संघर्ष conflict- सकारात्मक बाजू पूर्णा गंधर्व द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संघर्ष conflict- सकारात्मक बाजू

" युद्ध नको मज बुद्ध हवा "

संघर्ष म्हणजे दुःख, क्लेश ,इजा हे समीकरण तर आहेच , पण एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संघर्ष आवश्यकही असतो . तो कौशल्यपूर्ण रितीने हाताळणे आणि त्याची योग्य पद्धतीने वासलात लावणे, ही एक कला आहे. व्यक्तीशः मी संघर्ष ,वाद , कलह यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करू इच्छित नाही . कारण ते निःसंशय क्लेश आणि निंदेस पात्र आहेत . पण संघर्षरुपी काळ्या ढगाची रुपेरी रेषा दाखवून तो सुसह्य करून , निराकरणाचे उपाय सुचवून संघर्ष शमन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

संघर्ष अशा बाबी प्रकाशात आणते, ज्यांची खरोखर उकल होणे गरजेचे आहे , ज्या पीडा दायक आहेत. जेथे स्वतः ची मते आहेत , त्याबाबतचा आग्रहीपणा आहे , ऊर्जा आहे ,क्रोध अथवा स्नेह आहे , अधिकार आहे अशा ठिकाणी संघर्ष होतोच. संघर्ष हा दैनंदिन जीवनाचा , मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे . व्यक्ती - व्यक्ती , कुटुंब , कार्य स्थळ , जमाव , समाज , देश यांमध्ये तो उदभवणे स्वाभाविक आहे . संघर्षामधून गतिशीलता , जिवंतपणा ,ऊर्जा दिसून येतात . संघर्षापासून पलायन हा त्यावरचा उपाय नाही. संघर्षासह जीवनाचा स्वीकार करून संघर्ष टाळणे , समन्वय साधणे, सकारात्मक विधायक मार्गाकडे तो वळविणे ही कला अवगत झाल्यास जीवन सुंदर बनू शकते . संघर्षामधून नकारात्मक ऊर्जा आणि भावना यांचा निचरा होत असतो. वर्तमानातला छोटा संघर्ष भविष्यातील खूप मोठा विनाश टाळू शकतो .

एखादया निर्णयातून निर्माण झालेला संघर्ष हा त्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्यास भाग पाडतो . यातुन नवीन कल्पना ,शक्यतांचा उगम होऊ शकतो . समूहांमध्ये उद्भवलेला संघर्ष हा समूहांतर्गत निष्ठा , एकी बळावण्यास कारणीभूत ठरतो . इतर समूहांशी संघर्ष करताना गुणवत्ता ,कार्यमान (performance) वृद्धीसाठी प्रयत्न केला जातो .(म्हणजे दोन विद्यालयांत क्रीडा स्पर्धा असल्यास आपल्या शाळेला विजय मिळवून देण्यासाठी आपसातील द्वेष बाजूला ठेवून सहकार्य केले जाते. ) संघर्ष शमनासाठी विविध पर्याय ,शक्यता, माहिती पडताळा घेतला जातो . असे संघर्ष कधी कधी बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक वाढीसाठी आणि बदलासाठी कारणीभूत ठरतात . या संघर्षामध्ये जो टिकाव धरतो किंवा तो मिटविण्यास सहाय्यकारी ठरतो ,अशा व्यक्तीच्या रुपात एक नवीन नेतृत्व प्राप्त होते .

