मृत्यू योग Swara bhagat द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मृत्यू योग

फोन ची रिंग वाजली.

“अरे यार इतक्या सकाळी कोण फोन करतेय” झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळा नंतर मला जाग आली तसे मी लगेच माझा मोबाईल पहिला. माझ्या मित्राचे म्हणजेच शिवमचे चार पाच मिस्ड कॉल आले होते. तो सहसा असा फोन करत नाही पण काही तरी अर्जंट असावे म्हणून मी पटकन त्याला कॉल बॅक केला आणि कळले की माझा नेट पॅक च संपलाय. माझ्या बाबतीत नेहमी असेच घडते. नेमका आताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईन वरून शिवम ला फोन लावला. मी काही बोलणार तोच तो म्हणाला “हरेश लवकर आपल्या स्टँड वर ये, एम. जे. एम. हॉस्पिटल ला जायचंय”.. ते नाव ऐकून शरीरातून विजेची लहर जावी अशी क्षणीक भीती निर्माण झाली.

तुम्हाला वाटेल हॉस्पिटलचे नाव ऐकून घाबरण्यासारखे काय आहे. पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होतं आणि ऐकायला मिळत होत त्यावरून भीती वाटणं साहजिक होत. काही महिन्यांपासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बऱ्याच माणसांचा मृत्यू झाला होता. कारण काहीही असले तरी मृत्यू झालेल्या माणसाची छाती फाडलेली असायची व त्याचे हृदयच नसायचे. अजूनही कळले नव्हते की हे कोण करतयं. तिथल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात एक अमानवीय शक्ती आहे जिला माणसाच्या हृदयाची चटक लागली आहे. आणि तीच शक्ती हे सगळं करतेय. पण माझ्यासारख्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा या सगळ्यावर विश्वास ठेवणे अशक्यच होते म्हणून मी ही त्यांना अफवा समजत होतो. पण तरीही कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते ना तसच काहीसं होत होतं.

मी पटकन कशीबशी तयारी करून स्टँड वर पोहोचलो. शिवम माझी वाट पाहत थांबला होता. आम्ही तडक हॉस्पिटल ला गेलो. आम्ही इथे का आलोय हे मला अजूनही माहीत नव्हतं. शेवटी न राहवून मी शिवम ला हळूच बाजूला नेऊन विचारलं. त्याने सांगितले की आमचाच दुसरा मित्र आदित्य याचा अपघात झालाय. अजून तो शुद्धीवर आला नाहीये. माझे लक्ष समोर गेले, त्याचे आई वडील तिथेच बसून खूप रडत होते. मी त्यांना धीर देत शांत केले. दिवसभर आम्ही तिथेच थांबलो. संध्याकाळ होत आली होती. मी आदित्य च्या आई वडिलांना सांगितले की तुम्ही घरी जाऊन आराम करा मी आणि शिवम थांबतो इथे. दिवसभराच्या धावपळीमुळे ते ही थकले होते पण आम्ही थांबतो म्हंटल्यावर त्यांना जरा हायसे वाटले.

शिवम ने बाजूच्या हॉटेल मधून आम्हा दोघांसाठी जेवण आणले. आम्ही ते उरकून बाहेर गप्पा करत बसलो होतो. साधारण 11 वाजत आले होते. वर्दळ कमी होत होती आणि वातावरण शांत होत होतं. पण हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या खोकण्याच्या, कुजबुज करण्याचा आवाज शांततेला चिरत कानावर पडत होता. मी बसूनन बसून कंटाळून गेलो होतो म्हणून शिवम ला म्हणालो की मी जरा बाहेर पाय मोकळे करून येतो, तू इथेच बस. हॉस्पिटल च्या बाहेर पडलो तर रस्त्यावरच्या लाईट्स बंद असल्यामुळे मिट्ट काळोख पसरला होता. मी चालायला सुरुवात केली आणि अचानक रस्त्याच्या कडेलगतच्या झाडामागून एक किंचाळी ऐकू आली. मी दचकलो आणि जागेवरच थांबलो. इथे घडत असलेल्या प्रकाराची आठवण झाली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी कसलाही विचार न करता मागे वळलो आणि हॉस्पिटल मध्ये आलो.

