Tu Hi re majha Mitwa - 24 books and stories free download online pdf in Marathi

तू ही रे माझा मितवा - 24

#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_२४ (#ऋतू)

“वेद आजच्या भेटीचं कारण फक्त तू लिहलेलं मितवा काय आहे हे जाणून घेणं एवढंच नाहीये तर मला एका अनोळखी वाटेवर भेटलेल्या मितवाविषयी...rather एका ‘सहेलाविषयी तुला सांगायचं आहे.”

“तुला भेटलेला मितवा? I am not getting it,केव्हा? कुठे?”

जेवढा धक्का त्याला ऋतूच्या हातात मितवाचे कागद बघून लागला नाही त्याच्या जणू चौपट धक्का ‘कुणी मितवा’ तिला भेटला ह्या विचाराने लागला.

“खरतरं तुझ्या ह्या गोष्टीला..माफ कर आपल्या ह्या तू लिहलेल्या लव्हस्टोरीला तू ‘मितवा’ का नाव दिलं मला माहित नाहीत नाही, मला हे ही माहित नाही की तू मितवाची काय व्याख्या केली पण माझ्यासाठी मितवा म्हणजे ‘सहेला’.
प्रेमाच्या खूप पलीकडे असलेलं एक असं कॉम्प्लेक्स नातं ज्याला वेळ काळ,जेंडर,सहवास कश्याच बंधन नाही. कदाचित तुला आश्चर्य वाटेल मी इतकी figurative व्याख्या तुला कशी सांगू शकते पण ही डेफिनेशनही त्याचीच. मी फक्त जगले ती.

“ ऋतुजा प्लीज यार still I am not getting what do you want to say.’तो’ म्हणजे कोण...मला माहित नाही असा कुणी past or ex आहे तुझा?” वेद प्रचंड अस्वस्थ झाला.

“वेद त्या रात्रीपासून सुरुवात करते ज्या रात्री एका निर्जन ठिकाणी मला बोलावून तू आला नाहीस,असं ठिकाण जिथं थांबणं किती रिस्की होतं हे तुला कदाचित माहित नसेल पण मी अनुभवलंय ते. अश्या वेळी ’तो’माझ्या समोर आला..तो भेटलाही तिथं ,जिथं तू आणि मी भेटणार होतो..कदाचित तू मला प्रपोज करणार होता, कदाचित ती रात्र आपल्या नशिबात असती तर आयुष्य कुठल्या वाटेने गेलं असतं माहित नाही आणि आता जरतरच्या प्रश्नांना अर्थ ही नाही.
ती रात्र काहीतरी ठरवून तुझ्याविना आली आणि सोबत तो ही आला.... "कबीर"..!!” ती शांतपणे म्हणाली.

तिच्याकडून हे अनोळखी नाव इतक्या जवळीकतेने ऐकून त्याचं डोकच सुन्न झालं.

“कबीर? कोण कबीर?” तो जवळपास ओरडलाच.तिला हे अपेक्षितच होतं,थोडा वेळ शांत होत तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

