दिलदार कजरी - 6 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 6

६.

पहिले पाऊल

पुढील काही दिवस गावात फेऱ्या मारून मारून दिलदार थकला. घनघोर फेऱ्या झाल्या पण गावात कजरी दर्शन झाले नाही. देवळात देवीचे दर्शन होई. नि ती पावेल तर कजरी भेटेल.. कदाचित. विचारात मग्न दिलदारला कसलीच शुद्ध नव्हती आजकाल. समशेर आणि बाकी साथीदार तसे मोहिमा आखण्यात मग्न होते. आणि दिलदार आपल्या दुखऱ्या दिलाची मलमपट्टी करण्यात. येता जाता आता कजरीच्या गावचे पण ओळखीचे होतील की काय.. दिलदार त्या विचाराने अस्वस्थ होई, पण इतर काही न सुचून परत त्या देवळाकडे पुजारी कन्येच्या शोधात जाई. शेवटी काही दिवसांनी कजरी दिसली आणि दिलदारच्या दिलात दिल आले, म्हणजे जिवात जीव आला! थोड्याच दिवसांत मग अजून दोन गोष्टी घडल्या. पुढे होणाऱ्या मोठया घटनांची नांदी म्हणाव्या अशा! जे घडले ते अघटित होते.. अभूतपूर्व म्हणावे असे. आधी कोणी या डाकूवर्गातील कोणी कविता केली नसेल नि अशी गोड गुलाबी स्वप्ने पाहिली नसतील. दिलदारचे ते आधीच करून झालेले. आता पुढची पायरी! म्हणजे सात पिढ्यात कधी झाले नव्हते ते दिलदार करू पाहात होता.. पहिले पाऊल पडत होते.

हरीनामपूर चंबळच्या खोऱ्यापासून तसे दूरचे गाव. नदीकिनारी वसलेले. फार समृद्ध नसेल, पण गावात एक शाळा होती. तशा स्वतंत्र भारतात शाळांच्या इमारती गावागावातून दिसतात, पण इथे शाळेत एक मास्तर ही होते. शिक्षणबाह्य सरकारी कामे संपवून मुलांना शिकवण्याबद्दल त्यांची ख्याती होती. अशा गोष्टी लपून राहात नाहीत. म्हणजे गावातील शाळा, त्यात शिकवणारे शिक्षक असले आक्रित घडत असेल तर चर्चा तर होणारच. मास्तर असे आजूबाजूच्या गावात प्रसिद्ध होते. दररोज ते आपल्या सायकलीवरून ये जा करत नि गावकरी त्यांना मान देत. तशी गावातील शाळामास्तरांना मान देण्याची पद्धत आपल्याकडे नाही. पण हे हरिनाथ मास्तर एक अपवाद. तर ह्या हरिनामपुरात सकाळ सकाळी संतोकसिंगाच्या टोळीचा डाका पडला. घोड्यांच्या टापांचा आवाज गावात घुमला. धुरळा उडवत डाकू आले. गावकरी आपल्या घराघरात दडून बसले. अर्ध्या तासाने सारे शांत झाले.. तेव्हा गावकऱ्यांच्या ध्यानी आले, ते हे की गावातून लुटालूट झालीच नाही. नुसतेच दरोडेखोर येऊन गेले.. दोन दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की हरिनाथ मास्तर बेपत्ता आहेत!

समशेर आणि त्याच्या साथीदारांनी हरिनामपुरातून अपहरण केले ते हरिनाथ मास्तरांचे. ते ही त्यांच्या सायकलीसकट! असे सगळे करण्याची तशी सवय होती सगळ्यांना, अपहरण करावे, खंडणी गोळा करावी, त्या जोरावर कमाई करावी, ती पैशाचीच नाही तर टोळीच्या दहशतीची. टोळी अशानेच प्रसिद्धी पावते. दहशत जितकी जास्त तितकी टोळीची सुरक्षा जास्त. म्हणजे कोणी पोलिसांना खबर वगैरे देण्याच्या फंदात पडत नाही. पण मास्तरांचे अपहरण करण्याचा उद्देशच वेगळा होता. मास्तर आणि त्यांची सायकल, दोन्ही जंगलात पोहोचवण्यात आले. मास्तरांच्या डोळ्यावरची नि तोंडावरची पट्टी निघाली, तेव्हा मास्तरांना कळले की कुठल्या तरी जंगलात त्यांना आणण्यात आले आहे..

तत्त्वत: दिलदार अशा अपहरणाच्या विरूद्ध होता. कजरीला तो कधीच असे पळवून आणायला तयार झाला नसता. पण मास्तरांची गोष्ट वेगळी. स्वतः दिलदार हरिनामपुरात डाका घालायला गेला नसला तरी प्रेमात सारेच क्षम्य म्हणत मास्तरांच्या अपहरणास त्याने समशेरला मूक संमती दिली होती. म्हणजे झाले असे की, आधी दिलदारने आपल्या दिलाची इच्छा समशेरला सांगितली. समशेरच्या सुपीक डोक्यातून ही मास्तरांना सायकली सकट पळवून आणण्याची कल्पना उगवली.. उगवली आणि तिची अंमलबजावणीही तत्काळ झाली. अर्थात संतोकसिंगास यातील काही कळू न देता.

अपहरण पार पडले. हरिनाथ मास्तर त्या जंगलात टोळीच्या तंबूबाहेर थरथरत उभे होते. इतका वेळ डोळ्यावरच्या पट्टीमुळे अजूनही बाहेर जरा अंधुक अंधुकसे दिसत होते. 'गुरूर्देवो नम:' दिलदारला असे काहीसे आठवले, तसा पुढे होत तो मास्तरांना म्हणाला,"नमस्ते गुरूजी."