संघर्ष करणाऱ्या व्यक्ती असंतुष्ट , निराश आणि संदिग्ध अवस्थेत आहेत हे कळते . त्यातून त्यांचा राग , वैताग, चीडचीड, दडलेली विरोध करण्याची वृत्ती , कधी हिंसा या भावनांचा निचरा होत असतो . म्हणून संघर्ष ,समस्या निराकरण करण्यासाठी समस्येचा स्रोत शोधावा . संघर्षासाठी मिळणारे अनावश्यक बाह्य प्रोत्साहन व प्रबलन शक्य झाल्यास खंडित करावे . विविध पर्याय ,शक्यता पडताळून वाद मिटवावा. दोन संघर्ष बिंदूंचा मेळ घालण्याचा यत्न करावा.क्रोधावर क्रोध हा उपाय नसून संयम आणि शांती हा उपाय आहे. संघर्ष हा व्यक्तीच्या ठायी असणारी ऊर्जा दर्शवितो . या ऊर्जेची संघर्षात परिणीती होऊ नये, म्हणून व्यक्तीची ऊर्जा आणि वेळ विधायक कार्याकडे वळवावा . तो निर्माणच होऊ नये यासाठी उचित पूर्व अवधान राखावे . अशा संघर्षाचा सामना करावयाचा झाल्यास सक्रिय सकारात्मक उपाय योजना तत्काळ करावी . संघर्ष चिघळून रौद्र रूप घेई पर्यंत थांबू नये. संघर्षरत व्यक्ती वा समूहास योग्य निवडीचे स्वातंत्र्य द्यावे . समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन ,वर्तनामागचे कारण स्वतः ही समजून , दोन्ही पक्षांना समजून दयावे . दोघांचीही भावुकता कमी झाल्यास संघर्ष शमण्याची शक्यता बळावते . म्हणून भावनिक गुंतवणूक कमी करून बुद्धीचा वापर करावा . जो संघर्ष शमवित आहे त्याचे वर्तन ही हळुवार , न्यायिक आणि समर्पक असावे , त्याने स्वतः संतुलित असावे. इतरांचे विचार ,मते ,मनाचा कल , अभिरुची यांमधील भेद स्वीकारण्याची व हाताळण्याची मानसिक तयारी ठेवावी.

संघर्ष व्यवस्थापन (conflict management) :

संघर्षाचे निरीक्षण करून ,कारणांचा छडा लावून समस्येची उकल करावी . (सासू सून किंवा इतर गृह कलहाच्या वेळी पतीने स्वतः ला त्रास करून घेणे , पलायन असे उपाय गैर लागू आहेत, इतरांकडे नातेवाईक ,शेजारी यांकडे दोषारोपण करणे अयोग्य) परस्पर प्रेम ,सौहृद्य , सहकार्य असेल तर कलह होण्याची संभावना कमी होते . म्हणून असे काळजी ,प्रेम ,आदर, धाक असणारे खेळीमेळीचे वातावरण समूहांतर्गत निर्माण होईल, अशा संधी उत्पन्न कराव्यात. निष्ठेला प्रोत्साहन दयावे . जेथे स्नेह असतो तेथे संघर्ष नसतो , समर्पण असते, स्वीकृती आणि समायोजन असते .

जेथे व्यक्ती - व्यक्ती , समुह - समुह आंतरक्रिया घडते , तेथे संघर्ष अनिवार्य आहे . जेव्हा ही आंतरक्रिया आवश्यक असते आणि विचार ,कृती मध्ये भिन्नता असते ,तेव्हा संघर्ष हा अटळ आहे . संघर्ष काही वेळा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी होतो असेही नाही . कधी एखादया कृती वरील प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया ही संघर्षात परिवर्तित होते. तर कधी तत्काळ प्रतिक्रिया न होता ,अनेक दमन केलेल्या भावनांचा प्रक्षोभ होऊन संघर्ष उदभवतो. यावेळी परस्पर समेट घडवून किंवा समूहाचे विलगीकरण करून , आंतरक्रिया काही काळ थांबवून संघर्ष टाळता येऊ शकतो. चर्चा, सुसंवाद हे याबाबत प्रभावी माध्यम आहे. वैयक्तिक मते , अभिरुची, कल ,मुल्ये ,शैली यांना आव्हान न देता प्रत्येकाने समायोजन /तडजोड करण्याचा प्रयत्न करावा . समायोजन , इतरांच्या मताची स्वीकृती , इतरांवर दबाव न टाकणे यांमुळे संघर्ष टळतो . दोन्ही संघर्षरत व्यक्ती व समूहास समान महत्त्व आणि अवधान दयावे . समन्वय साधून win -win सोल्युशन म्हणजे दोघांनीही हानी होणार नाही किंवा समान लाभ होईल, असा उपाय काढावा . दोघांनाही त्यांची मते ,कौशल्य, माहिती परस्परांत वाटून घेण्याची संधी दयावी. अथवा पर्यायी व्यवस्था ,वस्तू उपलब्ध करून दयावी. दोन्ही पक्षांसमोर वर्तमानातील संघर्षाचे भविष्यातील भीषण परिणाम निदर्शनास आणावेत .( पती पत्नी /सासू - सून कलहामुळे भविष्यात येणाऱ्या समस्या विभक्तपण , लहान मुले, वृद्ध यांची होणारी दैन्यवस्था ,वेळ ,पैसे यांचा अपव्यय इत्यादी).