“मी त्या दिवशी तयार होऊन तुझी वाट बघत होते,एक धुंदी चढली होती प्रेमाची. आसपास समुद्राचा आवाज वर लुकलुकणाऱ्या असंख्य चांदण्या that moment was enchanted. तू मला कसं विचारशील? त्यावर मी काय बोलणार याची कितीतरी पारायणं मनात झाली होती...पण मग त्या निर्जन ठिकाणी आपण एकटे असल्याची जाणीव झाली आणि छातीत धस्स झालं,क्षणात धुंदीची जागा भीतीने घेतली.
जरा वेळाने मात्र तू येतोय अशी चाहूल लागली.ते वातावरण अगदी क्षणार्धात बदलून गेलंय याची जाणीव थेट काळजापर्यंत पोहचली. आता फक्त तो क्षण मला पूर्णपणे जगायचा होता जेव्हा मी तुझ्या आश्वासक मिठीत असणार होते. जिथं मला सेफ वाटणार होतं.
ती पावलं माझ्यापासून जरा अंतरावर थांबली आणि त्याने आवाज दिला..मी गोंधळले कारण तो तुझा आवाज नव्हता पण जो समोर उभा होता त्याच्या डोळ्यात जी अनोळखी पण आश्वासक काळजी होती ती नकळत पोहचली माझ्यापर्यंत. तरीही मी खूप घाबरले होते...I tried to avoid him पण जरावेळाने त्याची ओळख पटली. तो माझी मैत्रीण वैदू, तिचा बॉस होता.
त्या जागेच्या आजूबाजूला मवाली,नशेडी लोकांचा वावर,लेझरचे फोकस,घाण शेरेबाजी हे सगळं त्या वेळात मी अनुभवलं आणि त्याची आश्वासक सोबतसुद्धा...एक वेळ तर असं वाटलं कुठला तरी प्रवास पूर्ण झाला आहे आणि मी मला हव्या असेलल्या डेस्टिनेशनला येऊन पोहचले आहे.
मग खाडकन जाग आली हा विचार तुझ्यासाठी नव्हता. मी घाबरले आणि स्वतःला सावरलं,समजावलं.. तुझ्या ओढीने रिसोर्टकडे धावत आले पण दुसऱ्या दिवशी तुझं वागणं,तुझा अपिअरन्स खूप परका आणि अनोळखी वाटला. ह्या वेद्ला मी ओळखतच नाही असे विचार यायला लागले,मग स्वतःची लाज वाटली की मी स्वतःला कबीरकडे सोडून आले की काय म्हणून तू परका वाटतोय,तुझ्या वागण्याविषयी शंका येतेय.
मी पुनःपुन्हा मनाला वास्तवात येण्यासाठी बजावलं..तू वेदची ‘सोना’ आहेस हे ठणकावून सांगितलं पण ज्या पद्धतीने तू त्या दिवशी मला वागवलं मी imagine सुद्धा करू शकत नव्हते,तिथे एक मिनिट देखील थांबायला माझं मन तयार नव्हतं..तू तर खूप अपरिचित,अनोळखी वाटत होता,तू तो वेद नव्हताच जो मी अनुभवला होता,मला हवा होता.
’रीमाताईचं डिवोर्स प्रकरणामुळे घरी आपल्याविषयी तू सांगू शकणार नाही’ ह्या तुझ्या वाक्याने मनात प्रचंड गोंधळ निर्माण केला.
’तुला फक्त सुखातली मी हवीय की माझ्या दुःखासकट मी हवीय’ हे कळेनासं झालं.
वेद माझं आयुष्य लहानपणापासून निर्व्याज प्रेमासाठी आसुसलेलं होतं.तुझ्यात मी एक अश्वस्थ,स्थिर नातं शोधत होते जे माझ्या पेरेंट्समध्ये नव्हतं, जे ताईलादेखील मिळालं नाही आणि असं आश्वासक नातं नसेल तर आयुष्य कसं विस्कटून जातं हे मी बघत आलेय.
रेवाच्या तुझ्यावरच्या प्रेमाने आणि तुझा तिच्याविषयीच्या सोफ्टकॉर्नरने मला सतत अस्थिर,दोलायमान ठेवलं. त्यात तू बोलून गेला की हे बालिश वागणं मच्युरीटीमध्ये बदलायलाही तुला वेळ नकोय’ मला समजेना मी खरी कोण? तुला मी कशी हवीय? प्रेम करण्यासाठी नॉटी,चंचल आणि लग्न करण्यासाठी अगदी मच्युअर्ड असं का? पुन्हा गोंधळ,मनांत विचारांचं थैमान पण तरी मी त्या परिस्थितीत शांत होण्याचा पर्याय निवडला कारण मला तुला गमवायचं नव्हतं पण तिथे क्षणभरही थांबू वाटत नव्हतं.
मी मिळेल त्या मार्गाने पुण्याला तत्काळ निघून यायचा विचार केला आणि मला अपेक्षा नसतांना पुन्हा कबीर भेटला. तो ही पुण्याला निघाला होता. मी त्याच्यासोबत निघाले.
त्या प्रवासाने मात्र माझं आयुष्य वेगळ्याच दिशेला भरकटत नेलं.त्याच्यासोबत वाहवत जाण्यातही एक विश्वास होता,हे कुठलं नातं कुठले बंध होते जे नकळत बांधले जात होते ते कळतही नव्हतं, त्याच्या सोबतच्या एक एक क्षणात ‘मी आहे सोबत’ अशी विलक्षण जाणीव होती,विश्वास होता.मी लहानपणापासून कधीच न अनुभवलेली एक आश्वासक आपुलकी,काळजी होती,माया होती. त्या दिवशीच्या संध्याकाळी एका हळव्या क्षणी कबीरने माझं आयुष्य,माझी अस्थिरता माझ्या ओठांवरून वेचून घेतली, आपलीशी केली. त्या क्षणात लस्ट,एक्साईटमेंट,थ्रील हे नव्हतंच फक्त विश्वास होता,जाणीव होती साथ देण्याची,सोबत असण्याची. वेद आता माझं माझ्याकडे काहीच नाही आणि कितीही जतन करून, मारून ठोकून मनाला आता सांगितलं की तो क्षण विसरून जा तरी वेडं मन मान्य करायला तयार नाहीये.