एखाद्या डाकूला कोणाच्या पाया पडणे शोभले नसते, पण दिलदार त्यांच्या पाया पडला. असे ही दिलदार आजवर त्या टोळीत राहात होता, इतके सोडले तर त्याच्यात डाकूत्वाची लक्षणे होतीच कुठे?संतोकसिंगाला तर आपल्या घराण्याची बेअब्रू करणारा दिवटा असे वाटू लागलेले त्याच्याबद्दल ते उगीच नाही. अपहृत कोणाच्या पाया पडण्याचा त्या टोळीतला हा पहिलाच प्रसंग. सात पिढ्यात झाले नसेल अशा गोष्टी घडण्याची ती सुरूवात म्हणावी!

समशेर आणि दिलदारने मास्तरांना जवळच्या तुटक्या खुर्चीवर बसवले. तुटकी असली तरी ती खुर्ची होती, आणि मास्तरांना मान देण्याची त्यांची ती पद्धत होती.

"आधी खाऊन घ्या गुरुजी. मग निवांत बोलू.."

समशेर म्हणाला तेव्हा घाबरलेल्या मास्तरांना आपल्या तोंडाला पडलेली कोरड जाणवली. आजवर अपहरणाच्या गोष्टी ऐकलेल्या त्यांनी. अपहृताचे होणारे हाल पाहिलेले. पै पै गोळा करून खंडणी देत लोक आपलेच आयुष्य विकत घ्यायचे ते पाहिलेले. एखाद्या मास्तराचे अपहरण करून या डाकू लोकांना कसली कमाई होणार याचा त्यांना अंदाज येत नव्हता. एकतर ते स्वतः सदाफटिंग. आगेमागे कोणी नसताना त्यांच्या सुटकेसाठी कोण कशाला त्या डाकूंना खंडणी देणार? पण इकडे माहौलच वेगळा वाटत होता. मास्तर अधाशासारखे पाणी प्यायले. मग आजूबाजूला पाहिले. समशेर आणि दिलदारसिंग दोघेच बाजूला होते. दोघांचे वेश डाकूसारखे असतील पण हातात ना बंदूक होती न राकट चेहऱ्यावर उर्मट वा उग्र भाव..

"गुरुजी, तुम्ही इकडे सुरक्षित आहात. कोणी तुमचा बाल ही बाका करणार नाही."

"ते ठीक आहे. पण मला आणून काय मिळणार आहे तुम्हाला? माझ्या पुढे मागे नाही कोणी.."

"गुरुजी, तुम्ही करू शकाल ते अन्य कोणीच करू शकणार नाही."

"अरे, पण माझा काय दोष की मला पळवून आणलेत. नि माझ्या सुटकेची वाट पाहणारे तर कोणीच नाहीत."

"आम्ही आहोत गुरुजी. आमचे काम करून द्या. तुम्हाला सन्मानाने गावात परत सोडतो. हा एका ठाकूराचा शब्द आहे."

"तुमचे काम? आणि मी? एक शिकवणे सोडले तर मला दुसरे येते ते काय?"

"तेच हवे गुरुजी. तेच हवे."

 

शिकण्यासाठी लागते ते पुस्तक आणि पाटी पेन्सिल नाहीतर वही आणि पेन.. पेन्सिल. मास्तरांनी हे सांगितले तसा समशेर उठून उभा राहिला. घोड्यावर टाच मारून निघणार तोच मास्तर म्हणाले,

"लुटून नको. विकत आणणार असशील तर शिकवेन.. विद्या हवी ती ओरबाडून घेता येत नाही .."

समशेर थोडा चपापला.

"ठीक आहे गुरुजी. गावातून पैसे देऊन आणतो."

"गावात ना? मग तू कशाला? मीच जातो.." दिलदार म्हणाला. कजरीला पाहून दोन दिवस उलटून गेलेले. त्या निमित्ताने बाहेर तर पडता येईल.. मोठया उत्साहाने दिलदार उठला.

"गुरुजी, तोवर तुम्ही जेवून घ्या. मी येतो परत.."

"दिलदार, पण लगेच परत यायला विसरू नकोस.. नाहीतर तिकडेच राहशील उभा बघत.. आणि येताना सामान आणायला मात्र विसरू नकोस..नाहीतर होशील दंग नि ज्या कामासाठी गेलास तेच विसरशील."

या जंगलात शिक्षण? हे शिक्षणाचे वेड दिलदारच्या दिलात कुठून शिरले असेल? ते ही एका शिक्षकाचे अपहरण करून? मास्तरांनी जास्त चौकशी केली नाही, पण मामला काही और आहे हे कळले त्यांना. त्यांना घाई तर नव्हतीच आणि शाळेत काय नि इकडे काय, हाडाच्या शिक्षकाला शिकवायला मिळणे महत्त्वाचे. दिलदार गावातून खुशीत परतला. कजरी दर्शन झाल्याने गाडं खुशीत होतंच. मास्तरांनी सांगितलेले सारे वह्यापुस्तकांचे नि पाटी पेन्सिलीचे सामान त्याने खाली टाकले. मास्तरांनी जेवून घेतलेले. तसे जेवण तिखटजाळ होते. त्या डाकू संप्रदायाच्या एकूण वागण्याला शोभावे असे. पण दिलदार आणि समशेर दोघेही त्यांच्याशी अदबीने वागताना मास्तर पाहात होते.. जे जे होईल ते ते पहावे म्हणत मास्तर बसून राहिले. दिलदार नि समशेर दोघे त्यांची काळजी घेत होते. आजवर डाकूंबद्दलचा अनुभव त्यांचा असा काही नव्हता. या मागे काय कारण असावे याचा अंदाज त्यांना मात्र लागत नव्हता.