प्रत्येक वेळी संघर्षामधून वाईट निष्पन्न होईल असे नाही . असहमती , असमाधान, नकाराची कारणे मुद्देसूद डोळसपणे चर्चिली गेली, तर संघर्ष , कलह ,वाद शमेल. खेळीमेळीचे , स्वातंत्र्यपूर्ण , मैत्रीपूर्ण , समानतापूर्ण वातावरण राखावे . जास्तीतजास्त सकारात्मक सामाजिक आंतरक्रिया घडवून आणाव्यात. वाद ,कलह टाळण्यासाठी प्रस्थापित नियम, संरचना , भूमिका यात उचित बदल घडवावा . भविष्यातील वाद टाळण्यासाठी निर्वाणीचा उपाय आधीच शोधू शकता.

एकूणच संघर्ष हा सहनशक्ती आणि ऊर्जाशक्ती दोन्हीही पणाला लावतो . विधायक कार्यासाठी केलेला संघर्ष नैतिक उन्नती करतो , तर निव्वळ राग , शक्तीप्रदर्शन ,दमन यांसाठीचा व विध्वंसक संघर्ष पतन आणि नुकसान देतात. जेथे संघर्ष आहे तेथे निवारणाचे उपाय आणि शांतीचा विकल्प निश्चित असतो .धैर्य आणि संयम राखावा, नित्य आशावादी राहावे. संघर्ष हे कणा मोडणारे नसावेत ते कणखर बनविणारे असावेत . स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या संघर्षामुळे भारतभूमीने स्वातंत्र्याची सुवर्णसकाळ पाहिली . अशा आदर्श चळवळी , लढे, उत्क्रांती विधायक बदल घडवून आणतात ,याची साक्ष जगभराचा इतिहास देतो . समन्वय, समायोजन , इतरांचा सन्मान करण्याची मानसिक उदारता ज्यावेळी प्रत्येकाठायी येईल त्यावेळी , असा संघर्ष मुक्त समाज प्रगती व समाधानाची परिसीमा गाठेल.

संघर्षमुक्तता करण्यासाठी मी थोर मानसशास्त्रज्ञांच्या सिद्धांताचा आधार घेऊन, माझ्या आकलनशक्तीनुसार विवेचन केले आहे . त्यासाठी त्यांच्या विद्वतजड संकल्पना व्यावहारिक पातळीवर आणण्याचा प्रमाद , मी केवळ वाचकांप्रति असणाऱ्या माझ्या ममत्वभावामुळे केला आहे. कलह शमून मती शुद्ध ,स्थिर होवो , शांती स्थापित होवो यासाठी "दुरितांचे तिमिर जावो" असे पसायदान मागून , 'श्री ज्ञानदेवो सुखीया जाला' तीच प्रार्थना पुनः करून , मी अपुर्णमती पूर्णा संतोष पावते.

© पूर्णा गंधर्व.