मी स्वतःला खूप दोष दिला, राग आला, तुझ्यासाठी वाईट वाटलं,रेवा आणि जय अगदी बरोबर बोलत होते मी प्रेमाच्या लायकच नाहीये. अस्थिर,चंचल,बालिश स्वतःला नेमकं काय हवंय हे ही व्यवस्थित माहित नसलेली मूर्ख व्यक्ती आहे मी.कबीर म्हणजे एक मृगजळ आहे, खरतर फ्री आणि प्युअरसोल आहे.माझ्या मनात विश्वास निर्माण करून,स्थिरता कशाला म्हणतात याची फ्रेंड,फिलोसॉफर गाईडबनून ओळख करून दिल्यावरही त्याला हे प्रेमवैगरे काही माहित नाही असं म्हणतो.त्याचा विश्वासच नाहीये कुठल्या प्रेमावर. माझ्या मनावर एरवी माझा कधीही विश्वास नसतो पण इतकी मी तुझी झाल्यावर,तुझीच असल्यावरदेखील मला माझ्यादेखत हळूच चोरून घेऊन गेलेला तो आला तसा निघूनही गेला.
माझं हे असंच वागणं राहिलं तर प्रेम ह्या शब्दाला खरच किंमत राहील का? ही तर सरळ प्रतारणा आहे,इतकं आपलं प्रेम materialistic होतं? ह्याविचाराने स्वतःची लाज वाटली. हे सगळं ठीक करण्यासाठी मी तुला भेटले आणि एंगेजमेंटची घाई केली निदान त्यामुळे तरी मी स्थिरावेल,तुला हे सगळं तेव्हाच सांगायचा प्रयत्न केला पण हिंमत झाली नाही आणि आज तुला हे सगळं सांगून मी माफी मागणार होते,तू जे जे बोलणार, कॅरेक्टर जज करणार ते सगळं मान्य करणार होते पण आता मी निशांतची माफी मागू की वेदची हा पुन्हा गुंता तू वाढवून ठेवला वेद.तू जर मितवा लिहायला घेतली नसती तरी तु माझ्यावर प्रेम केलं असतंस का वेद? तुझ्या मितवाने आणि माझ्या आयुष्यात आलेल्या त्या मितवा ने पुन्हा विचार करायला भाग पाडलं ,पुन्हा तीच अस्थिरता,तोच केओस ...सांग ना मी काय करू ?”

चेहरा दोन्ही हातांनी झाकून ती हुंदके देऊन रडायला लागली.
तो अविश्वासाने हे सगळं ऐकत असतांना ती बोलायचं थांबल्याने जणू खडबडून जागा झाला.तिच्याकडे कावऱ्याबावऱ्या नजरेने बघायला लागला.कबीरबद्दल ऐकून तो सुन्न झाला होता आणि ‘त्या’ क्षणाचा विचार करून तर अगदीच बधीर झाला.समोर हुंदके देऊन रडणाऱ्या ऋतूला काय सांत्वना द्यावी हेच त्याला कळत नव्हतं. काय बोलावं कसं react व्हावं कुणाला काहीच कळत नव्हतं.
कोण बरोबर ,कोण जास्त बरोबर.... फक्त प्रश्नचिन्ह!

#क्रमशः

©हर्षदा

अंतिम भाग १६जुलै गुरुवारी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED