दिलदार कजरी - 2 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 2

२.

दिलाची हाक

आपल्या बापाने सोडलेला हुकूम ऐकून दिलदार खरेच गोंधळला. खरेतर घाबरला म्हणावे. आजवर शहरी संस्कृती त्याने पाहिली नव्हती. पण देशाची प्रगती झाली तशी गावागावातून वीज खेळू लागली. म्हणजे वीज प्रत्यक्षात ही खेळू लागली नि त्यानंतर लपंडाव ही खेळू लागली. पण सदैव भुकेल्यास खायला काहीही मिळाले तरी चालते. त्यामुळे विजेचे दिवे रात्री एक तास जरी मिणमिणता उजेड पाडत असले तरी गावे खुश होती. पाठोपाठ गावात टीव्ही पोहोचला. गावच्या चावडीवर सामायिक टीव्ही नि सामायिक कार्यक्रम दर्शनाचा कार्यक्रम होऊ लागला. गावातील वारे चंबळच्या खोऱ्यात न वाहते तरच नवल. चंबळच्या डाकूवर्गात ह्या उजेड पाडणाऱ्या दिव्यांची बात पसरली नि त्या पाठोपाठ हलती चित्रे दाखवणाऱ्या डब्याची ही. त्यानंतर गावोगावी नि चंबळच्या खोऱ्यात चित्र अजून बदलत गेले. शेजारच्या एका गावातून धान्याऐवजी टीव्ही लुटून आणला गेला. त्यात रात्रीच्या प्रहरी सगळे बसून चित्रपट पाहू लागले .. आजवर फक्त डोंगर दऱ्या बघितलेल्यांना टीव्हीतील सुखी आयुष्य दिसले, आपल्या ओबडधोबड आयुष्याऐवजी या चकचकीत आयुष्याचा हेवा वाटू लागला तर नवल नव्हते. काही थोडे टोळीकर मात्र आपल्या व्यवसायाशी इमान राखून होते. उगाच स्वत:च्या डोळ्यांनी प्रत्यक्षात कधी न पाहिलेल्या चकचकीत आयुष्याची झगमगीत स्वप्ने पाहणे म्हणजे आपल्या दरोडेखोरीच्या व्यवसायाशी नि त्यातून मिळणाऱ्या दोन घासांशी प्रतारणा .. असे जुने जाणिते नि संतोकसिंगाचे निष्ठावान सेवक म्हणू लागले, काहींना ते पटत होते, काहींना नाही.

आणि इकडे दिलदारसिंगच्या दिलात तर काही वेगळेच घडत होते ..

टीव्ही आला नि त्यावरील चित्रपटांनी सगळ्यांवर गारूड केले. कुणाला त्यातील श्रीमंती आवडली, कुणाला त्यातील चकचकीतपणा. तो आपल्या खडबडीत आयुष्यापुढे कधी कधी जास्तच जाणवू लागला. पण दिलदारच्या दिलात बसला तो शोले.

समशेरसिंग त्याचा दोस्त. खरेतर टोळीतील एक, पण दोस्ती होती ती दोघे एकाच वयाचे म्हणून. समशेरसिंगचा बाप ही त्याच टोळीतील. संतोकसिंगचा निष्ठावान सेवक म्हणावा असा. शोले पाहून दिलदार अस्वस्थ झाला. समशेरला म्हणाला,

"यार समशेरा.."

"जी सरदार .."

"तुला कसा वाटला हा शोले?"

"खूप जुना आहे सरदार. खूप जुना चित्रपट."

"जुना असू देत. पण तुला कसा वाटला?"

आपल्याकडे ही एक पद्धत आहे. कुणाच्या हाताखालील कुणाला जर एखाद्या गोष्टीबद्दल मत विचारले तर तो आपल्या वरील जो कोणी असेल त्याच्या मताचा आधी अंदाज घेतो. मग 'जो तुमको हो पसंद वही बात' सांगतो.. त्या पद्धतीला जागत समशेर म्हणाला,

"तसा चांगलाच आहे सरदार .."

"आणि गब्बरसिंग?"

"ठीकच आहे म्हणायचा सरदार.."

"तुला पटतो तो?"

"मला?"

