायला सांगितले. त्याप्रमाणे आईने म्हणजे निता बाईंनी फोन केला. जुजबी बोलणी झाल्यावर कांदेपोहेचा कार्यक्रम ठरला.
निनादचे आईवडील modern विचारांचे होते. त्यामुळे caste एक असो नसो त्यांना काही फरक पडणार नव्हता. वृंदाच्या आईवडिलांशी विचार जुळल्यामुळेच गोष्ट पुढे गेली होती. त्यांनाही caste शी काहीच issue नव्हता.
कार्यक्रमाच्या दिवशी निनाद आणि त्याचे आईवडील वृंदाच्या घरी पोचले. वृंदाच्या आईवडिलांनी त्यांचे स्वागत केले. जुजबी बोलणी झाली आणि तिचे वडील प्रतापराव म्हणाले,’’ निशा बेटा वृंदाला बोलाव.” तोपर्यंत वृंदाच्या आईने सगळयांना पोहे दिले.
निशा धावत वृंदाला बोलवायला आतल्या खोलीत गेली. थोड्याच वेळात फिक्कट पिवळ्या साडीतली वृंदा हातात चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. तिच्या गळ्यात मोत्याची माळ, कानात मोत्याच्या कुडया आणि हातात मोत्याच्या बांगड्या होत्या. कपाळावर नाजुक पिवळ्या आणि लाल रंगाची टिकली लावली होती. केस मागे क्लचने अलगद बांधलेले होते. जसजशी ती पुढे येऊ लागली सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
निनाद तिला बघतंच राहीला. पण काही क्षणातंच भानावर येऊन हातातल्या पोह्याच्या प्लेटवर चमचाने नक्षी काढू लागला. वृंदाने सगळयांना चहा दिला. निनादला दिला आणि हलकेच त्याला smile दिली. नंतर एका बाजूला खुर्चीत जाऊन बसली. कॉलेज आणि आता , तिच्यात म्हणावा तसा फरक नसला तरी ती बरीच सुंदर दिसतेय हे निनादला पटत नसले तरी जाणवले होते. वृंदानेही तिरप्या नजरेने निनादकडे पाहिले. फिक्कट निळ्या रंगाचा बारीक चेक्सचा शर्ट आणि फॉर्मल पँट, हातात Titan च घड्याळ, जेल ने केसांना दिलेलं मॉडर्न वळण आणि चेह-यावर आत्मविश्वास यामुळे तो खुपंच रुबाबदार दिसत होता.
बोलण्या बोलण्यातून त्यांना काही common family friends ची माहिती मिळाली. यावर निनादचे बाबा म्हणाले,”चला म्हणजे अगदीच अनोळखी नाही आहोत आपण.” यावर सगळे हसायला लागले.
सगळ्यांचं बोलणं चालू असताना त्या दोघांना वेगळ्या खोलीत जाऊन बोलण्याची संधी मिळाली. वृंदाचे वडील म्हणाले,”जा बेटा त्यांना आपलं घर दाखवून ये. आणि आतल्या खोलीत बोला तुम्ही दोघं.” सगळ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला तसे ते दोघं आतल्या खोलीत जाऊन बसले.
इकडचं तिकडचं बोलणं, शिक्षण, जॉब, hobbies यांवर गप्पा झाल्या. एकंदरीत हिने आपल्याला ओळखले नाही याची निनादला खात्री झाली. त्यानेही मग ओळख पटवली नाही. दोघं बाहेर आले आणि आपापल्या जागेवर जाऊन बसले. सगळ्यांनी मग एकमेकांचा निरोप घेतला.
दुस-या दिवशी निनादच्या वडलांनी वृंदाच्या वडलांना फोन करुन होकार कळवला. होकार आला तसे सगळे खुश झाले आणि लगीनघाईला सुरवात झाली. साखरपुडा, हळद, लग्न हे सगळं एकत्रंच करण्याचं ठरलं. प्रतापरावांच्या तब्येतीमुळे सगळं साधेपणाने करण्याचे ठरले. सीमाताई म्हणजेच वृंदाची आई त्याही तयारीला लागल्या. निशा आणि सुलेखा या दोन करवल्या. त्यांनीही उत्साहाने सगळया गोष्टींमध्ये सहभाग दर्शवला. निताबाई आणि संदीपराव पुढच्या नियोजनात व्यस्त झाले.
©हर्षदा शिंपी-बागुल