मी आणि शिवम आदित्य च्या शेजारी बसून होतो. बोलता बोलता शिवम झोपला पण झालेल्या प्रकारामुळे माझी झोप उडाली होती. या परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ती अमानवीय शक्ती हीच तर नसेल. या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायलाच हवा. मी घडाळ्यात पाहिले, तर एक वाजून गेला होता. मी हॉस्पिटल च्या वॉचमन ला घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी आलो. मी त्याला त्या झाडाकडे खुणावून म्हणालो की “हे बघा हेच ते झाड, इथूनच मला एक किंचाळी ऐकू आली होती.. माहीत नाही नक्की काय प्रकार आहे”. इतके बोलून मी मागे वळलो तर मागे कोणीही नव्हते. त्या काळोखी निर्जन रस्त्यावर मी एकटाच होतो. मी त्याला शोधू लागलो आणि शोधत त्या झाडाखाली आलो. त्या झाडावरून कसलासा आवाज आला म्हणून मी वर पाहिले आणि माझी बोबडीच वळली. भीतीने माझे हात-पाय थंड पडले, तोंडातून एक शब्द ही फुटत नव्हता. त्या झाडावर एक बाई बसली होती. तिच्या तोंडातून रक्ताची लाळ सांडत होती, संपूर्ण चेहरा फाटला होता, शरीर जळालेलं आणि जागोजागी कापलेलं. हातांची नख लांबलचक एखाद्या धारधार सुरीसारखी भासत होती. ती बाई त्या झाडाच्या फांदीवर एका माणसाच्या छातीवर बसली होती, काही तरी खात होती, कदाचित त्याच हृदय… मी दबक्या पावलांनी मागे सरकलो जेणेकरून माझी चाहूल तिला जाणवू नये. मी काही अंतर गेल्या नंतर सरळ धावत सुटलो. समोर हॉस्पिटल चे गेट दिसत होते पण तितक्यात मला ठेच लागली आणि मी खाली पडलो.

तोपर्यंत त्या बाई ला माझ्या असण्याची चाहूल लागली होती. अतिशय वेगाने ती सरपटत माझ्या दिशेने येऊ लागली. ठेच लागल्यामुळे मी वेदनेने कळवळत होतो पण तरीही धडपडत उठायचा प्रयत्न करू लागलो. पण शेवटी माझी धडपड व्यर्थ ठरली आणि मी तिच्या तावडीत सापडलो. तिने माझ्या पायाला धरून खेचले आणि माझ्या छातीवर बसून म्हणाली “मगाशी वाचलास, पण आता नाही”..

भीतीमुळे माझ्या शरीरातील सगळा त्राण संपला होता. माझा मृत्यू समोर दिसत होता. माझे कुटुंब, मित्र सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले, मी मनातून देवाचा धावा करू लागलो. तोच तिने माझ्या छातीत तिची नख खुपसायला सुरुवात केली आणि तितक्यात मला आवाज आला “हरेश काय झालं, असा का पडला आहेस, चक्कर वैगरे आली का”.. शिवम काळजीने विचारत होता. मी भानावर आलो आणि समोर पाहिले. ती बाई कुठेच दिसत नव्हती. मी प्रचंड घाबरलो होतो म्हणून मला धीर देत तो आत घेऊन गेला. मनात विचार आला की आज माझा मित्र देवासारखा धावून आला. पण हे प्रत्यक्षात घडले की फक्त भास हे मला समजत नव्हते. विचार करतच मी गाढ झोपून गेलो. सकाळी उठलो तेव्हा छातीत चरचरत होते. मी शर्ट काढून पाहिले तर माझ्या छातीवर नख खुपसण्याच्या खुणा होत्या….