"मला अजिबात नाही पटत. शेवट तर नाहीच पटत .."

"सरदार .. खरंय. तो शेवट काय बरोबर नाही."

'शेवट? सगळाच सिनेमा बरोबर नाही. त्यात जय मारला गेला, पण जिवंत असता तर एक मिळाली असती. वीरूला बसंती मिळाली. दोघे साधे चोर.. गुंड. आणि गब्बर? एवढा मोठा दरोडेखोर. त्याची अशी बेइज्जती? त्याच्यासाठी कोणीच नसावी? दरोडेखोरांचा असा अपमान? डाकू बनण्यासाठी केलेली इतकी मेहनत पाण्यात जावी? समशेरा, दरोडेखोरीला प्रतिष्ठा नाही यार .."

"सरदार, इतके मनाला लावून नाही घेऊ. सगळेच काल्पनिक. गोष्टच आहे नुसती ..एका डोळ्याने पहावी नि दुसऱ्या डोळ्याने सोडून द्यावी."

गोष्ट? एखाद्या काल्पनिक गोष्टीतही एका काल्पनिक गुंडास काल्पनिक बसंती पटावी.. आपल्याच अलाइड ब्रांच मधला तो.. ती ब्रांच मात्र काल्पनिक नाही. डाकू गब्बरसिंग पण खराखुरा. पण त्याच्यासारख्या स्पेशालिस्ट दरोडेखोरास कोणीच मिळू नये? इतकी दरोडेखोरी अप्रतिष्ठित का असावी? दिलदारासिंगाच्या मनी वैषम्य दाटून आले. काय करावे? काय करावे की अशी कोणी बसंती आपल्यालाच मिळेल? पण इथे बसंती आहेच कुठे? आणि या डोंगरखोऱ्यात घोड्यावरून बंदुका घेऊन फिरण्यात एखादी ती सापडावी तरी कशी? नि सापडलीच ती तर आपल्यावर फिदा व्हावी ती कशी?

तारूण्यसुलभ विचारांच्या अग्नीत टीव्हीवरच्या हिंदी चित्रपटांतील प्रेमकथांचे तेल ओतले जाऊ लागले. 'वन्ही तो चेतवावा' म्हणत तो अग्नी धगधगू लागला. माणसे मारण्याहून नि लुटालूट करण्याहून ही गोष्ट जास्त भुरळ पाडू लागली.. संतोकसिंग त्याला डाकूगिरीत पुढे आणू पाहात होता, पण दिलदारसिंगच्या दिलाची हाक काही और होती. संतोकसिंग आपली राजकीय कारकीर्द घडवण्यात मग्न होता नि दिलदार आपल्या दिलाचे तगादे ऐकत काहीतरी घडवण्याच्या प्रयत्नात. अशात टोळीकडे दुर्लक्ष झाले तर नवल नव्हतेच.

.. पण टोळीचा दबदबाच इतका.. खरेतर संतोकसिंगाची पुण्याई म्हणा.. म्हणजे समाजशास्त्रात सांगितले जाते, समाज व्यवस्थित चालायचा असेल तर व्यवस्था निर्माण करा, ती सुरळीत चालली तर ती चालवणारी व्यक्ती असो वा नसो, ती तशीच चालत राहिल. संतोकसिंग कधी न शाळेत गेला, न कधी शिक्षण घेतले. पण त्याने आपल्या टोळीत ही अशी व्यवस्था लावून दिली होती. त्यामुळे त्याची टोळी एखाद्या सुनियोजित कंपनीसारखी चालली होती. सारे टोळीतले सदस्य आपापली नेमलेली कामे इमाने इतबारे करत होते. संतोकसिंगचा दबदबा कायम होता. दिलदारसिंगचे नाव अजून झाले नव्हते. खरेतर आजवर दिलदार कोणत्याच डाकू मोहिमेत सामील झाला नव्हता. अगदी उमेदवारीच्या दिवसांत ही. म्हणजे बाप संतोकसिंग मागे लागे.. प्रत्यक्ष आॅन फिल्ड ट्रेनिंग महत्त्वाचे हे सांगण्याचा प्रयत्न करे.. पण दिलदार काही ना काही कारण सांगून ते आजवर टाळत आलेला. नाही म्हणायला लहानपणी हौस म्हणून बापाच्या घोड्यावर बसून एक दोनदा त्याने दरोडेखोरीचा अनुभव घेतलेला. लुटून आणलेल्या सामानाला हात लावून ऐटीत परतलेला. पण नंतर त्याला त्यात गंमत वाटेनासी झालेली. बडे बापका बेटा नसता तर टोळीत त्याला कुणी विचारलेही नसते. पण कित्येकदा जन्मावर गोष्टी अवलंबून असतात. खरेतर खूप काही. म्हणजे एखाद्याचा धर्म, जात, सामाजिक उतरंडीतील पायरी नि ती सांभाळून राहण्याची गरज, एखाद्याला मिळणारा किंवा न मिळणारा सन्मान .. वगैरे गोष्टी सर्व त्याच्या हातात नसलेल्या, कोणाच्या पोटी जन्म होतो यावर ठरत असतात. त्यामुळे बाकी समाजापासून फटकून असलेला हा चंबळमधील डाकूवर्ग याबाबतीत तरी मुख्य प्रवाहातच होता. आणि दिलदारसिंगला सरदार म्हणून आपला बाॅस मानत होता, जरी दिलदारसिंगला आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात फारसा रस नव्हता तरीही. म्हणजे त्याला रस आधीही नव्हताच.. आणि आता तर..

दिलदारच्या दिलाचा तगादा वाढत चाललेला. दिलाची हाक काही और होती आणि वास्तव काही और. त्यात आजवर न जाणवणारी गोष्ट त्याला नव्याने जाणवू लागलेली. स्वतः दिलदारची आई.. तिला संतोकसिंगाने आपल्या बंदुकीच्या जोरावर पळवून आणलेले. जिंकून नव्हे. आजूबाजूचे साथीदार आपापल्या वकुबाप्रमाणे तसेच करताना दिसत होते. आणि इकडे चितचोर नि रजनीगंधा सारखे जुने हळुवार चित्रपट पाहून दिलदार हळवा होत होता. धाकदपटशाने असली नाती जुळवण्यात कसली आलीय गंमत? हळुवार प्रेमकथा या चंबळच्या खोऱ्यात घडावी.. अशी की चंबळवासियांना उचंबळून यावे.. सोहनी महिवाल.. हीर रांझा सारखी दिलदार.. नि कुणाची तरी प्रेमकहाणी वर्षानुवर्षे सांगितली जावी.. पण हे घडावे कसे? आजवर गावागावातून फिरताना कुणाला पाहून 'कुछ कुछ होता है' असे काही झाले नव्हते. आणि डाकूंच्या टोळीतील कोणावर कुणी गाव की छोरी भाळेल अशी शक्यता ही नव्हती .. मग भलेही त्या रांगड्या,ओबडधोबड नि काटेरी रानटी झुडुपांसारख्यांच्या जंगलात हा रानटी का होईना पण गुलाबासारखा फुललेला कुणी असो..

दिलदार असा रानटी का होईना पण गुलाबाच्या फुलासारख्या मनाचा होता. बाहेर काटे दिसत असतील, ते आजूबाजूच्या परिस्थितीचे असतील, पण दरोडेखोरीत त्याचे कोमल मन काही रमेना. आणि यातून बाहेर पडण्याचा मार्गही काही दिसेना. सरदार संतोकसिंगचे कितीही दुर्लक्ष झाले तरी दिलदारचे मन काही या दरोडेखोरीच्या परंपरागत व्यवसायात नाही हे त्याला दिसत होतेच. अशा तरण्या वयातील कोणास काही समस्या दिसली तर लगेच त्याचे लग्न उरकून टाकायची पद्धत आपल्याकडे आहे. पण संतोकसिंग शहाणा होता. इतके पावसाळे अंगावर झेलल्याने त्याला समोर जाणवत होते.. ते एकच.. दिलदारला विवाह बंधनात अडकवणे हा काही त्यावर उपाय नाही. अर्थात त्याच्यासाठी कोणत्याही गावातून कोणालाही उचलून आणणे अशक्य तर नव्हतेच.. पण दिलदारची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत .. करावे तर काय नि कसे करावे?